जेसिका लिंच ही अमेरिकेतील जिगरबाज तरुणी सैन्यात दाखल झाली. इराक युद्धाच्या काळात तिच्या ताफ्यावर हल्ला झाला, त्यात नऊ सैनिक मारले गेले, ती जखमी झाली, तिला युद्धकैदी बनविण्यात आले हे सगळे खरे.. पुढचा भाग होता तो अमेरिकेचा प्रोपगंडा.. तो कशासाठी केला हे मग जगासमोर आलेच..
ती जिवावर उदार होऊन लढत होती..
हा होता ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीचा मथळा. बातमी होती जेसिका लिंच हिची. ही अवघ्या १९ वर्षांची तरुणी. ज्या वयात मुलांनी महाविद्यालयात जायचे, हसायचे-खेळायचे, त्या वयात ही जिगरबाज तरुणी सैन्यात दाखल झाली. देशासाठी. मानवतेसाठी. जागतिक शांततेसाठी! आघाडीवर लढणाऱ्या सैन्याला रसद पुरविण्याची जबाबदारी तिच्या तुकडीवर होती. सप्लाय क्लार्क म्हणून ती काम करीत होती. पण वेळ येताच एक साधी कारकून महिला आपल्या देशासाठी, स्वातंत्र्यासाठी काय करू शकते हे तिने दाखवून दिले होते. निदान अमेरिकी प्रचार तरी तसेच सांगत होता..
तो काळ होता इराक युद्धाचा. संपूर्ण जगाला सद्दाम हुसेन नावाच्या क्रूरकम्र्यापासून वाचविण्यासाठी अमेरिकेने धर्मयुद्ध पुकारले होते. २००३च्या २० मार्चला ते सुरू झाले. त्यानंतर तीनच दिवसांनी ती घटना घडली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार, २३ मार्च रोजी अमेरिकी लष्कराच्या ५०७ व्या ऑर्डनन्स मेन्टेनन्स कंपनीच्या तुकडीवर नासिरिया शहरानजीक अचानक इराकी सैन्याने घात लावून हल्ला केला. त्या तुकडीत जेसिका होती. तिच्या डोळ्यांदेखत तिचे अनेक सहकारी मारले गेले. तिलाही गोळ्या लागल्या. पण ती डगमगली नाही. तिने आपली एम-१६ रायफल उचलली आणि लढत राहिली. तिची एकच इच्छा होती, मारता मारता मरावे. शत्रुसैन्याच्या हाती आपण जिवंतपणी लागता कामा नये. पण अखेर तिचा नाइलाज झाला. बंदुकीच्या गोळ्या संपल्या. इराकी सैनिकांनी तिला पकडले, संगिनीने भोसकले.
आता ती युद्धकैदी झाली होती. तिचा छळ करण्यात येत होता. नंतर तिला एका इस्पितळात नेण्यात आले. तेथे इमान नावाची एक परिचारिका काम करीत असे. मोहम्मद ओदेह अल रेहाईफ हा ३२ वर्षीय वकील तिचा नवरा. तो तिला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला असताना त्याला जेसिका दिसली. एक इराकी सैनिक तिला लाफे मारीत होता. ते पाहून मोहम्मदचे मन कळवळले. त्याने अमेरिकी सैन्याला ही खबर दिली. ते समजताच अमेरिकी अधिकाऱ्यांनी तिच्या सुटकेची योजना आखली. अखेर १ एप्रिल रोजी विशेष दलाच्या सैनिकांनी त्या रुग्णालयावर हल्ला करून जेसिकाची सुटका केली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये या थरारक सुटकेची हकिगत प्रसिद्ध होताच, संपूर्ण अमेरिकेत जल्लोष झाला. त्या वीरांगनेच्या शौर्यगाथेने अनेकांची छाती भरून आली. पण आता तिच्या छळाच्या बातम्याही हळूहळू येऊ लागल्या. सद्दामच्या क्रूर सैनिकांनी तिचा केवळ छळच केला नव्हता, तर तिच्यावर बलात्कारही केला होता. त्या बातम्यांनी लोकांच्या मनात संतापाचा ज्वालामुखी उसळला. सद्दाम हुसेनसारख्या हुकूमशहाला सत्तेवरच नव्हे, तर जगात राहण्याचा अधिकार नाही, हीच आता अनेकांची भावना होती. अमेरिकेचा प्रोपगंडा, प्रचार पुरेपूर फळाला आला होता. पहिल्या महायुद्धाच्या काळातील एडिथ कॅव्हेल प्रकरणाची तंतोतंत पुनरावृत्ती झाली होती.
