धार्मिक परंपरा आणि आधुनिक कायदे यांतील द्वंद्व नवे नाही. सती प्रथेपासून, शारदा (सारडा) कायदा ते हिंदू कोड बिल ते जादूटोणाविरोधी कायद्यापर्यंत अनेक प्रसंगी, अनेक परंपरांच्या संदर्भात आपण हा संघर्ष पाहिला आहे. वस्तुत: धर्म हे काही साचलेल्या पाण्याचे डबके नसते. समाजाची धारणा करणारा धर्म हा नेहमीच प्रवाही असतो, परंतु याचे भान स्वत:स धार्मिक म्हणवून घेणाऱ्यांना असतेच असे नाही. त्यातून धर्म टिकवणे म्हणजे धर्मातील सगळ्याच प्रथा-परंपरांना – मग त्या कालबाहय़, टाकाऊ असल्या तरी – टिकवणे असा त्यांचा समज झालेला असतो. या भंपक प्रथा-परंपरा टिकवल्या नाहीत तर आपली संस्कृती, आपला धर्म लयाला जाईल, असा भयगंड बाळगणाऱ्यांची कमतरता आपल्याकडे नाही. अलीकडे तर अशा सनातन्यांचे पेवच फुटले आहे. त्या पेवात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचाही समावेश असावा, ही मात्र खेदाची गोष्ट. सांगली जिल्हय़ातील बत्तीस शिराळा येथील जिवंत नागांच्या पूजेची परंपरा पूर्ववत सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची घोषणा करून त्यांनी आपली परंपराशरणता तर दाखवून दिलीच, पण पर्यावरणमंत्री झाले म्हणून त्यांना पर्यावरणातले समजतेच असे नाही, हेही त्यांनी दाखवून दिले. एवढेच नाही, तर ते ज्या हिंदुत्वाचा वारसा सांगतात त्या हिंदुत्वाचे हिंदूंच्या आध्यात्मिक-वैचारिक प्रवाहांशी काडीमात्र नाते नाही हेही त्यांनी या घोषणेतून स्पष्ट केले आहे. अर्थात हा वैचारिक गोंधळ हीच आपली परंपरा बनलेली आहे. त्यामुळे एकीकडे गाईला देवता मानत गोवंश हत्येला बंदी घालायची आणि त्याच वेळी बल हा घोडय़ासारखा धावणारा प्राणी नसतानाही त्यांच्या शर्यती लावून आपल्या क्रौर्याचा तमाशा दाखवायचा हे आपण करतोच. हीच गोष्ट नागांबाबतची. त्यांना देवता मानायचे आणि एक तर दिसला साप की मार असे करायचे किंवा मग परंपरेच्या नावाने त्यांचे हाल हाल करायचे हे आपण करतो. हे आपल्याकडेच घडते आहे असे नाही. इटलीतील सापांचा उत्सव तर प्रसिद्ध आहे. अमेरिकेत टेक्सासमध्येही दोन वर्षांपासून असा रॅटलस्नेक उत्सव सुरू झाला आहे. पण टेक्सासमधील त्या उत्सवाचा हेतू रॅटलस्नेकना संरक्षण देणे हा आहे. शिराळ्यातील नागपंचमीत मोठय़ा श्रद्धेने आपण नागांचे हाल करतो. दिवसभर त्या नागांना दूध पाजण्याचे नाटक केले जाते. त्यांना हळद-कुंकू वाहिले जाते. त्यातील अनेक नाग नंतर अतिश्रमाने तरी मरतात किंवा त्या हळदी-कुंकवाने न्यूमोनिया होऊन तरी. म्हणून उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली, तर पर्यावरणमंत्री ती उठवण्यास निघाले आहेत. नागपंचमी, बलपोळा, वसूबारस, वटपूजा अशा आपल्या सणांमागे खरोखरच अत्यंत उदात्त असा कृतज्ञतेचा, भूतदयेचा, पर्यावरण संवर्धनाचा विचार आहे. साप, नाग हे शेतकऱ्यांचे मित्र असतात हा धडा तर आपण शाळेतही शिकलो आहोत, परंतु शिराळ्यातील परंपरेचे कुंकू लावून फिरणारांची शाळा वेगळी असावी. त्यामुळे त्यांना त्या उत्सवी विकृतीऐवजी केवळ बाजारपेठ तेवढी दिसत असावी. पण जावडेकर हे पर्यावरणमंत्री असल्याने निदान त्यांनी तरी आपले विद्यालय याहून भिन्न आहे हे दाखवून द्यावे. किमान खरा तो एकचि धर्म टिकवण्यासाठी तरी अशा क्रूर रूढी-परंपरांची घाण दूर करण्यासाठी त्यांनी हातभार लावावा. त्यातूनही पर्यावरण संरक्षणाचे बरेच काम होईल.

Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Amethi MP and Congress leader Kishori Lal Sharma statement regarding the BJP government in Maharashtra
किशोरी लाल शर्मांनी सांगितले स्मृती इराणींकडून राहूल गांधींच्या पराभवाची कारणे?
uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
readers feedback on loksatta editorial readers reaction
लोकमानस : लोकशाहीविरोधी मानसिकतेला धडा
Viral My Lords A Social Media Panchnama of Court Behaviour
व्हायरल माय लॉर्डस : न्यायालयातील वर्तनाचा समाजमाध्यमी पंचनामा
Loksatta kutuhal Advantages and disadvantages of large language formats
कुतूहल: विशाल भाषा प्रारूपांचे फायदे आणि तोटे
Babasaheb Ambedkar, Shyam Manav,
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पुत्र आणि ते…