‘किस’ हे बोल्शेविक प्रोपगंडाचे जणू ध्येयवाक्य होते..सर्वच देशांतील प्रोपगंडापंडितांनी पोस्टरचा वापर केलेला आहे. बोल्शेविकांची भित्तिचित्रे जरा वेगळी होती. त्यांनी पोस्टरना कथाचित्रांचे रूप दिले. आपल्याकडील काही आदिवासी जमातींमध्ये एकाच लांबलचक कापडावर कथा चित्रित करून ती दाखविली जाते. तसेच काहीसे ..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्रन्शडाट उठाव. फारसा कोणाला माहीत नाही तो. डावेही विसरले असावेत. प्रोपगंडाच्या इतिहासात मात्र तो अजरामर आहे. त्याची कहाणी सुरू होते रशियातील यादवीच्या अखेरच्या काळात.
पहिले महायुद्ध केव्हाच संपले होते. युद्ध सुरू असतानाच तिकडे रशियातील झारशाही नामशेष झाली होती. मार्क्सच्या अनुयायांनी लेनिनच्या नेतृत्वाखाली पुकारलेले बंड यशस्वी झाले होते. ‘जगातल्या कामगारांनो एक व्हा’ अशी घोषणा देणाऱ्या साम्यवादी विचारसरणीने औद्योगिकदृष्टय़ा मागासलेल्या देशातील शेतकऱ्यांना एक केले होते. त्या शेतकऱ्यांनी तेथे ‘कामगारांची हुकूमशाही’ स्थापन केली होती. सत्ता बोल्शेविकांच्या हाती होती. तिची सूत्रे व्लादिमीर इलियेच युल्यानोव्ह यांच्या हाती होती. जग त्यांना ओळखते लेनिन म्हणून. ते नेते म्हणून प्रभावी, तेवढेच वक्ते म्हणूनही. त्या गुणावर इंद्रजाल पसरविणारे. उत्तम ‘प्रचार’कही होते ते. बोल्शेविक हा त्यांचा गट. ते नाव म्हणजे लेनिन यांच्या प्रोपगंडाचा उत्तम नमुनाच.
१९०३च्या पार्टी काँग्रेसमध्ये ‘मार्क्सिस्ट रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी’ची फाळणी झाली. एकीकडे लेनिनचा गट होता. विरोधात ज्युलियस माटरेव्ह होता. वाद पक्ष सदस्यत्वाच्या मुद्दय़ाचा होता. त्यावरून मतदान झाले. कोणालाच स्पष्ट बहुमत नव्हते, पण तरीही लेनिनच्या गटाने स्वत:ला बोल्शेविक म्हणण्यास सुरुवात केली. बोल्शेविक म्हणजे बहुमत असणारे. विरोधी गटाला मेन्शेविक- म्हणजे अल्पमतातील- म्हणण्यात येऊ लागले. यातून एक पर्सेप्शन – जनसमजूत – निर्माण केले जात होते. ते प्रोपगंडाचे एक कार्य. ते साधणाऱ्या ‘ऐतिहासिक’, ‘क्रांतिकारी’, ‘सर्वात मोठे’ अशा प्रकारच्या शब्दांकडे म्हणूनच फार सावधगिरीने पाहावे लागते. झारशाहीविरोधातील लढय़ात लेनिन यांच्याकडे मार्क्सवादी विचारधारा होती. हाती शस्त्र मात्र प्रोपगंडाचे होते. इस्करा (ठिणगी) आणि प्रावदा (सत्य) या दोन भूमिगत कालिकांतून त्यांनी हा प्रोपगंडा चालविला होता. त्यांचे प्रोपगंडाचे तत्त्व साधेच होते. साधाच विचार होता त्यामागे. तो म्हणजे- किस. कीप इट सिंपल स्टय़ुपिड. बोल्शेविकांचे तेव्हाचे प्रचारफलक पाहा. ‘ब्रेड, पीस अॅण्ड लॅण्ड’, ‘ऑल पॉवर टू द सोव्हिएट्स’. साधे सोपे शब्द. अर्धसाक्षर, निरक्षर रशियनांना थेट भिडतील असे. आपल्याकडील ‘गरिबी हटाव’सारखे. काहीही स्पष्ट न सांगणारे; परंतु प्रभावी घोषणा तीच असते, जी धूसर असते. आपल्याला थेट काहीही सांगत नसते. सांगण्याचे काम उलट आपल्यावरच सोपवत असते. ज्याने त्याने त्यातून जो जे वांच्छिल तो अर्थ घ्यावा.
