पत्रकारितेच्या विश्वासार्हतेने अमेरिकेत आजपर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे, असे ताज्या जनमत चाचणीत सिद्ध झाले. आपल्याकडे पत्रकारितेवरील अविश्वासाच्या रोगाची अमेरिकेप्रमाणे ‘पॅथॉलॉजिकल टेस्ट’  झाली नसली तरी या रोगाची लक्षणे उघडपणे दिसत आहेत..
विश्वास हा एखाद्या काचेसारखा असतो; एकदा तडा गेला की तो पुन्हा सांधता येत नाही असे म्हणतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात हे इतके साधे सूत्र कितपत टिकते आहे, हे सांगणे अवघड आहे.
प्रत्यक्ष जगण्यामध्ये विश्वास-अविश्वासाची प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची असते. अनेक घटकांवर आणि संदर्भावर ती अवलंबून असते. व्यक्तीप्रमाणेच व्यवसाय आणि व्यवस्थांवरील विश्वासाबाबतही ते खरे आहे. अर्थातच, एक व्यवसाय आणि व्यवस्था म्हणून पत्रकारितेलाही ते लागू होते. पण पत्रकारितेबद्दल वाटणारा विश्वास वा अविश्वास ही केवळ गुंतागुंतीचीच प्रक्रिया आहे असे नाही तर ती समाजासाठी महत्त्वाचीही प्रक्रिया आहे. कारण व्यक्ती आणि समाजाची अनेक मते आणि निर्णय अनेकदा या विश्वासावर अवलंबून असतात. लोकशाहीवादी देशात तर लोकशाहीच्या भविष्याचाही संबंध लोकांना पत्रकारितेविषयी वाटणाऱ्या विश्वास वा अविश्वासाशी लावता येतो. कायदे करणारी संसद, त्यांची अंमलबजावणी करणारी नोकरशाही आणि कायद्याचे रक्षण करणारी- अर्थ लावणारी न्यायपालिका या लोकशाहीतील तीन स्तंभांबद्दलची मते बनविताना लोक बऱ्याच अंशी पत्रकारितेवरच अवलंबून असतात. म्हणून पत्रकारितेविषयी लोकांना वाटणारा विश्वास हा लोकशाहीतील एक महत्त्वाचा घटक असतो.   
म्हणूनही असेल कदाचित पण अमेरिकेत लोकांना एकूण पत्रकारितेबद्दल कितपत विश्वास वाटतो आणि प्रमुख वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांबद्दल किती विश्वास वाटतो याबद्दल सतत सर्वेक्षणे होतात, जनमत अजमावले जाते. गॅलप पोल, प्यू रिसर्च सेंटर, शिकागो विद्यापीठाचे जनमत संशोधन केंद्र अशा अनेक संस्थातर्फे गेली अनेक वष्रे असे जनमत सर्वेक्षण केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यातून एक गोष्ट प्रकर्षांने समोर येत आहे. ती म्हणजे लोकांचा पत्रकारितेवरचा सतत उडत चाललेला विश्वास. अगदी गेल्याच महिन्यात करण्यात आलेल्या गॅलप सर्वेक्षणामध्ये तर ६० टक्केअमेरिकी लोक वृत्तमाध्यमांमधील बातम्यांवर फारसा वा अजिबात विश्वास ठेवत नाहीत, असे दिसून आले आहे. फारसा किंवा अजिबात विश्वास नाही असे म्हणणाऱ्यांचे हे आतापर्यंतचे सर्वात जास्त प्रमाण. याचाच सोपा अर्थ असा की पत्रकारितेच्या विश्वासार्हतेने आजपर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे. ही अर्थातच चिंतेची बाब आहे. विशेषत: अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना आणि त्याबद्दल वृत्तमाध्यमांतून भरभरून लिहिले आणि दाखविले जात असताना असे निष्कर्ष हाती येणे तर अधिकच चिंताजनक आहे. १९७० च्या आसपास ही सर्वेक्षणे सुरू झाली तेव्हा ७० टक्के लोकांच्या मनातील पत्रकारितेविषयीच्या भावना सकारात्मक होत्या. हा विश्वास ९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत टिकला. पण नंतर फक्त ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतरच्या एखाद्या वर्षांचा अपवाद सोडल्यास तो सतत घसरत आहे. आणि आज ४० टक्क्यांवर आलाय. पण याच काळात लष्कर, अमेरिकी काँग्रेस, धर्म, शिक्षण अशा व्यवस्थांबद्दल लोकांना वाटणारा विश्वास मात्र बऱ्यापकी स्थिर राहिला आहे. पत्रकारितेसाठी तर ही विशेष चिंतेची बाब आहे. पत्रकारितेविषयीच्या या अविश्वासामागचे एक प्रमुख कारण लोकांना ती बाहेरच्या प्रभावघटकांपासून मुक्त वाटत नाही असे आहे, असेही याआधीच्या एका संशोधनात आढळून आले होते. सत्तर टक्के लोकांना पत्रकारितेवर सरकारचा आणि बडय़ा उद्योगांचा प्रभाव आहे तर ६५ टक्केंना, जाहिरातदार व कामगार संघटनांचा प्रभाव आहे असे वाटते, असेही त्यात म्हटले होते.
