युद्धकाळात ‘ल्युसितानिया’ हे प्रवासी जहाज नव्हे, तर युद्धनौका असल्याचे मानून जर्मनीने ते बुडविले. या बोटीतून १२३ अमेरिकी नागरिक प्रवास करीत होते. प्रचारतज्ज्ञांनी यातील निवडक वस्तुस्थितीच सादर करून जर्मनीचे क्रौर्य पुढे आणले आणि ब्रिटिशांनी प्रचाराच्या एका सर्वात महत्त्वाच्या तंत्राचा अवलंब केला..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बातम्या तयार केल्या जाऊ शकतात. पेरल्या जाऊ शकतात. तोडूनमोडून सादर केल्या जाऊ शकतात. आता हे काही राष्ट्रीय गुपित वगैरे नाही. सर्वानाच ते माहीत असते. आज माध्यमांच्या विश्वासार्हतेने तळ गाठला आहे तो त्यामुळेच. पण त्यातही एक मौज आहे. ती अशी, की आपणांस तीच बातमी पेरलेली वाटते, तेच खरेदीवृत्त वाटते, जे आपल्या मतांच्या विरोधात असते. अशा आपणांस न आवडणाऱ्या बातम्या देणारे वृत्तपत्र वा वृत्तवाहिनी वा पत्रकार मग आपणांस वृत्तवारांगना वाटतात. आपल्या मतांचे समर्थन करणारे वृत्त मात्र खरेच आहे, एवढेच नव्हे तर तो प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा लेख आहे असे आपण समजून चालतो. तशा बातम्या देणारे पत्र वा वाहिनी आपल्यासाठी शिरोधार्य ठरते. या दोन्हींतही गफलत आहे. सर्वसामान्यांतील असे समज हा उच्च दर्जाच्या प्रचाराचाच विजय. त्याची चर्चा आपण पुढे करूच. पण माध्यम हाच संदेश असतो हे माध्यमविषयाचे आद्यगुरू मार्शल मॅकलुहान यांचे मत ग्राह्य़ धरायचे, तर मग हा संदेश येतो कुठून, बातम्या येतात कुठून हे फार महत्त्वाचे ठरते. बातम्यांमध्ये आपण अनेकदा सूत्र हा शब्द वाचतो. ही सूत्रे आणि सूत्रधार हे फार महत्त्वाचे असतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धभूमीवरून येणाऱ्या आणि जगभरात- खासकरून अमेरिकेत जाणाऱ्या बातम्यांचा सूत्रधार होते लंडनमधील वेलिंग्टन हाऊस.
ब्रिटनच्या टेल्कोनिया या जहाजाने जर्मनी आणि अमेरिका यांच्यातील संदेशवहन केबल कापून टाकली. स्कँडिनेव्हिया आणि पोर्तुगालमधून संदेशवहन केबल जात होती. पण ती थेट नव्हती. त्यामुळे तेथून संदेश पाठविणे हे महागडे होते आणि त्याला उशीरही लागत होता. वृत्तपत्रांना ‘डेडलाइन’ची घाई असते. हा व्यवसाय म्हणजे सर्व घाईचा कारभार. त्यांना हा उशीर आणि हे पैसे दोन्हीही न परवडणारे. तेव्हा अगदी जर्मनीत वृत्तांकन करणाऱ्या अमेरिकी युद्धपत्रकारांनाही अवलंबून राहावे लागले ते ब्रिटनच्या ताब्यातील संदेशवहन केबलवर. अशा प्रकारे युरोप आणि उत्तर अमेरिका यांच्यातील थेट संदेशवहनावर ब्रिटनने नियंत्रण मिळविले. आता अमेरिकेत जाणाऱ्या सर्व बातम्या, सर्व माहिती ब्रिटनच्या नियंत्रणात आली. ‘ज्याच्या हाती माहिती तो पारधी’ हा माहितीयुगाचा महामंत्र येथेही लागू झाला. पण वेलिंग्टन हाऊसमध्ये बसलेल्या प्रचारतज्ज्ञांनी त्यात एक पथ्य पाळले होते. माहिती सेन्सॉर करूनच पाठवायची, निवडकच पाठवायची, पण ती वस्तुस्थितीच्या विपरीत असता कामा नये. प्रचारात महाअसत्यास एक वेगळे मूल्य असते हे खरे. पण एरवी प्रचार पूर्णत: खोटा असला तर तो लोकांच्या पचनी पडत नाही. असा प्रचार खोडून काढणे विरोधकांना सोपे असते. ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांनी त्याबाबत व्यवस्थित काळजी घेतली होती. अशा प्रचाराचे उत्तम उदाहरण म्हणून ‘ल्युसितानिया’ आणि ‘कॅव्हेल’ या दोन प्रकरणांकडे पाहता येईल. अमेरिकी नागरिकांच्या मनात जर्मनांबद्दल घृणा, तिरस्कार निर्माण करण्यात ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांना यश आले ते प्रामुख्याने या दोन प्रकरणांमुळे. यातील आरएमएस ल्युसितानिया हे क्युनार्ड लाइन या अँग्लो-अमेरिकी कंपनीच्या मालकीचे प्रवासी जहाज. ब्रिटनहून ते न्यू यॉर्ककडे निघाले असताना ७ मे १९१५ रोजी ते जर्मन यू-बोटीने (अंडरसी बोट) जलक्षेपणास्त्र डागून बुडविले. त्यात एक हजार १९८ जणांचा मृत्यू झाला.
तो युद्धाचा काळ होता. ब्रिटनभोवतीचा समुद्र हे युद्धक्षेत्र असल्याचे जर्मनीने आधीच जाहीर केले होते. तेथून जहाजाने प्रवास करू नये असा इशारा जर्मनीने आधीच दिला होता. ल्युसितानियाबद्दल तर जर्मन दूतावासाने अमेरिकेतील दैनिकांतून जाहिरातही दिली होती. पण तरीही हे जहाज तेथून सोडण्यात आले. शिवाय त्यात केवळ प्रवासीच नव्हते. त्यातून दारूगोळा वाहून नेण्यात येत होता. एवढेच नव्हे, तर त्या जहाजावर तोफाही लावलेल्या होत्या. तेव्हा ते प्रवासी जहाज नव्हे, तर युद्धनौका असल्याचे मानून कोणताही इशारा न देता जर्मन पाणबोटीने त्यावर क्षेपणास्त्र डागले. ते बुडविले. ही झाली जर्मनीची बाजू. एरवी ही युद्धातील एक घटना मानली गेली असती. परंतु ब्रिटिशांनी या घटनेचा प्रचारासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या बोटीतून १२३ अमेरिकी नागरिक प्रवास करीत होते. अनेक लहान मुले होती. अशा कोवळ्या निष्पाप बालकांना घेऊन जाणाऱ्या बोटीवर पाणबोटीतून केलेला हल्ला म्हणजे प्रशियन रानटीपणाचा आणखी एक नमुना, अशा पद्धतीने ब्रिटिशांनी ही घटना मांडली. या बोटीतून दारूगोळा नेण्यात येत होता, एवढेच नव्हे तर तिची अधिकृत नोंदणीही सहायक युद्धनौका अशीच झालेली होती. ही वस्तुस्थिती. परंतु आता ब्रिटिश हे बातम्यांचे सूत्रधार होते. वर्तमानपत्रे बातम्या प्रसिद्ध करीत होते. परंतु त्या बातम्यांचा मजकूर ठरवीत होते ब्रिटिश प्रचारतज्ज्ञ. तेव्हा निवडक वस्तुस्थितीच सादर करून वेलिंग्टन हाऊसने पुढे आणले ते जर्मनीचे उघडेनागडे क्रौर्य. त्यातच नेमका त्याच काळात जर्मनीच्या बेल्जियममधील अत्याचारांचा अहवाल (ब्राइस रिपोर्ट) प्रसिद्ध झाला. या दोन्ही घटनांचा वापर करून ब्रिटिशांनी प्रचाराच्या एका सर्वात महत्त्वाच्या तंत्राचा अवलंब केला. ते म्हणजे विरोधकांची एकसाची टाकसाळी प्रतिमा निर्माण करणे. भारतातील काही जातींची गुन्हेगारी जमात अशी प्रतिमा ब्रिटिशांनी निर्माण केली होती. अनेक जाती, जमातींच्याही अशाच टाकसाळी प्रतिमा तयार करून त्यांच्याविरोधात द्वेषभावना तयार केली जाते. आपल्याकडील ‘सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा, यांची संगत नको रे बाप्पा’ ही म्हण काय किंवा हल्ली प्रचारात असलेले सहकारसम्राट, शिक्षणसम्राट हे शब्द काय, हे याच प्रचारतंत्राचे नमुने. याच तंत्राचा अवलंब करून ब्रिटिशांनी जर्मनांची हूण ही प्रतिमा बळकट केली. हूण या मध्य आशिया आणि पूर्व युरोपातल्या रानटी टोळ्या. त्यांच्या अत्याचाराच्या कहाण्या या युरोपियन मानसिकतेत गाढ रुतून बसलेल्या आहेत. पण जर्मन हे स्वत:स शुद्ध आर्यवंशी मानणारे. तेव्हा त्यांना हुणांची उपमा कशी मिळाली, हा प्रश्नच आहे. त्याचे उत्तर मिळते ते कैसर विल्यम दुसरे यांनी केलेल्या एका भाषणात. सन १९०० मध्ये बॉक्सर बंड मोडून काढण्यासाठी जर्मन फौज निघाली तेव्हा त्यांच्यासमोर या राजाने भाषण केले. त्यात त्याने या हूणांचा आदर्श बाळगा असे आवाहन केले. हे भाषण युरोपातील अनेक देशांत सविस्तर छापून आले होते. ब्रिटिश प्रचारतज्ज्ञांनी पहिल्या महायुद्धात त्याचा वापर करून जर्मन म्हणजे क्रूर हूण अशी प्रतिमानिर्मिती केली.
पण ल्युसितानिया प्रकरण येथेच संपले नव्हते. त्या घटनेच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने कार्ल गोएत्झ नामक जर्मन कलाकाराने एक मेडल तयार केले. त्याच्या सुमारे ५०० प्रती तयार करण्यात आल्या होत्या. त्या मेडलमध्ये एक चूक राहिली होती. ती म्हणजे तारखेची. बोट बुडाली ७ मे रोजी. त्यावर तारीख लिहिली गेली ५ मे. ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाने ते मेडल मिळविले. त्याची छायाचित्रे काढली. एवढेच नव्हे, तर वेलिंग्टन हाऊसने त्याच्या ५० हजार प्रती तयार केल्या. प्रत्येक मेडल एका खास पेटीत ठेवले. त्यात ब्रिटिशांची बाजू मांडणारे पत्रकही ठेवले आणि त्या पेटय़ा योग्य ठिकाणी पोहोचतील याची व्यवस्था केली. मेडलवरील तारखेवरून ती बोट बुडविण्याचे कारस्थान जर्मनांनी आधीच रचले होते असा प्रचार सुरू केला. लहान मुले, अमेरिकी नागरिक बुडाल्याचा आनंद जर्मन साजरा करीत आहेत हे लोकमानसात ठसविण्यात आले. अशा क्रूर हुणांना शिक्षा झालीच पाहिजे अशी संतप्त भावना अमेरिकी नागरिकांच्या मनात निर्माण करण्यात आली. या प्रचाराला आणखी जोड मिळाली होती ती ब्रिटिश परिचारिका एडिथ कॅव्हेल हिला जर्मनांनी दिलेल्या मृत्युदंडाची.
हे प्रोपगंडाच्या इतिहासातील अजरामर प्रकरण. निवडक तथ्ये आणि सत्य-असत्य यांच्या बेमालूम मिश्रणाचे प्रचारतंत्र समजून घेण्यासाठी हे प्रकरण मुळातून पाहिले पाहिजे..
रवि आमले
ravi.amale@expressindia.com