ट्रम्पादी मंडळींचा सरसकट साऱ्याच माध्यमांना विरोध नसतो. जी त्यांच्या बाजूची ती माध्यमे त्यांना हवीच आहेत. अर्थ साधा आणि स्पष्ट आहे. सध्याचा ‘फेक न्यूज’वाद हा एकंदरच हितसंबंधांच्या संघर्षांचा वाद आहे. एकदा हे ध्यानी घेतले की प्रश्न येतो, तो म्हणजे कोणाचे हितसंबंध? त्याचे उत्तर आहे – अदृश्य सरकारचे..
‘न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, एनबीसी आणि तशी अनेक खोटारडी वृत्तमाध्यमे माझी शत्रू नाहीत. ती अमेरिकी नागरिकांची शत्रू आहेत!’
हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान. प्रोपगंडाचे हे उत्तम उदाहरण. आपणांस नापसंत असलेल्या, आपल्या विरोधात असलेल्या व्यक्ती वा गोष्टींचे राक्षसीकरण – डेमनायझेशन – हे त्यातील एक महत्त्वाचे तंत्र. ट्रम्प तेच वापरताना दिसतात. वृत्तमाध्यमे, ज्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते तीच लोकांची, लोकशाहीची शत्रू आहेत असे सांगत ट्रम्प या माध्यमांचे राक्षसीकरण करत आहेत. आणि त्याद्वारे ते लोकांसमोर माहितीचा दुसरा पर्याय ठेवत आहेत. तो म्हणजे स्वत:चा. ते सांगतील तेच खरे. तीच खरी बातमी. बाकी साऱ्या बातम्या बनावट – फेक, पैसे घेऊन छापलेल्या – पेड न्यूज. खरोखर हे असेच आहे का? माध्यमांतून खोटय़ा बातम्या प्रसिद्ध होत नाहीत वा ती पैसे घेऊन बातम्या छापत नाहीत, असे कोण म्हणेल? निदान ‘अशोकपर्व’ पाहिलेले वाचक तरी तसे म्हणणार नाहीत. मग ट्रम्प त्याविरोधात बोलले तर त्यात चूक काय आहे?
ट्रम्प अमेरिकेतील माध्यमांबाबत जे म्हणत आहेत, तेच आपण येथील माध्यमांबाबत बोलत आहोत. येथील अनेकांच्या मते, आपल्याकडील अनेक वृत्तपत्रे बंद करून त्यांच्या संपादकांना आणि पत्रकारांना, पाकिस्तानात नाहीच जमले तर निदान तुरुंगात तरी टाकले पाहिजे. तर आपल्याकडील हे जे सत्यप्रिय वाचक आहेत, त्यांचे तरी काय चूक आहे?
चूक या वाचकांची नाहीच. कारण तेच मुळात ट्रम्प आणि त्यांच्यासारख्या लोकांच्या प्रचाराचे बळी आहेत. ही ट्रम्पादी मंडळी माध्यमांबाबत राक्षसीकरणाप्रमाणेच आणखी एका तंत्राचाही वापर करीत आहेत. ते म्हणजे ‘कार्ड स्टॅकिंग’. पत्ते खेळताना त्यातील चांगले पत्ते तळाशी ठेवायचे. वाईट वरवर ठेवायचे. म्हणजे समोरच्याच्या हाती जातील ते वाईट पत्तेच. हेच प्रचारातही करायचे. एखाद्या गोष्टीची केवळ चांगली बाजू तेवढीच लोकांसमोर ठेवायची. किंवा उलटे करायचे आणि आपणांस हवा तो परिणाम साधून घ्यायचा. हे माध्यमांचे राक्षसीकरण इतिहासात पहिल्यांदाच होत आहे असे मुळीच नाही. रिचर्ड निक्सन हे ट्रम्प यांचे पूर्वसुरी. वॉटरगेट प्रकरणात रेटून खोटे बोलल्याबद्दल त्यांच्याविरोधात महाभियोगच चालणार होता. राजीनाम्यावर सुटले ते. त्यांचेही