तेव्हाचा रशिया हा निरक्षर होता, ग्रामीण होता. अशा संस्कृतीमध्ये लोकमानसावर प्रभाव असतो मूर्ती, प्रतिमा, चिन्हे यांचा. तो त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा भागच असतो. या पारंपरिक हत्यारांचा वापर राजकीय संदेश प्रसारित करण्यासाठी करण्यात आला तर? बोल्शेविकांनी तेच केले. त्यासाठीचे माध्यम होते पोस्टर. ‘म्युनिशन ऑफ द माइंड’चे लेखक फिलिप एम. टायलर सांगतात, ‘पोस्टर अत्यंत साध्या आणि अगदी निरक्षर खेडुतालाही सहज ओळखता येऊ शकेल अशा पद्धतीने चिन्हे सादर करीत असतात.’ अशी पोस्टर म्हणूनच प्रभावी ठरतात. सर्वच देशांतील प्रोपगंडापंडितांनी पोस्टरचा वापर केलेला आहे. बोल्शेविकांची भित्तिचित्रे मात्र जरा वेगळी होती. डी. एस. ऑर्लोव्ह, व्ही. डेनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिखाइल चेरेम्निख हे तेव्हाचे नावाजलेले चित्रकार. त्यांनी पोस्टरना कथाचित्रांचे रूप दिले. आपल्याकडील काही आदिवासी जमातींमध्ये एकाच लांबलचक कापडावर कथा चित्रित करून ती दाखविली जाते. तसेच काहीसे हे. यातील चेरेम्निख यांची रोस्टा विंडो चित्रे हा तर भन्नाट प्रकार होता. रोस्टा म्हणजे बोल्शेविक टेलिग्राफ एजन्सी. १९१८ला तिची स्थापना झाली. तो कागदटंचाईचा काळ. त्यावर मात करण्यासाठी चेरेम्निख यांनी भित्तिवृत्तपत्राचा प्रयोग सुरू केला. मॉस्कोतील गर्दीच्या ठिकाणी, दुकानांतील खिडक्यांतून ती लावली जात. पुढे तेथे कथाचित्रांची पोस्टर लावण्यात येऊ लागली.
ऑक्टोबर क्रांतीनंतर बोल्शेविकांच्या हाती सत्ता आली, पण त्यांची मांड अजून घट्ट व्हायची होती. झारनिष्ठ विरोध करीत होते. अलगतावाद्यांना फूस लावत होते. या झारनिष्ठांना ओळखले जाई व्हाइट्स या नावाने. हे परंपरावादी. त्यांचे पद्धतशीर राक्षसीकरण करण्यात आले. जुने म्हणजे वाईट. नवे ते चांगले. लाल म्हणजे प्रगती. बाकीचे सगळे रंग नरकाकडे नेणारे. अशी समीकरणे रूढ करण्यात आली. जे विरोधात ते भ्रष्ट, घातपाती, साठेबाज ठरविण्यात आले. लेनिनच्या मनात बडय़ा, श्रीमंत शेतकऱ्यांबद्दल प्रचंड तिरस्कार. ते ‘कुलाक’ म्हणून ओळखले जात. ते आता गणशत्रू ठरले. पुढे एखाद्याने लेनिनच्या विरोधात एक शब्द जरी उच्चारला तरी त्यावर लगेच कुलाक वा पांढरे असा शिक्का मारण्यात येऊ लागला. अशा ‘बायनरी’ – विरोधी जोडय़ा – तयार करणे हा प्रोपगंडाचाच भाग. आमच्या बाजूचे ते सारे देशप्रेमी. विरोधात बोलाल तर देश वा लोकद्रोही. असे ते चाललेले असते. हे नीट ओळखले पाहिजे. विरोधी विचारांना मुळातून संपवणे हा त्याचा उद्देश. हे किती घातक असते, ते दिसले क्रन्शडाट उठावाच्या वेळी.
