युद्धकाळात जर्मनीने प्रचारलक्ष्य केले ते सर्वसामान्य नागरिकांना. ब्रिटिशांनी मात्र जनतेला प्रभावित करू शकणाऱ्या प्रतिष्ठितांवर लक्ष केंद्रित केले. हजारो लोकांपर्यंत जाण्यापेक्षा, त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा मोजक्या लोकांपर्यंत जाणे अधिक फलदायी हे ते साधे तंत्र ब्रिटिशांनी विकसित केले. आजही ते उपयोगात आहे.

गेली अनेक दशके आमच्या सैन्याची दुरवस्था होत होती आणि आम्ही मात्र अन्य देशांच्या लष्करांना अनुदान देत होतो. आम्ही अब्जावधी डॉलर परदेशांवर उधळत होतो आणि इकडे अमेरिकेतील पायाभूत सोयीसुविधा सडत चालल्या होत्या. आता यापुढे असे होणार नाही. अमेरिका अमेरिकेपुरतेच पाहणार.. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातील भाषणातील हा महत्त्वाचा मुद्दा. आज अमेरिकी नागरिकांची मनोभूमिका नेमकी हीच आहे. अन्य देशांनी त्यांचे-त्यांचे पाहून घ्यावे. आम्हाला त्यांच्या भानगडीत पडण्याचे काहीही कारण नाही. पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळात अमेरिकी नागरिकांची भावना अगदी अशीच होती. लोक इतरांची लढाई लढण्यास तयार नव्हते. अमेरिकी नेत्यांवर या अलिप्ततावादी भूमिकेचे मोठे दडपण होते. अशा परिस्थितीत ब्रिटन आणि जर्मनी यांना अमेरिकेस आपल्या बाजूने युद्धात खेचायचे होते. ती त्यांची निकडीची आवश्यकता होती.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
sick leave policies German companies
‘सिक लिव्ह’ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची ‘खबर’ काढण्यासाठी जर्मनीत कंपन्यांकडून खासगी गुप्तहेरांची नेमणूक

एकोणिसाव्या शतकापासून ब्रिटन आणि जर्मनी यांच्यात चांगले व्यापारी संबंध होते. पहिल्या महायुद्धाने ते तुटले. या परिस्थितीत या देशांना नवी बाजारपेठ शोधणे आवश्यक होते. ही अशी, सातत्याने विस्तारत असलेली बाजारपेठ होती ती अमेरिकेची. म्हणूनच तिच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हे ब्रिटन आणि जर्मनीसाठी महत्त्वाचे होते. हे राष्ट्र आपल्या बाजूने असावे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेने युद्धात आपल्या बाजूने उभे राहावे ही त्यांची तेव्हाची गरज होती, परंतु भाषा आणि संस्कृतीच्या दृष्टीने अमेरिकेची ब्रिटन आणि फ्रान्सशी जवळीक होती. तेव्हा अमेरिका नाही आपल्या बाजूने आली तरी चालेल, परंतु तिने युद्धात ब्रिटन-फ्रान्सच्या बाजूने उतरू नये असे जर्मनीचे प्रयत्न होते. परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर तीनच वर्षांत अमेरिका उतरली ती ब्रिटनच्या बाजूने. प्रचाराच्या या युद्धात ब्रिटन जिंकले. जर्मनी हरली. याचे एक कारण होते जर्मनीने अमेरिकेत केलेला धसमुसळा प्रचार. ब्रिटनने अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने अमेरिकी नागरिकांना – चालू भाषेत सांगायचे तर – गुंडाळले होते. त्यांचा प्रचार इतका प्रभावी होता, की अमेरिकी नागरिकांना आपण स्वेच्छेने, विचारपूर्वक एका विशिष्ट ध्येयासाठी या युद्धात सहभागी झालो आहोत असे वाटू लागले होते. चांगल्या प्रचाराचे हेच वैशिष्टय़ असते. प्रत्येकाला वाटते की आपण आपल्या बुद्धीने विचार करीत आहोत, निर्णय घेत आहोत. परंतु त्यांना तोच निर्णय घेण्यास बाध्य केलेले असते ते इतरच कुणी. अनेकांना हे पटवून घेणे अवघड असते. मग ते ‘लोक खूप हुशार असतात, त्यांना सर्व समजत असते,’ असा प्रतिवाद करीत बसतात. ही स्वफसवणूक झाली. पण त्यामागे त्यांचे गणित असे असते, की एका व्यक्तीची बुद्धी असेल कमी. परंतु अनेक व्यक्ती एकत्र येऊन त्यांचे ‘लोक’ बनले, की त्या बुद्धीची बेरीज होऊन संख्या वाढते. हा अर्थातच अहंगंडजन्य अडाणीपणा झाला. तो अमेरिकी नागरिकांतही होता. ब्रिटिश प्रचार यंत्रणेने त्याचा व्यवस्थित फायदा घेतला.

