फक्त मतांकडे लक्ष ठेवून काँग्रेस सरकारचा कारभार कसा चालतो हे आंध्र प्रदेशातील ओवेसी अटक प्रकरणावरून दिसते आहे. समाजात दुही माजविणारी प्रक्षोभक भाषणे देण्याबद्दल ओवेसी बंधू प्रसिद्ध आहेत. एमआयएम (मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन) हा त्यांचा पक्ष फक्त दुहीच्या राजकारणावर उभा राहिलेला आहे. बहुसंख्याकांचा धाक दाखवून अल्पसंख्याकांना आक्रमक करायचे आणि मते मिळवायची हा प्रकार भारतात वर्षांनुवर्षे चालतो. एमआयएम हा त्या परंपरेतील पक्ष. अशा पक्षांना अधूनमधून बरे दिवस येतात. एमआयएमला सध्या तसे दिवस आले आहेत. आंध्र प्रदेश विधानसभेत या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. तेथील काँग्रेसचे सरकार या पक्षाच्या पाठिंब्यावर उभे असल्याने ओवेसी बंधूंना मोकळे रान मिळाले. या बंधूंपैकी आमदार असलेले अकबरउद्दीन ओवेसी यांनी हिंदू समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह व धमकी देणारी विधाने डिसेंबर महिन्यात केली. ते भाषण इतके प्रक्षोभक होते की त्यांच्यावर लगेच कारवाई होणे आवश्यक होते. परंतु, आंध्र प्रदेश सरकारमध्ये तितकी हिंमत नव्हती. हे भाषण नंतर यू-टय़ुबच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित झाले आणि ओवेसींच्या विरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटली. अपेक्षेप्रमाणे भाजपने हा विषय उचलून धरला. ओवेसींच्या अल्पसंख्याकांच्या राजकारणाला बहुसंख्याकांचा संताप हे भाजपचे उत्तर असते. निवडणुकीसाठी ते दोघांनाही उपयोगी पडते. परंतु, अल्पसंख्य वा बहुसंख्याकांचे राजकारण करण्याची संधी मिळावी अशी परिस्थिती का निर्माण होते हा कळीचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर मतांच्या राजकारणात आहे. ओवेसी यांनी प्रक्षोभक भाषणे आजच केलेली नाहीत. गेली पाच वर्षे ते वेगवेगळ्या कारणांनी अत्यंत हिंसक व प्रक्षोभक भाषणे करीत आहेत. पण त्यांच्यावर कारवाई दूर राहिली, या वक्तव्यांचा साधा निषेध कोणी केला नाही. काँग्रेसमधील दिग्विजयी वाचाळवीर अशा वेळी एकदम गप्प बसतात. नि:पक्षपातीपणे सरकार चालविण्यापेक्षा सत्ता टिकविणे काँग्रेससाठी महत्त्वाचे असल्याने ओवेसी यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस पुढे होताच आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून सबुरीचा आदेश मिळतो. उर्दूचा भाषांतरकार उपलब्ध नाही, म्हणून कारवाई करता येत नाही, असे निजामाच्या हैदराबादमधील पोलीस सांगत होते व जनतेने त्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करीत होते. तोपर्यंत ओवेसी लंडनला गेले. लंडनहून परतल्यावर हैदराबाद विमानतळावर ते मोठय़ा दिमाखात उतरले, पण पोलिसांनी बोलावणे पाठविताच त्यांची तब्येत बिघडली. चौकशी करण्याइतके ते बरे आहेत की नाही हे आता सरकारी डॉक्टर ठरविणार आहेत. अखेर ही टाळाटाळ अशक्य झाल्यानंतर ओवेसी यांना अटक झाली आहे. वास्तविक, आंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्याशी ओवेसी बंधूंचे जमत नाही. दोन महिन्यांपूर्वी एमआयएमने सरकारचा पाठिंबा काढून घेतला व त्यानंतर हिंसक भाषणे करण्यास सुरुवात केली. रेड्डींशी जमत नसले तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी ओवेसींचे चांगले सूत जमले आहे आणि त्या आधारावर ते पोलीस कारवाई चुकवीत आहेत. २०१४च्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून हे सर्व राजकारण सुरू आहे. तेलंगणातील ११९ विधानसभा मतदारसंघांपैकी किमान ७० मतदारसंघांत ‘अल्पसंख्य विरोधात बहुसंख्य’ हे राजकारण प्रभावी ठरणार असल्याने काँग्रेस ओवेसींना चुचकारीत आहे.  नांदेडच्या निवडणुकीत ओवेसींनी ताकद दाखविल्याने काँग्रेसला त्यांची साथ सोडवत नाही. समाजात वितुष्ट वाढले तर त्याची काँग्रेसला चिंता नाही. सत्ता मिळविण्याला वा टिकविण्याला तेथे प्राधान्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा