आजवर प्रचार – प्रोपगंडा म्हटले की लगेच मनात विचार येतो तो हिटलरचा. त्याला प्रचारयुद्धातील महारथी मानले जाते. पण त्यानेही त्याच्या ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्रातून पहिल्या महायुद्धातील ब्रिटिशांचा प्रचार किती प्रभावी होता हे सांगितले आहे..
काही वर्षांपूर्वी ‘द मॅट्रिक्स’ नावाची त्रिचित्रधारा येऊन गेली. तसे ते सारेच मसालापट. परंतु नीट पाहिले की लक्षात येई त्याच्या मुळाशी मायावादाचे तत्त्वज्ञान होते. आपण जे पाहतो ते संपूर्ण जग ही एक माया आहे. जे पाहतो आहोत ते मुळात नाहीच आहे. ते सारेच स्वप्न आहे. आपण जगतो आहोत ते त्या स्वप्नात. जोवर आपण त्यात आहोत तोवर आपणांस हे समजण्याची शक्यता नाही. रामदासस्वामींनी या संदर्भात ‘मिथ्या साचासारिखे देखिले। परि ते पाहिजे विचारिले॥’ असे म्हटले आहे. खोटे खऱ्यासारखे दिसते, तेव्हा ते खरोखरच खरे आहे का याचा विचार केला पाहिजे. मॅट्रिक्समधील निओ या नायकास हे भान येते एका औषधी गोळीतून. त्या गोळीमुळे तो त्या स्वप्नातून जागा होतो, छद्मजगातून बाहेर येतो. सध्याचा काळ हा अशाच मॅट्रिक्सचा आहे. प्रोपगंडाच्या मॅट्रिक्सचा.
आपल्यावर लहानपणापासून विविध संकल्पना आदळत असतात. आपल्या पालकांकडून, शिक्षकांकडून, समाजातील मोठय़ा लोकांकडून, पुस्तकांतून, चित्रपटांतून, चित्रांतून, संगीतातून, मित्रांच्या गप्पांतून.. आणि आपण घडत असतो. दोन व्यक्तींसमोर सारख्याच प्रतिमा वा सारखेच शब्द ठेवले तरी त्याच्या मनात उमटणारे अर्थ वेगळे असू शकतात. याचे कारण ही घडण्याची प्रक्रिया. ती दोघांबाबत वेगळी असेल, तर एकास डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील टिप्पणी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरीलच वाटेल, दुसऱ्यास त्यात वेगळाच वास येईल. एकास आकाशीचा चंद्र पाहून प्रेयसीच्या मुखकमलाची याद येईल आणि दुसऱ्यास भाकरीचा चंद्र आठवेल. यास काही लोक शिक्षणसंस्कार म्हणतात. तसेही शिक्षण हा चांगल्या व जुन्या अर्थाने प्रोपगंडाचाच भाग आहे. परंतु प्रश्न असा आहे की प्रोपगंडा चांगला वा वाईट असू शकतो? यास नेहमीच्या साच्यातील एक उत्तर आहे. ते म्हणजे हेतू हे कृतीच्या योग्यायोग्यतेचे परिमाण असते. परंतु प्रोपगंडा या शब्दाबाबत तसे म्हणता येणार नाही. याचे कारण त्याचा अर्थच बदललेला आहे. अनेक शब्द अशा प्रकारे आपल्यासमोर अर्थ-विपर्यास होऊन येत असतात. उदाहरणार्थ अचपळ. म्हणजे चपळ नसलेला. पण ‘अचपळ मन माझे..’ या पंक्तीत तो चपळ या अर्थाने आला आहे. ‘प्रपोगंडा’ या शब्दाचेही तसेच. इंग्रजी स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार ‘प्रो-प-गं-डा’ असाच हवा. पण बोलीभाषेत तो म्हटला जातो प्रपोगंडा असा. तो उच्चार सुपरिचित. म्हणून नेणिवेच्या पातळीवरील संकल्पनाबोधात अडथळा न आणणारा. त्यामुळे याआधीच्या लेखात तो तशा प्रकारे सादर केला तरी काही अपवाद वगळता तो कुणाला खटकला नाही. त्याचप्रमाणे प्रोपगंडाचे मराठी भाषांतर करून त्यास प्रचार असे म्हटले तर प्रोपगंडा करण्यातही कुणाला अणुमात्र वावगे वाटणार नाही. उलट, मग लोकांपर्यंत माहिती नेण्यासाठी, त्यांना काही सांगण्यासाठी प्रचार केला तर त्यात बिघडले काय? तो लोकशिक्षणाचाच भाग आहे, असे दटावले जाईल. याचे कारण प्रोपगंडा (किंवा प्रपोगंडा!) आणि प्रचार या दोन शब्दांच्या पर्यावरणात अतिशय फरक आहे. प्रचार हा चांगल्या गोष्टींसाठीही केला जाऊ शकतो. प्रोपगंडाचे कामच मुळी लोकांपुढे तथ्ये वा माहिती ठेवणे असे नसून, ती माहिती अशा प्रकारे ठेवणे की ज्यातून आपणांस हवी तशी लोकधारणा निर्माण करता येईल हे आहे. आपल्या मराठी प्रचारमधून ही कृष्णछटा तितकीशी मुखर होत नाही हे खरे. परंतु आजच्या काळात साधारणत: मराठी प्रचार आणि इंग्रजी प्रोपगंडा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज प्रचाराच्या मॅट्रिक्समध्ये, छद्मव्यूहामध्येच आपण जगत आहोत.
‘द मॅट्रिक्स’मध्ये निओ हा नायक आधी ज्या जगामध्ये राहत होता, तेथे त्याच्यासारखी इतरही अनेक माणसे होती. पण त्यातील कोणालाही ही कल्पना नव्हती, की आपण ज्याला खरे जग समजत आहोत, ते कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांनी तयार केलेले छद्मविश्व आहे. एखाद्या संगणकीय खेळात आपण स्वत:ही एक पात्र असावे तसे ते आहे. त्याची जाणीवही होऊ न देणे, कोणी सांगितले तरी त्यावर कोणाचाही विश्वासच बसणार नाही, असे वातावरण निर्माण करणे, ही त्या मॅट्रिक्स नामक संगणकीय प्रोग्रामची खुबी. प्रचाराचेही असेच असते. आपण प्रचाराच्या जाळ्यात अडकलेलो आहोत, हे वास्तव अनेकांसाठी सहन करण्यापलीकडचे असते. त्यामुळे ते नाकारण्याकडेच अनेकांचा कल असतो. किंबहुना प्रचार-प्रोपगंडा नामक काही असेल तर तो विरोधकांचा असतो. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तो प्रचाराचा भाग नसतो, असे अनेकांना वाटत असते आणि त्याहून भयंकर म्हणजे प्रचार नामक काही नसतेच, असे वाटणारीही माणसे असतात. त्यांचे म्हणणे असे असते, की फालतू बुद्धिजीवी, विचारवंत, माध्यमवीर अशा मंडळींनी तयार केलेली ही हवा असून, प्रचार म्हणजे काय हे न समजण्याएवढे लोक काही दूधखुळे नसतात. लोकांना सारे काही नीट माहीत असते. त्यांना तुम्ही मूर्ख समजू नका, हे विधान त्यातलेच. परंतु प्रचाराचा इतिहास पाहिला तर एक बाब नीटच लक्षात येते ती म्हणजे असे म्हणणारे लोक प्रत्येक काळात होते आणि ते व्यवस्थित मूर्ख बनले होते. त्यातही मौज अशी की अडाण्यांपेक्षा उच्चशिक्षितच प्रचारास अधिक प्रमाणात बळी पडताना दिसले. जनसंज्ञापन आणि प्रचार या विषयातील तज्ज्ञ डॉ. ब्रायन अॅन्सी पॅट्रिक यांच्या मते, याचे कारण शिक्षण. ‘शिक्षणातून अनेकदा प्रचार केला जात असल्याने प्रचाराची शिकार होणाऱ्यांत अशिक्षितांपेक्षा उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असते,’ असे त्यांनी म्हटले आहे. प्रचाराच्या इतिहासानेही हेच अधोरेखित केले आहे.
हा इतिहास साधारणत: तीन टप्प्यांत मांडता येतो. यातील पहिला टप्पा ख्रिश्चन प्रचाराचा. सतराव्या शतकाच्या प्रारंभी पोप ग्रेगरी पंधरावे यांनी ‘प्रोपगंडाकरिताचे काँग्रेगेशन अर्थात धर्मसभा’ स्थापन केली. डॉ. पॅट्रिक यांनी या धर्मसभेचे वर्णन ‘प्रचाराचे पहिले जागतिक अभियान’ असे केले आहे. ही धर्मसभा एवढी प्रबळ होती की तिच्या प्रमुखपदी असलेल्या काíडनलला रेड पोप असे म्हटले जात असे. रेड – लाल हा रक्ताचा, हिंसेचा, युद्धाचा रंग आहे. ख्रिस्ती धर्माचा हा प्रचार विरोधात होता तो प्रामुख्याने ‘काफिरां’च्या, अधार्मिकांच्या आणि सुधारकांच्या. ख्रिस्ती धर्माचा प्रसार पाहता हा प्रचार किती प्रभावी होता हे लक्षात येते. या प्रचाराचे वैशिष्टय़ म्हणजे यातून सर्वानी एकाच तऱ्हेने विचार करावा, विचारांची एकरूपता साधली जावी असा ख्रिस्ती धर्माचा प्रयत्न होता. चर्च सांगेल तेच सत्य हाच ‘सत्याच्या शोधाचा मार्ग’ या प्रचाराने लोकांपुढे ठेवला होता. त्यात रोमन कॅथॉलिक चर्चला यश आले हे दिसतेच आहे. हे प्रचाराचे यश होते. प्रचार इतिहासाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो तो पहिल्या महायुद्धापासून.
मध्ययुगाच्या काळोख्या रात्रीतून जाग्या झालेल्या जगातील हा प्रचार होता. जनसंपर्काची, माहिती प्रसारणाची नवी माध्यमे आता लोकांहाती होती. ज्ञानाच्या नवनव्या शाखा खुल्या झाल्या होत्या. साम्राज्यस्पर्धा टिपेला जाऊन पोहोचली होती. अशा काळात प्रचाराचा हा नवा अध्याय सुरू झाला. त्याचे श्रेय जाते ब्रिटिशांकडे आणि त्यानंतर अमेरिकी तज्ज्ञांकडे.
आजवर प्रचार – प्रोपगंडा म्हटले की लगेच मनात विचार येतो तो हिटलरचा. त्याला प्रचारयुद्धातील महारथी मानले जाते. पण त्यानेही त्याच्या ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्रातून पहिल्या महायुद्धातील ब्रिटिश प्रचाराची स्तुती केली आहे. ‘यासंदर्भातील (म्हणजे प्रचाराच्या) व्यावहारिक धडे घेण्याची भरपूर संधी मला मिळाली, पण दुर्दैव असे की, ते धडे आपणांस चांगल्या पद्धतीने शिकविले ते आपल्या शत्रूंनी,’ हे हिटलरचे उद्गार ब्रिटिशांचा प्रचार किती प्रभावी होता हे सांगतात. तो प्रचार जितका थेट जर्मनीविरुद्ध होता, तितकाच तो अमेरिकेविरोधातही होता. ब्रिटिशांनी प्रचाराच्या जोरावर अमेरिकेला युद्धतटस्थता सोडण्यास भाग पाडले. त्याचबरोबर त्या प्रचाराने ‘पब्लिक है, यह सब जानती है’ हे मिथकही मोडूनतोडून टाकले. अमेरिकी लोकांनी काय जाणावे आणि जाणू नये, हे त्या वेळी ब्रिटिशांची प्रचारयंत्रणा ठरवीत होती. प्रचाराचा छद्मव्यूह कसा रचला जातो हे पाहण्यासाठी ते समजून घेतले पाहिजे..
रवि आमले
ravi.amale@expressindia.com