आणीबाणी लादणे ही काही चांगली गोष्ट नव्हे. ती जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी कृती. परंतु तेव्हाच्या प्रोपगंडातून ती ‘देशहितासाठीची आवश्यक कृती’, ‘गरिबांसाठी चांगली संधी’ असे सांगण्यात येत होते. कोणी ‘चांगल्या उद्यासाठी आज त्रास सहन करा’ असे सांगितले तर ते चांगलेच. फक्त तो ‘उद्या’ मात्र धूसर होता..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अवकाशात ईथर नामक तत्त्व भरलेले आहे असा एक समज होता पूर्वी. ईथर नाही, पण आपले सबंध अवकाश आज माहितीने, डेटाने व्यापलेले आहे हे नक्की. आपल्या हातात मोबाइल फोन आहे. बाजूला वृत्तपत्रे पडली आहेत. भिंतीवर दूरचित्रवाणी संच आहे आणि समोर टेबलावर वैयक्तिक संगणक आहे. त्यावरील माहितीजालात विविध संकेतस्थळे आहेत. विविध माध्यमांतून आपणांस माहिती मिळत असते. समाजमाध्यमांतून तिची देवाण-घेवाण करीत असतो. परिणामी आपण अधिक माहितीसंपन्न झालो आहोत का? माहितीवर आपला ताबा आहे का?.. तर, नाही.
आपण येथे ज्ञानाबद्दल नव्हे, तर माहितीबद्दल (इन्फर्मेशन) बोलत आहोत आणि ती प्रचंड प्रमाणात आपल्यावर आदळत असली, तरी ती प्रामुख्याने नियंत्रित असते. ती नियंत्रित करणाऱ्या ‘अदृश्य सरकार’बाबत आपण यापूर्वी चर्चा केली आहे आणि नियंत्रणाबाबत सांगायचे, तर त्याचे अनेक मार्ग आहेत. माहितीचा धबधबा निर्माण करणे हाही त्यातील एक मार्ग असतो, हे आपण नीट लक्षात घ्यायला हवे. सामान्य माणसाला त्याचे मत बनविण्यासाठी, दोन गोष्टींतून एकीची निवड करण्यासाठी माहिती हवी असते. ही माहिती एवढय़ा प्रचंड प्रमाणात त्याच्या मेंदूवर आदळवायची की त्याची निवडक्षमताच बाधित व्हावी, तिचे ‘शॉर्टसर्ट’ व्हावे, तो गोंधळून जावा. अशा प्रकारे थकलेला मेंदू प्रोपगंडाकारांना फार भावतो. सतत बदलती चित्रे, शब्दांचा, संदेशांचा अविरत मारा यातून अखेर व्यक्ती शरण जाते ती त्याच्या मनातील आदिम भावनांना. प्रोपगंडाकारांचे लक्ष्य असते ते या भावनाच. याशिवाय माहिती नियंत्रणाच्या नेहमीच्या पद्धती आहेतच. ‘प्रोपगंडा अॅण्ड पर्सुएशन’चे लेखक गार्थ एस. जोवेट आणि व्हिक्टोरिया ओडॉनेल सांगतात- ‘प्रोपगंडाकार दोन प्रमुख मार्गानी माहितीचा ओघ नियंत्रित करीत असतात. १. माहिती वितरणाचा प्रमुख स्रोत असलेली माध्यमे नियंत्रित करून आणि २. विरूपित माहिती सादर करून. तीही अशा प्रकारे सादर केली जाते की आपणांस वाटावे की ती विश्वासार्ह स्रोतांकडून आलेली आहे.’ पण ही नियंत्रित माहिती असते तरी कशी?
