पोस्टल कूपन विनिमय-व्यवहारातील नफ्याचे प्रमाण २३० टक्के असल्याचे पाहून पोन्झीने कंपनीच स्थापली आणि ४५ दिवसांत ५० टक्के नफ्याची जाहिरातही केली. गोणी भरभरून पैसे जमू लागले..
चार्ल्स पोन्झी विदेशी चलनात उलाढाल करण्यात फारसा कधी गुंतला नव्हता. पण त्याने बँकेत आणि संबंधित वित्त कंपन्यांत नोकरी केली होती. त्यामुळे या चलनबाजाराची त्याला थोडी कल्पना  होती. व्यापारी वर्तमानपत्रात चलनाचे दर मिळतात ते पाहून संबंधित दलालाकडून दुसरे चलन खरेदी करायचे किंवा विकायचे अशा सामान्य व्यवहाराची त्याला पुरेशी ओळख होती. ‘पोस्टल युनियन करारा’त ठरवला गेलेला दर पहिल्या महायुद्धापूर्वी ठरला होता. महायुद्धामुळे व्यापारात उलथापालथी झाल्या. परिणामी, देशादेशातील चलनाचे देवघेवीचे दर अतोनात बदलले होते. पोन्झीच्या  चाणाक्ष नजरेने नेमके हेच हेरले. पोस्टल युनियनच्या दरानुसार ‘कुपन’ मिळवायचे तर तो दर अगोदर पूर्वी ठरलेलाच आणि चलनबाजारातला चलनाचे विनिमय दर भलतेच वेगळे! पोन्झीच्या डोक्यात विचार तरळू लागले. पूर्वी एका डॉलरचे पाच इटालियन लिरा मिळायचे. आता डॉलरचे वीस इटालियन लिरा मिळतात. इटलीमध्ये वीस लिरामध्ये ६६ पोस्टल कुपन मिळतील. तीच अमेरिकेत आणून विकली तर पोस्टल युनियनच्या ठरीव दरानुसार ३३० सेंटला विकली जातील. म्हणजे  ३.३० डॉलरला! पोन्झी यातल्या नफ्याच्या  दराकडे पाहून भांबावून परत परत वेगवेगळ्या चलनाचे आणि पोस्टल कुपन त्रराशिक आणि पंचराशिक करून ताळा पाहू लागला! एक डॉलर विकायचा त्याचे वीस इटालियन लिरा मिळवायाचे. त्याची  ६६ पोस्टल कुपन घ्यायची. ती अमेरिकेत आणून विकायची. त्याचे ३.३० डॉलर  मिळवायचे! म्हणजे या उलाढालीमुळे एक डॉलर गुंतवणूक केली की त्याचे ३.३० डॉलर मिळतात. म्हणजे नफ्याचे किंवा परताव्याचे प्रमाण पडते २३० टक्के. या उलाढालीचा खर्च होईल, त्यापोटी तीस टक्के गेले समजा! तरी २०० टक्के नफा! पोन्झीचा प्रथम विश्वास बसेना. तो फिरून फिरून हिशोब करीत राहिला. पूर्वीच्या दरानुसार एक डॉलरचे पाच ऑस्ट्रियन क्रोनेन मिळायचे आता १,४०,००० क्रोनेन मिळतील. पोन्झीला हर्षवायू व्हायचेच काय ते बाकी होते!
त्याने मनाशी खूणगाठ बांधली. आता ही खाण हातून सोडायची नाही. एवढा नफा देणारे दुसरे काही असू शकत नाही. त्याला संभाव्य उद्योगाने पार झपाटून टाकले, पण हा उद्योग आरंभायला सुरुवातीचे भांडवल कोण देणार? पोन्झीने आपले मित्र, जुने सहकारी, जुन्या नोकरी व्यवसायातले परिचित यांना आपला नियोजित धंदा समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. कुणालाच ती कल्पना सहजी विश्वसनीय वाटत नव्हती. पण पोन्झीने आपली मधाळ जीभ चालूच ठेवली. मिळणाऱ्या नफा-परताव्याचे आकडे डोळे विस्फारावेत असे होते. त्याची लालूच ऐकणाऱ्यावर गारुड करत असे. आपल्या संभाव्य व्यवसायाचे सगळे तपशील तो सांगत नसे. ऐकणाऱ्यांनादेखील नफ्याचा उंच झोका पाहण्यात अधिक स्वारस्य असे. परंतु हा व्यवसाय कसा नखशिखांत कायदेशीर आहे आणि ही संधी हेरणारा तोच एक प्रतिभावान चाणाक्ष आहे, असे ठसवायला पोन्झी कधी चुकत नसे. त्याच्या ध्यानात आले की असे आसपासच्या गोतावळ्यातून कितीसे भांडवल उभे राहणार? आणि कितीजणांना असे व्यक्तिश: पटवीत बसायचे? म्हणून त्याने हा व्यवसाय करणारी कंपनी नोंदवून टाकली. जमलेल्या पैशातून अगोदर एक ऑफिस घेऊन टाकले. त्यात उधारीचे दिमाखदारी फर्निचर बसवले. मग वेगवेगळ्या बँकांकडे खेटे घालत कर्जाची चाचपणी केली, पण कुणी त्याच्या वैयक्तिक संपत्तीपलीकडे कर्जाऊ रक्कम द्यायला कबूल होईना. दिवसामागून दिवस सरत होते. अखेरीस दोन महिन्यांनी फर्निचरची उधारी वसूल करायला जोसेफ डॅनिएल हा त्या फर्निचरचा पुरवठादार दारात येऊन उभा राहिला. ते फर्निचर नेले काढून तर ऑफिस म्हणजे एक रिकामी जागा! पोन्झीला जमिनीवर नाही तर खिडकीत बसावे लागले असते. पोन्झीने पुन्हा आपले जिव्हा कौशल्य वापरले! डॅनिएलला सांगितले मी फर्निचरचे पैसे देईनच पण आता नाही. उलट तूच फर्स्ट स्टेट बँकेत वचनपत्र देऊन मला दोनशे डॉलर्स दे! डॅनियल चक्रावला. पण पोन्झीने आपल्या व्यवसायाचे असे काही कीर्तन केले की डॅनिएल महाशय राजी झाले! सुरुवातीला नोंदताना त्याची कंपनी ‘इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपनी’ अशा नावाने नोंदली होती. नोंदणी करणे तेव्हा अगदी स्वस्त होते! खर्च फक्त पन्नास सेंट! परंतु पोन्झीला वाटले नाव जरा अधिक रोखठोक आणि स्पष्ट पाहिजे, म्हणून बदलून ते ‘सिक्युरिटीज एक्स्चेंज कंपनी’ असे केले. डॅनिएलसारखे अजून काहीजण गळाला लागले. एका गहाणवटीने कर्ज देणाऱ्याने कर्ज दिले पण भांडवल गुंतवायला नकार दिला.
पोन्झीने तेवढय़ा तजविजीवर मोठी झेप टाकली. काही शेलके विक्रेते नेमले. त्यांचे काम लोकांकडून ठेवी गोळा करायचे आणि ठेवीच्या प्रमाणात कमिशन मिळवायचे. ‘सिक्युरिटी एक्स्चेंज कंपनी’, पत्ता- २७, स्कूल स्ट्रील नॉस्टन मॅसेशुसेट्स या नावाने  जाहिरात येऊ लागली. तुम्हाला झटकन श्रीमंत व्हायचे आहे? भेटा- ३०१/२, कोर्ट स्ट्रीट, फ्लायमाऊथ थिएटर, वरचा माळा. आमचे अधिकारी तुम्हाला योजना समजावून सांगतील. तुमच्या गुंतवणुकीवर ४५ दिवसांत ५० टक्के नफा. गुंतवणुका कराल त्या  दिवसापासून पंचेचाळीस दिवस मोजा. पुढच्या दिवशी मूळ रक्कम आणि वर पन्नास टक्के परतावा. त्वरा  करा. आमची ठेवी स्वीकारण्याची कचेरी रोज संध्या. ६ ते ८ चालू असेल. आपले विश्वासू ‘सिक्युरिटीज एक्स्चेंज कंपनी’.
नॉस्टनमध्ये इटलीमधून स्थलांतर केलेले कामगार, छोटे-मोठे व्यापारी, कारकून मोठय़ा संख्येने होते. झटपट श्रीमंतीचे मृगजळ सगळ्यांना खुणावत होते. या जाहिरातीसरशी सिक्युरिटी एक्स्चेंज कंपनीच्या केंद्रावर एकच झुंबड उसळली. कचेरीत काम करणारे दोघे-तिघे हैराण व्हायचे. कंपनीचे तथाकथित एक पानी करारपत्र नावे टाकून द्यायचे. पैसे घ्यायचे आणि एका कार्डावर गुंतवणूकदाराचे नाव, पत्ता नोंदवायचा. पोन्झीची ल्युसी मेली नावाची कीर्दखतावणी करणारी विश्वासू नोकर होती. जमलेले पैसे एका गोणीत भरून नंतर ते बँकेत भरले जायचे.
दुसरीकडे पोन्झीला या पैशाचे काय करावे ही विवंचना होतीच. त्याने पोस्टल युनियनची कुपन झपाटून खरेदी केली खरी पण अमेरिकेत तेवढय़ा मोठय़ा प्रमाणावर त्याची विक्री होईना. मग त्याने काही मोठय़ा कंपन्यांना मोठय़ा सवलतीने विकता येतील का असाही खटाटोप करून पाहिला तरी त्याला हवा तेवढा उठाव होईना. मग त्याने काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आणि त्यावर कब्जा केला. परंतु त्याने फार काही भागणार नव्हते. दर पंचेचाळीस दिवसांनी परतफेडीचे शुल्ककाष्ठ मागे होते. त्यावर काय तोडगा काढायचा? एक तोडगा पोन्झीच्या थोडाफार अखत्यारीत होता. काहींचे पैसे कबूल केल्यानुसार द्यायचे. पण कुठून? नव्याने येणाऱ्या ठेवींमधून. पण दरवेळेस नव्या ठेवींची रक्कम  परतफेडीच्या रकमेपेक्षा पन्नास टक्क्यांनी वाढीव ठरावी इतपत मोठी पाहिजे. पोन्झीने आणखी ठेव गोळा करणारे विक्रेते हाकारले. पन्नास टक्के परताव्याचे लोभी वाढतच होते. ज्यांना पैसे परत मिळाले ते स्वत: पुन्हा गुंतवत होते. एवढेच नव्हे तर फार आपखुशीने पोन्झीची तरफदारी करीत त्याचा उदोउदो करत होते. हा उदोउदो भलत्याच शिगेला पोहोचू लागला होता. गरिबांचा उद्धारकर्ता त्यांच्या घरावर सोन्याचे पत्रे घालू शकणारा वित्तीय किमयागार अशी पोन्झीची ख्याती झाली होती.
त्याचबरोबरीने पोन्झीच्या या ‘चमत्कारी’ गुंतवणूक जादूबद्दल पराकोटीचा संशय घेणारेदेखील होते. विशेषत: अनेक मोठे बँक-  व्यावसायिक थक्क होऊन याचा छडा लावायला टपले होते. पन्नास टक्के परतावा कदापि शक्य नाही याची त्यांना खात्री होती. सकाळी तीन टक्क्य़ाने ठेवी स्वीकारा, नीट पारखून आणखी तीन टक्के वाढवून (म्हणजे सहा टक्क्य़ांनी कर्ज द्या म्हणजे तीन वाजता गोल्फ खेळायला मोकळे असा आमचा तिनाचा पाढा आहे, असे बँक-व्यावसायिक गमतीने म्हणायचे. पोन्झीने त्यांच्या रुढीला पार सुरुंग लावला होता. त्यांचे ठेवीदार पळाले हे एक शल्य पण त्याहून खुपणारे शल्य म्हणजे हा बेटा पोन्झी पन्नास टक्के परतावा मिळवतो कुठून? त्यांनी एकीकडून वर्तमानपत्रातले शोधक पत्रकार, बँक आणि व्यापाराची न्याहाळणी ठेवणारे कायदेबाज अधिकारी आणि फसवणुकीच्या गुन्ह्य़ाखाली पोन्झीला अडकवायला पोलीस अशा तीनही आघाडय़ा उघडल्या.
पण पोन्झी तेवढाच जागरुक होता. त्याने काही बातमीदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनाच आपल्या ठेवीमध्ये सामील करून घेतले होते. बलिदान झालेल्या पोलिसांसाठी असणाऱ्या निधीला त्याने गलेलठ्ठ देणगी दिली होती. खेरीज मी सर्वसामान्यांना श्रीमंत करतो आहे हे या गलेलठ्ठ बॉस्टन ब्राह्मण विघ्नकर्त्यांना पाहावत नाही, असा आक्रमक पवित्रा तो वारंवार घेत असे.
‘हॅनोव्हर ट्रस्ट’ या बँकेकडेपण पोन्झीने आपले लक्ष्य केंद्रित केले होते. या बँकेने एके काळी त्याला कर्ज मिळणार नाही म्हणून धुडकावले होते. आता पोन्झीची ‘जमा ठेव’ रक्कम या  बँकेत ठेव म्हणून भरली जात होती. पोन्झीची ठेव रक्कम अतोनात मोठी होती. एखाद्या दिवशी पोन्झीने ठेवी परत घेतो म्हटले तर बँकेचा धुव्वा होणार होता. या बळावर पोन्झीने बँक व्यवस्थापनाला वेठीस धरले आणि त्या बँकेचे सर्वाधिक समभाग खरेदी केले. असाच घाट त्याने आणखी दोन बँकांवर घालण्याचा प्रयत्न केला. पण तो हवा तसा फलद्रूप झाला नाही.  हॅनोवर ट्रस्ट ताब्यात ठेवण्यात पोन्झीचा हेतू दुहेरी होता. या कंपनीच्या समभागाचे वाढते मोल ही पोन्झीची वैयक्तिक मत्ता होती. खेरीज त्याला लागेल तशी वाढीव कर्जाची उचल आपल्या बहुमताच्या जिवावर मागता येईल असा त्याचा विश्वास होता. म्हणजे अगदी गळ्याशी आले तर बँकेकडून हवे तेवढे पैसे उचलून वेळ निभावता येईल अशी तजवीज होणार होती.
पण वर्तमानपत्रे, बँक-व्यापाराचे नियंत्रण अधिकारी आणि प्रतिस्पर्धी बँक व अन्य ‘संशयकार’ यांचा ससेमिरा काही कमी होत नव्हता. त्यात आणखी एक लचांड उपटले होते. सुरुवातीला त्याला कर्ज देणाऱ्या डॅनिएलने पोन्झीच्या संपत्तीत मूळ भांडवल पुरवठादार म्हणून माझाही वाटा आहे असा दावा करीत पोन्झीच्या काही बँक ठेवींवर गोठवणूक आणली होती. त्यामुळे ठेवींच्या  परतफेडीचे चाक थबकून अडकण्याची शक्यता होती. या गोठवणुकीला उत्तर म्हणून पोन्झीने दुहेरी हत्यार पाजळले होते. त्याने पुढच्या रकमा बेनामी ठेवी (म्हणजे खोटय़ा नावाने काढलेल्या खात्यात टाकायला सुरुवात केली. खुद्द हॅनोव्हर ट्रस्टमध्येदेखील त्याने अशी बेनामी खाती काढली होती.)
दरम्यान त्याने आणखी एक धाडसी खेळ केला. ‘माझ्याबद्दल संशय आहे ना, मग मीच काही काळ धंदा रोखतो. ठेवी घेणे बंद करतो. एक न्यायसंस्थेतील लोकांची समिती नेमतो. त्यांनी, लोकांचे पैसे परत करेल इतपत मत्ता माझ्याकडे आहे, असे सांगितले तर मग पुन्हा व्यवसाय सुरू करेन. दरम्यान, ज्यांना भीती वाटते त्यांनी ठेवी परत घेऊन जा. पण तेव्हा व्याज-नफा नाही देणार. काहींनी ठेवी काढून घेतल्या. पोन्झीला हे हवेच होते. कारण काढून घेतलेले प्रत्येक देणे पन्नास टक्क्य़ांनी कमी होणार होते! शिवाय शब्दाला जागल्याचे प्रशस्तिपत्र!
परंतु, पोन्झीच्या खेळाचा तराजू सतत संशय आणि अतोनात प्रशस्ती अशा झोक्यांमध्ये हलत राहिला. डॅनिएलच्या दाव्यामुळे  गोठलेली खाती मोठी होती. अखेर पोन्झीने त्याला ‘मानवेल’ अशी रक्कम अदा केली आणि दावा मागे घेतला. परतफेडीचा दाबदबाव सोसायला आणखी अवसर मिळाला. परंतु पोन्झीनेच नेमलेल्या एका प्रसिद्धी अधिकाऱ्याने पोन्झीकडे पुरेशी मत्ता नाही, एकाचे पैसे दुसऱ्याला फिरवत राहण्याचा हा मामला आहे असे सांगून टाकले. पुन्हा संशयाचे, परतफेडीचे आणि चौकशींचे मोहोळ उठले.
बँक क्षेत्रातील तपासणी अधिकाऱ्यांनी नीट निरखून पाहणी करायला सुरुवात केली. हॅनोवर ट्रस्टमधल्या पोन्झीच्या खात्यातील भरणा आणि उचल याचे हेलकावे डोळ्यात मावेनात एवढे मोठे होते. पोन्झीने अनेक बेनामी खाती ठेवली आहेत आणि त्यातदेखील असे हेलकावे दिसत आहेत हे पण त्यांच्या लक्षात आले. बँक निरीक्षकांचा डोळा आहे हे लक्षात आल्याने हॅनोवर ट्रस्टचे अन्य संचालक आणि अन्य बँकांचे संचालक गाळण उडाल्यागत सावध झाले. ‘पोस्टल युनियन कुपन्स’चा गोरखधंदा आहे, असा बभ्रा झाल्यावर पोस्ट अधिकारी पण सतर्क झाले. त्यांनी चौकशी केली. पोन्झीच्या दाव्यामध्ये हा फार कळीचा बचाव होता. पण खुद्द पोस्टमास्टर जनरलने जाहीर करून टाकले की, पोन्झीने गोळा केलेले ठेवीचे पैसे हे काही लाखाच्या आकडय़ात आहेत. मात्र पोस्टल युनियनची कुपन जेमतेम हजाराच्या आसपास आहेत. एका संशोधक पत्रकाराने पोन्झीने पैसे घेतले पण अन्य कुठल्या देशात तेवढे पाठविलेच नाहीत तर पोस्टल कुपन येणार कुठून आणि त्यातून किफायत मिळणारच कशी, अशी झोड उठवली.
हळूहळू पोन्झीचे दिवस भरत आले. उमेदवारीच्या  काळात एका बँकेतील अफरातफर आणि खोटय़ा स्वाक्षऱ्या, खोटी पत्रे तयार करण्याच्या कटात त्याला कॅनडात तुरुंगवास भोगावा लागला होता. पाच इटालियन लोकांना अमेरिकेत विनापरवाना घुसण्यासाठी मदत केल्यामुळे शिक्षा  झाली होती. पोन्झीच्या मागावर असणाऱ्या वर्तमानपत्रांनी हे लपविलेले बिंग उघडकीस आणले. पोन्झीने प्रथम ते झिडकारले. मग मग हळूहळू स्वीकारले. ते पण जरा गुर्मट भावामध्येच! त्याचे म्हणणे होते की त्यातल्या मुख्य सूत्रधाराचा मी छोटा हस्तक होतो. तो मुख्य हस्तक आता पुन्हा मोठा प्रतिष्ठित बँक व्यवसायी  बनला आहे. मग मला का धारेवर धरता? आणि तेव्हा केलेल्या चुकांचे किटाळ माझ्या आताच्या व्यवसायावर का उडवता? यामागे माझ्यामुळे हवालदिल झालेल्या वित्तसम्राटांचे मतलबी कारस्थान आहे.
