शंभर वर्षांपूर्वी अमेरिकी सरकारला हवी ती लोकभावना निर्माण करण्यासाठी ‘फोर मिनट मेन’ या संघटनेचा चांगलाच उपयोग झाला. वरवर पाहता अतिशय साधी-सरळ कल्पना होती ती. वक्त्यांनी लोकांसमोर जायचे आणि बोलायचे. पण या साधेपणातच तिच्या यशाचे रहस्य होते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्च १९१७. म्हणजे बरोबर १०० वर्षांपूर्वीची गोष्ट. शिकागोतला सॅडल अ‍ॅण्ड सायकल नावाचा क्लब. पोलाद कारखानदार डोनाल्ड एम रेयरसन, सिनेटर मेडील मॅककॉर्मिक असे काही प्रतिष्ठित नागरिक रात्रभोजनासाठी एकत्र जमले होते. गप्पा छान रंगात आल्या होत्या. विषय होता अर्थातच युद्धाचा. काँग्रेसमध्ये नुकतेच एक विधेयक मांडण्यात आले होते. सर्व नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देण्याबाबतचे. ही सर्व मंडळी देशभक्त. विधेयकाच्या बाजूची. काहीही करून ते विधेयक मंजूर झालेच पाहिजे असे त्यांचे मत होते. पण ते होणार कसे? त्या विधेयकाला जोरदार विरोध होता. तो मोडून काढायचा कसा? कोणी तरी सहज सुचवले – चित्रपटगृहांत बरेच लोक एकत्र येतात. आपण तिथे जाऊन भाषणे दिली तर?

रेयरसन यांना ही कल्पना अतिशय आवडली. सिनेटर मॅककॉर्मिक यांनीही ती उचलून धरली. पण भाषणे करणार कोण? अखेर ठरले, की देशभक्त वक्त्यांची संघटना तयार करायची. त्यांनी चित्रपटगृहांत जायचे. सिनेमाचे मध्यंतर होते, ती वेळ सोयीची. तेव्हा भाषण द्यायचे. चित्रपटगृहे हे तेव्हापासून या अशा राष्ट्रवाद्यांचे लाडके ठिकाण आहे म्हणायचे! मग प्रश्न आला, संघटनेच्या नावाचा. कोणी तरी म्हणाले, चित्रपटांची रिळे बदलायला प्रोजेक्शनिस्टला चार मिनिटे लागतात. त्या चार मिनिटांच्या मध्यंतरात बोलणाऱ्यांच्या संघटनेला म्हणावे – फोर मिनट मेन. सर्वानाच नाव आवडले. कारण या नावाचा संबंध केवळ अवधीशी नव्हता. तर तो होता अमेरिकी क्रांतियुद्धाशी.

अठराव्या शतकात ब्रिटिशांशी लढून अमेरिकेने स्वातंत्र्य मिळविले होते. त्या युद्धात अनेक सर्वसामान्य नागरिकांनीही भाग घेतला होता. एरवी सामान्य नागरी जीवन जगणाऱ्या अनेकांनी तर स्वत:च सैनिकी शिक्षण घेतले होते. नागरी शिलेदारच ते. वेळ येताच एका मिनिटात लढायला तयार होत असत. त्यावरून त्या शिलेदारांना नाव पडले मिनट मेन. देशभक्तीचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. फोर मिनट मेन या नावातून या संघटनेने त्या देशभक्तांशीच आपले नाते जुळवले. प्रोपगंडाशास्त्रातील ‘ग्लिटरिंग जनरॅलिटी’- चमकदार सामान्यता – या तंत्राचा हा उत्तम नमुना. एखाद्या आदर्श नैतिकतादर्शक शब्दाशी एखाद्या गोष्टीस वा व्यक्तीस जोडून घ्यायचे आणि त्यातून कोणत्याही पुराव्यांविना ती गोष्ट वा व्यक्ती तशीच आदर्श आहे हे लोकांना मान्य करायला, स्वीकारायला लावायाचे असे हे तंत्र. आपल्या बहुतेक राजकीय घोषणा – मग ती ‘गरिबी हटाओ’ ही घोषणा असो की जाहिराततज्ज्ञ पीयूष पांडे यांचे सहकारी अनुराग खंडेलवाल यांनी तयार केलेली ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ ही घोषणा असो – यात तंतोतंत बसतात. अशा घोषणा या अतिशय मोघम असाव्या लागतात. त्या मोघमपणामुळे प्रत्येकाच्या मनात त्याच्या त्याच्या कुवतीनुसार हवा तो, परंतु चांगलाच अर्थ निर्माण होत असतो. याचे आपल्याकडील दुसरे उदाहरण म्हणजे शिवसेना आणि मावळे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मावळे म्हणण्यातून जी सरंजामशाही भावना निर्माण होते, तिच्या आधारावर या पक्षाचे एकचालकानुवर्तीत्व भक्कम टिकून राहिले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातही मावळे म्हटल्यावर एक वेगळीच, लढाऊ  स्वातंत्र्ययोद्धय़ाची प्रतिमा तयार होत असते. ही ग्लिटरिंग जनरॅलिटी. फोर मिनट मेन या नावातून नेमका असाच परिणाम साधला जात होता. या नावाने ओळखले जाणारे वक्ते जे बोलतील ते देशहिताचेच असेल असा संदेश आपोआपच लोकांतच जात होता.

या संघटनेतर्फे ३१ मार्च १९१७ रोजी शिकागोतल्या स्ट्रॅण्ड थिएटरमध्ये पहिले भाषण झाले. वक्ते होते डोनाल्ड रेयरसन. १९१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘फोर मिनट मेन ऑफ शिकागो’ या ५५ पानी पुस्तिकेत या संघटनेचा इतिहास दिला आहे. त्यानुसार, स्थापनेनंतर काही दिवसांतच ही संघटना जॉर्ज क्रील यांच्या लोकमाहिती समितीचा भाग बनली. १६ जून १९१७ ते २४ डिसेंबर १९१८ हा या संघटनेचा काळ. अवघ्या अठरा महिन्यांचे आयुष्य. पण एवढय़ा कमी काळात या संघटनेच्या माध्यमातून ७५ हजार वक्त्यांनी अमेरिकेतल्या सात हजार ४४८ शहरांतील, गावांतील चित्रपटगृहे, चर्च, क्लब, कारखाने असे जेथे जेथे लोक एकत्र येतात अशा ठिकाणी जाऊन भाषणे दिली. त्या भाषणांची संख्या होती साडेसात लाखांहून अधिक. आणि ऐकणाऱ्या नागरिकांची संख्या होती ३१ कोटी ५० लाख. भाषणे कोठेही होवोत, त्यांचा वेळ मात्र चार मिनिटांचाच ठेवण्यात आला होता. याचे कारण, क्रील यांच्या मते चार मिनिटे एवढाच सर्वसामान्य अमेरिकी नागरिकाचा अवधान-काल होता. तेव्हा अवघ्या चार मिनिटांचीच ही भाषणे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील ‘कमर्शियल ब्रेक’सारखी. तेथेही ते युद्धच विकत असत. त्यांचे विषय असत – ‘आपण का लढत आहोत?’, ‘कोण आहेत आपले शत्रू?’, ‘जर्मन प्रोपगंडाचा पर्दाफाश’, ‘लोकशाहीला धोका’, येथपासून ‘अन्नबचत’, ‘लिबर्टी लोन’ येथपर्यंत. विविध भाषांतून, विविध समुदायांसमोर ती होत असत. अमेरिकी सरकारला हवी ती लोकभावना निर्माण करण्यास या फोर मिनट मेनचा चांगलाच उपयोग झाला. जॉर्ज क्रील यांनी लोकमाहिती समितीच्या कामावर ‘हाऊ  वुई अ‍ॅडव्हर्टाइज्ड अमेरिका’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात ‘ही संघटना अभिनवता आणि प्रभाव या दोन कारणांमुळे इतिहासात अजरामर होईल,’ अशा शब्दांत या समितीच्या कामाचा गौरव केला आहे. वरवर पाहता अतिशय साधी-सरळ कल्पना होती ती. वक्त्यांनी लोकांसमोर जायचे आणि बोलायचे. बस्स, एवढेच. पण या साधेपणातच तिच्या यशाचे रहस्य होते. प्रोपगंडाचा इतिहास पाहिला तर अशा साध्याच गोष्टी अत्यंत प्रभावशाली ठरल्याचे दिसते. हेच तंत्र पुढे अनेक प्रचारतज्ज्ञांनी वापरले. भारतातील याचे एक आधुनिक, परंतु काहीसे वेगळे उदाहरण म्हणजे ‘चाय पे चर्चा’. त्याची सविस्तर चर्चा सदरहू सदरात पुढे येईलच. फोर मिनट मेनच्या या साधेपणातही एक योजना होती. त्यातील पहिली बाब वक्त्यांची. त्यांची निवड स्थानिक समितीकडून केली जाई. पण त्यांनी काय बोलायचे, ते कसे बोलायचे हे मात्र सांगितले जाई केंद्रीय समितीकडून. क्रील समितीने जारी केलेल्या एका माहितीपत्रकातील एक सूचना पाहण्यासारखी आहे. ती म्हणजे- ‘तुमच्या देशाला तुमची आवश्यकता आहे यांसारखे वापरून गुळगुळीत झालेले वाक् प्रचार अजिबात वापरू नका.’ याचे कारण अशा शब्दांनी त्यांचा जोम गमावलेला असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे – ‘श्रोत्यांमधील अतिसामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला उद्देशून बोला. त्याच्यावरच्या सगळ्यांना आपोआपच तुमचे म्हणणे समजेल.’ यातून प्रोपगंडातील नावीन्याची आणि सामान्यतेची थोरवीच सांगितलेली आहे. आजच्या आपल्या थोर वक्त्यांची भाषणेही याहून वेगळी नसतात!

