आपल्या विरोधकांचे राक्षसीकरण करण्याचा प्रभावी प्रोपगंडा तंत्राचा पद्धतशीर वापर हिटलरने वृत्तपत्रांविरोधात सुरू केला; पण हे करताना त्याला त्या माध्यमाचे महत्त्व कमी करायचे नव्हते. ते साधन बदनाम करून कसे चालेल? तेव्हा त्याने प्रोपगंडाचा रोख वळविला तो वृत्तपत्रांचे प्रकाशक आणि पत्रकार यांच्याकडे..
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारसभांमधून एक शब्द वारंवार कानावर पडत होता- ल्युगनप्रेस. या निवडणुकीनंतर ट्रम्प यांच्या बोलण्यात नेहमी एक शब्द येत असतो- फेक न्यूज. भारतातही तो लोकप्रिय आहे. त्याला जोडून आपण एक शब्द वापरतो- प्रेस्टिटय़ूट. या शब्दाचे निर्माते आहेत अमेरिकेतील आर्थिक-राजकीय होराभूषण जेराल्ड सेलेन्टे. भारतात तो सादर करण्याचे श्रेय जाते केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांना. या सर्व शब्दांमागील भावनांचा पूर्वज म्हणून आपल्याला ल्युगनप्रेसकडे पाहता येईल. हा जर्मन शब्द. त्याचा अर्थ खोटे बोलणारी माध्यमे. नाझींच्या माध्यमविरोधी प्रचाराच्या केंद्रस्थानी हा शब्द होता. तसा तो हिटलरपूर्वीही अस्तित्वात होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या संरक्षण मंत्रालयाने ‘द ल्युगनप्रेस ऑफ आवर एनिमीज’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली होती; पण हिटलरने तो लोकप्रिय केला. प्रोपगंडातील बद-नामकरण तंत्राचे हे उत्तम उदाहरण. तो एवढा प्रभावी आहे, की विरोधातील माध्यमांना त्याद्वारे सहज चीतपट करता येते आणि हिटलरसाठी ते अत्यंत गरजेचे होते.
याचे कारण हिटलरला माध्यमांच्या ताकदीची पूर्ण जाणीव होती. अखेर तो प्रोपगंडा-पंडित होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने माध्यमांच्या ताकदीचा अनुभवही घेतला होता. ‘द थर्ड राईश- पॉलिटिक्स अॅण्ड प्रोपगंडा’ या पुस्तकातून डेव्हिड वेल्श सांगतात, की नाझी पक्ष विरोधात असताना त्याच्यावर वृत्तपत्रांतून जी टीका होत होती, ती तो विसरला नव्हता. त्याच्या मनात वृत्तपत्रांबद्दल राग होता. त्यामुळे तो क्वचितच पत्रकारांना भेटून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असे; पण त्याला या वृत्तपत्रांची क्षमता पुरेपूर माहीत होती. तो सांगतो की, ‘‘पत्रकारिता जगतामध्ये एक छान रीत आहे. माध्यमांना ते राज्यांतर्गतची ‘महासत्ता’ म्हणतात. खरोखरच त्यांचे महत्त्व अमाप आहे.’’ कारण- ‘माध्यमे आपल्याला मोठेपणीही शिकवीत असतात.’ आणि हिटलरपुढील सर्वात मोठे काम होते, ते त्याचे विचार, त्याचे नाझी तत्त्वज्ञान लोकांना शिकविण्याचे. त्याकरिता त्याच्या हातात वृत्तपत्रे असणे आवश्यक होते.
पण कोण आणि कसे असतात या वृत्तपत्रांचे वाचक? हिटलरने त्याचाही नीट अभ्यास केलेला दिसतो. ‘माइन काम्फ’मध्ये त्याने वाचकांची तीन प्रकारांत विभागणी केलेली आहे. पहिला प्रकार वाचतील त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा. दुसरा कशावरही विश्वास न ठेवणाऱ्यांचा आणि तिसरा जे वाचतील त्याचा तर्कशुद्धपणे अभ्यास करून नंतर आपले मत बनविणाऱ्यांचा. यातल्या दुसऱ्या दोन गटांची त्याला पर्वा नाही. कशावरही विश्वास न ठेवणारे सगळ्याच वृत्तपत्रांचा तिरस्कार करतात. त्यांना हाताळणे अवघड. कारण ते सगळ्याच गोष्टींकडे संशयाने पाहतात. त्यांना प्रोपगंडा भरवणे कठीणच. तिसऱ्या प्रकारचे वाचक हे बुद्धिवादी असतात. ‘प्रत्येक पत्रकार बदमाश असतो आणि कधी कधी तो खरेही बोलतो,’ अशी त्यांची धारणा असते. शिवाय संख्येने ते कमीच असतात. तेव्हा ते काही उपयोगाचे नाहीत. राहता राहिले पहिल्या प्रकारचे वाचक. हिटलरच्या मते ती म्हणजे साध्या आणि हलक्या कानाच्या लोकांची गर्दी, पण ते संख्येने बहुसंख्याक. त्यांची मतपेढी मोठी. हिटलरचे लक्ष्य होती ती ही गर्दी. त्याला त्यांना आपल्या कब्जात घ्यायचे होते. त्यांना आपली विचारधारा शिकवायची होती; पण त्याच्यापुढे एक अडचण होती. हे लोक आधीपासून वेगळी वृत्तपत्रे वाचत होते. त्यांपासून त्यांना परावृत्त कसे करायचे? काम अवघड होते.
तेव्हा हिटलरने पहिल्यांदा प्रस्थापित माध्यमांविरोधात प्रचार आघाडी उघडली. आपल्या विरोधकांचे राक्षसीकरण करण्याचा प्रभावी प्रोपगंडा तंत्राचा पद्धतशीर वापर त्याने वृत्तपत्रांविरोधात सुरू केला; पण हे करताना त्याला त्या माध्यमाचे महत्त्व कमी करायचे नव्हते. ते साधन बदनाम करून कसे चालेल? तेच तर तोही वापरत होता. तेव्हा त्याने प्रोपगंडाचा रोख वळविला तो वृत्तपत्रांचे प्रकाशक आणि पत्रकार यांच्याकडे. सामान्य वाचकांच्या हाती मतपत्रिका असते. ते सत्तेवर कोणाला आणायचे हे ठरवीत असतात. वृत्तपत्रे त्यांना शिकवत असतात; परंतु हे ‘शिक्षक’ काही चांगले नाहीत. ते ‘खोटे, अडाणी आणि सैतानी मनोवृत्तीचे’ आहेत. त्यांनीच तर जर्मनीची वाट लावली नाही काय? याच जर्मन वृत्तपत्रांनी ‘आपल्या लोकांच्या’ गळी ‘पाश्चिमात्य लोकशाही’ची बकवास उतरवली नाही काय? हीच दैनिके समाजाच्या नैतिक अध:पतनास कारणीभूत ठरली नाहीत काय? आपले लोकही अखेर आधुनिक बनेपर्यंत याच दैनिकांनी नीतिमूल्ये, सार्वजनिक सभ्यता यांची टिंगल केली नाही काय? त्यांना कालबाह्य़ आणि खालच्या दर्जाचे ठरविले नाही काय? राज्याच्या बळाला याच दैनिकांनी विरोध केला नाही काय? हे हिटलरचे प्रश्न होते. यातून तो एकच बाब लोकांच्या मनावर बिंबवू पाहत होता, की ही सगळी प्रस्थापित माध्यमे देशविरोधी आहेत. देशाच्या संस्कृती आणि सभ्यतेच्या विरोधी आहेत. ‘जर्मन राईश आणि जनता यांची कबर खोदण्याचेच काम या तथाकथित उदारमतवादी माध्यमांनी केले,’ असे तो सांगत होता.
अशा या माध्यमांचे मालक कोण होते? हिटलर सांगतो- ज्यू, उदारमतवादी आणि साम्यवादी. या माध्यममालकांसाठी आणि पत्रकारांसाठी त्याच्याकडे खास शब्द होते- किडेमकोडे, जहरिले साप. यातून त्यांचे राक्षसीकरण, बद-नामकरण तो करीत होता आणि त्याला जर्मन राष्ट्रवादाची जोड देत होता. हिटलरच्या एकूणच प्रोपगंडाच्या मुळाशी हा राष्ट्रवाद आणि वंशवाद आहे. ‘माइन काम्फ’मध्ये त्याने या माध्यमांसाठी आणखी एक शब्द वापरला आहे- ‘ल्युगनप्रेस’. सर्व प्रस्थापित, त्यातही मार्क्सवाद्यांच्या हातात असलेली माध्यमे ही ल्युगनप्रेस. ते कशावरून? तर ती नाझींविरोधी आहेत म्हणून. त्यांची मालकी ज्यूंकडे आहे म्हणून. आणि हे सारे ज्यू तर विदेशी शक्तींसाठी काम करणारे. राष्ट्रद्रोही. त्यांची माध्यमे ज्या काही बातम्या देतात त्या सर्व खोटय़ाच असणार. त्यांची टीका खोटी असणार. ती पक्षपाती असणार. कारण- ते ज्यू आहेत. त्यांची दैनिके ल्युगनप्रेस आहेत. यावर एकदा लोकांचा विश्वास बसू लागला की पुढचे काम सोपे जाणार होते आणि तसे झालेही.
