‘गरजेच्या वेळी उपयोगी ठरतो तोच खरा मित्र’ अशा शब्दांत ज्यांचा गौरव केला गेला, ते जर्मनीचे सम्राट कैसर विल्हम द्वितीय यांना वर्षभरानंतर क्रौर्याचे प्रतीक बनवण्यात आले. वेडा, माथेफिरू, रानटी, राक्षस अशा शब्दांत त्यांचे वर्णन करण्यात आले होते. प्रोपगंडातील सर्वात प्रभावी तंत्र मानले जाते ते राक्षसीकरणाचे..
क्युबाच्या हवाना बंदरात मेन या अमेरिकी युद्धनौकेत स्फोट झाला. त्यात ती बुडाली. ही वस्तुस्थिती. ती कोणी बुडविली याबाबत मात्र संदिग्धता होती. जोसेफ पुलित्झर यांच्या ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’ आणि विल्यम रँडॉल्फ हर्स्ट यांच्या ‘न्यू यॉर्क जर्नल’ या दोन वृत्तपत्रांनी ही घटनाच ‘फिरवली’. तिला ‘स्पिन’ दिला आणि ते जहाज स्पॅनिश सैनिकांनी बुडविल्याची ‘फेक न्यूज’ जन्मास घातली. ही बातमी स्पॅनिश-अमेरिकन युद्ध सुरू होण्याचे तात्कालिक कारण ठरली. पहिल्या महायुद्धात ब्रिटनमध्ये अगदी याचीच पुनरावृत्ती झाली. फरक एवढाच होता, की तेथे सरकार आणि माध्यमे एकमेकांच्या हातात हात घालून होती. त्यामुळे लोकमानसाचे लगाम हाती असलेल्या ‘अदृश्य सरकार’चे काम अधिक सोपे बनले. माध्यमांचे मालक याच सरकारचे भाग बनून सरकारी प्रोपगंडाला हातभार लावत होते. प्रचाराची परिणामकारकता वाढविण्यासाठी बनावट बातम्या पेरीत होते. हे केवळ ब्रिटन वा अमेरिकेतच झाले असे नाही. ते जर्मनी, फ्रान्स, इटली अशा सगळ्याच देशांनी केले; पण त्यातही ब्रिटिश प्रोपगंडा हा सर्वात प्रभावी होता. त्यामुळे त्याचे मोठय़ा प्रमाणात संशोधन झाले. त्यावर अनेक पुस्तके, लेख लिहिले गेले. आर्थर पॉन्सन्बी यांचे ‘फॉल्सहूड इन वॉर टाइम’ (१९२८) हे त्यातलेच एक. पॉन्सन्बी हे तत्कालीन ब्रिटिश राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते. त्यांनी युद्धकाळातील प्रोपगंडाचा व्यवस्थित अभ्यास केला. तत्कालीन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या जर्मनांच्या क्रौर्याच्या, अत्याचाराच्या बातम्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यातून हा युद्धकालीन प्रोपगंडावरील एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ जन्मास आला. त्यातून समजते, की सरकार आणि माध्यमे जेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून काम करू लागतात किंवा सरकारी धोरणांचा उदोउदो करणे यालाच जेव्हा माध्यमे देशभक्ती म्हणू लागतात, तेव्हा पत्रकारितेचे नेमके काय होते ते?
