केंद्रात स्थिर व मजबूत सरकार सत्तेवर येण्यास प्रादेशिक पक्षांबाबत महत्त्वाची घटनादुरुस्ती आवश्यक आहे. प्रादेशिक पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत भाग घेण्यास मनाई करावी, असे स्पष्ट विचार ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. या व्यक्तव्याची संभावना ‘लोकसत्ता’ने ‘मुख्यमंत्र्यांचा राज्यशास्त्रविनोद’ अशी केली असली (अन्वयार्थ, २५ एप्रिल), तरी जनतेने त्याचे समर्थन करावयास पाहिजे. प्रादेशिक पक्षाच्या पाठिंब्याने, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रात दोनदा सत्तेवर आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीपुढे प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या राज्याच्या हिताची ढाल पुढे करून केंद्र सरकार व देशाच्या पंतप्रधानांसमोर राष्ट्रीय हिताचे निर्णय घेताना कशा अडचणी निर्माण केल्या, त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर काय किंमत मोजावी लागली हे पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधानाच्या कार्यालयाचे मंत्री असताना जवळून पहिले असणार, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला अनुभवाचा आधारही आहे.
काहींच्या मते कायदे केल्याने सगळ्याच गोष्टी साध्य होणार नाहीत हे काही अंशी खरे असले तरी भारतात मात्र कायदे केल्यानेच बऱ्याच अनिष्ट गोष्टींना पायबंद बसला. स्वातंत्र्यानंतर पक्षांतर विरोधी कायदय़ाच्या बाबतीतही काही हितसंबंधी लोकांकडून विरोध केला गेला होता. त्यानंतरही संसदेने पक्षांतर बंदी कायदा मंजूर करून अमलात आणला. त्याचे भारतीय राजकारणात चांगले परिणाम दिसत आहेत. आयाराम गयाराम बंद झाल्याने राज्य सरकारे त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करीत असून राज्याला राजकीय स्थैर्य प्राप्त झाल्याने विकासाला गती आली हे दृष्टिआड करून चालणार नाही. माहितीच्या अधिकाराचा कायदा, भ्रष्टाचारविरोधी कायदा यांचेही सुपरिणाम आज दिसत आहेत.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या खुन्यांना न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा तामिळनाडू सरकारने राजकीय फायद्यासाठी व जनतेची सहानुभूती मिळवण्याकरिता जन्मठेपेत रूपांतरित केली. पंजाब राज्य सरकारकडूनही अशाच प्रकारचे काही निर्णय घेण्यात आले. सध्या केंद्रात मंत्री असलेले शेख अब्दुल्ला यांनी मोदी पंतप्रधान झाल्यास काश्मीर भारतात राहणार नाही, असे व्यक्तव्य निवडणूक प्रचारात केले. अशा स्वरूपाचे देशाच्या सार्वभौमत्व व अखंडत्वालाच आव्हान देणारी व्यक्तव्ये किंवा कृत्ये करण्यास हे नेते का धजत आहेत, याचे मूळ कारण म्हणजे केंद्रातील सत्ताधारी किंवा आघाडय़ांत प्रादेशिक पक्षाची असलेली भागीदारी. आघाडय़ांच्या राजकारणामुळेच प्रादेशिक पक्षांच्या या आगळीकांकडे राष्ट्रीय पक्ष काणाडोळा करतात. प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी जनतेच्या स्थानिक प्रश्नांबरोबरच काही भावनिक मुद्दे हाताळीत आपापली सत्तास्थाने मजबूत केली आहेत. त्यामुळे त्यांच्या राज्यात असलेल्या लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यात ते यशस्वी होत आहेत. आजच्या संविधानिक चौकटीत केंद्रात एकपक्षीय सरकार सत्तेवर येणे आजच्या स्थितीत तरी शक्य वाटत नाही. तेव्हा किमान प्रादेशिक पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत मज्जाव करण्यास घटनादुरुस्ती झाल्यास फरक दिसू लागेल. दोन वा तीन राष्ट्रीय पक्षांपकी एका पक्षाला बहुमत मिळणे कठीण नाही. स्वबळावरील एकाच पक्षाचे सरकार हे राष्ट्रहिताचे व जनहिताचे निर्णय जलद गतीने घेण्यास सरकार सक्षम असेल. मग ‘आघाडी सरकारच्या मर्यादे’चा बहाणा करायला वाव राहणार नाही. तेव्हा हे लोकशाहीच्या बळकटीसाठी व राष्ट्रीय अखंडत्वासाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणकारांनी ध्यानात घ्यावे.
विठ्ठल शेवाळे, पुसद (जि. यवतमाळ)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा