मॅकडोनाल्ड यांना सातत्याने देशद्रोही म्हणण्यात येऊ लागल्यानंतर त्यांनी नेमका काय देशद्रोह केलाय हे जाणून घेण्याची गरजच कोणास भासत नव्हती. मॅकडोनाल्ड यांच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ते जातील तेथे त्यांच्या विरोधात निदर्शने करीत होते. सभा उधळून लावीत होते. १९१५ मधील त्या सभेत असेच झाले..
ही कहाणी अगदी कालची वाटेल. आपल्या नजीकची. कदाचित आपल्या राजधानीतलीही. नेहमीच्या ऐकण्यातली. परंतु ती आहे ब्रिटनमधली, नोव्हेंबर १९१५ची. रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या एका सभेची.
ते मजूर पक्षाचे नेते. डावे. पहिल्या महायुद्धाला त्यांचा कडवा विरोध होता. युद्धकाळात असे बोलणे म्हणजे देशद्रोहच. स्वाभाविकच माध्यमे त्यांच्यावर तुटून पडली. लंडनच्या ‘टाइम्स’ने तर ‘जर्मनीच्या एकाही पेड-एजंटने मॅकडोनाल्ड यांच्याएवढी तिची सेवा केली नसेल,’ अशा शब्दांत त्यांची अग्रलेखातून सालटी काढली. त्यांना शत्रुराष्ट्राचे ‘पेड एजंट’ ठरविले. व्हॅलेन्टाइन चिरोल यांनीही त्यांच्यावर कडवट टीका केली. लोकमान्य टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणणारे ते हेच चिरोल. ‘टाइम्स’मधील आपल्या लेखात उच्चारस्वातंत्र्य, सहिष्णुता, देशाची बदनामी असे मुद्दे मांडत त्यांनी मॅकडोनाल्ड यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. जर्मनीकडून पैसे घेऊन ते युद्धाला विरोध करीत आहेत, हेच त्यांना त्यातून सुचवायचे होते. प्रख्यात लेखक एच. जी. वेल्स हे तर समाजवादी. पण ‘समाजवादाची कुजकी घाण’ अशा शब्दांत त्यांनी मॅकडोनाल्ड यांचा उद्धार केला. वेल्स हे ‘वॉर प्रोपगंडा ब्युरो’चे सदस्य. तेव्हा प्रचाराची तंत्रे त्यांना चांगलीच अवगत असणार. मॅकडोनाल्ड यांच्याबाबत हे जे तंत्र वापरण्यात आले त्याचे नाव – बद-नामकरण – नेम कॉलिंग. ‘चमकदार सामान्यता’ या तंत्राच्या अगदी उलटे आणि राक्षसीकरणाच्या तंत्राशी काहीसे जवळ जाणारे हे तंत्र. यात नकारार्थी प्रतिमा वा कल्पना यांच्याशी व्यक्तीचे नाते जोडले जाते. पप्पू, फेकू, प्रेस्टिटय़ूट, सिक्युलर ही याची आपल्याकडील काही उदाहरणे. मॅकडोनाल्ड यांचेही याच प्रकारे पेड एजंट, देशद्रोही, समाजवादातील घाण असे बद-नामकरण करण्यात येत होते. त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्याच एका जवळच्या सहकाऱ्याने तर, ‘मॅकडोनाल्ड यांनी आता दुसरा मतदारसंघ शोधावा. खरे तर त्यांनी आता दुसराच देश शोधला तर मला वैयक्तिकरीत्या आनंद होईल,’ असे विधान केले होते. एकंदर आपल्याविरोधी मते असलेल्या व्यक्तीने देश सोडून जावे हा प्रेमाचा सल्ला सगळीकडेच दिला जातो म्हणायचा! पण हा केवळ संतापातून आलेला उद्गार नसतो. त्यात संबंधित व्यक्ती ही त्या शत्रुराष्ट्राची हस्तक आहे असा छुपा आरोप असतो. हे बद-नामकरणाचे तंत्र आपण समजून घेतले पाहिजे.
