चे गव्हेराचे ते पोस्टर आठवतेय? हा क्युबन क्रांतिवीर. मार्क्‍सवादी बंडखोर नेता. त्याचे हे चित्र. काळ्या-पांढऱ्या रंगांतले. विस्कटलेले केस. चेहऱ्यावर बंडखोर संताप. डोक्यावर बरे कॅप. त्यात पिवळ्या रंगाचा तारा आणि मागच्या बाजूला क्रांतीचा भडक लाल रंग. आज जागतिकीकरणाची फळे चाखणाऱ्या तरुणाईच्या टी-शर्टावरही हे चित्र दिसते. ते १९६७ मधले. अल्बेटरे कोर्डा नावाच्या छायाचित्रकाराने चे गव्हेराचे छायाचित्र काढले होते. गुरिल्लेरो हिरॉईकोया नावाने ते गाजले. पुढे त्यावरून जिम फिट्झपॅट्रिक या आयरिश चित्रकाराने हे पोस्टर तयार केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असेच एक पोस्टर होते बराक ओबामा यांचे. स्टेन्सिल करून काढल्यासारखे. गडद लाल, पिवळ्या, निळ्या आणि निळसर रंगातले. त्यावर ठसठशीत, अगदी साध्या टंकातला एकच शब्द – होप. २००८च्या निवडणूक प्रचारासाठी शेफर्ड फेरीनामक सामान्य चित्रकाराने तयार केलेले हे पोस्टर. चे गव्हेराच्या त्या पोस्टरशी साम्य सांगणारे.. जगभरातील पॉप संस्कृतीशी नाते सांगणारे.. अत्यंत लोकप्रिय अशी ही दोन्ही पोस्टर्स. छानच कलाकारी होती त्यात, पण तो केवळ चित्रकलेचा नमुना नव्हता. तो उत्तम प्रोपगंडाचाही मासला होता.

पोस्टर हे जनमाध्यम. त्यातून हवा तसा प्रोपगंडा करता येऊ  शकतो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळातच जगाला त्याचा ठसठशीत प्रत्यय आला होता. प्रोपगंडाचा इतिहास आणि कला-शास्त्र यांच्यात रस असणाऱ्यांना या काळात रेंगाळावेच लागते. याचे कारण याच टप्प्यात आधुनिक प्रोपगंडाचा पाया रचला गेला. त्याचे शास्त्र विकसित झाले. त्या काळात ज्ञात असलेले मानसशास्त्राचे सिद्धांत वापरून व्यक्ती आणि समष्टी यांना कसे भुलवावे याचे तंत्र तयार झाले. त्यासाठीची विविध साधने बनविण्यात आली. आजचा प्रोपगंडा तांत्रिकदृष्टय़ा त्याहून किती तरी पुढे गेला आहे. मनोविज्ञानातील विविध शोध, संगणक आणि इंटरनेट यामुळे अत्यंत प्रबळ बनला आहे. परंतु तरीही पहिल्या महायुद्धाच्या काळात तयार झालेल्या प्रोपगंडा यंत्रणांनी आणि त्यात काम करणाऱ्या प्रचारपंडितांनी मळवून ठेवलेली वाट आजच्या काळालाही सोडता आलेली नाही. याच वाटेवर आपणांस दिसतो तो भित्तिपत्रकांचा – पोस्टरचा – परिणामकारक वापर. छपाईची कला वयात येऊ  लागल्याचा तो काळ. आज अंकीय क्रांतीची, फोटोशॉपसारख्या ई-साधनांची जोड तिला मिळाली आहे. डिजिटल पोस्टर वगैरे गोष्टी आल्या आहेत, पण त्यामागचे प्रोपगंडा तंत्र मात्र अगदी तसेच आहे.

