विक्रम गोखले यांनी (लोकसत्ता १४ फेब्रुवारी) काश्मिरी जनतेबाबत व्यक्त केलेला कळवळा आणि अब्दुल्ला घराण्याविषयीची त्यांची आगपाखड या दोन्ही प्रतिक्रिया म्हणजे ऐतिहासिक अर्धसत्य आहे. श्री. गोखले आपल्या पत्रातून असं सुचवू पाहत आहेत की, काश्मिरी जनतेला रोजीरोटीची खरी भ्रांत आहे आणि ती पुरविण्यात अब्दुल्ला घराणं सत्तेच्या लालसेपायी सतत अपयशी ठरत आलं आहे. म्हणून काश्मिरी लोक अब्दुल्ला घराण्याच्या नावाने खडे फोडत आहेत.
हे अर्धसत्य अशासाठी की, लोक अब्दुल्ला घराण्याच्या विरोधात बोलतात हे खरे आहे; पण त्याचे कारण नुसते रोजीरोटी हे नाही. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून अब्दुल्ला घराण्याने काळाच्या ओघात काश्मीरचे वेगळेपण घालवले, ही भावना खोऱ्यात प्रबळ आहे. या भावनेला आपण इतर भारतीय ‘फुटीरतावादी’ म्हणतो.
नेमकी येथेच सारी गोम आहे.
महाराजा हरीसिंग, शेख अब्दुल्ला आणि काश्मिरी जनता या सर्वाना आपले वेगळेपण टिकवण्याची आकांक्षा होती. मात्र पाकने हल्ला केल्यामुळे एका विशिष्ट परिस्थितीत काश्मीर भारतात विलीन झाले. पण असे करताना भारतीय राज्यघटनेत घालण्यात आलेले ३७०वे कलम ही भारतीय संघराज्यात आपले वेगळेपण टिकून राहण्याची ग्वाही आहे, असे महाराजा, अब्दुल्ला व जनताही मानत होती. उलट काळाच्या ओघात काश्मीर हे इतर संस्थानांप्रमाणे प्रू्णत: विलीन होईल, असे भारतीय नेते आणि जनता मानत होती. ही जी मूलभूत विसंगती व विसंवाद गेली ६५ वष्रे आहे, तोच या प्रश्नाच्या मुळाशी आहे.
म्हणूनच १९७७ साली इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत करार होऊन शेख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता झाल्यावर त्यांना काश्मिरी जनतेचा उत्स्फ्रू्त पािठबा मिळाला आणि पुढे फारुख अब्दुल्ला यांचे सरकार प्रथम बरखास्त करण्यात आले आणि नंतर दिल्लीतील सत्तधाऱ्यांच्या कलाने वागायची तयारी दाखवल्यावर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर काश्मीरमधील दहशतवादाची सुरुवात झली आहे.
म्हणूनच काश्मीरचा प्रश्न सोडवायचा असल्यास हेच वेगळेपण टिकवण्याची खरी हमी द्यावी लागेल आणि ती प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठीही ठोस पावले टाकावी लागतील.
हे करण्यासाठी भारतीय जनतेला विश्वासात घेऊन देशहितासाठी याची असलेली गरज पटवून द्यावी वागेल. तसे झाल्यासच पाकिस्तानला खरा शह बसेल, त्यासाठी दूरदृष्टीचे व जनमनात स्थान असलेले नेतृत्व हवे. ते आज तरी राजकीय क्षितिजावर दिसत नाही.
अर्थात श्री. गोखले यांच्यासारखे बुद्धिवंत त्यांना खरोखरच देशहिताची कळकळ असेल, तर हे करू शकतात. पण ते जी विचारसरणी मानतात, तिला भारताचे बहुसांस्कृतिकत्वच मान्य नाही. आपापले वेगळेपण टिकवूनही एकत्र राहता येते आणि देश समर्थ बनवता येतो, हे मान्य नसल्यामुळेच एकसाची सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला जातो.
अशा परिस्थितीत काश्मीरची जखम भळभळतच राहणार आहे आणि श्री. गोखले यांच्यासारखे बुद्धिवंत काश्मिरी जनतेच्या नावाने नक्राश्रूही ढाळत राहणार आहेत.
– प्रकाश बाळ, ठाणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा