‘नावीन्य’ हा निकष संशोधनाने एकदा पार केला, की मग उरतात असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे आणखी दोन निकष. या तिन्ही निकषांवर खरे उतरले तर संशोधनाला पेटंट मिळते; पण यापकी कुठल्याही अडथळ्याला अडखळून संशोधनाचा कपाळमोक्ष झाला, तर पेटंट नाकारले जाते हे नक्की. पेटंट मिळवण्याची ही तीन अडथळ्यांची शर्यतच जणू!
माझ्या लेकीच्या शाळेत मध्यंतरी एक विज्ञान खेळण्यांचे प्रदर्शन होते. वर्गातल्या तीन तीन जणांच्या गटाला एक एक खेळणे बनवून प्रदर्शनात मांडायचे होते. सर्वोत्कृष्ट खेळण्यांना भले मोठे बक्षीसही होते; पण बक्षीसपात्र ठरण्यासाठी एक अट होती. ती अशी की, त्या आधीच्या वर्षी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या खेळण्यांपेक्षा या वर्षीची खेळणी वेगळी आणि नवीन असली पाहिजेत. तरच त्यांचा बक्षीस देण्यासाठी विचार केला जाईल. एका दुपारी लेकीच्या खोलीत त्यांच्या गटाची खेळणे बनविण्यासाठी चाललेली खुडबुड ऐकून त्यांचे काय चाललेय पाहायला गेले. सिग्नलवर चालणारी रेल्वे यंत्रणा बनविण्याचा उद्योग चालू होता. समोर एक आगगाडी ठेवून तिचा अभ्यास करणे चालू होते. ही आगगाडी तुम्ही बनवलीत का, असे विचारल्यावर कळले की, ती त्यांनी नव्हे, तर मागच्या वर्षीच्या एका गटाने बनविली होती आणि ती बघून काही तरी बनविण्याची यांची धडपड चालू होती.
‘‘अगं पण तुम्हाला नवीन खेळणं बनवायचंय ना? बक्षीस नाही का मिळवायचं तुम्हाला.’’ मी विचारले.
‘‘मिळवायचंय ना..पण इतके सगळे जण दर वर्षी नवीन काय बनवणार? आम्ही जुन्याच एका खेळण्याची कॉपी करतोय.’’ इति माझी मुलगी.
‘‘पण मग याला बक्षीस कसं मिळेल?’’.. माझा भाबडा प्रश्न.
‘‘अगं, मागच्यापेक्षा वेगळं आणि नवीन खेळणं बनवायला लावलंय ना.. मग आम्ही बनवतोय की. ही ट्रेन मागच्या वर्षीच्या मुलांनी थर्मोकोलची बनवली होती. आम्ही ती पुठ्ठय़ाची बनवतोय. शिवाय त्यांची ट्रेन आकाराने जरा छोटी होती. आमची मोठी आहे. आमच्या ट्रेनला त्यांच्यापेक्षा जास्त डबे आहेत. मग आहे की नाही आमचं खेळणं नवीन?’’.. इति माझी कन्या.
हे ऐकून माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपआपल्या उत्पादनाला मक्तेदारी मिळावी म्हणून काहीही करून पेटंट मिळवण्यासाठी धडपडण्यासारखेच होते हे. या प्रदर्शनासाठी होता तसाच पेटंट मिळवण्यासाठीचाही पहिला निकष असतो ‘नावीन्य’. आणि आपले संशोधन नवे आहे की नाही हे कसे शोधायचे ते मागच्या लेखात आपण विस्ताराने पाहिले; पण माझी मुलगी आणि तिच्या मत्रिणींनी केले तसेच आपले संशोधन वेगळे भासविण्यासाठीचा प्रयत्न संशोधकही करतात. ज्यावर अगोदरच पेटंट मिळाले आहे किंवा शोधनिबंध लिहिले गेले आहेत अशा संशोधनात काही बदल करतात, जेणेकरून ही संशोधने ‘नावीन्याचा’ निकष पार पाडतील. असे काही थातूरमातूर बदल करून नावीन्याचा निकष पार पाडता येईलही; पण मग त्या त्या क्षेत्रातील थोडी फार माहिती असलेल्या कुणालाही हे बदल सुचणे जर साहजिक असेल, तर त्या व्यक्तीला असले बदल करण्यासाठी नवीन पेटंट द्यायचे का? आणि मक्तेदारी निर्माण करायाची का? तर निश्चितच नाही.
विजयचे टुथब्रशच्या एका डिझाइनवर पेटंट आहे आणि या पेटंटमध्ये ब्रशच्या आकाराबरोबरच त्याच्या मोजमापांचाही उल्लेख केलेला आहे. या ब्रशच्या तंतूंची लांबी समजा दीड सेंटिमीटर आहे. वापरायला लागल्यानंतर लक्षात येतं की, दातांच्या खाचखळग्यामध्ये हे तंतू पोहोचू शकत नाहीत. म्हणून अजय दोन सेंटिमीटर लांबीचे तंतू असलेला ब्रश बनवतो. याशिवाय विजयच्या आणि अजयच्या डिझाइनमध्ये काहीही फरक नाही. अजयला आता स्वत:च्या डिझाइनवरही पेटंट हवे आहे. म्हणून मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे अजय आपल्या संशोधनाचे नावीन्य तपासून पाहतो. त्यासाठी तो पेटंट आणि शोधनिबंधांचे निरनिराळे डेटाबेसेस तपासून पाहतो; पण २ सेंटिमीटर लांब तंतू असलेल्या ब्रशचे एकही डिझाइन अजयला सापडत नाही. १ सेंटिमीटर, सव्वा सेंटिमीटर, दीड सेंटिमीटर असे सगळे आहेत; पण २ सेंटिमीटर नाही. याचाच अर्थ अजयने बनविलेले ब्रशचे डिझाइन ‘नवे’ आहे आणि पेटंट मिळण्यासाठीची नावीन्य ही जी पहिली अट आहे, त्यात हे संशोधन पास होईल.
पण खरं सांगा.. दीड सेंटिमीटर लांबीचे तंतू दातांपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून त्याची लांबी अध्र्या सेंटिमीटरने वाढविणे हे ‘नवीन’ असेलही; पण ब्रश बनविण्याच्या तंत्रज्ञानातील साधारण बुद्धिमत्ता असलेल्या कुणाही सर्वसामान्य माणसाला ही कल्पना सुचणे साहजिक नाही का? तर अगदीच साहजिक आहे. मग जे उत्पादन शोधून काढण्यात संशोधकाच्या ‘संशोधन वृत्तीचा’ अजिबातच कस लागलेला नाही.. ते आधी अस्तित्वात असलेल्या संशोधनांत केलेला एक किरकोळ बदल आहे, जो कुणाही त्या क्षेत्रातील किमान कौशल्य असलेल्या व्यक्तीला सुचू शकेल.. तर असे संशोधन ‘साहजिक’ (ऑब्व्हियस) समजले जाते आणि ते पेटंट मिळण्यासाठीचा ‘असाहजिकता’ (‘नॉन ऑब्व्हियस’ किंवा ‘इन्व्हेंटिव्ह स्टेप’) ही जी दुसरी अट आहे ती पार पाडू शकत नाही.
खरं तर पूर्णपणे नवीन संशोधन फार कमी वेळेला बाजारात येतात. जी येतात ती बरेचदा आधी अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानातच केलेले बदल असतात, जेणेकरून ते तंत्रज्ञान वापरणे अधिकाधिक सोपे होईल, उपयोगी होईल. अशा संशोधनांना म्हणतात सुधारित संशोधने (‘इन्क्रीमेंटल इन्व्हेन्शन्स’). मग अशा सुधारित संशोधनाला पेटंट्स मिळतच नाहीत का? तर अर्थात मिळतात. कारण कुठलेही तंत्रज्ञान अशा प्रकारच्या लहान लहान सुधारणाने अधिकाधिक काटेकोर होत जाणेच अपेक्षित असते. पण हा जो बदल केला गेला आहे त्यात खरोखर काही सर्जनशीलता आहे का? की पेटंट मिळविण्यासाठी केला गेलेला तो एक किरकोळ बदल आहे हे या दुसऱ्या निकषामध्ये तपासले जाते. हे कसे तपासतात? तर पेटंट ऑफिसमधला पेटंट परीक्षक स्वत:ला त्या संशोधकाच्या जागी कल्पतो. म्हणजे संशोधन जर रसायनशास्त्रातील असेल तर तो हे संशोधन एखाद्या रसायनशास्त्रज्ञाचा चष्मा घालून तपासेल आणि मग हे संशोधन सुचणे त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञ माणसासाठी ((A Person Having Skill In The Art याचे लघुरूप: PHOSITA), म्हणजे इथे एखाद्या रसायनशास्त्रज्ञासाठी, साहजिक आहे की असाहजिक हे ठरवेल. साहजिक असेल तर पेटंट दिले जाणार नाही आणि असाहजिक असेल तर मात्र संशोधन पेटंट मिळण्यासाठीचा दुसरा निकषही पार पाडेल.
असाहजिकता ठरविण्यासाठी अमेरिकन पेटंट कायद्यामध्ये ज्या खटल्याचे दाखले दिले जातात त्यातला पहिला म्हणजे हॉचकीस वि. ग्रीनवूड हा खटला. लाकडाची किंवा धातूची दार उघडण्याची हॅण्डल तेव्हा प्रचलित होती. हॉचकीसने अगदी तशाच प्रकारचे हॅण्डल पोस्रेलीनमध्ये बनविले आणि त्यावर पेटंटही मिळवले. ग्रीनवूडने या पेटंटला ‘असाहजिकतेच्या’ आधारावर आव्हान दिले. अस्तित्वात असलेल्या डिझाइनचे हॅण्डल फक्त लाकूड किंवा धातूमध्ये न बनविता पोस्रेलीनमध्ये बनविण्यात संशोधकाच्या सर्जनशीलतेची कुठलीच चमक दिसून आली नाही, असे ग्रीनवूडचे म्हणणे आणि म्हणून हे पेटंट रद्द करण्यात आले.
संशोधनाने नावीन्य आणि असाहजिकता हे दोन निकष पार पाडले, तर तिसरा निकष तपासला जातो तो म्हणजे औद्योगिक उपयुक्ततेचा (इंडस्ट्रिअल अॅप्लिकेशन किंवा युटिलिटी). एखादे संशोधन जर खरोखर अफलातून असेल, पण तरी जर ती एखादी अमूर्त कल्पना असेल किंवा वैज्ञानिक तत्त्व असेल, उदा. आइनस्टाइनचा सापेक्षतावाद.. तर त्याला काहीही औद्योगिक उपयुक्तता नाही. ते एखादे उत्पादन किंवा प्रक्रिया नाही, जी उद्योगात वापरता येऊ शकेल. म्हणून अशा संशोधनांना पेटंट मिळत नाहीत. उदा. हिऱ्यामधून क्ष किरणांचे विकिरण कसे होते हे शोधून काढल्यास त्यावर पेटंट नाही; पण याच संशोधनावर आधारित एक्स रे क्रिस्टालोग्राफ नावाचे उपकरण जर बनविण्यात आले, तर मात्र ते औद्योगिक उपयोग असलेले उत्पादन आहे आणि म्हणून त्यावर पेटंट मिळेल.
पेटंट मिळवण्यासाठीची ही तीन अडथळ्यांची शर्यत! नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे ते तीन अडथळे. यापकी कुठल्या अडथळ्याला अडखळून संशोधनाचा कपाळमोक्ष झाला नाही तर पेटंट मिळणार हे नक्की!
ही शर्यत रे अपुली..!
‘नावीन्य’ हा निकष संशोधनाने एकदा पार केला, की मग उरतात असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे आणखी दोन निकष.
आणखी वाचा
First published on: 13-08-2015 at 02:24 IST
मराठीतील सर्व कथा अकलेच्या कायद्याची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Procedures for obtaining a patent right