प्रोपगंडाचे हे एक तत्त्व आहे की, विरोधकांवर टीका करायची तर तुटूनच पडायचे त्यांच्यावर. त्यांच्यात काही चांगले गुण असतील, त्यांनी काही चांगली कामे केली असतील असे चुकूनही म्हणायचे नाही. ते मूर्ख, स्वार्थी, भ्रष्टाचारी, देशाची वाट लावणारे असेच सतत सांगत राहायचे. हिटलर तेच करीत होता..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिले महायुद्ध संपले होते. जर्मनीच्या नागरी सरकारने युद्धबंदी स्वीकारली होती. व्हर्सायचा तह झाला होता. त्यानंतरच्या काही महिन्यांनंतरची, १९१९ मधील ही गोष्ट. पराभूत, अपमानित जर्मन सैन्याचे चीफ ऑफ स्टाफ जनरल एरिक ल्युडेन्डॉर्फ आणि बर्लिनच्या ब्रिटिश लष्करी मिशनचे प्रमुख जनरल नील माल्कम एका रात्री एकत्र जेवण करीत होते. छान गप्पा चालल्या होत्या त्यांच्या. अचानक माल्कम यांनी विचारले, तुम्हाला काय वाटते, जर्मनी का हरली? ल्युडेन्डॉर्फ यांच्याकडे कारणांची कमतरता नव्हती. बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘नागरी सरकारने लष्कराला साथ दिली नाही.’’ त्यावर माल्कम म्हणाले, ‘‘म्हणजे? जनरल, तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला?’’ ते ऐकताच ल्युडेन्डॉर्फ चमकलेच. म्हणाले, ‘‘होय, होय. अगदी तसेच. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला.’’ त्या रात्रभोजनाने जर्मनीत पराभवाच्या एका नव्या सिद्धांताला जन्म दिला. खंजीर सिद्धांत.

आधीच्या सरकारने राष्ट्राशी द्रोह केला आहे. त्यांच्यामुळेच आज संपूर्ण देशाला अपमानिताचे जिणे जगावे लागत आहे. देशाची वाट लावली त्या सरकारने आणि त्या सरकारमधील, लष्करामधील ज्यूंनी. जर्मनीच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी बसविण्यात आलेल्या समितीसमोर ल्युडेन्डॉर्फ यांच्यासारखे सेनाधिकारी सातत्याने हा पाठीतला खंजीर मिरवत होते. राष्ट्रवादी नागरिकही तेच म्हणत होते. जर्मनीसारखा महान संस्कृती आणि परंपरा असलेला देश पराभूत झाला तो सरकारमधील काही ‘जयचंदां’मुळे. दरम्यान फ्रेडरिक मॉरिस या ब्रिटिश सेनाधिकाऱ्यानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते म्हटल्यावर सर्वाचाच त्या खंजीर सिद्धांतावर विश्वास बसला. विशेष म्हणजे मॉरिस यांचे जे विधान जर्मन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आले होते, ते त्यांनी कधी केलेच नव्हते; परंतु सर्वच माध्यमांचे एक वैशिष्टय़ असते. तेथे आरोपांचे पारडे नेहमीच खुलाशापेक्षा जड असते. शिवाय, पराभवाला फंदफितुरी कारणीभूत होती, हे खरे असो वा खोटे, ते ऐकायला पराभूतांना नेहमीच आवडते. सामाजिक अहंगंडाला सुखावणारे असते ते. तेव्हा सर्वानीच हा खंजीर सिद्धांत उचलून धरला. त्या खंजीर खुपसणाऱ्यांची एक यादीच तयार झाली मग. त्यात पहिल्या क्रमांकावर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी होतीच. कारण ती तेव्हा सत्ताधारी होती. शिवाय जर्मनीतले मार्क्‍सवादी, समाजवादी होते. त्यांच्या कामगार संघटना होत्या. शांततावादी होते. उदारमतवादी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यू होते.

एकदा अशा प्रकारे ‘शत्रूची निर्मिती’ झाल्यानंतर पुढचा प्रचार सोपा होता. अडॉल्फ हिटलर आणि त्याच्या राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्षाची भरभराट झाली ती या प्रचाराच्या लाटांवर स्वार होऊनच. ल्युडेन्डॉर्फला मदतीला घेऊन हिटलरने हा खंजीर सिद्धांत पुढे नेलाच, पण त्यातून त्याने त्याचे स्वत:चे एक भयंकर तत्त्वज्ञान रचले. त्याचे नाव नाझी किंवा नात्झी. हा शब्द आला तो हिटलरच्या पक्षाच्या नावातील नॅत्सनेल – नॅशनल – या शब्दातून. हा खरे तर हेटाळणीखोर शब्द होता. प्रारंभीच्या काळात बव्हेरियात या पक्षाचा प्रभाव होता. तेथील गावठी लोकांना नात्झी म्हणत. तोच पुढे हिटलरच्या पक्षासाठी वापरण्यात येऊ  लागला. हे प्रोपगंडातील बद-नामकरणाचे, नेम कॉलिंगचे तंत्र. नकारार्थी प्रतिमा वा कल्पनांशी नाते जोडण्याचे. हिटलरचा पक्ष आणि त्यांचे विचार हे गावठी आहेत, अजागळ आहेत हेच त्यातून सूचित केले जात होते. आजचे याचे उदाहरण म्हणजे आयसिस. या संघटनेने तीन-चार वेळा आपले बारसे केले. पण ओबामांसारखे नेते कधीही तिला आयसिस म्हणत नाहीत. ते म्हणतात डाएश. हे आयसिसच्या अरबी नावाचे लघुरूप, पण हेटाळणी करणारे. हिटलरला म्हणूनच नात्झी या शब्दाचा राग होता. त्याने कधीही ते नाव वापरले नाही. कारण त्याला प्रोपगंडाच्या ताकदीची पुरेपूर कल्पना होती.

पहिल्या महायुद्धाच्या काळात तो सैन्यात होता. आघाडीवर लढला होता. तेथे त्याने दोस्त राष्ट्रांचा प्रोपगंडा पाहिला होता, अनुभवला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला तो समजला होता. ‘माइन काम्फ’ (माझा संघर्ष) हे त्याचे वैचारिक आत्मचरित्र. प्रोपगंडा या विषयावर दोन स्वतंत्र प्रकरणे आहेत त्या पुस्तकात. त्यात शत्रुराष्ट्रांच्या प्रोपगंडाची मनापासून स्तुती केली आहे त्याने आणि त्याचबरोबर जर्मन सरकारकडे तशी कौशल्ये नसल्याबद्दल दु:खही व्यक्त केले आहे. खरे तर त्या काळातील जर्मन युद्धप्रचारही काही कमअस्सल नव्हता. पण प्रोपगंडाचे हे एक तत्त्व आहे की, विरोधकांवर टीका करायची तर तुटूनच पडायचे त्यांच्यावर. त्यांच्यात काही चांगले गुण असतील, त्यांनी काही चांगली कामे केली असतील असे चुकूनही म्हणायचे नाही. ते मूर्ख, स्वार्थी, भ्रष्टाचारी, देशाची वाट लावणारे असेच सतत सांगत राहायचे. हिटलर तेच करीत होता. तो लिहितो, ‘या (म्हणजे प्रोपगंडाच्या) क्षेत्रात जे काही करण्यात आले ते सुरुवातीपासूनच इतके अपुरे होते, घिसेपिटे होते की त्याचा अजिबात फायदा झाला नाही. कधी कधी झाला तो उलट तोटाच.’