या तंत्रामागे उभा होता तो गुस्ताव ले बॉन या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने मांडलेला गर्दीच्या मानसशास्त्राचा सिद्धांत. ‘द क्राऊड : ए स्टडी ऑफ द पॉप्युलर माइंड’ हे त्यांचे पुस्तक. फे५ मधले, पण आजही उपयुक्त असे. त्यांचे म्हणणे असे, की सातत्याने एखादी बाब लोकांसमोर आपण ठेवत गेलो की त्यातून त्यांना जे ‘पर्सेप्शन’, जो अनुबोध होतो, त्यातून ते कृतीप्रवण होतात, तेही नकळत, नेणिवेच्या पातळीवर. हा अनुबोध निर्माण करण्यासाठी पोस्टर हे माध्यम अत्यंत उपयुक्त. एक तर ते जनमाध्यम. शिवाय स्वस्त आणि अपेक्षित लक्ष्यापर्यंत साधासरळ संदेश सहजी वाहून नेणारे. ती कुठेही – म्हणजे जेथे गर्दी तेथे – लावता येतात. अमेरिकेत पहिल्यांदा त्याचा प्रभावी वापर झाला तो यादवी युद्धाच्या काळात आणि पुढे १८९८ च्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धात; पण पहिल्या महायुद्धात पोस्टरचा ज्या प्रकारे प्रोपगंडासाठी उपयोग करण्यात आला त्याला तोड नाही. ‘जागतिक महायुद्धांतील अमेरिकी प्रोपगंडा’ या इव्हा लेसिनोव्हा यांच्या प्रबंधातील माहितीनुसार, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत ७००हून अधिक प्रकारची प्रोपगंडा पोस्टर्स तयार करण्यात आली होती. युद्धासाठी सरकारला आर्थिक साह्य़ करा, अन्न वाचवा, सैन्यात भरती व्हा हे सांगतानाच नागरिकांच्या मनातील देशभक्तीची भावना चेतवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्याकरिता या पोस्टरमध्ये खास प्रतिमांचा, रंगांचा आणि शब्दांचा वापर करण्यात आला होता. उदाहरणार्थ ‘लिबर्टी लोन’करिता तयार आलेले ते सुप्रसिद्ध भित्तिचित्र.

सैनिकी गणवेशातील तरुण. कडेवर त्याचे बाळ. छान चिकटून बसलेले. एका बाहूमध्ये त्याची पत्नी. एकमेकांकडे प्रेमभराने पाहात असलेले. कौटुंबिक भावना प्रतीत करणारे ते चित्र; पण त्यात चित्रकाराने आणखी एक तपशील भरला आहे, सहजी लक्षात न येणारा; पण अत्यंत महत्त्वाचा. त्या सैनिकाची पत्नी नुसतीच त्याच्या मिठीत नाही, तर ती त्याच्या छातीवरचे शौर्यपदक प्रेमाने कुरवाळतही आहे. मध्यभागी असे चित्र आणि त्यावर शब्द – फॉर होम अ‍ॅण्ड कंट्री. व्हिक्टरी लिबर्टी लोन. या विजय आणि स्वातंत्र्य या दोन शब्दांतून प्रवाहित होतो तो सकारात्मक संकेतार्थ. ‘विजय’ या शब्दातून युद्ध जिंकणारच असा प्रखर आत्मविश्वास निर्माण होतो. ते कशासाठी जिंकायचे तर अर्थातच देशासाठी. ते कंट्री या शब्दातून समजले. मग तेथे होम या शब्दाचे काम काय? तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल, तर देशासाठी युद्ध जिंकले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही लिबर्टी लोन बॉण्ड खरेदी केले पाहिजेत. या चित्रात वापरण्यात आलेला लाल आणि निळा रंग पुन्हा प्रेक्षकाला त्याच्या अमेरिकनतेची आठवण करून देत होता. त्याचबरोबर लाल रंगातील अक्षरे संदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देत होती. एवढा सगळा विचार त्यामागे होता. तो विचार आला होता गर्दीच्या मानसशास्त्रातून. ज्यातून काही संदेश द्यायचा आहे, त्या प्रत्येक चांगल्या पोस्टरमागे – मग ती सरकारी योजनेबद्दलची असोत वा एखाद्या वस्तूची जाहिरात करणारी – हा विचार असतोच. तो स्पष्ट दिसत नसतो. तो केवळ जाणवतो. त्यातच त्याचे यश असते.

या सर्व भित्तिचित्रांतून लोकांनी करावयाच्या कृतीचा आदेश दिला जात होता. सगळे जे करतात तेच आपण करावे ही स्वाभाविक प्रवृत्ती झाली. कळपात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याचा हाच प्रयत्न असतो, की आपण कळपापासून बाजूला पडू नये. जे पडतात ते वेगळे असतात. त्यांना वेगळे गणले जाते. त्या वेगळेपणाची स्वतंत्र किंमत त्यांना चुकती करावी लागते. सामान्यांच्या मनात त्याचे भय असते. कारण वेगळेपणात स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्याची भीती मोठी असते. पोस्टर प्रोपगंडातून याच भावनेशी खेळ केलेला असतो. ‘एज ऑफ प्रोपगंडा’ हे या विषयावरील एक महत्त्वाचे पुस्तक. त्याचे लेखक अँथोनी आर. प्रॅटकॅनिस सांगतात, की साध्या प्रतिमा आणि घोषणा यांद्वारे लोकांच्या मनातील पूर्वग्रह आणि भावना यांच्याशी खेळ करीत त्यांचे विचार छाटायचे आणि आधीच निश्चित केलेल्या मतप्रवाहांपर्यंत वा दृष्टिकोनांपर्यंत त्यांना न्यायचे हे प्रोपगंडाचे कार्य.

वर उल्लेख केलेल्या चे गव्हेरा आणि ओबामा यांच्या पोस्टरमधून हेच केले जात होते. या चित्रांचे वैशिष्टय़ होते त्यांच्या संदेशात. अत्यंत तीव्रतेने तो प्रेक्षकाच्या नेणिवेला भिडत होता. तो संदेश होता बंडखोरीचा, व्यवस्थेच्या विरोधाचा. दोन्ही चित्रांची शैली पाहा. ती ‘स्ट्रीट आर्ट’ म्हणून गणल्या जाणाऱ्या कला प्रकारातली. म्हणजे अभिजन कलासंस्कृतीच्या दुसऱ्या टोकावरची. ओबामांच्या पोस्टरमध्ये रंगाचा वापरही विचारपूर्वक केलेला आहे. लाल, पांढरा आणि निळा हे रंग. ते अमेरिकी नागरिकांना अमेरिकनतेचे वाटतात. देशप्रेमाची भावना व्यक्त करणारे वाटतात. ओबामांच्या त्या पोस्टरमधून या भावनेचा आविष्कार होत होता आणि त्याबरोबरच्या ठळक शब्दांतून त्या भावनेला आकार मिळत होता. चे गव्हेराचे पोस्टर आजच्या पॉप संस्कृतीने सामावून घेतले असले, तरी तेथेही ते बंडखोरीचेच प्रतीक आहे. दोन्ही चित्रे व्यवस्थेच्या विरोधातील प्रचाराचे कार्य करत आहेत. परंतु ओबामांच्या पोस्टरचे वेगळेपण हे, की त्यात वापरले गेलेले ‘होप’, ‘प्रोग्रेस’ असे शब्द ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडले जात होते. त्यातून नागरिकांना त्यांनाच मतदान करण्यासाठी ते प्रवृत्त करीत होते.

वाचण्यास सोपी, स्पष्ट संदेश देणारी अशी ही पोस्टर्स. दिसतात साधी, परंतु त्यातील प्रतिमा, रंग, शब्द, टंक यांद्वारे ती वेगळ्याच गोष्टी सांगत असतात, व्यक्तींना कार्यप्रवृत्त करीत असतात. हे पोस्टरसंमोहन अतिशयोक्त वाटत असेल, तर सैन्यात भरती व्हा म्हणून सांगणारा अंकल सॅम आठवून पाहा..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com

 

मराठीतील सर्व प्रचारभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guerrillero heroico poster world war i barack obama poster marathi articles