रिचर्ड निक्सन यांना आता राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. ही वॉटरगेटच्या किती तरी आधीची, १९५२ मधील गोष्ट. रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदासाठी आयसेनहॉवर उभे होते. त्यांनी उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निक्सन यांची निवड केली होती. प्रचार जोरात सुरू होता. निक्सन कॅलिफोर्नियाच्या दौऱ्यावर होते. तेथील सभेनंतर त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांच्या हातात एक वर्तमानपत्र ठेवले. त्यातील बातमीचा मथळा त्यांनी वाचला आणि ते कोसळलेच. मथळा होता – ‘निक्सन स्कँडल फंड’. निक्सन यांच्या प्रचारमोहीम प्रमुखांनी दोन वर्षांपूर्वी एक निधी उभारला होता. त्यातील पैसे निक्सन यांनी स्वत:च्या राहणीमानावर खर्च केले, असा आरोप होता. त्या निधी घोटाळ्याचे वादळ देशभर घोंघावू लागले होते. निक्सन यांना निवडणुकीतून माघार घेण्याशिवाय अन्य मार्ग दिसत नव्हता. अशा वेळी त्यांच्या मदतीला आली दूरचित्रवाणी.
हे एक अतिशय महत्त्वाचे प्रोपगंडा साधन. राजकारणात ते किती महत्त्वाचे आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी निक्सन यांच्यासारखे दुसरे उदाहरण नाही. निक्सन यांना या माध्यमाने तारले होते, तसेच बुडवलेही होते. अध्यक्षपदाची एक निवडणूक तर जिंकता जिंकता ते हरले, ते केवळ टीव्हीमुळे. १९६०च्या त्या निवडणुकीत, अमेरिकेतील पहिली टीव्हीवरून थेट प्रक्षेपित झालेली अध्यक्षीय वादसभा झाली. त्यात निक्सन यांचे प्रतिस्पर्धी होते जॉन एफ. केनेडी. ज्यांनी ती वादसभा रेडिओवरून ऐकली त्यांच्या दृष्टीने त्यात निक्सन हेच वरचढ ठरले होते. पण टीव्हीवर ते हरले. याचे कारण – प्रतिमानिर्मितीत ते कमी पडले. गोष्टी साध्या होत्या. केनेडी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देताना थेट कॅमेऱ्यात पाहून बोलत होते. निक्सन स्टुडिओतील प्रेक्षकांकडे पाहून बोलत होते. घराघरांत टीव्हीसमोर बसलेल्या नागरिकांना वाटत होते, केनेडी आपल्याशीच, आपल्या डोळ्याला डोळा देत बोलत आहेत आणि निक्सन नजर चुकवत आहेत. स्टुडिओतल्या प्रखर दिव्यांमुळे त्यांना घाम येत होता. तशात ते नुकतेच तापातून उठलेले होते. ते काय म्हणतात याहून ते कसे म्हणतात, कसे दिसतात हे महत्त्वाचे ठरले. शिवाय केनेडी यांच्या भात्यात आणखी एक अस्त्र होते. त्यांची सुंदरशी, सहा महिन्यांची गर्भवती पत्नी – जॅकेलिन. वादसभेच्या वेळी तिने आपल्या घरी ‘डिबेट वॉचिंग पार्टी’ ठेवली होती. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत त्याच्याही बातम्या आल्या. तिने कोणते कपडे घातले होते, कोण कोण आले होते, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या वगैरे. ख्यातनाम राजकीय विश्लेषक डॅनिएल बूरस्टिन यांनी त्यांच्या ‘द इमेज’ या पुस्तकात यालाच ‘स्यूडो इव्हेन्ट’ – छद्म कार्यक्रम – म्हटले आहे.
