नाटय़संमेलन म्हटले की नाटके ही आलीच. बेळगावात दिमाखात पार पडलेल्या ९५व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनातही ती नेहमीप्रमाणेच झाली. मुळात हल्ली संमेलन हेच एक नाटक असते. नाटके चालत नाहीत. प्रयोग परवडत नाहीत. कलाकार टीव्ही मालिकांच्या घाण्याला जुंपून घेण्यास प्राधान्य देतात. कारण प्रश्न फक्त मानधनाचा असतो. अशा वातावरणात रंगभूमीच्या समृद्धीची नाटय़गीते संमेलनाध्यक्ष फैयाज यांनी खुशाल गावीत, परंतु त्या लकेरींनी रंगभूमीच्या नेपथ्याचे उडालेले रंग काही दृष्टिआड होणार नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संमेलनाचे उद्घाटन करताना रंगभूमीचे ते स्वरूप नेमके समोर आणले. सर्कस, तमाशा या कलाप्रकारांची वाताहत झाली तसे दिवस रंगभूमीला येऊ नयेत अशी सदिच्छा त्यांच्या भाषणात होती. त्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे असेही ते म्हणाले. पण सरकारच्या जिवावर तगू पाहणाऱ्या कला टिकत नसतात. त्या काळातील समाजाला ती भावली पाहिजे, आपली वाटली पाहिजे. नाटकांबाबत ते घडत नाही याचे कारण गावोगावी नाटय़गृहे नाहीत वा कलाकारांना कमी मानधन मिळते हे नाही. चांगल्या प्रेक्षकांना पाहायला आवडतील अशी चांगली नाटके नाहीत हे ते कारण आहे. ती आली की प्रेक्षकही येतील आणि पसेही. चांगली नाटके कशी येतील हे ठरविण्याचे स्थळ संमेलन असू शकत नाही. जमावाला प्रतिभा नसते. तरीही प्रत्येक संमेलनामध्ये रंगभूमीच्या उद्धारासाठी गळे काढले जातात. बालरंगभूमी हा तर त्यासाठीचा प्रिय विषय. नव्या संमेलनाध्यक्ष फैयाज यांनीही बालरंगभूमीला बळ देण्याचे आवाहन केले. खेडय़ापाडय़ातल्या पालकांनी बखोटे धरून मुलांना नाटकांना बसविले तरी ही रंगभूमी सशक्त होणार नाही, हे कधी तरी लक्षात घेतले पाहिजे. हीच गोष्ट संगीत रंगभूमीची. पण त्यावर बोलण्यातच सर्वाना रस दिसतो. अलीकडे तर संमेलनात फक्त वक्ते आणि त्या-त्या गावातले रसिक मायबाप तेवढे दिसतात. ज्यांनी रंगभूमीची पालखी वाहायची असते ते प्रथितयश, तरुण कलाकार मात्र जमल्यास िदडीत वगरे नाचून जातात तेवढेच. बेळगावात तर तेही दिसले नाही. मग याला नाटकवाल्यांचे संमेलन कसे म्हणावे? ते तर मनोरंजनाचे न-नाटय़च. असेच आणखी एक न-नाटय़ या संमेलनात झाले. ते सीमावादाचे. हा एकूणच मराठी संमेलनांचा आवडता विषय आहे. हे संमेलन तर थेट कर्नाटकातच भरवण्यात आले होते. त्यामुळे सीमावादावर वाद होणार हे गृहीतच होते. तसे झालेही. बेळगावातील मंडळींनी उद्घाटन सोहळ्यात घोषणाबाजी केली. शरद पवार यांनी आपले भाषण संपवताना जयिहदचा नारा दिला आणि त्यानंतर जय महाराष्ट्र म्हणण्याऐवजी नमस्कार केला. त्यांचा हा नमस्कार महाराष्ट्राने केलेला नमस्कारच होता, हे प्रांतवादाच्या राजकीय पोळ्या भाजणारांनी लक्षात घेतलेले बरे. मुळात रंगभूमीलाच घरचे थोडे झालेले असताना हे सीमावादाचे घोडे खांद्यावर घेण्याची आवश्यकता नाही. ते त्यांचे काम नाही. त्याने संमेलनाला चमचमीतपणा येत असल्याने हा परिपाठ कायम राहिला असावा. तर ही न-नाटय़े सोडली तर मग या संमेलनाबद्दल बोलण्यासारखे फारसे काहीच उरत नाही. नेहमीप्रमाणे सारे काही शानदार, दिमाखदार झाले व संमेलनाचे सूप वाजले, इतकेच!

Story img Loader