पृथ्वीवरील मानवी व अमानवी जीवनाचे स्वास्थ्य व भरभराट यांना मौल्यवान महत्त्व आहे. जीवनाची समृद्धी व वैविध्य हीही मूलत: मूल्येच आहेत. महत्त्वाच्या गरजा भागवण्याखेरीज माणसांना हे वैविध्य व समृद्धी कमी करण्याचा काहीही हक्क नाही.

विसावे शतक जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून नोंदवले जाईल. या शतकात दोन महायुद्धे, अणुस्फोट यांसह इतरही अनेक घटना-घडामोडी घडल्या आणि पर्यावरण, हवामानबदल, गर्भपात, दहशतवाद आदी प्रश्न निर्माण झाले. प्रस्तुत पुस्तकात प्रिन्स्टन विद्यापीठाचे प्रमुख पीटर सिंगर यांनी या प्रश्नासह समानता व त्याचा अर्थ, श्रीमंत व गरीब, सविनय कायदेभंग, हिंसा, नीतिशास्त्र, नीतिमत्ता यासंबंधी विवेचन व विश्लेषण केले आहे.  ‘बट्र्राड रसेलनंतरचा मूलगामी  तत्त्वज्ञ’, असे वॉल स्ट्रीट जर्नल म्हणते, तर २००५ मध्ये ‘टाइम’ने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला आहे.
१९८० मध्ये प्रस्तुत पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्र्झलडमध्ये मोठय़ा प्रमाणात सिंगर यांचा निषेध करून त्यांच्या या पुस्तकाविषयी नापसंती व्यक्त करण्यात आली. त्यांना धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे सिंगर वादग्रस्त लेखक ठरले. प्रस्तुत पुस्तकाची तिसरी दक्षिण आशियायी आवृत्ती २०११ मध्ये प्रकाशित झाली. त्यात प्रत्येक प्रकरणात नवीन माहिती, वेगवेगळे विवेचन केले आहे. एकूण १२ प्रकरणांत वरील प्रश्नांची मांडणी करून विश्लेषण केले आहे.
लिंगभावनेसंबंधी बंधने म्हणजे नीतिशास्त्र नव्हे कारण धार्मिक नेतेही जगातील दारिद्रय़, हवामानासंबंधी विचार व्यक्त करू लागले आहेत आणि प्रच्छन्न, चोरटे संबंध व अश्लील वाङ्मयासंबंधी ते आता कमी बोलू लागले आहेत. नीतिशास्त्र म्हणजे तत्त्वत: अतिशय उदात्त व व्यवहारात निरुपयोगी अशी आदर्श व्यवस्था नव्हे. नीतिशास्त्र धर्मावर आधारित नाही. इम्मान्युएल कांट यांनी स्वहित प्रेरणेने नैतिक कायद्याचे पालन करणाऱ्यांच्या वृत्तीचा तिरस्कार केला. ते म्हणत, कायद्याचे पालन केवळ त्यांच्यासाठीच करायला हवे. नैतिकतेच्या मुळांचा विचार आपल्याला परमेश्वर व निसर्ग यांच्यापासून मुक्त करतो. आपल्या पूर्वजांपासून नैतिक अंत:स्फूर्तीचा एक संच आपण वारसा म्हणून घेतला आहे.
समानता व त्यातील मथितार्थ यासंबंधी लिहिताना लेखकाने दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या नैतिक दृष्टिकोनात बदललेल्या बाबींचा विचार करताना गर्भपात, विवाहबाह्य़ लैंगिक संबंध, समलिंगी संबंध, अश्लील वाङ्मय, आत्महत्या आणि सुखाचे मरण यासंबंधी विवेचन केले आहे. वांशिक विषमतेसंबंधी वृत्ती-प्रवृत्तीत झालेले बदल काही अचानक झालेले नाहीत. विसाव्या शतकाप्रारंभीची वांशिक गृहीतके संपूर्णतया नाकारली गेली आहेत. अनेक तत्त्ववेत्त्यांनी हितसंबंधांचा समान विचार करण्यासंबंधी भूमिका मांडली आहे, नैतिकतेचा पाया म्हणून तिचा प्रसार केला आहे. पण फार थोडय़ांनी हे तत्त्व आपल्या प्रजातीच्या पलीकडे स्वीकारले आहे. दु:ख व यातना या वाईटच आहेत आणि वंश, स्त्री-पुरुष अथवा सजाती निरपेक्ष दु:ख व यातना यांचा प्रतिबंध व्हायला हवा वा त्या