जॉर्ज डब्लू बुश यांनी नाइन-इलेव्हनच्या निमित्ताने इराकवर केलेल्या हल्ल्याला संयुक्त राष्ट्रांत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिळालेला पाठिंबा हे अमेरिकी प्रचाराचे मोठे यश होतेच. पण या आक्रमणाला घरच्या आघाडीवरून अजूनही विरोध होत होता. त्याबद्दल अनेकांच्या मनात शंका होत्या. तज्ज्ञ, अभ्यासक, सामाजिक संस्था, माध्यमे यांच्याकडून त्यावर टीका होत होती. राज्यकर्ते अशा टीकेची पर्वा करतात याचे कारण सर्वसामान्य नागरिक त्या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांविरोधात जाऊ शकतात. तज्ज्ञांचे, पत्रकारांचे म्हणणे सर्वसामान्यांना पटू लागले तर अनर्थ होऊ शकतो. तेव्हा पहिल्यांदा तज्ज्ञ आणि पत्रकार, अभ्यासकांविषयी नागरिकांच्या मनात अप्रीती निर्माण करणे आवश्यक असते. त्यांच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करणे गरजेचे असते. या ठिकाणी भावनांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपल्या बाजूने या लोकभावना वळविणे हे प्रोपगंडाचे महत्त्वाचे काम. जेसिका लिंच हिची कहाणी या कामी बुश प्रशासनाच्या कामी आली.
या कहाणीत अमेरिकी लोकभावना प्रक्षुब्ध होऊ शकेल असे सारे घटक होते. एक तरुणी. तीही गौरवर्णीय. व्हाइट अँग्लो सॅक्सन. ती क्रूर अशा शत्रुसैन्याशी प्राणपणाने लढते. मारिता मारिता मरावे या बाण्याने लढली. तिचे दुर्दैव असे की तिच्याकडील दारूगोळा संपला. म्हणून केवळ ती शत्रूच्या हाती लागली. त्यांनी तिच्यावर घोर अत्याचार केले. पण ती बधली नाही. अखेर तिच्या शूर सहकाऱ्यांनी जिवावर उदार होत शत्रूवर हल्ला केला आणि तिची सुटका केली. अशी ही कहाणी. ती माध्यमांना पुरविण्यात आली. तीही कळते, समजते अशा पद्धतीने. तिच्यावर चित्रपटही काढण्यात आला. ‘सेव्हिंग जेसिका लिंच’ हे त्याचे नाव. तिच्या सुटकेच्या वेळी अमेरिकी कमांडोंनी त्या सर्व घटनेचे नाइट व्हिजन कॅमेऱ्यातून चित्रीकरण केले होते. तेही कोणत्या हॉलीवूड चित्रपटाहून कमी नव्हते. या सगळ्या कहाणीत कमतरता होती ती एकच. ती म्हणजे सत्याची.