हा तोटा भरून काढण्याचा पण त्याने केला होता आणि त्यात तो पूर्ण यशस्वी झाला. हे यश त्याच्या लोकप्रियतेत झळकते. जर्मनीतील वायमार प्रजासत्ताकाच्या अखेरच्या काळात, १९२८ मध्ये त्याच्या नात्झी पक्षाला मते पडली होती अवघी आठ लाख दहा हजार १२७. म्हणजे एकूण २.६ टक्के. दोनच वर्षांत तो आकडा गेला १८.३ टक्क्यांवर आणि पुढच्या दोन वर्षांत, १९३२ मध्ये ही मतांची संख्या गेली १३ कोटी ७६ लाख पाच हजार ७८१ वर. ३७.३ टक्के मते मिळवून नात्झी पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष बनला होता. १९२४ मध्ये जर्मन संसदेत ३२ खासदार असलेल्या या पक्षाची नोव्हेंबर १९३२ मधील खासदारसंख्या होती १९६. या लोकप्रियतेच्या जोरावर १९३३ साली हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर बनला आणि मग सत्तेच्या आधाराने हा पक्ष वाढतच गेला. १९२८ मध्ये एक लाख सदस्यसंख्या असलेल्या नात्झी पक्षाला जसजसा निवडणुकीत विजय मिळत गेला, तसतसे त्याकडे आकर्षित होणारे नागरिकही वाढत गेले.

हिटलरच्या या उदयास व्हर्सायचा तह आणि खंजीर सिद्धांतापासून १९३० मधील जागतिक महामंदीपर्यंतची अनेक कारणे होती; परंतु या कारणांचा वापर करून लोकांच्या मनावर सत्ता मिळविण्यात हिटलर यशस्वी झाला तो प्रभावी प्रोपगंडाच्या जोरावर. केवळ सामान्यांनाच नव्हे, तर स्वत:ला सगळे काही समजते आणि आपल्याला कोणी उल्लू बनवू शकणार नाही अशा भ्रमात वावरणाऱ्या बुद्धिजीवींनाही हिटलरने या प्रोपगंडाच्या बळावर गुलाम केले. भय, दहशत ही हत्यारे होतीच. हल्ली राजकीय नेत्यांच्या सेना असतात. कायद्याच्या परिघाबाहेर काम करीत असतात त्या. हिटलरचे तसे स्टॉर्मट्रपर्स होते. विरोधकांना झोडपण्याचे काम करीत ते. नंतर तर सगळी यंत्रणाच हिटलरच्या हाती आली. ती दहशत होतीच, पण ती नात्झी विचार मान्य नसणाऱ्यांना. बहुसंख्य नागरिक मात्र आपखुशीने त्या विचारांचे पाईक बनले होते. हिटलरने ‘आईन फोक, आईन राईश, आईन फ्यूहरर – एक लोक, एक राष्ट्र, एक नेता’ अशी घोषणा दिली. ‘पक्ष हाच नेता आणि नेता हाच पक्ष’ असे बजावले, त्यापुढे सर्वानी माना तुकविल्या होत्या. हिटलर दाखवील तीच दिशा आणि सांगेल तेच सत्य ही त्यांची भावना होती. त्याने पसरविलेल्या द्वेषाने लोक एवढे आंधळे झाले होते, की ६० लाख ज्यूंचे शिरकाण त्यांना दिसले नाही. एवढेच नाही, तर हा नात्झी विचार तथाकथित आर्य वंशाच्या लोकांचा बळी घेत होता. त्यातील रोगी, वृद्ध, अपंग, मतिमंद यांना वंशशुद्धीसाठी वेचून मारत होता, तेही त्यांना दिसले नाही. रोमा जिप्सी हे भारतातून काही हजार वर्षांपूर्वी युरोपात गेलेले. त्यांचा वंशविच्छेद करण्यात येत होता. त्याबाबतही जर्मन नागरिकांचे काही म्हणणे नव्हते. त्याचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले हे खरे. पण तोवर ते हिटलरच्या भक्तीतच तल्लीन होते. हे त्याने साधले ते केवळ प्रोपगंडाद्वारे. ‘आध्यात्मिक अस्त्र’ म्हणायचा त्याला तो.

हे अस्त्र त्याने नेमके कसे चालविले हे समजून घेतले तर एखादे राष्ट्रच्या राष्ट्र एखाद्या नेत्याच्या पायावर कसे लीन होते ते कळू शकेल. त्यासाठी अर्थातच भेटावे लागेल त्यालाच.. ‘प्रोपगंडा-पंडित’ हिटलरलाच.

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com