आंतरराष्ट्रीय व्यवहारांत देशाचे नैतिक नाक उंच असणे हे फार महत्त्वाचे असते. म्हणूनच कोणताही देश स्वत:स आक्रमक म्हणवून घेण्यास कधीही तयार नसतो. त्यात आगळीक कोणी केली याला फार महत्त्व असते. म्हणूनच दोन देशांमध्ये कुरबुरी चालू असतील, गोळीबार होत असेल, तर कोणताही देश आपले किती सैनिक मारले गेले हे ओरडून सांगतो. आपण इतरांचे सैनिक मारले हे मात्र सहसा कोणीच कबूल करत नाही. याचे कारण हे नैतिक नाक उंच असण्यात लपलेले आहे. जर्मनीला पहिला फटका बसला तो त्यात. ऑगस्ट १९१४ मध्ये जर्मनीने बेल्जियम आणि फ्रान्सवर आक्रमण केले आणि स्वत:ची नैतिक उंची गमावली. या आक्रमणाचे समर्थन करण्यासाठी जर्मनीने प्रचाराची पराकाष्ठा केली, परंतु त्यांना अपयशच आले. या युद्धात ‘गरीब बिचाऱ्या बेल्जियम’वर जर्मन हूणांनी कसे आक्रमण केले हाच दोस्त राष्ट्रांच्या प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा राहिला. युद्धपूर्व काळात अमेरिकी नागरिकांची सहानुभूती मिळविण्याच्या लढाईत जर्मनी अयशस्वी ठरण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे तेव्हाचे बिनडोक प्रचारतंत्र. अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर जर्मन नागरिकांच्या संघटना-बंड्स – होत्या. त्यांच्या माध्यमातून जर्मनी तेथे प्रचारसाहित्य ओतत राहिली. पण त्याचा परिणाम झाला तो उलटाच. कोणताही प्रचार हा प्रचार वाटता कामा नये हा प्रचाराचा पहिला नियम. आपल्यावर प्रचार लादला जात आहे, आपली मते बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे कोण सहन करील? ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय माहितीसंप्रेषण या विषयाचे पहिले प्रोफेसर फिलिप टेलर यांच्या मते, जर्मन प्रचारतज्ज्ञांनी नेमका तो बिनडोकपणा केला आणि त्याचा दुष्परिणाम झाला.