जोवेट आणि ओडॉनेल यांच्या मते, न दिलेली माहिती, आधीच ठरलेल्या वेळी प्रसारित केलेली माहिती, लोकांच्या दृष्टिकोनांस, मनोबोधांस प्रभावित करील अशा प्रकारे अन्य माहितीच्या पाठीवर आपल्याला द्यायची ती माहिती बसवायची, तसेच माहिती विरूपित वा विकृत करून मांडायची ही सर्व नियंत्रित माहितीची रूपे. या सगळ्याचा अंतिम हेतू काय, तर व्यक्तीचे वर्तन, वर्तनाची प्रतिमाने – पॅटर्न – आपणास हवी तशी बनवायची. यात खुबी अशी असते, की आपल्या वर्तनीचे पॅटर्न्स अन्य कोणी ठरवत आहे हे व्यक्तीला समजतच नाही. अशी व्यक्तीही माहिती वा त्याचे मत प्रसारित करीत असते. परंतु ते मत म्हणजे केवळ ‘फॉरवर्ड वा रिट्वीट’ असते. वर्तन-वशीकरणाचा हा प्रयोग आपणांस जाहिरातविश्वात स्पष्ट दिसतो. आपण एखादी गाडी, एखादा मोबाइल खरेदी करतो, तेव्हा आपणांस वाटत असते की ते आपण आपल्या मनाने वा मतानेच खरेदी करीत आहोत. परंतु आपले ते वर्तनही बाह्य़शक्तींना वश असते हे आपल्या लक्षातही येत नसते. समजा आले, तरी आपण ते अमान्यच करणार असतो. आपल्या समाजात अचानक कुठून तरी एखादी कपडय़ांची फॅशन येते, आपल्या विचार अवकाशात अचानक कुठून तरी एखादा मुद्दा अवतरतो. कुठून येतो तो? सगळा समाज अचानक एखाद्या मुद्दय़ावर वाद घालू लागतो. कुठून येतो तो? तेव्हा जे वस्तूंच्या जाहिरातींबाबत, तेच राजकीय पक्ष वा मुद्दय़ांबाबत.
भारताला माहितीवरील नियंत्रण नवे नाही. आधुनिक काळातील त्याची प्रणेती होती अर्थातच ब्रिटिश सत्ता. त्यानंतर प्रोपगंडाचा हा प्रकार प्रकर्षांने जाणवला तो आणीबाणीच्या काळात. सरकारी आणि सरकारविरोधी अशा दोन्ही प्रकारचा प्रोपगंडा त्या काळात आपणांस पाहावयास मिळतो. एकीकडे इंदिरा गांधी यांचे सरकार ‘परकी हाता’चा प्रचार करीत होते. तो राक्षसीकरणाचा – डेमोनायझेशनचा – प्रकार. दुसरीकडे विरोधकही हेच करीत होते. इंदिरा गांधी ही चेटकीण आहे अशी भावना तेव्हाच्या बुद्धिजीवी मध्यमवर्गात निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले होते. तो काळ होता मुद्रितमाध्यमांचा आणि नभोवणीचा. पण विरोधकांच्या हातात होती ती प्रामुख्याने सायक्लोस्टाइल पत्रके आणि कुजबुज यंत्रणा. बाकी माध्यमे सरकारने नियंत्रित केली होती. त्यातून चित्रपटही सुटले नव्हते.
आणीबाणीच्या काळात येथील जनता सरकारच्या विरोधात होती असे सध्याचे लोकप्रिय मापन आहे. वस्तुस्थिती त्याच्या विरोधी आहे. उत्तर भारतातील गोपट्टा आणि विरोधी पक्ष वा संघटनांचे कार्यकर्ते वगळता सर्वसामान्य जनता आणीबाणीकडे अनुशासन पर्व या भावनेने पाहात होती. नंतर निवडणुकीचा निकाल वेगळा लागला याची कारणे १८ जानेवारी १९७७ नंतरच्या प्रचारात आहेत. तत्पूर्वी लोकांसमोर येत होती ती सरकार नियंत्रित माहिती. ५५ कोटी भारतीयांची ‘एकत्रित ताकद आणि त्यांनी गाळलेला घाम’ यांतून देश एका ‘नव्या आणि यशस्वी समाजवादी कालखंडात प्रवेश करील’, हे वारंवार सांगितले जात होते. ‘गरिबी हटाव’ ही इंदिरा गांधींची लोकप्रिय घोषणा होती. ‘ते म्हणतात इंदिरा हटाव, मी म्हणते गरिबी हटाव’ हे महत्त्वाचे वाक्य. ते चुकीचे होते का? वरवर पाहता नाही. परंतु त्यातून त्या काय