अमेरिकेने आशियात ऑस्ट्रेलिया, जपान या बलाढय़ देशांबरोबर प्रशांत महासागरातील लहान देशांची मोट बांधली व चीनविरोधी देशांचा एक मोठा अक्ष प्रशांत महासागरापासून हिंदी महासागरापर्यंत आणून ठेवला. त्यापाठोपाठ अमेरिकेने भारताला या अक्षात सहभागी करून घेतले. भारताच्या भोवती अरबी समुद्रात चीन बांधीत असलेल्या अक्षाला प्रत्युत्तर म्हणून प्रशांत महासागरातील अक्षाचा भारताला उपयोग होणार होता. अमेरिकेची ही बांधणी होत असतानाच फिलीपाईन्स, मलेशिया, व्हिएटनाम आदी प्रशांत महासागरातील लहान राष्ट्रांकडून चीनच्या आक्रमकतेला आव्हान मिळू लागले. जपानने तर फारच चढा स्वर लावला व महासागरातील चिल्लर बेटांवरून चीन-जपान लष्करी संघर्ष उफाळतो की काय, अशी परिस्थिती काही महिन्यांपूर्वी निर्माण झाली होती. जपान सध्या आर्थिक संकटात आहे व त्यामुळे तेथे आक्रमक राजकारणाची चलती आहे. या आक्रमक वाऱ्यांमुळे तेथील निवडणुकीत शिन्झो अ‍ॅबे यांना विजय मिळाला. ही भारतासाठी अत्यंत शुभसूचक तर चीनसाठी अत्यंत त्रासदायी घटना आहे. जॉर्ज बुश यांच्याप्रमाणे अ‍ॅबे यांना भारताबद्दल प्रचंड आस्था आहे. त्यांचे आजोबाही पंतप्रधान होते व तेही भारतप्रेमी होते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अ‍ॅबे यांनी केवळ भारताची पाठराखण केली नाही तर नेमके शब्दप्रयोग करीत आशियातील परराष्ट्र संबंधांना वेगळी दिशा दिली. ‘आशिया-पॅसिफिक’ हा शब्दप्रयोग बदलून त्यांनी ‘इंडो-पॅसिफिक’ असा शब्दप्रयोग करीत प्रशांत महासागराशी हिंदी महासागराचे नाते जोडून दिले. भारत हा आमचा ‘नैसर्गिक मित्र’ आहे अशी भूमिका जॉर्ज बुश यांच्या जोडीने अ‍ॅबे यांनीच सर्वप्रथम घेतली. ‘समुद्रवलयांकित लोकशाही राष्ट्रांचे सहकार्य’ या त्यांच्या शब्दप्रयोगामुळे जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत हे लोकशाहीच्या माळेत गुंफले गेले आणि एकपक्षीय राजवट असलेला चीन एकटा पडला. हुकुमशाही पद्धतीने काम करणाऱ्या ‘बिजिंग मतैक्या’च्या समोर धीम्या गतीने पण लोकशाही मार्गाने आर्थिक प्रगती करून घेणाऱ्या ‘दिल्ली मतैक्या’ची त्यांनी उघड तरफदारी केली. हे त्यांचे दोन शब्दप्रयोग ‘इकॉनॉमिस्ट’ने उचलून धरले. भारताबद्दल क्रियाशील आस्था असणाऱ्या अ‍ॅबेंकडे जपानची सूत्रे आल्यामुळे आशियातील राजकारणात भारताचे वजन वाढू शकते. याचे आर्थिक फायदेही होऊ शकतात. जपानची चीनमध्ये प्रचंड गुंतवणूक असली तरी तेथील मजुरीपासून अन्य अनेक खर्च वाढल्यामुळे जपानमधील बडय़ा कंपन्या नव्या भूमीच्या शोधात आहेत. ही गुंतवणूक भारतात आली तर आपला खूप फायदा होईल. जपान व अमेरिकेच्या सहाय्याने अद्यावत तंत्रज्ञानही आणता येईल. दुसऱ्या बाजूला चीनही भारताबाबत नमते धोरणे स्वीकारू लागेल. चीनला चिंता आहे ती पूर्वेकडून होणाऱ्या आक्रमणाची. ‘पूर्वेला अमेरिका व पश्चिमेला भारत अशा दोघांना दुखविण्याचा मूर्खपणा चीनला करायचा नाही’, असे माओ यांनी नेहरूंना १६ मे १९५९रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. तिबेटवरून तेव्हा वातावरण गरम झाले होते. या पत्राला योग्य प्रतिसाद नेहरूंकडून मिळाला असता तर कदाचित १९६२चे युद्ध घडलेच नसते असे काही अभ्यासकांचे मत आहे. ‘तुम्हालाही दोन आघाडय़ा आहेत’ अशी आठवण त्याच पत्रात माओ यांनी करून दिली होती व नंतरच्या काळात पाकिस्तानच्या लष्कराला अद्यावत करीत भारताला कैचीत पकडले. या कैचीतून सुटून चीनबरोबर जाऊन पाकिस्तानला एकटे पाडण्याची संधी भारताला आता आली आहे. आज जपान, अमेरिका व चीन या तीनही बलाढय़ राष्ट्रांना भारताची गरज आहे. भाताच्या अनेक अडचणी ही राष्ट्रे सोडवू शकतात. कसोटी आपल्या मुत्सद्दीपणाची आहे.

Story img Loader