‘टाइम्स’सारखे प्रतिष्ठित दैनिक एकीकडे मॅकडोनाल्ड यांच्याविरोधात लेख, अग्रलेख प्रसिद्ध करीत असताना ‘जॉन बुल’सारखे साप्ताहिक त्यांच्या खासगी आयुष्यावर चिखलफेक करीत होते. होरॅशियो बॉटमली हे या मासिकाचे मालक-संपादक. ते खासदार आणि कडवे देशभक्त (पुढे त्यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले, ही बाब वेगळी). मॅकडोनाल्ड हे देशद्रोही असून, त्यांचे कोर्टमार्शल करावे, त्यांना गोळ्या घालून ठार मारावे अशी मागणी ते आपल्या मासिकातून करीत होतेच. पण एका अंकात त्यांनी मॅकडोनाल्ड यांचा जन्मदाखला प्रसिद्ध करून, ते एका स्कॉट मोलकरणीची ‘नाजायज औलाद’ असल्याचा ‘गौप्यस्फोट’ केला. त्यावर मॅकडोनाल्ड यांची प्रतिक्रिया इतकीच होती, ‘बरं झालं, माझी आई आज जिवंत नाही. ती जिवंत असती तर हे वाचून नक्कीच मेली असती.’ ‘द लाइफ ऑफ जेम्स रॅम्से मॅकडोनाल्ड’ या लॉर्ड एल्टन लिखित चरित्रात (१९३९) या साऱ्या कथा तपशिलाने येतात.
आपल्या विरोधकांचे चारित्र्यहनन, राक्षसीकरण हे प्रोपगंडाचे तंत्र. अनेक जण त्याला सहज बळी पडतात. लॉर्ड एल्टन लिहितात, ‘असंख्य संतप्त नागरिक, आघाडीवरील सैनिकांचे माता-पिता यांनी त्यांचे एकही भाषण ऐकले नसेल, एकही लेख वाचला नसेल, पण तरीही त्यांना माहीत होते की आपल्या देशात देशद्रोही आहेत आणि मॅकडोनाल्ड हा त्यांचा प्रमुख आहे.’ हे प्रोपगंडाचे यश. मॅकडोनाल्ड यांना सातत्याने देशद्रोही म्हणण्यात येऊ लागल्यानंतर त्यांनी नेमका काय देशद्रोह केलाय, त्यांचे नेमके काय म्हणणे आहे, ते खरोखरच देशाविरोधात बोलले आहेत का, हे काहीही जाणून घेण्याची गरजच कोणास भासत नव्हती. मॅकडोनाल्ड यांच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आता ते जातील तेथे त्यांच्या विरोधात निदर्शने करीत होते. त्यांच्या सभा उधळून लावत होते. तेथे कशा देशविरोधी घोषणा दिल्या जातात याची तिखटमीठ लावून वर्णने करीत होते. नोव्हेंबर १९१५ मधील त्या सभेत झाले ते असेच..
मॅकडोनाल्ड यांच्या संघटनेने लंडनमधील एका सभागृहात ही सभा ठेवली होती. आधीपासूनच त्याच्या बातम्या येत होत्या. वृत्तपत्रे टीका करीत होती. ‘डेली एक्स्प्रेस’ने एक वाचकपत्र प्रसिद्ध केले होते. ‘ही सभा म्हणजे ब्रिटिश राष्ट्राविरोधात छेडलेले युद्ध आहे. त्याविरोधात निदर्शने करणे म्हणजे जणू प्रत्यक्ष आघाडीवरील खंदकांत उभे राहून आपल्या देशासाठीच लढणे आहे,’ असे त्या ‘प्रोत्साहक’ पत्रात म्हटले होते. वातावरण एकूणच तापले होते. त्या दिवशी विरोधी गटातील अनेकांनी बनावट तिकिटांद्वारे सभागृहात प्रवेश मिळविला. त्यात गणवेशातील सैनिकही होते. पुढच्या सगळ्या रांगा त्यांनी व्यापल्या. सभेची वेळ होताच त्यांनी एकच गदारोळ केला. व्यासपीठावरचे फलक फाडले. दरुगध निर्माण करणारे बॉम्ब फोडले. प्रेक्षकांना मारहाण केली. कोणाला व्यासपीठावर जाऊच दिले नाही. सभा अक्षरश: उधळून लावली. पण यातील खरी कहाणी पुढेच आहे. ‘फॉल्सहूड इन वॉर टाइम’ या आर्थर पॉन्सन्बी यांच्या पुस्तकात ती येते.
या सभेतील वक्त्यांवर नजर ठेवण्यासाठी तेथे एक गुप्तहेर पाठविण्यात आला होता. मेजर आर. एम. मॅके असे त्या लष्करी पोलीस अधिकाऱ्याचे नाव. त्याने दिलेला अहवाल नंतर ब्रिटिश लोकसभेत वाचून दाखविण्यात आला. ती घटना तशीच महत्त्वाची होती. सैनिकांनी जाऊन त्या सभेत गोंधळ केला होता. काय होता तो अहवाल? त्यात म्हटले होते, ‘मॅकडोनाल्ड यांनीच त्या सैनिकांना बाहेर काढावे अशी सूचना करून सैनिकांना भडकविले. त्या सभेत कोणी तरी प्रक्षोभक भाषा वापरली. कोणी ते मात्र समजले नाही.’ त्या लष्करी गुप्तचराने आणखी एक सनसनाटी माहिती दिली होती. त्या सभागृहात काम करणाऱ्या महिला ‘केवळ जर्मनांसारख्या दिसतच नव्हत्या, तर त्यांचे उच्चारही तसेच होते.’ म्हणजे त्या जर्मन होत्या. यातील एकही गोष्ट अर्थातच खरी नव्हती. पण हे कमीच की काय अशी एक बाब यानंतर दोन वर्षांनी समोर आली.
ज्या विश्वासू हेराच्या माहितीवरून मॅकडोनाल्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आले होते, त्या मेजर मॅके यांना १९१७ मध्ये गैरव्यवहार आणि अधिकारांचा दुरुपयोग या आरोपांखाली अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत समजले, की गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ऐकायलाच येत नव्हते. ते बहिरे होते! एका कर्णबधिराच्या सांगण्यावरून मॅकडोनाल्ड यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते.
अर्थात तरीही मॅकडोनाल्ड यांना अनेक नागरिकांचा पाठिंबा होता. पुढे ते ब्रिटनचे पंतप्रधानही झाले. येथे प्रश्न असा येतो, की बहुसंख्य लोक युद्धज्वराने पछाडलेले असतानाही शांततावादी मॅकडोनाल्ड यांना पाठिंबा मिळत होता तो कसा? त्याचे कारण होते त्यांच्यावरील क्रूर शाब्दिक हल्ला! ‘जॉन बुल’ साप्ताहिकाने त्यांच्या आईच्या चारित्र्यावर चिखलफेक केली. ही उघडीनागडी पीतपत्रकारिता. त्या हल्ल्यामुळे अनेक नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूतीची भावना निर्माण झाली. अमेरिकेतील प्रचारतज्ज्ञ फ्रँक लुंत्झ यांच्या मते ही भावना महत्त्वाची. या लुंत्झ यांच्याकडे इस्रायलच्या प्रतिमानिर्मितीचे काम होते. इस्रायली प्रवक्त्यांसाठी त्यांनी एक गोपनीय पुस्तिका तयार केली होती. ती पुढे फुटली (तिची आठवण येण्याचे कारण म्हणजे मोदी यांचे अलीकडचे काश्मीरबाबतचे ‘टुरिझम की टेररिझम’ भाषण. लुंत्झ यांनी या पुस्तिकेत असेच वाक्य वापरले होते. पॅलेस्टिनींना बुक्स हवीत, बॉम्ब नव्हे!). या पुस्तिकेतील पहिले प्रकरण होते- प्रभावी जनसंपर्काचे २५ नियम आणि त्यातील पहिला नियम होता- दोन्ही बाजूंना सहानुभूती दाखवा.
मॅकडोनाल्ड यांच्याबाबतचा प्रोपगंडा याबाबतीत कमी पडला. म्हणूनच ते आयुष्यात ‘बहिरा हेर आणि इतर कथा’ येऊनही टिकून राहू शकले. सगळेच असे टिकतात असे नाही. त्यातील अनेकांच्या कपाळी कायमचा देशद्रोहाचा शिक्का चिकटून बसतो. आपण ते पाहतोच आहोत..
रवि आमले ravi.amale@expressindia.com