ते काहीही असू शकतात. म्हणजे एखादी पत्रकार परिषद, चित्रपटाचा प्रीमिअर, पारितोषिक समारंभ, वादसभा, चर्चा.. काहीही. त्यांचा लसावि एकच असतो. तो म्हणजे ते स्वाभाविक नसतात. घडवलेले असतात. त्यांची पटकथा आधीच तयार असते. त्यातून तयार केल्या जातात त्या प्रतिमा. ‘पीआर’चे पितामह एडवर्ड बर्नेज यांनी या स्यूडो-इव्हेन्टचे एक उदाहरण दिले आहे. एका हॉटेलची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम त्यांच्याकडे आले होते. त्यासाठी काय करायला हवे? तर त्या हॉटेलचे इंटेरिअर, तेथील सुखसोयी, सुविधा, खाद्यपदार्थाचा दर्जा यांत वाढ करा असे कोणीही सुचविले असते. बर्नेज यांनी त्या व्यवस्थापनाला सांगितले की, हॉटेलचा तेरावा वर्धापन दिन साजरा करा. समारंभाला सुप्रसिद्ध बँकर, वकील, धर्मोपदेशक, समाजातील मान्यवर अशा ‘सेलेब्रिटीं’ना आमंत्रित करा. हे हॉटेल समाजाची किती चांगल्या पद्धतीने सेवा करीत आहे, हे त्यांच्या तोंडून वदवा. त्याच्या बातम्या छापून आणा. बस्स. हा स्यूडो इव्हेन्ट. ही प्रतिमानिर्मिती. हे जाहिरात तंत्र राजकारणातही वापरले जाते. आपण एखादी वस्तू खरेदी करावी, त्याप्रमाणे उमेदवारांच्या या प्रतिमांची ‘मानसिक खरेदी’ करीत असतो. या तंत्रात निक्सन कमी पडले. मतदारांनी त्यांना नाकारले. पण या निधी घोटाळ्यात मात्र याच टीव्हीने त्यांना वाचवले.
तसे त्या घोटाळ्याच्या आरोपांना पत्रकार परिषद घेऊनही उत्तर देता आले असते. पण पत्रकारांपुढे जाण्यात धोका असतो. तेथे आपल्या कथनावर आपले नियंत्रण राहीलच याची खात्री नसते. पत्रकार आडवे-तिडवे प्रश्न विचारू शकतात. त्याने आपण अडचणीत येऊ शकतो, आपली बनविलेली प्रतिमा, व्यक्तिमत्त्वातला खोटेपणा यांचे वस्त्रहरण होऊ शकते. त्यामुळेच अनेक राजकीय नेते नियंत्रित पत्रकार परिषदेचा स्यूडो इव्हेन्ट आयोजित करतात. तेथे पत्रकार ‘आपले’च असतात आणि कोणते प्रश्न विचारायचे हेही ठरलेले असते. निक्सन यांनी त्याऐवजी वेगळाच पर्याय निवडला तो टीव्हीवर भाषण देण्याचा.
त्या भाषणाची अर्थातच खास तयारी करण्यात आली होती. कोनार्ड ब्लॅक यांच्या निक्सन चरित्रात याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. त्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणासाठी हॉलीवूडमधील एल कॅपिटान थिएटरची निवड करण्यात आली होती. ती केवळ एवढय़ाचसाठी की तेथील प्रकाशयोजना उत्कृष्ट होती. तेथे खास, हॉलीवूडच्या भाषेत ‘जीआय बेडरूम डेन’चा सेट उभारण्यात आला होता. अमेरिकी मध्यमवर्गीय गृहस्थाच्या घरातल्यासारखा. एक जुन्या पद्धतीचे टेबल, दोन खुच्र्या, पुस्तकांचे लहानसे कपाट, मागे पडदा. निक्सन चारचौघांसारख्या साधेपणानेच राहतात हे त्यातून दाखवायचे होते. या भाषणातील मुख्य मुद्दा होता तो आपण गैरव्यवहार कसा केला नाही हा. ‘त्यातली एक पेनीसुद्धा मी वैयक्तिक कामासाठी वापरलेली नाही. मी श्रीमंत नाही. माझ्या पत्नीकडे मिंक कोट नाही, पण तिच्याकडे रिपब्लिकन कापडाचा कोट आहे.’ अर्धा तास ते हे सांगत होते. बोलता बोलता त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की, लोकांना वाटत असेल की याने काही तरी फायदा करून घेतलाच असेल. याचे स्वत:च उत्तर देताना त्यांनी आपली कमकुवत आर्थिक स्थिती लोकांसमोर मांडली. शेवटी शेवटी त्यांनी प्रेक्षकांना एक धक्का दिला. ते म्हणाले, ‘मला एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे की, निवडणुकीनंतर मी एक भेट स्वीकारली होती.’ या वाक्याने अनेकांच्या मनात भलत्याच शंका आल्या असतील, पण ती भेट होती एका मतदाराने दिलेला कुत्रा. ते सांगत होते, ‘त्याने पार टेक्सासहून आमच्यासाठी पाठवला होता तो. आमच्या धाकलीने त्याचे नाव ठेवले चेकर्स.. आणि मी इथे एवढेच सांगेन की, लोक याबद्दल काहीही म्हणोत, पण आम्ही तो कुत्रा ठेवून घेणार आहोत.’ आज हे भाषण ओळखले जाते ते चेकर्स स्पीच म्हणून. अमेरिकी राजकारणात टीव्हीचे युग सुरू करणारे म्हणून. अमेरिकेतील किमान ६० लाख लोकांनी ते ऐकले होते. कालपर्यंत निक्सन यांच्यावर संशयाने पाहणारे या भाषणानंतर त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. ते कशामुळे?
या भाषणातील सत्य, प्रामाणिकपणा, नैतिकता या शब्दांतून चमकदार सामान्यता हे तंत्र दिसते. आपला साधेपणा दाखविण्यामागे ‘प्लेन फोक्स’ – साधा माणूस – हे तंत्र होते. सामान्यांचा विश्वास जिंकण्याचे ते एक उत्तम साधन असते. जाहिरातींत आपल्यातलाच माणूस दाखवतात अनेकदा, तो यासाठीच (पाहा – सध्याच्या राज्य सरकारच्या जाहिराती.). आपल्या पत्नीकडे कोट नसल्याचे ते सांगत होते त्यामागचा हेतूही तोच होता. कुत्र्याच्या कथेतून आपण कसे चांगले अमेरिकी गृहस्थ आहोत हे दाखविणे हा टेस्टिमोनियल – प्रशंसापत्र – तंत्राचा भाग. त्याकरिता त्यांनी टेक्सासमधील मतदाराचे नाव घेतले होते. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून प्रोपगंडा तंत्रे वापरण्यात आली होती. हट्टीकट्टी गरिबी आणि भ्रष्टदुष्ट श्रीमंती अशा भावनांना खेळविले जात होते. हे भाषण सुरू असताना कॅमेरामनच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. अनेकांची अशीच गत झाली होती. लोकांचा निक्सन यांच्यावर विश्वास बसला होता. हे टीव्हीवरील प्रोपगंडाचे सामथ्र्य.
प्रतिमानिर्मिती आणि दिसते तसेच असते यावर असलेली आपली श्रद्धा टीव्ही प्रोपगंडाला परिणामकारक बनवीत असते. पण मग हे लोकांना समजत नसते का?. तर, नसते. याचे एक कारण म्हणजे टीव्ही सतत आपल्या घरात असतो. त्यावरील येणारे संदेश आपण परिघावरच्या मार्गाने ग्रहण करीत असतो. उदाहरणार्थ, घरात दुसरीच काही कामे करताना आपण टीव्ही पाहात असतो. अशा वेळी साध्या साध्या, निवेदकाच्या दिसण्यासारख्या गोष्टीही परिणाम करून जात असतात. पुन्हा त्यात विचार करण्यास वेळच दिलेला नसतो. म्हणून त्याला इडियट बॉक्स म्हणतात. पण तो मूर्ख नव्हे, तर हुशार पेटारा आहे.. प्रोपगंडाचा.
रवि आमले
ravi.amale@expressindia.com