दुसऱ्या महायुद्धाला युरोपात तोंड फुटले ते हिटलरच्या पोलंडवरील आक्रमणाने, १९३९ मध्ये; पण त्याला आक्रमण म्हणायचे का? कळ तर आधी पोलंडने काढली होती. ‘ग्लाईविट्झ घटना’ म्हणून ओळखली जाते ती. ग्लाईविट्झ (आजचे क्लिविस)  हे जर्मन-पोलंड सीमेवरचे जर्मनीतले एक गाव. तेथे रेडिओ केंद्र होते. एके रात्री पोलिश सैनिकांची एक टोळी गुपचूप जर्मनीत घुसली आणि त्यांनी त्या केंद्रावर हल्ला केला. काही पोलिश घुसखोर मारले गेले त्यात; पण त्यांनी ते केंद्र ताब्यात घेतले. दहशतवादी हल्ला नव्हे, तर आक्रमणच होते ते. पोलंडने यापूर्वीही असे प्रकार केले होते. आता हिटलरला गप्प बसणे शक्य नव्हते. ही घटना लगेच सर्व जगभर झाली. जर्मन न्यूज एजन्सीने त्याची बातमी दिली. बीबीसीनेही त्याला प्रसिद्धी दिली. आता बीबीसी म्हणजे विश्वासार्हता. त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. पोलंडचा हा आततायीपणाच होता. जर्मनीला त्याचा प्रतिकार करण्याचा अधिकार होता. हिटलरने तेच केले. पोलंडवर हल्ला केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युद्धांचा इतिहास वाचताना ही घटना नीट लक्षात ठेवायला हवी. कारण अशा- तपशील वेगवेगळे, परंतु आशय हाच असलेल्या- घटना आपणांस वारंवार दिसत असतात. व्हिएतनामी बोटींनी आंतरराष्ट्रीय सीमेत उभ्या असलेल्या अमेरिकी युद्धनौकेवर हल्ला केला. ती ‘गल्फ ऑफ टोंकिन घटना’. त्या आक्रमणाच्या प्रतिकारातून अमेरिका-व्हिएतनाम युद्धाला प्रारंभ झाला. असेच झाले पुढे इराकबाबत. सद्दाम हुसेनने लादेनला मदत केली अमेरिकेवरील हल्ल्यासाठी. शिवाय त्याने महासंहारक अस्त्रही बनवले. म्हणून इराकयुद्ध सुरू झाले; पण.. वस्तुस्थिती काही वेगळीच होती.

ग्लाईविट्झ घटना पाहा. तेथील रेडिओ केंद्रावर हल्ला झालाच नव्हता. नाझींच्या ‘एसएस’ (शूट्झस्टाफेल) या संघटनेचा प्रमुख हिमलर आणि जर्मन गुप्तचर संघटना यांनी रचलेले ते नाटक होते. ते व्यवस्थित वठावे यासाठी त्यांनी पोलंडचा सहानुभूतीदार असलेल्या एका जर्मन नागरिकाचे अपहरण केले. ‘डाखव छळछावणी’तून अनेक कैद्यांना आणले. त्या सर्वाना मारले. या कैद्यांचे चेहरे ओळखता येऊ  नयेत म्हणून ठेचले. हे सगळे मृतदेह, त्यांची हत्यारे मग पत्रकारांना दाखवली, की हे पाहा पोलिश घातपाती. एरवी गुप्तचर परिभाषेत ‘फॉल्स फ्लॅग – छद्मध्वज – ऑपरेशन’ म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार. नाझींनी त्याचा वापर प्रोपगंडासाठी केला. पण केवळ फॅसिस्ट हुकूमशहाच असे करतात असे नव्हे. तो लोकशाहीतही दिसतो. त्यामागील हेतू असतो, तो सरकारने जो निर्णय आधीच घेतला आहे, तोच निर्णय सरकारने घ्यावा अशी लोकमागणी निर्माण करणे. नागरिकांना असे वाटावे, की सरकारने ते विशिष्ट पाऊल जनभावना लक्षात घेऊन उचलले आहे. त्यात खुबी अशी असते, की आपणास काय हवे आहे ते प्रोपगंडाच्या माध्यमाद्वारे सरकारच आपणास सांगत असते आणि आपण खूश असतो, की सरकार लोकांचे ऐकते. अशा प्रकारचा प्रोपगंडा ओळखणे महाकठीण. याचे एक कारण म्हणजे, त्यामागील ‘सत्य’ हे नियंत्रित असते. त्यातील बनावट, भेसळ लक्षात येणे हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. तेव्हा माहिती नियंत्रित करणाऱ्या कोणत्याही राज्यव्यवस्थेपासून सांभाळून राहणे एवढेच मग सामान्यांच्या हाती राहते.