खूप कमी व्हायला हव्यात. जीवनाचे मूल्य हा मोठय़ा प्रमाणावर नैतिक प्रश्न आहे. दुसऱ्याला ठार मारणे, आत्महत्या, भ्रूणहत्या, गर्भहत्या आणि मानवी हत्या यासंबंधी अनेक अंगांनी विस्ताराने विवेचन केले आहे. जीवनाच्या नीतिशास्त्राच्या पारंपरिक पावित्र्यापासून दूर जाणे म्हणजे अवांछित परिणामांचा धोका स्वीकारणे होय असे सिंगर यांचे प्रतिपादन आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक नीतिशास्त्र निर्माण करण्याच्या इजा, त्रासासंबंधी समतोल भूमिका घेतली पाहिजे. ते कायमचे थांबवण्यासाठी उपाययोजना करायला हवी.
विसाव्या शतकाच्या अखेरीस जागतिक बँकेने कमालीच्या दारिद्रय़ात जीवन कंठणाऱ्या ६० हजार स्त्री-पुरुषांची मते, दृष्टिकोन नोंदवण्यासाठी एक शोधपथक पाठवले होते. ७३ देशांत हिंडल्यानंतर शोधपथकाची निरीक्षणे होती- वर्षांतील १२ महिने वा काही महिने ही माणसे अगदी थोडे जेवतात. पैसे वाचवत नाहीत. मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत. पाठवलीच तर पुन्हा त्यांना शाळेतून काढावे लागते. अस्थिर निवाऱ्यात राहावे लागते. फक्त उकळलेले पाणीच प्यावे लागते. या भौतिक कमतरतेबरोबरच कमालीची  भेदभावाची अपमानित अवस्था आणि अपयशाची खोल, तीव्र जाणीव बऱ्याच वेळा सहन करावी लागते.
हवामानबदल  प्रश्नासंबंधी विवेचन करताना लेखकाने हवामानबदलाचे जगभर कोणते भीषण, भयानक, भीतिदायक परिणाम होणार आहेत याची सविस्तर माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २००४ मध्ये पृथ्वीवरील तापमान वाढल्यामुळे १ लक्ष ४० हजार अधिक मृत्यू झाले. १९६१ ते १९९० या काळात सरासरी जागतिक तापमान राहिल्यामुळे मृत्यू प्रमाण खूपच कमी होते. हवामानबदलामुळे मलेरिया, डेंग्यू आणि अतिसार यांच्यामुळे झालेल्या मृत्यूंत संख्येची भर पडली. शुद्ध पाण्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे हे रोग उद्भवतात. अधिक उष्ण तापमान अथवा कमी पर्जन्यमान यामुळे कमी पिकामुळे कुपोषणाने अधिक मृत्यू घडले.
निसर्गासंबंधी पाश्चिमात्यांचा दृष्टिकोन हिब्रू व ग्रीक परंपरेच्या मिलाफातून तयार झाला आहे. या दोन्ही परंपरा माणसांना नैतिक विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवतात व जगाच्या नैसर्गिकदृष्टय़ा लक्षणीय वैशिष्टय़ांचे विश्व त्या परंपरा व्यापून टाकतात. पृथ्वीवरील मानवी व अमानवी जीवनाचे स्वास्थ्य व भरभराट यांना मूलत: मौल्यवान महत्त्व आहे. जीवनाची समृद्धी व वैविध्य हीही मूलत: मूल्येच आहेत. महत्त्वाच्या गरजा भागवण्याखेरीज माणसांना हे वैविध्य व समृद्धी कमी करण्याचा काहीही हक्क नाही, असे लेखकाने पर्यावरणासंबंधी विवेचन करताना म्हटले आहे. सविनय कायदेभंग, हिंसा आणि दहशतवाद याचे विवेचन, विश्लेषण, वेगळ्या प्रकरणात केले आहे. नैतिक कृती का बाणवायची यासंबंधी शेवटच्या प्रकरणात प्रतिपादन केले आहे.
तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, पर्यावरण अभ्यासकांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.

प्रॅक्टिकल इथिक्स : पीटर सिंगर,
केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली,
पाने : ३३७, किंमत : ४४५ रुपये.

Story img Loader