विक्रम गोखले यांनी (लोकसत्ता १४ फेब्रुवारी) काश्मिरी जनतेबाबत व्यक्त केलेला कळवळा आणि अब्दुल्ला घराण्याविषयीची त्यांची आगपाखड या दोन्ही प्रतिक्रिया म्हणजे ऐतिहासिक अर्धसत्य आहे. श्री. गोखले आपल्या पत्रातून असं सुचवू पाहत आहेत की, काश्मिरी जनतेला रोजीरोटीची खरी भ्रांत आहे आणि ती पुरविण्यात अब्दुल्ला घराणं सत्तेच्या लालसेपायी सतत अपयशी ठरत आलं आहे. म्हणून काश्मिरी लोक अब्दुल्ला घराण्याच्या नावाने खडे फोडत आहेत.
हे अर्धसत्य अशासाठी की, लोक अब्दुल्ला घराण्याच्या विरोधात बोलतात हे खरे आहे; पण त्याचे कारण नुसते रोजीरोटी हे नाही. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून अब्दुल्ला घराण्याने काळाच्या ओघात काश्मीरचे वेगळेपण घालवले, ही भावना खोऱ्यात प्रबळ आहे. या भावनेला आपण इतर भारतीय ‘फुटीरतावादी’ म्हणतो.
नेमकी येथेच सारी गोम आहे.
महाराजा हरीसिंग, शेख अब्दुल्ला आणि काश्मिरी जनता या सर्वाना आपले वेगळेपण टिकवण्याची आकांक्षा होती. मात्र पाकने हल्ला केल्यामुळे एका विशिष्ट परिस्थितीत काश्मीर भारतात विलीन झाले. पण असे करताना भारतीय राज्यघटनेत घालण्यात आलेले ३७०वे कलम ही भारतीय संघराज्यात आपले वेगळेपण टिकून राहण्याची ग्वाही आहे, असे महाराजा, अब्दुल्ला व जनताही मानत होती. उलट काळाच्या ओघात काश्मीर हे इतर संस्थानांप्रमाणे प्रू्णत: विलीन होईल, असे भारतीय नेते आणि जनता मानत होती. ही जी मूलभूत विसंगती व विसंवाद गेली ६५ वष्रे आहे, तोच या प्रश्नाच्या मुळाशी आहे.
म्हणूनच १९७७ साली इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत करार होऊन शेख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता झाल्यावर त्यांना काश्मिरी जनतेचा उत्स्फ्रू्त पािठबा मिळाला आणि पुढे फारुख अब्दुल्ला यांचे सरकार प्रथम बरखास्त करण्यात आले आणि नंतर दिल्लीतील सत्तधाऱ्यांच्या कलाने वागायची तयारी दाखवल्यावर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर काश्मीरमधील दहशतवादाची सुरुवात झली आहे.
म्हणूनच काश्मीरचा प्रश्न सोडवायचा असल्यास हेच वेगळेपण टिकवण्याची खरी हमी द्यावी लागेल आणि ती प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठीही ठोस पावले टाकावी लागतील.
हे करण्यासाठी भारतीय जनतेला विश्वासात घेऊन देशहितासाठी याची असलेली गरज पटवून द्यावी वागेल. तसे झाल्यासच पाकिस्तानला खरा शह बसेल, त्यासाठी दूरदृष्टीचे व जनमनात स्थान असलेले नेतृत्व हवे. ते आज तरी राजकीय क्षितिजावर दिसत नाही.
अर्थात श्री. गोखले यांच्यासारखे बुद्धिवंत त्यांना खरोखरच देशहिताची कळकळ असेल, तर हे करू शकतात. पण ते जी विचारसरणी मानतात, तिला भारताचे बहुसांस्कृतिकत्वच मान्य नाही. आपापले वेगळेपण टिकवूनही एकत्र राहता येते आणि देश समर्थ बनवता येतो, हे मान्य नसल्यामुळेच एकसाची सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला जातो.
अशा परिस्थितीत काश्मीरची जखम भळभळतच राहणार आहे आणि श्री. गोखले यांच्यासारखे बुद्धिवंत काश्मिरी जनतेच्या नावाने नक्राश्रूही ढाळत राहणार आहेत.
– प्रकाश बाळ, ठाणे.
शिक्षकांची जबाबदारी वाढली, पण-
‘मुले कशी शिकतील’ या नंदकुमार यांच्या लेखात (१४ फेब्रु.) शिक्षणाच्या एका मुख्य पलूकडे लक्ष केंद्रित केले आहे. ‘मुलांना शिकवायचे’ ऐवजी ‘मुलांनी शिकायचे’ या आधारावर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ने ज्ञानरचनावाद स्वीकारला. म्हणजे सरळ सरळ माहितीचा खजिना मुलांना न देता, त्यांना स्वत: ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशील करणे, बुद्धीचा वापर करून स्वत: ज्ञान शोधणे. पण काय केल्याने मुलांना ज्ञानाची तहान लागेल, हा लेखात मांडलेला प्रश्न फार महत्त्वाचा आहे.
एवढे मात्र नक्की, फक्त पुस्तकांवर आधारित शिक्षणपद्धती वापरून ते शक्य नाही. गणिताची सूत्रे किंवा विज्ञानाचे धडे बघून ज्ञानाचे ओझेच वाटते. बाहेरच्या जगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय जिज्ञासा जागृत करणे कठीण आहे. पण अशा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणपद्धती पूर्णपणे वेगळी असावी लागेल. तरीही राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये या दृष्टीने शिक्षकांसाठी भरपूर सूचना व पद्धती दिलेल्या आहेत. म्हणजे कृतींचा वापर करून व मुलांना प्रश्न विचारून त्यांना विचार करण्यास उद्युक्त कसे करता येईल हे चांगल्या प्रकारे समजावले आहे. यात शिक्षकांची जबाबदारी नक्कीच वाढते.
पण वस्तुस्थिती सर्वाना माहितीच आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘प्रथम’च्या ‘असर’ या अहवालानुसार देशातील पाचवीतल्या अध्र्याहून अधिक (५३.२%) मुलांना वाचता येत नाही. जर शिक्षक या पायाभूत पातळीवरसुद्धा अपुरे पडत असतील तर फक्तनवीन पद्धती काढून किंवा नवीन दृष्टिकोन देऊन काय उपयोग? ‘मुले भराभरा शिकली तर मला आनंद होतो,’ असे आजचे शिक्षक खरेच म्हणतात का?
उत्तरे नक्कीच सोपी नाहीत. पण शिक्षणात आज खरंच खूप मोठा बदल (रिफॉर्म) हवा आहे. तो होईल अशी अनेकांना अपेक्षा आहे.
– हृषिकेश कीर्तिकर,
फेलो- शैक्षणिक साधन विकास प्रकल्प, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस.
पवार यांची निर्णयक्षमता उचितच
भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्यानिमित्त झालेली उधळपट्टी आणि संपत्तीच्या प्रदर्शनाची दाखल घेऊन शरद पवारांनी केलेली जाधवांची कानउघाडणी अत्यंत योग्य अशीच कृती आहे .दुष्काळामुळे खेडय़ापाडय़ातील जनता व जनावरे अन्नपाण्यासाठी टाहो फोडत असताना भरल्या पोटी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना जेवायला घालणे हे एक प्रकारचे पापच आहे. जाधवांनी माफी मागितली हे उचितच झाले पण ‘लेकी बोले सुने लागे’ हेही होऊ शकते. निदान दुष्काळ संपेपर्यंत तरी कोणी आता अशा प्रकारे संपत्तीचे प्रदर्शन करण्याची हिम्मत दाखवणार नाही अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. राजकारणी आणि नेतेमंडळी योग्य तो बोध घेतील असे वाटते. शरद पवारांनी या निमित्ताने जी निर्णयक्षमता दाखवली ती आगळीवेगळी आहे म्हणून त्यांचे अभिनंदन करायला हवे.
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)
डोळ्यात येऊ देऊ नका, एवढय़ापुरते!
पवारसाहेबांनी त्यांच्या कन्येचे लग्न साधेपणाने केले यात दुमत असण्याचे कारण नाही, मात्र नंतर पंचतारांकित हॉटेल्समधून विविध हितसंबंधींकरिता वेगवेगळी खास प्रीतीभोजने झडत होती हे गुलदस्त्यात ठेवले गेले. पवारसाहेबांचा राग आहे तो राज्यमंत्री जाधवांनी केलेल्या प्रदर्शनाला तसेच राजकारणात राहून खायचे आणि दाखवायचे दात (आणि काळा पसा) वेगवेगळे असावेत याचे भान सुटल्याबाबत!
हवे ते करा फक्त कुणाच्या डोळ्यांत येईल असे काही करू नका, एवढाच त्यांच्या फटकारण्याचा अर्थ! ना ते जाधवांची आमदारकी काढून घेणार ना पक्षातून हकालपट्टी करणार! माणसाने राष्ट्रवादी असावे, ते असे!
– सतीश पाठक, कल्याण</strong>
आटलेल्या तळ्यांतील गाळ काढण्याची संधी!
सलग दोन वर्षांच्या दुष्काळामुळे राज्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक तळी आताच आटून गेली आहेत. त्यामुळे जरी पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले असले तरी त्यामध्ये एक संधीसुद्धा आहे. ती म्हणजे वर्षांनुवष्रे गाळाने भरलेली तळी स्वच्छ करण्याची संधी. या तळ्यांतील गाळ काढला तर तळी त्यांच्या पूर्ण क्षमतेइतकी भरू शकतील. या सुपीक गाळाचा शेतीसाठी वापर करता येईल. सध्या पाण्यासाठी धडपडणाऱ्या राज्यकर्त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून भविष्यातील पाणीटंचाई टळू शकेल. निदान तिला तोंड देणे तरी सोपे होईल.
– वाघेश साळुंखे
प्रेरक ‘फ्रेंच कनेक्शन’
सुनील चावके यांनी लिहिलेल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या फ्रेंच दुभाषी अनुराधा कुंटे यांच्यावरील ‘द फ्रेंच कनेक्शन’ या लेखामुळे श्रीमती कुंटे यांच्याबद्दलची सविस्तर आणि अपरिचित माहिती वाचकांना उपलब्ध झाली. मी स्वत याच क्षेत्रात (रशियन भाषेचा दुभाषी) निराळय़ा पातळीवर काम करीत असल्याने श्रीमती कुंटे यांच्याबद्दल गेली ३० वर्षे ऐकून होतो, परंतु या लेखाने विविधांगी माहिती देण्याचे काम केले.
– सतीश खांबेटे, दहिसर (मुंबई)