‘‘जर्मनीतले अराजक मी संपवले. तेथे सुव्यवस्था प्रस्थापित केली. आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रातील उत्पादकता प्रचंड प्रमाणात वाढवली.. आपल्या सर्वाच्या सहानुभूतीचा विषय असणाऱ्या त्या ७० लाख बेरोजगारांना उपयुक्त उत्पादकतेमध्ये गुंतविण्यात मी पूर्णत: यशस्वी झालो.. मी जर्मनीला केवळ राजकीयदृष्टय़ाच एक केले नाही, तर लष्करीदृष्टय़ा तिला बळही दिले..जर्मनीची हजारो वर्षांची ऐतिहासिक एकता मी पुन्हा प्रस्थापित केली आणि हे सगळे रक्ताचा एक थेंबही न सांडता, माझ्या लोकांना किंवा अन्य कुणालाही युद्धाची वेदना न देता मी हे सगळे साध्य केले..’’
२८ एप्रिल १९३९ रोजीच्या राईशस्टॅग भाषणात हिटलर हे म्हणाला आणि त्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला, कारण तोवर जर्मनीत एक ‘फ्युहरर प्रिंझिप’ – ‘हिटलर मिथक’ – पूर्णत: तयार झाले होते. त्याचे दैवीकरण झाले होते. हिटलरच्या त्या संपूर्ण भाषणात कुठेही ज्यूंवरील अत्याचारांचा उल्लेख नाही. तो ज्या आर्यवंशाचे कौतुक सांगत होता, त्या आर्यवंशाच्याच अनेक नागरिकांना त्यांच्यात केवळ आनुवंशिक आजार आहेत म्हणून पुढे मृत्यूच्या दाढेत लोटले जाणार होते, किंबहुना १९३३ मध्ये केलेल्या ‘आनुवंशिक आजारी व्यक्तींची संतती प्रतिबंधक कायद्या’ने अशा जर्मनांची सक्तीने नसबंदी सुरूही झाली होती, याचे संकेत नाहीत. अर्थव्यवस्था सुधारताना असंख्य सामान्यांचे जीवन कसे बरबाद झाले आहे याची दखल नाही; पण जर्मन नागरिक हिटलरच्या प्रेमात होते.
अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सव्र्हिसेस’साठी वॉल्टर लँगर यांनी तयार केलेल्या गोपनीय अहवालातून तेव्हाचा जर्मन समाज हिटलरकडे कसा पाहात होता, याची सखोल माहिती मिळते. हिटलर कसा मद्य-मांसाला शिवतही नाही. तो लैंगिक संबंधांपासून कसा लांबच राहतो. त्याला मुले कशी आवडत याच्या कहाण्या तेव्हा पद्धतशीरपणे लोकप्रिय करण्यात आल्या होत्या. तेव्हाच्या एका लेखकाने म्हटले होते, की खाण्यासाठी प्राण्यांची कत्तल व्हावी हा विचारही हिटलरला सहन होत नव्हता. म्हणून तो शाकाहारी होता. त्याच्या दयाळूपणाच्या तर अनेक कथा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. सामान्य नागरिकांनी त्याला गाऱ्हाणे घालायचे फक्त. लागलीच तो त्यांना मदत करतो, याची उदाहरणे लोकांसमोर ठेवली जात होती. अशाच कथा सांगितल्या जात होत्या त्या त्याच्या साधेपणाच्या, कामसूपणाच्या. लोकांना सांगितले जाई, की तो रोज १६ ते १८ तास काम करतो. आता सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे म्हणजे दैवी आक्रीतच. या अहवालात एका तरुण नाझीचे मत दिले आहे. तो म्हणतो, ‘‘मी हिटलरसाठी प्राणही देईन, पण त्याच्याऐवजी त्याच्या खुर्चीवर मी नाही बसणार. किमान रोज सकाळी उठल्यावर मी हेल हिटलर असे म्हणू शकतो, पण हा माणूस पाहा. आयुष्यात काहीही मौजमजा नाही. धूम्रपान नाही. मद्यपान नाही. बाई नाही. फक्त काम. रात्री झोपेपर्यंत फक्त काम.’’ लेख, बातम्या, पुस्तके, छायाचित्रे, भित्तिपत्रके आणि अर्थातच गावगप्पा अशा विविध माध्यमांतून हिटलरची अशी प्रत्यक्षाहून थोर प्रतिमा निर्माण करण्यात येत होती. चित्रपट या माध्यमाचाही त्यात खूपच मोठा वाटा होता.
नाझी काळात जर्मनीमध्ये एक हजार ९४ चित्रपट निर्माण झाले. त्या सगळ्यांतून नाझी विचारसरणीचाच प्रचार केला गेला; पण त्यांत पहिले स्थान द्यावे लागेल ते – ‘ट्रायम्फ डे विलेन्स’ला. हा १९३५ मधला माहितीपट. त्याचा विषय होता नाझी पक्षाचा १९३४ सालचा न्यूरेम्बर्ग मेळावा. दिग्दर्शिका होती लेनी रेफेन्स्थाल. या चित्रपटाचे एक वैशिष्टय़ म्हणजे यातील एकही प्रसंग बनावट नाही. प्रोपगंडा हा सत्याधारित असावा, असे एडवर्ड बर्नेज म्हणत. हे तत्त्व यात पाळलेले आहेच. मुद्दा असतो तो हाच की, हे सत्य कोणते आणि कोणाचे आणि किती? आपल्यासमोर अनेकदा आकडेवारी सादर केली जाते. आकडे खोटे बोलत नसतात; परंतु ते खरे तेच सांगतात असेही नसते. अनेकदा ते फुगविलेले असतात. अनेकदा त्यांच्या तुलनेत असे काही निवडक आकडे ठेवले जातात की, त्यामुळे या नव्या आकडय़ांतून दिसणारे वास्तवच बदलते. ‘ट्रायम्फ डे विलेन्स’मध्ये हेच करण्यात आले. तेथे वास्तवाचे दर्शन अशा कोनांतून घडविण्यात आले की, त्यातून एक नवेच ‘फेक’ वास्तव तयार झाले. लेनी रेफेन्स्थाल हिने चित्रपटनिर्मितीच्या नेहमीच्याच कॅमेरा मांडणी, हालचाली, संपादन आणि चित्रविलीनीकरण अशा तंत्रांतूनच हे साधले होते.
या चित्रपटाच्या प्रारंभी दिसते ते एक विमान. त्याच्या काचांतून दाट ढगांच्या टेकडय़ांनी भरलेले आकाश दिसत आहे. बऱ्याच वेळाने ढगांचा पडदा विरळ होऊ लागतो आणि दिसू लागतात न्यूरेम्बर्गमधल्या ऐतिहासिक इमारती. त्यांचे उंच उंच मनोरे. सरळसोट रस्ते आणि त्या शहरावरून सरकत जाणारी विमानाची सावली, एखाद्या गरुडासारखी. हा पक्षी नाझी सत्तेचे प्रतीक. आता रस्त्यावरून दिसताहेत सैनिकांच्या पलटणी. लांबच लांब, संचलन करीत चाललेल्या. शिस्तबद्ध. काही सेकंदांनी धावपट्टीवर ते विमान उतरू लागते. अनेक लोक तेथे जमले आहेत. सुंदर सुदृढ तरुण-तरुणी, गोंडस लहान मुले-मुली, चेहऱ्यांवर आनंद फुललेला. एक हात उंचावलेला, नाझी सलाम करणारा. आलटूनपालटून आपल्याला दिसते ते विमान आणि गर्दीतील चेहरे. आता ते क्लोजअपमध्ये आहेत. एका क्षणी विमान थांबते आणि त्यातून उतरतो हिटलर. त्याचे दर्शन घडवताच कॅमेरा पुन्हा दूरवर जातो. त्याची एक झलक पाहण्यास आतुर झालेल्या महिला दिसतात आता. त्याचा जयजयकार करत आहेत त्या. मग काही क्षण हिटलरचा छान हसरा चेहरा पडद्यावर थांबून राहतो. काही क्षणच. त्यानंतर दिसतो तो हिटलरच्या गाडय़ांचा काफिला. दुतर्फा ही गर्दी आहे. आनंदाने बेभान लोक त्याचे स्वागत करताहेत. संपूर्ण शहरभर हेच चित्र आहे. नाझी सलाम करणारी उत्तेजित गर्दी आणि ते स्वागत स्वीकारत चाललेला, पडदाभर व्यापलेला पाठमोरा हिटलर.. असे अनेक प्रसंग.
