वर्तमानकाळाकडे तटस्थपणे पाहणे कठीणच. कारण एक तर त्यात आपले हितसंबंध गुंतलेले असतात आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वर्तमानाबद्दल आपण जो विचार करत असतो, तो ‘आपला’च आहे असे आपल्याला वाटत असते. प्रोपगंडाचे खरे यश कशात असेल तर ते हेच, की प्रत्येक व्यक्तीचे विचार, मत, कल्पना आणि कृती हे सारे ‘त्याचे’ असते, ते त्याने त्याच्या मनाने, बुद्धीने काळजीपूर्वक पारखून घेऊन निवडलेले असते, असे त्या व्यक्तीला पटवणे. एकदा तसे वाटू लागले, की मग कोणी काहीही सांगो, त्यावर तिचा विश्वासच बसणार नाही. कारण आपणही प्रोपगंडाबळी आहोत असे मान्य करणे हा त्या व्यक्तीला आपल्या बुद्धीचा अपमान वाटतो. त्यामुळे प्रोपगंडानामक काही प्रकार असतो, हे एक तर नाकारण्याकडे किंवा त्याचा फारसा प्रभाव नसतो, असे सांगण्याकडे त्यांचा कल असतो. हेच मोदी-प्रचाराबाबतही झाले आहे. ते ज्यांच्यासाठी दैवी अवतार आहेत, उद्धारक आहेत, त्यांना मोदींच्या यशात प्रोपगंडाचा मोठा वाटा आहे हा विचारही सहन होणार नाही. किंबहुना हाच विरोधकांचा प्रचार आहे, अशी त्यांची भावना असू शकेल. २०१३ पासून मोदी यांच्या केवळ प्रतिमासंवर्धनाचेच नव्हे, तर त्यांच्या दैवतीकरणाचे प्रयत्न सुरू झाले होते, हे त्यांना पटणार नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की ७ सप्टेंबर २०१३ रोजी मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याआधीपासून त्यांच्याभोवती ‘हॅलो बायस’ निर्माण करण्यात येऊ लागला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा