मोठमोठे झगमगाटी ‘इव्हेंट’ करणे, लोकांवर भित्तिपत्रकांतून, प्रसारमाध्यमांतून, भाषणांतून सतत प्रचार आदळवत ठेवणे हा बर्नेज यांच्या प्रचारतंत्राचा आत्मा. या सर्व गोष्टींचा प्रभावशाली वापर राजकीय क्षेत्रातही केला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले ग्वाटेमालाच्या उदाहरणातून..
‘लोकांच्या सवयी आणि मते यांना अत्यंत हुशारीने आणि जाणीवपूर्वक वळण देणे हा लोकशाही समाजातील एक महत्त्वाचा भाग असतो.’ एडवर्ड बर्नेज यांच्या ‘प्रोपगंडा’ या पुस्तकाची सुरुवात होते ती या वाक्याने. त्यांनी प्रोपगंडापंडिताचे हे काम सांगितले आहे, की त्याने लोकांच्या मतांना आणि सवयींना वळण द्यायचे. ‘स्पिन’ देणे म्हणतात ते हेच. लोकांना एखादी वस्तू विकत घेण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता हे केले जाते. सगळ्या जाहिरातींचा हाच हेतू असतो. पण तो कसा साध्य करायचा?
त्यासाठी बर्नेज यांच्या मदतीला आले सिग्मंड फ्रॉईड. मनोविश्लेषण तंत्राचे जनक. ते बर्नेज यांचे मामा. ते सांगत, की माणसाच्या अबोध मनामध्ये काही अतार्किक, अविवेकी भावना वास करीत असतात. या शक्ती त्याची वर्तणूक नियंत्रित करीत असतात. बर्नेज यांनी फ्रॉईड यांची पुस्तके अभ्यासली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यातून त्यांच्या लक्षात आले, की लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अतार्किक, अविवेकी भावनांची नीट ओळख करून घेतली, की मग त्यांचा वापर करणे सोपे. तो करून लोकांचे वागणे, बोलणे त्यांच्याही नकळत नियंत्रित करता येऊ शकते. या अभ्यासाचा वापर त्यांनी अनेक ठिकाणी केला.
एखादी वस्तू वा कल्पना तिच्या गुणावगुणांच्या क्षमतेवर लोकांनी स्वीकारावी याऐवजी त्याला अन्य सद्गुण वा सद्भावना यांचे आवरण चढवायचे. म्हणजे मीठ साधे मीठ म्हणून ठेवायचेच नाही. ते ‘देश का नमक’ बनवायचे. एखाद्या धोरणात्मक घोषणेची तुलना थेट एखाद्या ऐतिहासिक गोष्टीशी वा व्यक्तीविशेषाशी करायची. म्हणजे लोकांच्या मनात देश, देशाच्या जीवनातील एखादी ऐतिहासिक घटना, थोर व्यक्ती यांबाबत ज्या उदात्त भावना असतात त्यांचे आरोपण आताच्या गोष्टींवर करायचे. हे ‘ग्लिटरिंग जनरॅलिटी’ तंत्र. दुसरे तंत्र- बद-नामकरणाचे. नेम कॉलिंग. नकारार्थी प्रतिमा वा कल्पना यांच्याशी वस्तू, व्यक्ती, विचार, कल्पना यांचे नाते जोडायचे. सर्वाच्या अबोध मनात हिंसक भावना असतात आणि त्यांना लटकलेली असते भयभावना. त्या प्रतलावर आणायच्या. त्यासाठी लोकांच्या समोर आपल्या विरोधातील व्यक्ती, विरोधी विचार यांची भोकाडी उभी करायची. हे राक्षसीकरणाचे तंत्र. असेच आणखी एक तंत्र म्हणजे ‘टेस्टिमोनियल’. असंख्य जाहिरातींमधून आपण हे पाहतो. समाजातील प्रतिष्ठित, लोकप्रिय व्यक्तींकडून किंवा कधी कधी अगदी आपल्यातल्याच, आपल्याला आपली वाटेल अशा व्यक्तीकडून वस्तूचा, राजकीय व्यक्तीचा, धोरणाचा प्रचार करायचा. बर्नेज यांनी त्यांच्या अनेक जाहिरात मोहिमांतून या तंत्रांचा वापर केला. मोठमोठे झगमगाटी ‘इव्हेंट’ करणे, लोकांवर भित्तिपत्रकांतून, प्रसारमाध्यमांतून, भाषणांतून सतत प्रचार आदळवत ठेवणे हा तर त्यांच्या प्रचारतंत्राचा आत्मा. या सर्व गोष्टींचा प्रभावशाली वापर राजकीय क्षेत्रातही केला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले ग्वाटेमालाच्या उदाहरणातून.