कोण असतात हे चार मिनिटांचे वक्ते? खुद्द चार्ली चॅप्लीन, मेरी पिकफर्ड यांसारख्या सेलिब्रेटी या संघटनेसाठी काम करीत होत्या. पण ही भाषणे करणारे सगळेच स्वयंसेवक-वक्ते काही हॉलीवूड वा वॉशिंग्टनहून आलेले नसत. ते स्थानिकच असत. युद्धावर जाण्याचे वय लोटलेले मध्यमवयीन पुरुष, वकील, धर्मोपदेशक, स्थानिक नेते अशांचा त्यात समावेश असे. त्यात महिलाच नव्हे, तर लहान मुलेही असत. बहुतेक सारे असत ते मात्र गोरे. ते बोलत ते त्यांना जे पढविले गेले तेच, परंतु भाषा त्यांची असे. ढब त्यांची असे. यातून सरकारचा प्रवक्ता आपल्याच भाषेत आपल्याशी संवाद साधत आहे आणि त्याच वेळी तो आपल्यातलाच आहे अशी दुहेरी भावना लोकमानसात निर्माण होत असे. त्यांच्या शाब्दिक अवडंबरातून सारेच लोक युद्धाच्या बाजूने असल्याचा समज आपोआपच तयार होत असे. अमेरिकेत अवघ्या काही महिन्यांत पराकोटीची युद्धखोर भावना दिसू लागली ती त्यामुळेच.

या भाषणांच्या जोडीने क्रील समितीने चित्रपटांचाही प्रोपगंडासाठी पद्धतशीर वापर केला. पुढे दुसऱ्या महायुद्धात नाझींनी ते तंत्र उचलले. आजही सर्रास त्याचा उपयोग केला जातो. हॉलीवूड तर त्यासाठी प्रसिद्ध आहे..

रवि आमले – ravi.amale@expressindia.com