पोन्झीच्या कारभाराची ‘खोल’ चौकशी करणाऱ्या अ‍ॅलेनने मात्र आपले काम धीमेपणे चालू ठेवले होते. ल्यूसी मार्टेली नावाच्या बेनामी खात्यातील पैसे वापरून पोन्झीची परतफेड चक्र चालविले जाते हे त्याच्या खबऱ्यांनी हेरले होते. दरम्यान, पोन्झीने मँचेस्टर न्यू हॅम्पशायरमध्ये ठेवलेल्या खात्यातली रक्कम काढताना दोनदा जास्त रकमेचा धनादेश दिला. त्यामुळे रक्कम मिळाली नाही. ते पैसे ‘मार्टेली’ खात्यात येऊ शकले नाही. रक्कम मोठी भरभक्कम होती.
इकडे बॉस्टनमध्ये तर परतफेडीचे धनादेश वाटले गेले होते. बँक नियंत्रणाचा आयुक्त म्हणून अ‍ॅलेनला आता कारवाई करायला हस्तक्षेप करायला धडधडीत निमित्त मिळाले. हॅनोवर ट्रस्टच्या कोषाधिकारी आणि संचालकांनी अ‍ॅलेनचे म्हणणे प्रथम धुडकावले पण दारावर नोटीस’ ठोकल्यावर तेही वठणीवर आले. पोन्झीच्या सिक्युरिटी एक्स्चेंज कंपनीचे धनादेश वठविण्यास मनाई आली. हॅनोवर ट्रस्टकडे ठेवलेले पंधरा लाख डॉलर्सचे बाँडपण गोठवले गेले. पोन्झीकडे पैसे परत करण्याचा देखावा चालू ठेवणारे रस्ते नाकेबंदी होवून थंडावले.
यामागे मला संपविण्याचा कट आहे, ‘वेळ दिला तर या चौकशीचे थोतांड मी उघडे पाडीन,’ अशा वल्गना करीत अखेर पोन्झीने आपल्या त्रुटी कबूल केल्या. तरी मला जर संधी दिली असती तर माझ्याकडे पुरेसे पैसे आणि मत्ता होती, असा हेका चालूच ठेवला. अखेरीस सर्व देण्यांची मोजदाद झाल्यावर मात्र त्याला गुन्हा कबुलावा लागला! वरकड देणी होती तीस लाख डॉलर्स इतकी! चौकशी समितीतले दोन सदस्य आपल्या बाजूला असतील ही योजनापण फसली. कोर्टातदेखील बराच काळ पोन्झी गुन्हा कबूल करीत नव्हता. त्यानंतर सुरू झाले एकामागोमाग एक बाहेर येणारे फसवणुकीचे गुन्हे. ते अमेरिकेतल्या अनेक राज्यात पसरले होते. प्रत्येक ठिकाणची शिक्षा भोगत त्याला जवळपास पंधरा वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. १९३४ मध्ये त्याची इटलीला ‘सन्मानपूर्वक’ रवानगी करण्यात आली.
पण पोन्झी छापाचे हे जाळे पुन्हा पुन्हा उद्भवत राहिले आहे. अगदी अलीकडे २००८ मध्ये असाच एक लफंग माणूस उघडकीस आला. त्याची कथा पुढच्या वेळी.
* लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.  त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com
हे सदर पाक्षिक असल्याने, ‘पोन्झीचे जाळे’ मालिकेचा पुढील भाग ३० एप्रिल रोजी.

Story img Loader