ब्रिटनला ती चूक करायची नव्हती. अमेरिकनांच्या अहम्ला धक्का न लावता त्यांच्या मनावर ताबा मिळवायचा होता. त्यासाठी ब्रिटनने दोन गोष्टी केल्या. सर्वप्रथम जर्मनीच्या माहितीची नाकाबंदी केली. युद्धकाळात माहिती हे मोठे शस्त्र असते. माहिती, बातम्या यांच्या आधारे युद्धे जिंकली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा ब्रिटनने जर्मनीला दिलेला निर्वाणीचा इशारा संपल्यानंतर पहिल्या काही तासांत काय केले, तर आपले ‘टेल्कोनिया’ हे जहाज पाठवून जर्मनी आणि अमेरिका यांच्यातील संदेशवहन केबल कापून टाकली. त्यामुळे जर्मनीला अमेरिकेत आपणांस हव्या तशा बातम्या पाठविणे कठीण झाले. आता शक्तिशाली ‘वायरलेस ट्रान्समीटर’शिवाय त्यांच्याकडे अन्य पर्याय नव्हता. जर्मनीची प्रचारक्षमता अशी कमकुवत केल्यानंतर ब्रिटनने दुसरी महत्त्वाची गोष्ट केली. ती म्हणजे वॉर प्रोपगंडा ब्यूरोची स्थापना. त्याची जबाबदारी सोपविली खासदार चार्ल्स मास्टरमन यांच्याकडे. ते राष्ट्रीय विमा आयोगाचे अध्यक्षही होते. आयोगाच्या इमारतीतच त्यांनी हा विभाग सुरू केला. त्या इमारतीचे नाव होते वेलिंग्टन हाऊस. याच नावाने नंतर हा विभाग ओळखला जाऊ  लागला. त्याच्याकडे जबाबदारी होती देशांतर्गत आणि देशाबाहेरील – खासकरून अमेरिकेतील – प्रचाराची. तो कसा करता येईल हे ठरविण्यासाठी मास्टरमन यांनी सुरुवातीलाच एक बैठक बोलाविली होती. त्या बैठकीला उपस्थित असलेल्या साहित्यिकांची नावे पाहिली तर आज धक्काच बसतो. त्यांत हजर होते, ‘शेरलॉक होम्स’चे जनक आर्थर कॉनन डॉईल, ‘टाइम मशीन’कार एच जी वेल्स, ‘जंगल बुक’चे कर्ते रुडयार्ड किपलिंग, कादंबरीकार थॉमस हार्डी, समीक्षक विल्यम आर्चर अशी मातब्बर मंडळी. ब्रिटिशांचे प्रचारसाहित्य तयार करणारी मंडळी या अशा उंचीची होती. साहित्यिकांप्रमाणेच चित्रपटकार, चित्रकार, पत्रकार अशा अनेकांना मास्टरमन यांनी प्रचाराच्या कामास लावले होते. हे काम एवढय़ा गोपनीय पद्धतीने चालले होते, की १९३५ पर्यंत त्याचा कोणालाही – अगदी सरकारमधील अनेक उच्चपदस्थांनाही – पत्ता नव्हता. ती गोपनीयता गरजेचीच होती. अमेरिकेत प्रसिद्ध होत असलेल्या अनेक बातम्या, पत्रके, पुस्तके, भित्तिचित्रे, व्यंगचित्रे यांचा उगम वेलिंग्टन हाऊसमधून होत आहे हे तेथील नागरिकांना समजले असते, तर जी जर्मनीची गत झाली तीच ब्रिटिश प्रचाराची झाली असती. जर्मनी आणि ब्रिटिश प्रचारतंत्रातील आणखी एक फरक येथे लक्षात घेण्यासारखा आहे. जर्मनीने प्रचारलक्ष्य केले ते सर्वसामान्य नागरिकांना. ब्रिटिशांनी तसे न करता, सर्वसामान्यांना प्रभावित करू शकणाऱ्या प्रतिष्ठितांवर, उच्चपदस्थांवर आपले लक्ष केंद्रित केले. हजारो लोकांपर्यंत जाण्यापेक्षा, त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा मोजक्या लोकांपर्यंत जाणे अधिक फलदायी हे ते साधे तंत्र ब्रिटिशांनी विकसित केले. आजही ते उपयोगात आहे. जाहिरातीत ‘ऊँचे लोग’ दाखवून फालतू पानमसालाही लोकांच्या गळी उतरवला जातो तो याच तंत्राने. तारांकितांची, नामांकितांची लोकप्रिय प्रतिमा, विश्वासार्हता विकावयाच्या वस्तूवर संक्रमित करणे हा या तंत्राचा गाभा. तेव्हा अमेरिकेतील नेते, उद्योजक, शिक्षक, पत्रकार, धर्मोपदेशक हे जेव्हा जर्मनी क्रूर आक्रमक आहे असे म्हणू लागले तेव्हा लोकही तसाच विचार करू लागले.

अमेरिकी नागरिकांमध्ये युद्धपिपासा जागृत करण्यात वेलिंग्टन हाऊसमधून पेरल्या जात असलेल्या बातम्यांचाही मोठा सहभाग होता. त्या बातम्या पूर्णत: खोटय़ा नव्हत्या, पण पूर्णत: खऱ्याही नव्हत्या. सत्य, अर्धसत्य, नियंत्रित सत्य असे ते मिश्रण होते. त्याची उदाहरणे पुढच्या भागात पाहू या..

रवि आमले

ravi.amale@expressindia.com

 

 

 

 

 

Story img Loader