ते बहुधा जगातील सर्वात प्रसिद्ध रोखलेले बोट असेल. ते होते लॉर्ड हर्बर्ट किचनर यांचे. ते सन्याधिकारी. कट्टर साम्राज्यवादी. पहिल्या महायुद्धाच्या काळातील ब्रिटनचे युद्धमंत्री. आज त्यांचे नाव इतिहासाच्या पुस्तकांतच उरले आहे. पण त्यांचा चेहरा आणि ते रोखलेले बोट मात्र आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांची छबी असलेले ते भित्तिपत्रक युद्धकालीन प्रोपगंडा कहाण्यांचा भाग बनले आहे. आज १०० वर्षांनतरही अनेक प्रचारतज्ज्ञांना मोहवीत आहे.
महायुद्धकाळात प्रारंभी ब्रिटनच्या राष्ट्रीय युद्धध्येय समितीने आणि नंतर वॉर प्रोपगंडा ब्युरोने अनेक प्रोपगंडा पोस्टर तयार केली होती. एका अंदाजानुसार १९१४ ते १९१८ या चार वर्षांच्या काळात अशी सुमारे ५७ लाख अधिकृत भित्तिपत्रके छापण्यात आली होती. किचनर यांचे पोस्टर हे त्यांतलेच एक. पण आज प्रसिद्ध आहे त्याहून ते अधिकृत पोस्टर वेगळे होते. त्या मूळच्या आवृत्तीमध्ये अध्र्या भागात लॉर्ड किचनर यांचे गणवेशातील छायाचित्र होते आणि उरलेल्या भागात काळ्या रंगावर पिवळा मजकूर होता. तब्बल ३५ शब्द होते त्यांत. पोस्टर प्रोपगंडास ना-लायक असेच ते भित्तिपत्रक. पण ते पाहून लंडन ओपिनियन या दैनिकात काम करणारे ग्राफिक कलाकार आल्फ्रेड लीटे यांना एक कल्पना सुचली. त्यांनी किचनर यांचा गणवेश कायम ठेवला. डोक्यावर लष्करी टोपी चढवली. मिशा थोडय़ा भरदार केल्या. चेहरा तरुण केला. अधिकृत भित्तिपत्रकात ते भलतीकडेच पाहात होते. त्याने त्यांना पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत रोखून बघायला लावले आणि त्यांचे मधले बोट थेट पाहणाऱ्याकडे रोखले. कोणत्याही कोनातून पाहिले तरी किचनर आपल्याकडे पाहूनच बोट रोखत आहेत, अशी त्याची रचना होती. हे चित्र पाच सप्टेंबर १९१४ च्या ‘लंडन ओपिनियन’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आले. तेव्हा त्याबरोबर मोजकेच शब्द होते – ‘युअर कंट्री नीड्स यू’ अतिशय प्रभावशाली असे ते चित्र होते. त्यामुळे पुढच्याच आठवडय़ात ‘लंडन ओपिनियन’ने त्याच्या प्रती विक्रीस काढल्या. आता त्यातील संदेश थोडासा बदललेला होता. ‘देशाला तुमची गरज आहे’ हे वाक्य आता ‘देशाला तुम्ही हवे आहात’ असे करण्यात आले. मासिकाच्या नावाच्या जागी ब्रिटन्स हा शब्द आला. ‘देशाच्या सन्यात सामील व्हा’ हा ठसठशीत आदेश आला आणि किचनर यांच्या आग्रहामुळे ‘गॉड सेव्ह द किंग’ हे घोषवाक्यही त्यात समाविष्ट करण्यात आले. का कोण जाणे, त्या काळात या पोस्टरचा फारसा वापर झाला नाही. परंतु त्याचा परिणाम मात्र नक्कीच झाला. नक्कल हे प्रशंसेचे सर्वोत्तम स्वरूप, असे म्हणतात. किचनर पोस्टरच्याही अनेक नकला झाल्या. अनेक देशांत झाल्या. अमेरिकेत त्याचे रूप दिसले ते अंकल सॅमच्या त्या गाजलेल्या ‘आय वाँट यू’ भित्तिचित्रातून.
डोक्यावर उंच लिंकन टोपी, कानावर आलेले केस, हनुवटीवरची लांब पांढुरकी दाढी, नाकेला, गालफाडे काहीशी आत गेलेला असा तो मध्यमवयीन सॅमकाका. तो कोण होता याबद्दल अनेक दंतकथा आहेत. काहींच्या मते हे नाव आले ते न्यूयॉर्कमधील सॅम्युअल विल्सन नामक एका मांसव्यापाऱ्यावरून. १८१२ च्या युद्धात तो अमेरिकी लष्करास मांसपुरवठा करीत असे. त्याच काळात यूएस म्हणजे अंकल सॅम असे समीकरण तयार झाल्याचे सांगतात. त्याचे सध्याचे सुप्रसिद्ध चित्र रंगविले ते जेम्स माँटगोमेरी फ्लॅग या चित्रकाराने. जुल १९१६ मध्ये त्याने ‘लेस्लीज’ या साप्ताहिकासाठी ते चित्र काढले होते. त्यातील गंमत अशी, की त्यासाठी मॉडेल म्हणून त्याने स्वतचाच चेहरा वापरला. आणि त्या चित्राची कल्पना उचलली ती लॉर्ड किचनर यांच्या पोस्टरवरून. इटलीमध्ये अचिली मोझन या चित्रकारानेही युद्धप्रचाराकरिता अशाच प्रकारचे पोस्टर तयार केले होते. अनेकांनी त्या पोस्टरपासून प्रेरणा घेतली आहे. त्याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणून नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराकडे बोट दाखवता येईल. २०१४ ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या दोन्हींत मोदी यांच्या प्रचार पोस्टरमध्ये त्यांचे रोखलेले बोट दिसले होते. मोदींची अशी किमान तीन प्रकारची भित्तिपत्रके तयार करण्यात आली होती.