कर्नल हाकोवो अर्बेझ गुझमन हे ग्वाटेमालाचे राष्ट्रपती. त्यांच्या धोरणांमुळे युनायटेड फ्रूट कंपनीचे प्रचंड नुकसान होत होते. त्याविरोधात ग्वाटेमालामध्ये आवाज उठवून उपयोग नव्हता. आम्ही तुमचे शोषण करीत आहोत. त्याआड येणारी सरकारी धोरणे अन्यायकारक आहेत असे कसे सांगणार? त्याविरोधात अमेरिकी सरकारला जागृत करणे आवश्यक होते. बर्नेज यांच्या कंपनीने ते आव्हान स्वीकारले. अमेरिकेतील भांडवलशहांना भय होते ते साम्यवादाचे. त्याचा पुरेपूर वापर त्यांनी करून घेतला. तेथील माध्यमे हाताशी धरली. हळूहळू वृत्तपत्रांतून ग्वाटेमालातील ‘साम्यवादी संकटा’विषयीचे लेख, अग्रलेख प्रसिद्ध होऊ लागले. पत्रकार लॅरी टाय त्यांच्या ‘फादर ऑफ स्पिन’ या पुस्तकात लिहितात, की ‘द नेशनसारख्या उदारमतवादी पत्रातूनही असे लेख येऊ लागले. बर्नेज यांच्यासाठी ते चांगलेच होते. कारण त्यांना हे माहीत होते की अमेरिकेचे मन जिंकायचे असेल, तर तेथील उदारमतवाद्यांचे मन जिंकणे आवश्यक होते.’
एकीकडे अशा प्रकारे लेख प्रसिद्ध केले जात असतानाच, याविरोधात काही प्रसिद्ध होणार नाही हेही पाहिले जात होते. याचा एक नमुना बर्नेज यांच्या मृत्यूनंतर उजेडात आला. १९५१ साली ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये रॉकवेल केंट नामक कलाकाराचे एक पत्र ‘ग्वाटेमाला लेबर डेमॉक्रसी’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. तर बर्नेज यांनी टाइम्सचे प्रकाशक आर्थर हेस सुल्झबर्जर यांच्याकडे त्याबद्दल तक्रार केली, की हा पत्रलेखक कम्युनिस्ट समर्थक आहे. त्याचे पत्र म्हणजे पार्टी-प्रोपगंडा आहे. हे सुल्झबर्गर बर्नेज यांचे नातेवाईक. त्यामुळे या तक्रारीनंतर काय झाले असेल याचा अंदाज लावणे कठीण नाही. अर्बेझ यांच्या विरोधातील लेख वा त्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवीत असे बर्नेज यांची कंपनी. आणि त्या माहितीचा स्रोत कोण असे? तर युनायटेड फ्रूट कंपनी. अर्थात त्या वर्तमानपत्रांना त्याचा संशयही येण्याचे कारण नव्हते. कारण बर्नेज पुरवीत असलेली माहिती तथ्यांवर आधारित असे. त्यात खुबी एकच होती, की ती तथ्ये बर्नेज यांनी ‘तयार’ केलेली असत.
ग्वाटेमालामध्ये काय चाललेय हे पाहण्यासाठी बर्नेज यांची कंपनी तेथे बातमीदारांना घेऊन जात असे. १९५२च्या जानेवारीत ते न्यूजवीक, सिनसिनाटी एन्क्वायररसारख्या बडय़ा पत्रांचे प्रकाशक, टाइमचे सहयोगी संपादक, ख्रिश्चन सायन्स मॉनिटर, मायामी हेराल्डचे वरिष्ठ अधिकारी अशा लोकांना दोन आठवडय़ांच्या दौऱ्यावर घेऊन गेले होते. बर्नेज त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात, की त्या पत्रकारांना कुठेही जाण्याचे, कोणालाही भेटण्याचे आणि हवे ते लिहिण्याचे स्वातंत्र्य होते. ते खरे मानायचे का?