केन केल्मन हे विश्लेषक सांगतात, की यात काही मूलभूत प्रतिमा वा अभिकल्प यांचा पद्धतशीर वापर करण्यात आला आहे. प्राचीन वास्तू, पुतळे, आकाश, ढग, स्वस्तिक, संचलन, गर्दी या गोष्टींतून एका धर्मसांस्कृतिक प्रतिमासृष्टीशी हिटलरला जोडण्यात आले आहे. ते थेट दिसणार नाही. परंतु त्यातून जर्मन जनतेच्या मनावर उमटविले जाणारे चित्र असे होते – ऐतिहासिक न्यूरेम्बर्गला प्रज्वलित करण्यासाठी, जर्मन लोकांमधील ऊर्जा, त्यांचे आत्मबल तेजाळण्यासाठी उंच आकाशातून, काळ्या ढगांतून हाती प्राचीन अग्नी घेऊन हिटलर आला आहे. लेनी रेफेन्स्थाल हिने यात भ्रमनिर्मितीचे कॅमेरातंत्र वापरले होते. केल्मन सांगतात, की वस्तुस्थितीचे काही महत्त्वाचे भाग कॅमेऱ्याच्या फ्रेमबाहेर ठेवून, म्हणजे उदाहरणार्थ लोकांचे वा वास्तूंचे भाग दाखवायचे ते वरचेच. जणू काही त्यांच्याखाली काही नाहीच. इमारतींचे नाते जमिनीशी नाही, तर आकाशाशी आहे. जणू ते तरंगते महालच. अशा तंत्रातून त्या सर्व गोष्टींना एक आध्यात्मिक परिणाम देण्यात येत होता. चित्रचौकटींच्या संपादनातून, खटकन् दृश्यांचे कोन बदलणे, क्षणात क्लोजअपवरून लाँग शॉटकडे जायचे अशा गोष्टींतून प्रेक्षकांना भ्रमित करण्यात येत होते. यात लोकांची गर्दी, चेहरे दाखविले की सहसा लगेच चित्रविलीनीकरण होते नि समोर येते महाप्रचंड स्वस्तिक वा गरुड. जणू तोच लोकांचा आत्मा आहे. लोक त्यातच मिसळून जात आहेत. ती गर्दी, ते लोक, ते रस्ते, इमारती हे सारे बदलते आहे; पण टिकून राहणारे आहे ते नाझी स्वस्तिक, गरुड आणि अर्थातच हिटलर. अशा प्रकारच्या चित्रमांडणीतून प्रेक्षकांच्या नेणिवेला भिडण्याचा प्रयत्न केला जात होता. ‘प्रोपगंडा अँड द नाझी वॉर फिल्म’चे लेखक सिगफ्रिड क्रॉकोर युद्धप्रोपगंडापटांबद्दल म्हणतात की, ‘त्यांचा हेतू माहिती द्यावी हा नव्हे, तर लोकांना प्रभावित करणे हा होता.’ ‘ट्रायम्फ डे विलेन्स’मधूनही हेच साधण्यात आले होते.
त्या मेळाव्यात रुडॉल्फ हेस याने घोषणा केली होती की, ‘पक्ष म्हणजेच हिटलर. हिटलर म्हणजेच जर्मनी आणि जर्मनी म्हणजेच हिटलर.’ ‘ट्रायम्फ डे विलेन्स’ने ते किती खरे आहे हेच प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. हिटलरचा दैवी अवतार उभा केला. जसा अन्य चित्रपटांतून ज्यूंचा राक्षसी अवतार उभा करण्यात आला होता..
रवि आमले
ravi.amale@expressindia.com