याचा अर्थ असा नव्हे, की त्या काळातील सर्वच वृत्तपत्रे सततच खोटय़ा बातम्या प्रसिद्ध करीत होती. तसे कधीच होत नसते; पण हेही तेवढेच खरे, की त्या काळातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे मालक सत्तेच्या वर्तुळात होते, अदृश्य सरकारचे भाग होते, त्याच्या हितसंबंधांची जपणूक करीत होते. एकीकडे पत्रमालक, दुसरीकडे सरकार आणि तिसरीकडे लष्कर अशा तीन आघाडय़ांचे अडथळे असतानाही तेव्हाचे अनेक पत्रकार काम करीत होते. या संदर्भात ‘द टाइम्स’चे उदाहरण लक्षणीय आहे. १९१६ मध्ये तोफगोळा टंचाईप्रकरणी (शेल क्रायसिस) हर्बर्ट अॅस्क्विथ यांचे उदारमतवादी सरकार पडले, ते केवळ ‘टाइम्स’मुळे. ब्रिटिश सैन्य आघाडीवर लढण्यास पाठविण्यात आले आहे; पण देशात तोफगोळ्यांची टंचाई आहे, ही बाब ‘टाइम्स’च्या एका पत्रकाराने उघडकीस आणली होती. आता हे पाहता वृत्तपत्रे सरकारचाच प्रचार करीत होती असे कसे म्हणता येईल, असा प्रश्न उपस्थित होईल; पण त्याचे उत्तर ‘टाइम्स’चे मालक लॉर्ड नॉर्थक्लिफ आणि लॉईड जॉर्ज यांच्या संबंधांत आहे. नॉर्थक्लिफ अॅस्क्विथ सरकारविरोधात तोफा डागत होते, तेव्हा त्यांना दारूगोळा पुरविण्याचे काम लॉईड जॉर्ज करीत होते आणि नंतर सरकार उलथवून लॉईड जॉर्ज पंतप्रधान बनले या घटनेत ते दडलेले आहे. नॉर्थक्लिफ ही साधी असामी नाही. जगातील पहिल्या प्रचंड खपाच्या दैनिकाचे, ‘डेली मेल’चे ते मालक. ‘डेली मिरर’, ‘टाइम्स’, ‘द संडे टाइम्स’ अशा अनेक दैनिकांचे, मासिके, साप्ताहिके यांचे ते मालक. एकाच वेळी हातात ‘टाइम्स’ आणि ‘डेली मिरर’ यांसारखी भिन्न प्रवृत्तीची बहुखपाची वृत्तपत्रे असणे याचा अर्थ एकाच वेळी वरच्या आणि खालच्या वर्गावर प्रभाव टाकण्याची ताकद असणे. ती या एका व्यक्तीच्या हातात एकवटलेली होती. स्वाभाविकच लॉईड जॉर्ज पंतप्रधानपदी येताच, त्यांनी नॉर्थक्लिफ यांच्याकडे ‘मिनिस्ट्री ऑफ एनिमी प्रोपगंडा’ची सूत्रे सोपवली. त्यांच्याप्रमाणेच ‘डेली क्रॉनिकल’चे संपादक रॉबर्ट डोनाल्ड हे अलिप्त देशांतील प्रोपगंडाचे प्रमुख बनले. ‘डेली एक्स्प्रेस’ आणि ‘लंडन इव्हिनिंग’चे मालक लॉर्ड बेव्हरब्रूक यांच्याकडे माहिती मंत्रालय सोपविण्यात आले. थोडक्यात सर्व माध्यमे आता सरकारी प्रचारयंत्रणेचे भाग बनली होती. लोकांच्या माथी खोटय़ा बातम्यी मारू लागली होती. ब्रिटिश माध्यमांतून दोन पातळ्यांवरून हा युद्धप्रचार केला जात होता. त्यातील पहिली पातळी होती युद्धप्रयत्नांस लोकमान्यता मिळवून देण्याची आणि दुसरी होती नागरिकांचे आणि सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्याची. या दोन्ही हेतूंसाठी खोटेपणाचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला.
पॉन्सन्बी सांगतात, नॉर्थक्लिफ यांच्या ‘डेली मेल’ने १९१३ मध्ये ज्यांचा गौरव ‘गरजेच्या वेळी उपयोगी ठरतो तोच खरा मित्र’ अशा शब्दांत केला, ते जर्मनीचे सम्राट कैसर विल्हम द्वितीय यांना आता क्रौर्याचे मूर्तिमंत प्रतीक बनवण्यात आले होते. ‘डेली मेल’चा २२ सप्टेंबर १९१४ चा अंक या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. या एकाच दिवशी विविध बातम्या आणि लेखांतून वेडा, माथेफिरू, रानटी, राक्षस, आधुनिक जुडास अशा शेलक्या शब्दांत त्यांचे वर्णन करण्यात आले होते. प्रोपगंडातील सर्वात प्रभावी तंत्र मानले जाते ते राक्षसीकरणाचे. कैसर ही एकच व्यक्ती युद्धास जबाबदार आहे असे लोकमानसावर बिंबवून, त्यांची क्रूर आणि विकृत अशी प्रतिमा तयार करून माध्यमांनी सर्वसामान्यांना जर्मनांचा द्वेष करण्यास शिकवले. या एका राक्षसाचा खातमा करण्यासाठीच हे युद्ध लढले जात आहे असा समज करून देण्यात आला. सर्व वाईट गोष्टींसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले. एकदा त्यांना फासावर चढविले, की सगळे ठीक होईल असेच लोकांना वाटत राहिले. आजही सर्रास हे तंत्र वापरले जाते. त्यासाठी एखादा सैतानाचा दगड- द्वेषमूर्ती – तयार केली जाते. जगातील सर्व भ्रष्टाचार, हिंसाचार आदी गोष्टींसाठी तीच व्यक्ती जबाबदार आहे हे लोकांच्या मनावर सातत्याने ठसविले जाते. त्यांच्याविरोधात बातम्या दिल्या जातात; विनोद, व्यंगचित्रे अशा माध्यमांतून त्यांचे चारित्र्यहनन केले जाते. आपण जिंकलो की त्या व्यक्तीला तुरुंगात टाकू, फासावर चढवू असे सांगून लोकमत आपल्या बाजूने वळविले जाते. असे सैतानाचे दगड बनविण्याचा धंदा सर्वकाळात जोरात सुरू असतो. २०१६च्या अमेरिकन निवडणुकीत आपण तेच पाहिले. ‘लॉक हर अप’ ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारातील लोकप्रिय घोषणा होती. एका अध्यक्षीय वादसभेत तर ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांना तुरुंगात टाकण्याची धमकीच दिली होती. ‘‘मी जर निवडून आलो तर मी माझ्या अॅटर्नी जनरलना तुमच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी खास वकील नेमण्याची सूचना करीन,’’ हे त्यांचे तेव्हाचे उद्गार. अशा धमक्या नंतर बहुधा हवेतच विरून जातात, कारण त्या केवळ प्रोपगंडाचा भाग असतात. लोक त्यांवर विश्वास ठेवतात. हे प्रोपगंडाचे यश असते. युद्धकाळात, ब्रिटनमधील १९१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘कैसरना फाशी द्या’ ही अशीच एक लोकप्रिय घोषणा होती. पंतप्रधान आपल्या भाषणांतून कैसरवर खटला चालविण्याचे आश्वासन देत होते; पण तसा खटला भरला गेलाच नाही, त्यांना फासावर चढवण्यात आलेच नाही, कारण – त्यांच्याविरोधात टिकेल असा पुरावाच नव्हता.
युद्ध सुरू असताना सत्ताधारी वा माध्यममालक यांना याची कल्पना नव्हती असे नाही; पण तेव्हा नागरिकांना द्वेषाचे दगड मारण्यासाठी म्हणून कोणी तरी समोर ठेवणे भाग होते. त्यासाठी जर्मन क्रौर्याच्या कहाण्या पसरविण्यात आल्या. अत्यंत सनसनाटीकरण, विकृत चित्रमय कथनशैली हे त्यांचे वैशिष्टय़. त्या बातम्यांमुळे जनमत प्रक्षुब्ध झाले होते; पण तेव्हाही त्यांच्या सत्यतेबद्दल काही लोक शंका घेत होते. त्यांच्या समाधानासाठी सरकारने एक सत्यशोधन समिती नेमली. ब्राइस समिती म्हणून ती ओळखली जाते. अशा प्रकारच्या समित्या आणि त्यांचे अहवाल यातून कशा प्रकारे प्रोपगंडा केला जातो हे पाहायचे असेल तर त्यासाठी ब्राइस अहवालाएवढे उत्तम उदाहरण दुसरे नाही..
ravi.amale@expressindia.com