यूएफसीमध्ये पीआर अधिकारी म्हणून तेव्हा नव्यानेच लागलेले थॉमस मॅक्केन सांगतात, की ‘या पत्रकारांना काय दिसावे, काय ऐकू यावे हे सगळे काळजीपूर्वक नियंत्रित करण्यात आले होते.’ हे तथ्यांवरील, माहितीवरील नियंत्रण. ते ज्याच्या हातात तोच सत्य-वान. हे नियंत्रण कसे ठेवण्यात आले होते? तर बर्नेज यांनी ग्वाटेमालामध्ये काही गुप्तचर पेरले होते. त्यांनाच नंतर माहितीस्रोत म्हणून पत्रकारांसमोर पेश केले जायचे. पुन्हा एखादी कंपनी पत्रकारांना दौऱ्यावर घेऊन जाते, तेव्हा त्याचेही एक ओझे असतेच वार्ताकनावर. हेच ग्वाटेमालाबाबत घडत होते. वर्तमानपत्रांतून ग्वाटेमाला सरकारविरोधात येणारे लेख बर्नेज यांच्या कंपनीकडून फेरप्रकाशित केले जात असत. ते सरकारी निर्णयप्रक्रियेशी संबंधित व्यक्तींना, नेत्यांना पोस्टाने पाठविले जात. ‘कम्युनिझम इन ग्वाटेमाला- २२ फॅक्ट्स’ या माहितीपत्रकाच्या तीन लाख प्रती छापण्यात आल्या होत्या. या सगळ्यांतून एकच चित्र रंगविले जात होते, ते म्हणजे कम्युनिझमचा राक्षस आता लॅटिन अमेरिकेत म्हणजे आपल्या परसदारी आला आहे.
त्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष होते आयसेनहॉवर. त्यांचे परराष्ट्रमंत्री होते जॉन फोस्टर डलेस. यांची कायदा कंपनी होती आणि ती यूएफसीची सल्लागार होती. परराष्ट्र उपमंत्री (लॅटिन अमेरिका) होते जॉन एम. कॅबोट. त्यांचा भाऊ काही काळ यूएफसीचा अध्यक्ष होता. याशिवाय काही बडय़ा नेत्यांचाही या कंपनीशी संबंध होता. शिवाय कंपनीने वॉशिंग्टनमध्ये काही लॉबिईस्टही नेमले होते. या सर्वाच्या प्रचारातून प्रशासनावर ग्वाटेमालाविरोधात कारवाई करण्याचा दबाव वाढत चालला होता. लॅरी टाय लिहितात, ‘याविरोधात बोलले तर आपल्याला कम्युनिस्ट समर्थक म्हटले जाईल या भयाने अनेक उदारमतवादी या काळात गप्प तरी बसले होते किंवा त्या प्रचारात सहभागी तरी झाले होते.’
बर्नेज यांचा हा प्रोपगंडा सुरू असतानाच तिकडे सीआयएनेही ग्वाटेमाला सरकार उलथवून लावण्याची तयारी सुरू केली होती. कार्लोस कॅस्टिलो अर्मास नावाचा एक तडीपार सैन्याधिकारी त्यांनी हाताशी धरला होता. १८ जून १९५४ रोजी सीआयए प्रशिक्षित दोनशे सैनिकांसह तो ग्वाटेमालात घुसला. त्याच्या साह्य़ाला सीआयएची लढाऊ विमाने होती. अवघ्या दहा दिवसांत त्यांनी अर्बेझ सरकार उलथवून लावले. आठवडाभरात अर्मास हा अमेरिकामित्र राष्ट्राध्यक्षपदी बसला. या ‘क्रांती’मागे केवळ बंदुकाच नव्हत्या, तर बर्नेज यांचे प्रचारबॉम्बही होते.
प्रोपगंडाने अशा प्रकारे राजकीय क्षेत्रात बदल केले जाऊ शकतात याचे कारण प्रोपगंडाने समाजाला हवे तसे ‘बनवता’ येते. त्याचे विचारच नव्हे, तर सवयीही बदलता येऊ शकतात. अमेरिकेतील महिलांना सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त सिगारेट ओढायला लावून बर्नेज यांनी तेही सिद्ध करून दाखविले आहे..