राज्यव्यवस्थेकडून केल्या जाणाऱ्या प्रोपगंडाची शिकार केवळ जर्मन नागरिकच बनले होते असे नाही. ब्रिटन, सोव्हिएत रशिया, अमेरिका आदी सगळे देश तेच करीत होते. अमेरिकेत तेव्हा अध्यक्षपदी होते फ्रँकलिन डी. रूझवेल्ट. १९३३ ते ४५ अशी १२ वर्षे ते अध्यक्षपदी होते. ते थोर मुत्सद्दी नेते होतेच आणि अशा नेत्याला असलेले प्रोपगंडाचे भान आणि ज्ञान हेसुद्धा त्यांच्याकडे होते. ते पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी उभे राहिले तेव्हा अमेरिका महामंदीने ग्रासलेली होती. बेरोजगारी, टंचाई, दारिद्रय़ ही मोठी आव्हाने होती. लोक भ्रष्टाचार, गुन्हेगारीने त्रासले होते. त्या काळात त्यांनी मतदारांना दिलासा दिला, की गडय़ांनो, अच्छे दिन, आनंदी दिन आले आहेत.. जॅक येलेन यांनी लिहिलेले ‘हॅपी डेज आर हिअर अगेन’ हे गीत घेऊन रूझवेल्ट प्रचारात उतरले होते. ‘सगळे मिळून ओरडू या आता, यावर शंका घेईल असे कोणी नाही आता, तेव्हा सगळ्या जगाला सांगू या आता, की खुशीचे दिवस आलेत पुन्हा’ असे सांगणारे हे गीत पुढे डेमोक्रॅटिक पक्षाचे जणू अधिकृत प्रचारगीतच बनले. सत्तेवर आल्यानंतर आठवडाभराच्या आतच त्यांनी रेडिओवरून नागरिकांशी संवाद साधणे सुरू केले. विविध विषयांवर अगदी घरगुती संवाद असे तो. ‘फायरसाइड चॅट’ – ‘शेकोटीभोवतीच्या गप्पा’ असेच म्हणत त्याला. लोकांना वाटे ते आपले मन मोकळे करतात. पण तो सारा प्रोपगंडाचा भाग होता. त्यांच्या त्या सगळ्या गप्पांची पटकथा तयार केलेली असे त्यांच्या सल्लागारांनी आणि त्याला शैलीदार बनवलेली असे नाटककार रॉबर्ट शेरवूड यांनी. त्यांच्या ‘न्यू डील’नामक धोरणांना त्यांनी यातून पाठिंबा मिळवला. रेडिओप्रमाणेच त्यांनी नाटकाचाही प्रोपगंडासाठी वापर केला. १९४०च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात त्यांच्या प्रोपगंडाकारांनी ‘पॉवर’ नावाचे एक नाटक आणले. त्यात विरोधक कसे सैतान आहेत, मूर्ख भांडवलशाहीवादी आहेत असे दाखविण्यात आले होते. हे बद-नामकरणाचे तंत्र. ते आता पुन्हा वापरण्यात येणार होते. त्याकरिता हॉलीवूड सज्जच होते. या प्रोपगंडा माध्यमाबद्दल रूझवेल्ट यांनी म्हणून ठेवलेले आहे की, ‘चित्रपट उद्योगाचा तसा प्रयत्न असो वा नसो, पण ते प्रोपगंडाचे जगातील सर्वात शक्तिशाली साधन बनू शकते.’ पुढे अमेरिकी चित्रपट उद्योगाने ते सातत्याने दाखवून दिले. या चित्रपट उद्योगाने अगदी टारझन (टारझन ट्रायम्फ्स, १९४३), शेरलॉक होम्स (शेरलॉक होम्स अँड द व्हॉइस ऑफ टेरर, १९४२), एवढेच नव्हे तर, बॅटमन, सिक्रेट एजन्ट एक्स-नाइन अशी कार्टून पात्रेही जगभरातील ‘पंचमस्तंभी’ आणि नाझी हस्तक यांच्याविरोधात उतरवली. चार्ली चॅप्लीन यांचा ‘द ग्रेट डिक्टेटर’ हा एक अभिजात चित्रपट. त्यातून हिटलरची खिल्ली उडविण्यात आली होती. (परंतु त्यातून हिटलर विनोदी झाला. त्याचे क्रौर्य झाकोळले गेले. नाझीविरोधी प्रोपगंडा म्हणून हा चित्रपट अयोग्य होता. हे पुढे चॅप्लीन यांनीही मान्य केले.)

तिकडे सोव्हिएत रशियात स्टॅलिनने आपल्या नागरिकांसमोर हे महायुद्ध ‘ग्रेट पॅट्रिऑटिक वॉर’ म्हणून मांडले. १९४१च्या नोव्हेंबरमध्ये स्टॅलिनने केलेले ‘होली रशिया’ भाषण हे रशियन प्रोपगंडाचे खास उदाहरणच. त्यात त्याने नाझी जर्मनीची तुलना झारच्या रशियाशी केली होती. ब्रिटनला तर प्रोपगंडाचा दांडगा अनुभव होताच. त्यांनी पुन्हा ती यंत्रणा कामाला लावली. या वेळी चित्रपट या साधनाचा त्यांनीही मोठय़ा प्रमाणावर वापर केला. या ब्रिटिश प्रोपगंडाचे लक्ष्य केवळ युरोपच नव्हते. त्यांच्यासमोर आता भारतही होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत ही प्रोपगंडाचीही युद्धभूमी बनली होती. ब्रिटन विरुद्ध जपान व जर्मनी असा तो संघर्ष होता. भारतीयांनी ब्रिटिश सत्तेविरोधात बंड करावे यासाठी जपानी प्रोपगंडा कार्यरत होता. जपानने प्रोपगंडाला अतिशय योग्य नाव दिलेले आहे.- ‘विचारयुद्ध’. १९३२ पासून तेथील शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘विचार पर्यवेक्षण विभाग’ हे काम करीत असे. पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर तेथे ‘नैकाकू जोहोबू’ हा माहिती-प्रसारण विभाग सुरू करण्यात आला. जपानी प्रोपगंडाचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी केलेला पोर्नोग्राफीचा वापर. त्या प्रोपगंडाचे लक्ष्य खास करून ऑस्ट्रेलियन सैनिक असत. त्यांच्या बायका, प्रेमिका या तेथील ब्रिटिश आणि अमेरिकी सैनिकांशी कसे लैंगिक चाळे करीत असत अशी चित्रे असलेली पोस्टकार्डे आणि पत्रके ऑस्ट्रेलियन सैनिकांत वाटली जात. शत्रुसैनिकांचे मनोधैर्य खच्ची करणे हा त्याचा हेतू. हा प्रकार नाझी रेडिओवरूनही करण्यात येत असे. जपानच्या युद्धप्रोपगंडामध्येही रेडिओचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येत होता. २२ भाषांमधून ते कार्यक्रम प्रसारित करण्यात येत असत. हिंदी ही त्यातील एक भाषा. याशिवाय पत्रके, भित्तिचित्रे यांतूनही ब्रिटनविरोधी प्रोपगंडा सुरू होता. मात्र भारतात त्या सर्वात प्रभावी होता तो ब्रिटिश प्रोपगंडा. त्याची तंत्रे तीच, पहिल्या महायुद्धात वापरलेली होती. -नेम कॉलिंग, कार्ड स्टॅकिंग, बँडवॅगन आदी. त्यासाठी त्यांनी वापरलेली साधने मात्र भारतासाठी नवीन होती. ते पाहणे हे आजच्या काळातही रंजक आहे आणि तेवढेच शैक्षणिकही.

रवि आमले

ravi.amale@expressindia.com