मत ‘माध्यमे हीच शत्रू आहेत’ असेच होते. तसे का? तर या ट्रम्पादी मंडळींच्या मते ही माध्यमे खास हितसंबंधीयांसाठीच काम करीत असतात म्हणून. पण खरेच हे कारण असते का? तसे अजिबात नाही. त्यांना ती गणशत्रू वाटतात याचे कारण ती त्यांच्या हितसंबंधांसाठी काम करीत नसतात. जी त्यांचे हितसंबंध जपतात, त्यांच्या धोरणांना, विचारांना पाठिंबा देतात ती माध्यमे त्यांच्यासाठी हरिश्चंद्राची अवतार असतात. अमेरिकेतील फॉक्स न्यूज ही वाहिनी ट्रम्प यांना म्हणूनच आवडते. माध्यमसम्राट रूपर्ट मर्डॉक यांच्या मालकीची सर्व माध्यमे, तसेच ‘ब्रेटबार्ट न्यूज’सारखी ऑनलाइन वृत्तपत्रे त्यांना म्हणूनच जनमित्र वाटतात. म्हणजे त्यांचा सरसकट साऱ्याच माध्यमांना विरोध नसतो. जी त्यांच्या बाजूची ती माध्यमे त्यांना हवीच आहेत. अर्थ साधा आणि स्पष्ट आहे. सध्याचा ‘फेक न्यूज’वाद हा एकंदरच हितसंबंधांच्या संघर्षांचा वाद आहे. एकदा हे ध्यानी घेतले की प्रश्न येतो, तो म्हणजे कोणाचे हितसंबंध? त्याचे उत्तर आहे – अदृश्य सरकारचे.
अदृश्य सरकार!
एखाद्या षड्यंत्रसिद्धांतात चपखल बसावा असा हा शब्द. अविश्वसनीय वाटावा असा विचार. पण तो मांडला आहे एडवर्ड बर्नेज यांनी. बडय़ाबडय़ा जाहिराततज्ज्ञांनी हे नाव ऐकताच कानाच्या पाळ्यांना हात लावावा, असे हे व्यक्तिमत्त्व. आज जनसंपर्क – पीआर – म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रोपगंडा शाखेचे ते जनक. १९२८ मध्ये त्यांनी लिहिलेले ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक म्हणजे जाहिरात क्षेत्राचे बायबल. त्याच्या पहिल्या प्रकरणातच त्यांनी या ‘हितसंबंधीं’चा परिचय करून दिलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘लोकशाही समाजातील महत्त्वाचा घटक कोणता असेल, तर जनसमूहाच्या संघटित सवयी आणि मते यांची जाणीवपूर्वक आणि अत्यंत हुशारीने केलेली हेराफेरी. समाजाच्या अदृश्य यंत्रणेत जे हेराफेरी करतात त्यांना त्यांनी म्हटले आहे – अदृश्य सरकार. हे अदृश्य सरकारच आपल्या राष्ट्रातील खरे सत्ताधारी असते. आपल्यावर कोणी तरी सत्ता चालवत असते, आपल्या मनोभूमिका, आवडीनिवडी तयार करीत असते. हे करणारे जे लोक असतात ते आपल्याला माहीतही नसतात.. मोजकेच लोक असतात ते. पण नैसर्गिक नेतृत्वगुण, समाजास आवश्यक असलेल्या कल्पनांचा पुरवठा करण्याची क्षमता आणि सामाजिक व्यवस्थेतील त्यांची महत्त्वाची जागा यांद्वारे ते समाजावर राज्य करीत असतात. लोकमानसास कळपुतळीप्रमाणे नाचवीत असतात.’ बर्नेज सांगतात, या सरकारचे कार्यकारी अंग म्हणजे प्रोपगंडा. माध्यमे ही या अदृश्य सरकारसाठी केवळ माध्यम – मीडियम – म्हणून काम करीत असतात. आता हे जर खरे असेल, तर कसली लोकशाही आणि कसले काय?