ही सगळी कथा धादांत बनावट होती. म्हणजे जेसिकाच्या ताफ्यावर हल्ला झाला हे खरे. त्यात नऊ सैनिक मारले गेले, जेसिका जखमी झाली, तिच्या मांडीचे, टाचेचे हाड मोडले, तिला युद्धकैदी बनविण्यात आले हे सगळे खरे. परंतु ती जिवावर उदार होऊन लढली हे खोटे. तिला गोळ्या लागल्या हेही खोटे. त्यांचे वाहन उलटताच ती बेशुद्ध पडली होती. तिचा छळ करण्यात आला, तिच्यावर बलात्कार करण्यात आला हेसुद्धा खोटे. तिला उपचारासाठी ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथील डॉक्टरांनी, परिचारिकांनी तिची चांगली व्यवस्था ठेवली होती. तेथे ती युद्धकैदी होती. पण काही दिवसांनी इराकी सैनिक त्या रुग्णालयातून निघून गेले. आणि रुग्णालयाच्या संचालकांनी जेसिकाला अमेरिकी फौजेच्या ताब्यात देण्याची सूचना दिली. त्यानंतर मग तिच्या सुटकेचे सारे नाटय़ रचण्यात आले.
आतून-बाहेरून गोळीबार होत असताना अमेरिकी कमांडो तेथे रँबो-सिल्वेस्टर स्टॅलनच्या आवेशात ‘गो गो गो’ करीत घुसले वगैरे सारा बनाव रचण्यात आला. त्याची चित्रफीत नंतर व्यवस्थित संकलित करून वृत्तवाहिन्यांवरून दाखविण्यात आली. या सगळ्याच्या मागे पेंटॅगॉनमधील अधिकारी होतेच. परंतु हे सारे करण्यात आले ते एका जनसंपर्क संस्थेच्या मदतीने. तिचे नाव रेंडन ग्रुप.
या घटनेनंतर काही महिन्यांतच हा खोटेपणा उजेडात आला. वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी, न्यू यॉर्क टाइम्स यांनी त्याचा पर्दाफाश केला. खुद्द जेसिका लिंच हिनेही नंतर काँग्रेशनल समितीपुढे दिलेल्या साक्षीत हे सारे खोटे असल्याचे सांगितले. ‘लष्करी अधिकाऱ्यांनी आपणास इराकी युद्धातील वीरांगना म्हणून पेश करण्याचा खोटेपणा केला,’ असे तिने स्पष्ट सांगितले. आपणांस असे ‘लिटल गर्ल रँबो’ म्हणून सादर का केले गेले हेच समजत नाही, असे ती म्हणाली. पण त्याचे कारण सुस्पष्ट होते. बुश प्रशासनाला अमेरिकी जनमत आपल्या बाजूने वळवायचे होते. अमेरिकी कुटुंबांतील देशभक्तीच्या भावनेचा वापर करून घेऊन टीकाकारांना गप्प करायचे होते. त्यासाठी हा सगळा उपद्व्याप करण्यात आला होता. त्यातील सत्य समाजासमोर नंतर आले. पण त्याचा व्हायचा तो परिणाम आधीच झाला होता. इराकवरील अमेरिकी आक्रमणाच्या काळात बुश यांच्यासमवेत सारी जनता होती. जेसिकासारख्या बाहुल्या तेव्हा विकल्या जात होत्या, तिची छबी असलेले फ्रिजवर लावायचे चुंबक विकले जात होते. आणि बुश यांच्या धोरणांवर टीका करणारे सर्वसामान्य ‘देशभक्तां’च्या रोषाचे धनी बनले होते. टीकाकारांकडे दहशतवादाचे समर्थक म्हणून पाहिले जात होते. आपण एका प्रचारतंत्राचे बळी आहोत हे या देशभक्तांना समजतही नव्हते.
पहिल्या महायुद्धाचा काळ हा प्रचाराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. त्या काळातही अशाच प्रकारे लोकांमधील युद्धज्वर वाढविण्यात आला होता. एडिथ कॅव्हेल प्रकरणातून जर्मनांची क्रूर हूणवंशी ही प्रतिमा ठसली होतीच. आता या युद्धात अमेरिकेने उतरावे यासाठीचा प्रचार शिगेला नेण्यात येत होता. जर्मनांपासून अमेरिकेलाही धोका आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. त्यासाठी ब्रिटिशांनी प्रचारतंत्राचा एक नवा फासा टाकला. प्रचाराच्या इतिहासात ते प्रकरण ओळखले जाते झिमरमन तार म्हणून.