संदेश देत होत्या, तर विरोधकांना गरिबी हटवण्यात रस नाही. ते गरीबविरोधी आहेत. हे नक्कीच चुकीचे होते. यात दिसते ते ‘कार्ड स्टॅकिंग’ – नाण्याची एकच बाजू दाखविण्याचे – आणि त्याचबरोबर बद-नामकरणाचे तंत्र. त्यातून इंदिराविरोध म्हणजेच गरीबविरोध असे समीकरण निर्माण केले जात होते. तेव्हाच्या दिल्लीतील एका पुलाचे छायाचित्र उपलब्ध आहे. त्यावर लिहिलेले होते – ‘गरिबी हटवण्याची एकच जादू – कठोर परिश्रम, सुस्पष्ट भूमिका, प्रबळ इच्छाशक्ती आणि कडक शिस्त – इंदिरा गांधी’. हा ‘ग्लिटरिंग जनरॅलिटी – चमकदार सामान्यता’ तंत्राचा नमुना. आदर्श नैतिकतादर्शक शब्दाशी एखाद्या गोष्टीस वा व्यक्तीस जोडून घेत त्यातून कोणत्याही पुराव्यांविना ती बाब वा व्यक्ती तशीच आदर्श आहे हे लोकांना मान्य करायला, स्वीकारायला लावायचे असे हे तंत्र. शिस्त आणि परिश्रम या बाबी तेथे ‘दारिद्रय़निर्मूलन’ या एका आदर्श भूमिकेशी जोडल्या होत्या. आणीबाणी लादणे ही काही चांगली गोष्ट नव्हे. ती जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी, वेदना देणारी कृती. परंतु तेव्हाच्या प्रोपगंडातून आणीबाणीला अनुशासनाशी जोडण्यात येत होते. ती ‘देशहितासाठीची आवश्यक कृती’, ‘गरिबांसाठीची चांगली संधी’ असल्याचे सांगण्यात येत होते. आता कोणी ‘चांगल्या उद्यासाठी आज त्रास सहन करा’ असे सांगितले तर ते चांगलेच की. तेच केले जात होते. फक्त तो ‘उद्या’ मात्र धूसर होता.
आपल्या उपराष्ट्रपतींनी त्या पदावर येण्यापूर्वी ‘मोदी ही ईश्वराने देशाला दिलेली देणगी’ आहे असे म्हटले होते. त्या काळात काँग्रेस नेते देवकांत बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली होती. जर्मनीत ‘फ्युहरर प्रिंझिप’ – हिटलर मिथक – तयार करण्यात आले होते. तसेच हे इंदिरा मिथक. त्यांचे अशा प्रकारचे दैवतीकरण आणीबाणीच्या आधीपासूनच केले जात होते. १९६७च्या निवडणुकीतील त्यांचे ग्रामीण जनतेसमोरचे एक भाषण आहे. त्यात त्या म्हणतात- ‘तुमच्यावरची जबाबदारी तुलनेने कमी आहे. तुम्ही ती निभावू शकता. पण माझ्या खांद्यांवर कितीतरी मोठी जबाबदारी आहे. कारण माझ्या कुटुंबातले कोटय़वधी सदस्य गरिबीने गांजलेले आहेत. मला त्यांची काळजी घ्यायची आहे.’ इंदिरा गांधींची ‘मदर इंडिया’ प्रतिमा अशा पद्धतीने बनविण्यात आली होती. ७१च्या युद्धानंतर त्यांच्याकडे दुर्गारूपात पाहिले जात होते. तशा प्रकारचे राजकीय मूर्तिकरण माध्यमांतून, उंच उंच पोस्टरांतून केले जात होते. माहिती नियंत्रणाचा एक मार्ग म्हणजे ती विरूपित स्वरूपात सादर करणे. आणीबाणी काळातील ‘फिल्म्स डिव्हिजन’ने बनविलेल्या ‘वुई हॅव प्रॉमिसेस टू कीप’ या माहितीपटाचा प्रारंभ होतो, तो विविध प्रांतांतील लोकनृत्यांच्या दृश्याने. मागून निवेदक सांगत असतो – ‘आपण नाचत-गात आहात.. आज आपण खूप खूश आहात. कारण – सामुदायिक विकास योजना रंग लाई है!’ एका वेगळ्या पद्धतीने हे लोकांकडे ‘रोखलेले बोट’ होते. लोकांच्या वर्तनवशीकरणाचा हा प्रकार होता. त्याचे प्रयोग पुढच्या काळात तंत्रप्रगतीमुळे अधिक सोपे होत गेले. २०१४च्या निवडणुकीत आपण ते अनुभवले..
ravi.amale@expressindia.com