ख्यातनाम विचारवंत नॉम चॉम्स्की यांनी नेमक्या याच प्रश्नाला हात घातला आहे. ‘मीडिया कंट्रोल’ या पुस्तिकेत लोकशाही व्यवस्थेवर भाष्य करताना ते सांगतात, ‘लोकांचे लोकांसाठी’ वगैरे हा जो लोकशाहीचा अर्थ आहे तो शब्दकोशात दिसेल. परंतु त्यांच्या मते – ‘लोकांनी आपले आयुष्य कसे जगावे हे ठरविण्याच्या अधिकारावर बंदी घातली पाहिजे. माहितीची साधने कठोरपणे नियंत्रित केली पाहिजेत. ती अत्यंत संकुचित अशी ठेवली पाहिजेत, अशी लोकशाहीची एक पर्यायी संकल्पना आहे. आणि ती आजचीच नाही. पूर्वीपासून हे चालत आले आहे.’
हे सारे चालविणारे जे अदृश्य सरकार आहे त्याचा भाग अधूनमधून उजेडात येतो. आपण तो ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड लॉइड जॉर्ज यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय युद्धध्येय समितीमध्ये, आर्थर कॉनन डॉईल, एच जी वेल्स, रूडयार्ड किपलिंग, थॉमस हार्डी, विल्यम आर्चर यांच्यासारख्या ‘नैसर्गिक नेतृत्वगुण, समाजास आवश्यक असलेल्या कल्पनांचा पुरवठा करण्याची क्षमता आणि सामाजिक व्यवस्थेत महत्त्वाची जागा’ असलेल्या मातब्बरांचा समावेश असलेल्या वॉर प्रोपगंडा ब्युरोमध्ये पाहिला आहे. जॉर्ज क्रील यांच्या नेतृत्वाखालील लोकमाहिती समितीमध्येही तो स्पष्ट दिसतो. अमेरिकेत अत्यंत युद्धविरोधी असे वातावरण असताना, शांततावादी चळवळी जोरात सुरू असताना ज्यांनी अवघ्या सहा महिन्यांत नागरिकांना युद्धखोर बनविले, ते हेच अदृश्य सरकार होते. ती क्रील समिती होती. युद्धात त्यांचे हितसंबंध होते आणि क्रील यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘लोकांची मने जिंकणे, त्यांच्या दृढ मनोधारणांवर विजय मिळविणे’ हे त्या समितीचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी अन्य माध्यमांप्रमाणेच वृत्तमाध्यमांचाही मोठय़ा प्रमाणावर वापर केला. क्रील अहवालानुसार, या समितीद्वारे आठवडय़ाला वृत्तपत्रांचे सुमारे वीस हजार स्तंभ – ‘कॉलम’ – भरेल एवढा मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होता. या समितीच्या एकटय़ा महिला विभागातर्फे १९ हजार ४७१ वृत्तपत्रे आणि महिलांची कालिके यांना फक्त नऊ महिन्यांत दोन हजार ३०५ वृत्तान्त पाठविण्यात आले होते. युद्धाचा ज्वर चढलेल्या काळात ही सर्व वृत्तपत्रे त्या बातम्या प्रसिद्ध करीत होती. युद्धखोरी वाढविण्यास मदत करीत होती. ‘अदृश्य सरकार’ त्यांना नाचवीत होते. अमेरिकेतील काही वृत्तपत्रमालकही त्या अदृश्य सरकारचे भाग होते. माध्यमांतून हितसंबंधांचा खेळ खेळला जात होता. प्रोपगंडा हे त्याचे शस्त्र होते.
पण हा खेळ केवळ क्रील समितीनेच केला असे नव्हे. आज वृत्तपत्र क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा गणला जाणारा पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो, त्या जोसेफ पुलित्झर यांच्या ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’नेही त्यापूर्वी तेच केले होते. हे तेच वृत्तपत्र, ज्यातील एका कार्टूनमुळे ‘यलो जर्नालिझम’ हा शब्द जन्मास आला.. या वर्तमानपत्राची स्पॅनिश-अमेरिका युद्धातील भूमिका प्रचारेतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी (किंवा पिवळ्या शाईने!) नोंदवावी अशी आहे..
रवि आमले
ravi.amale@expressindia.com