आता प्रश्न असा पडतो की त्या रोखलेल्या बोटात आणि एकंदरच त्या भित्तिपत्रकांत अशी काय जादू होती की प्रोपगंडाच्या इतिहासात त्यांना एवढे महत्त्व आहे. हर्टफोर्डशायर विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापक केरेन पाइन सांगतात, ‘बोट रोखणे ही व्यक्तिवादी क्रिया आहे. म्हणजे ते एका व्यक्तीला उद्देशून असते. आपण त्या बोट रोखण्याशी जोडले जातो आणि त्याला प्रतिसाद देणे आपणांस भाग पडते.’ ही भित्तिपत्रके तशी साधीच. परंतु त्यांचे अपील – आवाहन त्या साधेपणात आणि त्यातून नेणिवेच्या पातळीवर लोक जो संदेश ग्रहण करतात त्यात आहे. ही सर्व चित्रे पाहा. त्यातील आवेश आज्ञार्थी आहे, सर्वसामान्य व्यक्तींना एक अधिकारी व्यक्ती आज्ञा करते आहे असा. किचनर यांच्या पोस्टरवरील शब्द नागरिकांच्या मनातील देशप्रेमाच्या भावनेला हात घालत आहेत. शिवाय अजून जे सन्यात भरती झाले नव्हते, त्यांच्या मनात ते अपराधगंडही तयार करीत होते. भावनिक ब्लॅकमेलिंगच्या जवळ जाणारा असा तो संदेश होता. या सर्वात अंकल सॅमच्या पोस्टरचे आवाहन अधिक प्रबल होते. याचे कारण किचनर वा इटालियन पोस्टरमधील सनिकाप्रमाणे अंकल सॅम ही केवळ व्यक्ती नव्हती. ते राष्ट्राचे प्रतीक होते. प्रोपगंडामध्ये अशा चित्र-प्रतीकांना फार महत्त्व. या चित्र वा प्रतिमांना दोन अर्थ असतात एकमेकांत गुंतलेले. त्यातील भावार्थ महत्त्वाचा. तो येतो संस्कृतीतून, पूर्वग्रहांतून. प्रेक्षक जेव्हा ती प्रतिमा पाहात असतो तेव्हा त्याच्या नेणिवेतून तो प्रतिसाद देत असतो तो या भावार्थाला. अंकल सॅम पाहिल्यानंतर डोळ्यांसमोर तो ‘लिंकनसारखीच’ टोपी घातलेला दाढीवाला बाबा असतो आणि मन त्याचा संबंध तत्क्षणी अमेरिकेशी जोडत असतो. ती प्रतिमा मनातील राष्ट्रभावनेला साद घालत असते.
तशी राष्ट्र ही संकल्पना अमूर्तच. इतिहास, भूगोल, समाज, संस्कृती, परंपरा अशा विविध गोष्टींतून ती तयार होते. ती केवळ नकाशातून कशी प्रतीत होणार? राष्ट्र डोळ्यांसमोर मूर्त करायचे तर त्याची प्रतिमाच हवी. म्हणूनच अनेक देशांत राष्ट्राचे मानवीकरण करण्यात आल्याचे दिसते. अंकल सॅमपूर्वी अमेरिकेचे मानवीकरण दिसते ते एका स्त्रीप्रतिमेत. तिचे नाव होते कोलंबिया. हे अमेरिकेचे पूर्वीचे एक नाव. अमेरिकन काँग्रेसने एका फ्रेंच चित्रकाराकडून तिचे चित्र तयार करून घेतले. अनवाणी, माथ्यावर टोपी, अंगात सफेद गाऊन, कधी कधी हातात कॉर्नूकोपिया (म्हणजे बकऱ्याचे शिंग. हेसुद्धा पुन्हा प्रतीकच. धनधान्याच्या, फळाफुलांच्या मुबलकतेचे.) अशी ती सुंदर तरुणी. पहिल्या महायुद्धात अंकल सॅमप्रमाणेच सन्यभरती मोहिमेसाठी तिच्या चित्राचा वापर करण्यात आला होता. पुढे अंकल सॅम या पुरुष प्रतिमेने तिची जागा घेतली. जम्रेनिया, ब्रिटानिया, भारतमाता या अशाच काही राष्ट्रप्रतिमा. धार्मिक चिन्हे, शिल्पे, प्रतिमांप्रमाणेच हे. प्रचारात याचा मोठय़ा खुबीने उपयोग केला जातो. तेथे वापरले जाते प्रोपगंडातील ‘फॉल्स कनेक्शन’ – छद्मसंबंध – तंत्र. ‘ट्रान्सफर’ वा आरोपण हा त्याचा एक भाग. एखादी गोष्ट लोकांच्या गळी उतरवायची असेल, तर तिच्याशी या प्रतिमांमधून निर्माण होणारा भाव जोडायचा, त्यांतील प्रतिष्ठा, अधिकार, आदर आदी गोष्टींचे आरोपण त्यावर करायचे, असा हा प्रकार. हेच तंत्र जाहिरातींमध्ये सर्रास वापरले जाते. युद्धप्रचारासाठीच्या भित्तिपत्रकांतील त्या रोखलेल्या बोटामागे हेच छद्मसंबंधाचे तंत्र दिसते. ते रोखलेले बोट आपल्या मनाला हवे तसे वाकवू पाहात असते.
प्रोपगंडाचा तोच तर हेतू असतो..
रवि आमले
ravi.amale@expressindia.com