या ल्युगनप्रेसच्या ‘हातात जाण्यापासून सामान्य जनतेला रोखणे हे राज्याच्या केवळ हिताचेच नाही, तर ते राष्ट्रीय कर्तव्य आहे.’ या माध्यमांवर नियंत्रण ठेवायलाच हवे. ते करताना सरकारने उगाच वृत्तपत्रस्वातंत्र्याचा वगैरे बाऊ करू नये, असा प्रचार हिटलर करीतच होता. सत्तेवर येताच त्याने तेच केले. नाझींना बळ मिळत गेले तसतसे तो विरोधी माध्यमे संपवीत गेला. १९३३ च्या प्रारंभी जर्मनीत नाझींच्या मालकीची दैनिके होती ५९. त्यांचा एकूण खप होता सात लाख ८२ हजार १२१. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के. त्या वर्षांअखेर त्याने आणखी २७ दैनिकांवर मालकी मिळविली आणि खप गेला २४ लाखांवर. पुढच्या सहा वर्षांत जर्मनीतील दोनतृतीयांश माध्यमांवर नाझींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताबा प्रस्थापित झाला. सत्तेवर आल्यानंतर हिटलरने प्रोपगंडा मंत्रालयाचीच- ‘राईश मिनिस्ट्री फॉर पब्लिक एनलाइटमेन्ट अॅण्ड प्रोपगंडा’ची- स्थापना केली होती. त्याद्वारे केवळ मुद्रितच नव्हे, तर सर्वच माध्यमांवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली. आता वृत्तपत्रांतून फक्त सरकारी सत्यच प्रसारित होऊ लागले. सरकारची जाहिरात म्हणजेच सकारात्मक बातम्या असे गणले जाऊ लागले. हा प्रोपगंडाचा टोकाचा प्रकार.
या प्रोपगंडा मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती डॉ. जोसेफ गोबेल्स यांच्याकडे. गोबेल्स हिटलरप्रमाणे पत्रकारांचा तिरस्कार करीत नसे. तो स्वत:ला एक पत्रकारच समजे. नाझी पक्षाचा तो एक प्रभावी वक्ता आणि संघटक होता. त्याचबरोबर १९२७ मध्ये त्याने पक्षाच्या निधीतून ‘डे अँग्रीफ’ (आक्रमण) नामक वृत्तपत्रही सुरू केले होते. पुढे मंत्री झाल्यानंतर तर त्याच्या ताब्यात पक्षाचे राष्ट्रीय वृत्तपत्रच आले. त्याचे नाव- ‘फोकशुओ बोबाख्तर’ (लोकनिरीक्षक). या वृत्तपत्राचा एकमेव मालक होता हिटलर. ‘डे अँग्रीफ’, ‘फोकशुओ बोबाख्तर’ आणि त्याच्या जोडीला ‘डे स्टुर्मर’ या तीन दैनिकांनी हिटलरच्या उदयाच्या काळात नाझी प्रोपगंडाची मदार सांभाळली होती. अन्य दैनिकांतून, साप्ताहिकांतून प्रसिद्ध होणाऱ्या टीकेला उत्तर देतानाच, लोकांच्या मनावर नाझी विचारांचे गारूड निर्माण करण्याच्या श्रेयात या तीन दैनिकांचाही वाटा होता. एकीकडे ज्यू आणि साम्यवादी यांच्याविरोधात जहाल प्रचार करतानाच, हिटलरची प्रत्यक्षाहून उत्कट अशी प्रतिमा निर्माण करण्याचे काम या दैनिकांनी आणि खासकरून गोबेल्सने केले. ते कसे, हे पाहणे हा निश्चितच ज्ञानवर्धक अनुभव आहे..
रवि आमले
ravi.amale@expressindia.com