ते साल होते १९२१. व्हाइट्सविरोधातील युद्ध लाल सेनेने जवळजवळ जिंकले होते, पण या यादवीत अर्थव्यवस्थेची वाट लागली होती. औद्योगिक उत्पादन घटले होते. तशात याच वर्षी मोठा दुष्काळ पडला. शेतीची माती झाली. या आर्थिक दुरवस्थेसाठी लेनिनची धोरणे – वॉर कम्युनिझम – मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत होते; परंतु त्याचे सर्व खापर झारशाहीवर फोडण्यात येत होते. लेनिनच्या प्रचारतंत्राचे हे एक वैशिष्टय़च, पण आता लोकांमधील असंतोष वाढू लागला होता. शेतकरी संतापले होते. अनेक जण शेती कसायलाच नकार देऊ लागले होते. संपच तो एक प्रकारचा. तशात पेट्रोग्राडमधील कामगारांनी ब्रेडच्या रेशनिंगविरोधात संप पुकारला. या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी क्रन्शडाटच्या नौदल तळावरून एक शिष्टमंडळ आले. ते सारे बोल्शेविकच. साम्यवादावर निष्ठा असणारे. म्हणजे लेनिनच्याच बाजूचे; पण हे सारे पाहून त्यांचाही भ्रमनिरास झाला. पेट्रोग्राडमधील संप फोडण्यासाठी सरकारने जे केले ते पाहून त्या तळावरील नौसैनिकांनी एक सभा बोलावली. त्यात १५ मागण्या करण्यात आल्या. तातडीने निवडणुका, उच्चारस्वातंत्र्य, सभा भरविण्याचे स्वातंत्र्य, सर्वाना समान रेशन अशा त्यांच्या मागण्या होत्या, पण सरकारने त्या मागण्या करणाऱ्यांच्या दोन नेत्यांना अटक केली. तशात तळावर सरकार हल्ला करणार अशी अफवा पसरली. तळावरील नौसैनिकांनी तातडीने बैठक घेऊन अंतरिम क्रांतिकारी समितीची स्थापना केली. हे लेनिनला थेट आव्हान होते. त्यांनी एकाच वेळी या बंडवाल्यांवर दुहेरी हल्ला चढविला. एक लष्करी आणि दुसरा प्रोपगंडाचा. लष्करी हल्ल्यात किमान साडेदहा हजार सैनिक मारले गेले. हरल्यानंतर किमान दोन हजार बंडखोरांना कंठस्नान घालण्यात आले. कित्येकांची रवानगी कारावासात झाली.
हे सगळे होते साम्यवादीच, पण बंड सुरू होताक्षणी सरकारी वृत्तपत्रांतून त्यांचे राक्षसीकरण सुरू झाले. लिओ ट्रॉटस्कीने ज्या नौसैनिकांचे वर्णन ‘रशियन क्रांतीचा गौरव’ अशा शब्दांत केले होते, ते आता ‘पांढरे’ असल्याचे सांगण्यात येऊ लागले. फ्रेंच आणि अन्य विदेशी राष्ट्रे या बंडामागे असल्याचे सांगण्यात येऊ लागले. या प्रोपगंडाचा हेतू होता, बंडवाल्यांना सामान्य जनतेच्या नजरेतून उतरविण्याचा. त्यांना जनतेची सहानुभूती न मिळू देण्याचा. सरकारविरोधात उठणारा प्रत्येक आवाज हा विदेशी वा दहशतवाद्यांचा हस्तक ठरविण्यात येतो. त्यातलाच हा प्रोपगंडा. बंड शमल्यानंतर त्याचा सूर थोडा बदलला. आता ते बंडवाले हे प्रतिक्रांतिकारी होते, त्यांना भांडवलशाही आणायची होती, क्रांतीचा खात्मा करायचा होता असा इतिहास लिहिला जाऊ लागला. तो खोटा असल्याचे पुढे अनेकांनी सिद्ध केले. ते बंडखोर लोकांच्या बाजूचे होते. सरकारला त्यांचा विरोध होता, पण लेनिन म्हणजेच सरकार आणि सरकार म्हणजेच देश असे समीकरण तयार झाल्यानंतर ते गणशत्रू बनले. किती सोपे आणि साधे प्रचारतंत्र हे. कोणाच्याही लक्षात येण्यासारखे; परंतु त्या साधेपणातच त्याचा प्रभाव दडलेला होता. ‘किस’ अर्थात ‘किप इट सिम्पल स्टय़ुपिड’ हे बोल्शेविक प्रोपगंडाचे जणू ध्येयवाक्य होते ते उगाच नाही.