जनमत चाचण्यांमधील त्रुटी, जनमतावर पडणारे नजीकच्या भूतकाळातील घटनांचे तात्कालिक परिणाम आणि एकूणच लोकशाहीव्यवस्थांमध्ये लोकांचा मत व्यक्त करण्यातील चिकित्सक मोकळेपणा अशा काही घटकांमुळे जनमत चाचण्यांमधून पत्रकारितेविषयी अविश्वास जास्त व्यक्त होणे स्वाभाविक आहे असेही काहींचे म्हणणे आहे. ते खरे मानले तरी विश्वासाची सतत घटत चाललेली पातळी म्हणजे पत्रकारिता एका क्रेडिबिलिटी क्रायसिसमधून जात असल्याचेच चिन्ह आहे, यावर मात्र बहुतेकांचे एकमत होते. केवळ जनमत चाचण्याच कशाला अमेरिकेतील वृत्तपत्रांचा वेगाने घटणारा खप आणि तरुण वाचकांनी त्याकडे फिरविलेली पाठ या गोष्टीदेखील या क्रायसिसवर शिक्कामोर्तब करतात असेही म्हटले जाते. विश्वासार्हतेच्या या समस्येमुळे पत्रकारिता ही जनहितासाठी वॉचडॉगचे किंवा जागल्याचे काम करणारी व्यवस्था आहे हेही लोक नाकारू लागतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्या एका संशोधनामध्ये वाढती स्पर्धा, वाढते व्यापारीकरण, नकारात्मक बातमीदारी, माहितीरंजन (इन्फोटेन्मेन्ट) यामुळे लोकशाहीवादी देशांमध्ये पत्रकारितेवरचा लोकांचा विश्वास कमी होत जातो असे दिसून आले आहे. आणि पत्रकारितेतील माहितीची खातरजमा करू पाहणारी, त्याबद्दल खुली मते व्यक्त करणारी अनेक पर्यायी व्यासपीठे इंटरनेटवर निर्माण झाल्याने तर पत्रकारितेविषयीच्या अविश्वासामध्ये अजूनच भर पडत असल्याचे चित्र सध्या उभे राहिले आहे.
 हे सारे संशोधन अमेरिका आणि मुख्यत्वे पाश्चात्त्य पत्रकारितेसंदर्भात आहे. पण वरील वर्णनातील अमेरिका शब्द काढून त्याऐवजी भारत शब्द टाकला तरी फार मोठा फरक पडणार नाही असे मानायला जागा आहे. आपल्याकडे प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेविषयी इतक्या सातत्याने सर्वेक्षणे झालेली नाहीत. त्यामुळे नेमक्या टक्केवारी वगरे संशोधनात्मक निष्कर्षांच्या बाबतीत आपली स्थिती झाकली मूठ सव्वा लाखाची अशी आहे. पण या वर्णनातील विश्वासार्हतेसंबंधीचे टप्पे, घटत्या विश्वासाविषयीची दिली जाणारी कारणे, त्याचे काही परिणाम आपल्याकडेही कमी-अधिक प्रमाणात लागू होऊ शकतात. ‘पेपरामध्ये छापून आलं म्हणजे खरंच असणार’ अशी मानसिकता आपल्याकडे पूर्वी खूप आढळायची. तोही एक भाबडेपणाच होता. पण निदान पत्रकारितेविषयी असणारा एक विश्वास त्यातून प्रकट व्हायचा. आज वृत्तमाध्यमांना अशी सर्रास विश्वासार्हता मिळणे फारच अवघड आहे. किंबहुना विविध सार्वजनिक व्यासपीठांवर आणि खासगी चर्चामध्ये पत्रकारितेवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचे आणि होणाऱ्या टीकेचे स्वरूप खरे तर अधिकाधिक तीव्रच होत चालले आहे. अविश्वासाच्या भावनेतून पत्रकारितेवर रोष व्यक्त होण्याचे प्रमाणही खूप आहे. अविश्वासामुळे अमेरिकेतल्याप्रमाणे आपल्याकडची पत्रकारिता क्रेडिबिलिटी क्रायसिसमधून जात आहे की नाही याबद्दल काहीएक वस्तुनिष्ठ विधान करता येणार नाही कारण त्यासाठी आवश्यक असे संशोधनाचे पाठबळ आज आपल्याकडे नाही. पण प्रत्यक्षात पत्रकारिता तशी असली किंवा नसली तरी जनमानसाच्या भावना अविश्वासाकडे झुकणाऱ्या आहेत हे दाखविणारी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसून येत असतात.
चित्रपटांमधून समाजमनातील अनेक अबोध भावनांचे, स्पप्नांचे, भीतींचे आणि अपेक्षांचे प्रतििबब उमटत असते असे म्हणतात. या चष्म्यातून चित्रपटांकडे पाहिले तर गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांमधून वृत्तमाध्यमांचे विशेषत टीव्ही वाहिन्यांच्या पत्रकारितेचे जे चित्रण झाले ते काही फार आश्वासक नाही असेच म्हणावे लागते. खरे तर गेल्या काही वर्षांपासून कथानकाचा मुख्य किंवा पूरक भाग म्हणून चित्रपटांमधून पत्रकारितेचे चित्रण होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पण ‘नो वन किल्ड जेसिका’सारख्या मोजक्या चित्रपटांचे अपवाद वगळले तर बहुतेक चित्रपटांमधून पत्रकारितेचे जे चित्रण आढळते ते ढोबळमानाने ‘पीपली लाइव्ह’च्याच अंगाने जाणारे आहे. सत्तरीच्या दशकातील सिंहासनामधून दिसणारे पत्रकार आणि पत्रकारितेचे स्वरूप आणि आताच्या ‘पीपली लाइव्ह’मधून दिसणारे स्वरूप पत्रकारितेतील हेच स्थित्यंतर दर्शविते. गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेची चिकित्सा करणारी, त्यातील कच्चे दुवे, त्रुटी, चुका दाखवून देणारी दहूट (thehoot.) किंवा न्यूजलाँड्री  सारखी संकेतस्थळेही लोकप्रिय झाली आहेत. पेड न्यूज, नीरा राडिया प्रकरण, कॅश फॉर व्होट प्रकरण, अनेक प्रकारची स्टिंग ऑपरेशन्स यांच्यामुळेही पत्रकारितेच्या विश्वासार्हतेपुढे अनेक वेळा प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. त्याबद्दल भरपूर चर्चाही झाली आहे. अशा काही प्रकरणापायी साऱ्या पत्रकारितेला वेठीला धरता येणार नाही. निष्ठेने, कसोशीने काम करणारे, विश्वासार्हतेच्या कसोटय़ांवर खरे उतरणारे पत्रकार आणि पत्रकारिता आजही आहेत हेही मान्य करता येईल. पण म्हणून विश्वासार्हता घटत चालली असल्याच्या या खुणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल. अविश्वासाच्या रोगाची अमेरिकेप्रमाणे पॅथॉलॉजिकल टेस्ट झाली नसली तरी या रोगाची अनेक लक्षणे उघडपणे दिसत आहेत. त्यामुळे या काचेला तडा जाण्याच्या आधीच सावरले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा