चित्रपट आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रातील अनेकांना प्रसिद्धी विनासायास मिळते. चाहत्यांचे पाठबळही असतेच. त्यामुळे त्यांच्यावर कुठलेही दोषारोप झाले की, ते या प्रसिद्धीचा व चाहत्यांच्या सहानुभूतीचा हत्यारासारखा वापर करू पाहतात.
न्यायालयाने शिक्षा फर्मावली तरी बेहत्तर, आपण आपले इमान कायम ठेवणार अशी तयारी आणि त्यासाठी लागणारा धीरोदात्तपणा यांचे नाटक अनेक जण उत्तम प्रकारे वठवू शकत असतील. क्रीडा आणि चित्रपट या क्षेत्रांचा गेल्या पाच-सहा दशकांतील जागतिक इतिहास पाहिला तर आपण जणू निदरेषच होतो. परंतु न्यायालयांनी जो काही जुलूम चालविला आहे त्यापुढे हतबल व्हावे लागणार, असा अभिनय अनेकांनी उत्तमरीत्या केला आहे. आपण नायक आहोत की खलनायक, हे ज्याचे त्याला माहीत असते. त्यामुळे अगदी डोळ्यांत अश्रू अनावर होऊनसुद्धा न्यायप्रिय असल्यामुळे मला झालेली शिक्षा आता मी भोगलीच पाहिजे वगैरे प्रसारमाध्यमांपुढे बोलणे हा भंपकपणा ठरतो.
याला अपवाद मोहम्मद अलीचा. व्हिएतनाम युद्धावर जाण्यास विरोध केला, म्हणून मोहम्मद अली ऊर्फ कॅशियस क्ले या महान मुष्टियोद्धय़ाला अमेरिकी न्यायालयांनी १९६७ मध्ये दोषी ठरविले होते. २० जूनच्या सकाळी अवघ्या २१ मिनिटांत हा खटला निकाली निघाला. अली दोषी ठरला, त्याला पाच वर्षांची कैद आणि १० हजार डॉलरचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. पण मी माझ्या सदसद्विवेकाचेच ऐकणार असे म्हणत अलीने आधी राज्य न्यायालयात, मग सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि तेथे मात्र सरकारच्या विधानांमध्ये सुसंगती नसल्याच्या कारणास्तव तो सुटला. या कोर्टबाजीच्या काळात मोहम्मद अलीने अनेक ठिकाणी युद्धविरोधी भाषणे केली. त्याची भूमिका योग्य की अयोग्य, याचा फैसला अमेरिकी संघराज्याच्या न्यायालयाने केलाच नाही. तरीही सरकारविरुद्ध त्याने केलेली विधाने ही देशविरोधीच आहेत, असे मानणारा एक वर्ग होता. अलीने मुद्दामहून सुन्नी इस्लाममध्ये केलेले धर्मातर, नेशन ऑफ इस्लाम या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे त्याने सांगणे, त्याची ती भाषणे आणि त्याचा एकंदर गोऱ्या अमेरिकेला असलेला विरोध हे अनेकांना संतापजनक वाटले होते. मात्र युद्धविरोध ही तरुणाईची खूण मानण्याचा नूर अमेरिकेत त्याच काळात पसरू लागलेला असल्याने प्रसारमाध्यमे अलीच्या विरुद्ध नव्हती. अवघ्या बाविसाव्या वर्षी हे विवेकाचे वादळ झेलणाऱ्या अलीला ऐन उमेदीची चार वर्षे बॉक्सिंगच्या एकाही महत्त्वाच्या स्पर्धेत भाग न घेताच काढावी लागली. हे कारकिर्दीचे आणि आयुष्यावरच परिणाम करणारे नुकसान होते, परंतु ते त्याने झेलले.
जबाबदारीची जाणीव ठेवून केलेला कायदेभंग आणि छोटामोठा गुन्हा यांत फरक असतो तो हा. आपण गुन्हा केलेलाच नाही, असे अनेक जण न्यायालयात म्हणत राहिले. न्यायालयांची किंवा अमेरिकी ज्युरींची मती गुंग व्हावी, इतके फाटे त्यांनी आपापल्या खटल्यांना फोडले. मग तो बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरलेला अमेरिकी मुष्टियोद्धा माइक टायसन असो किंवा सहचारिणीचा खून केल्याप्रकरणी कैदेत असलेला फुटबॉलपटू-अभिनेता ओ जे सिम्सन असो की तुरुंगातही अमली पदार्थाचा व्यापारच सुरू करणारा अभिनेता कॅमेरून डग्लस. हे सारे जण आपण किती निदरेष आहोत हेच विविध प्रकारे सांगत राहिले. अमेरिकेतील प्रसारमाध्यमेही त्यांच्यासोबत बहकली. टायसनने १९९२ ते ९५ पर्यंत तीन वर्षांची शिक्षा भोगून चांगल्या वर्तणुकीच्या आधारे जामीन मिळवला, त्याच्या सामन्यांवर पैसा लावणाऱ्यांना भरपूर पैसा मिळवून दिला आणि आठ वर्षांपूर्वी त्याचा जोम कमी झाल्याने तो यथावकाश मुष्टियुद्धाच्या कुंपणाबाहेर फेकलाही गेला. मग आपण आयुष्यात किती असमाधानी आहोत वगैरे पश्चात्तापाची स्वगते त्याने प्रसारमाध्यमांपुढे सुरू केली. आताशा अमेरिकी प्रसारमाध्यमांनाही टायसनच्या त्या रडगाण्यांत रस राहिलेला नाही. मला धर्मसेवकच बनायचे आहे, असे पाच वर्षांपूर्वी म्हणणारा टायसन, अद्याप तरी त्या पंथाला लागलेला नाही. ओ जे सिम्सनचा खटला त्याच्या अभिनयगुणांमुळे २००४-०५ साली इतका रंगला होता की, हा एकेकाळचा फुटबॉलपटू अभिनयाच्या क्षेत्रातच का रमला, याचे उत्तर न मागता मिळाले. अमेरिकी चित्रवाणी वाहिन्यांनी हा खटला इतक्या लोकप्रियतेच्या पातळीला नेऊन पोहोचवला की अखेर बीबीसीसारख्या एरवी थंडपणे जग पाहणाऱ्या वाहिन्यांवरही आज ओ जे काय बोलला किंवा त्याच्या अश्रूंचा बांध आज कसा फुटला याची सनसनाटी हा बातम्यांचा अविभाज्य भाग झाला होता. या खटल्याची लोकप्रियता आजही कायमच आहे असा गवगवा सध्या सुरू करून एक अमेरिकी वाहिनी त्या खटल्याची मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या माथी मारणार आहे. त्याला प्रेक्षकसुद्धा प्रतिसाद देणारच, असा प्रचार आतापासून चालू झाला आहे. याउलट कॅमेरून डग्लसचे. स्वत:च्या या दिवटय़ा पोराला हॉलिवूडमध्ये मार्गी लावण्याचा प्रयत्न मायकल डग्लसने केला, पोराला अभिनेता म्हणून यश मिळेल यासाठी खटपट केली, पण कॅमेरूनवर अमली पदार्थ बाळगल्याचे आरोप झाल्यावर मुलापेक्षा वडीलच अधिक वेळा दीनवाण्या चेहऱ्याने प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांपुढे जाऊ लागले. पालकांच्या दुर्लक्षाचा बळी आहे हो माझा मुलगा, अशी हूल त्यांनी वकिलामार्फत न्यायालयातही पोहोचवली. कॅमेरून डग्लस हा पालकांचे दुर्लक्ष झाले म्हणून अमली पदार्थाच्याच गुन्ह्यापायी तुरुंगात असताना एका वकील तरुणीला प्रेमपाशात ओढत होता आणि तुरुंगात भेटीसाठी येताना अमली गोळ्या घेऊन येण्याची सक्ती तिच्यावर करू लागला. अखेर त्याला सज्जड कैद झाली व पहिली नऊ वर्षे पॅरोलही मिळणार नाही, अशी अट न्यायालयाने निकालपत्रातच घातली.
भावनांचा बाजार मांडून, रडूनभेकून आणि आपणही माणूसच आहोत, आपण किती चुकलो वगैरे त्रागा करून जनतेची सहानुभूती मिळवता येते. ती जनता अमेरिकी आहे की भारतीय, तिचे दरडोई उत्पन्न काय आदी प्रश्नांना इथे थारा नसतो. दोषारोप एरवी उघडच असणार. अशा स्थितीमध्ये अडकल्यावरही एवढीच परिस्थितीनिरपेक्ष लोकप्रियता अगदी निराळ्या प्रकारेही मिळवता येते. हा प्रकार बुद्धिचातुर्याला महत्त्व देणारा. आपल्यावर इतक्या जणांचा पैसा लागला आहे, परदेशात जाण्यास न्यायालयाने मनाई केलेली असली तरी जाणे अत्यावश्यक असल्यामुळे आता न्यायालयाच्या हाती बॉलीवूडचे किंवा हॉलीवूडचे भवितव्य अवलंबून आहे, असा प्रचार केला जातो. या पळवाटा फक्त अभिनेतेच शोधतात असेही नाही, पण अभिनेत्यांना वा चित्रपट आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रातील अनेकांना प्रसिद्धी विनासायास मिळते. चाहत्यांचे पाठबळही असतेच, त्यामुळे पळवाटा आणि खोटेपणा यांमधले अंतर येथे पाळले जात नाही.
संजय दत्त वा सलमान खान हे अंतर पाळतात, असा दावा करणारे त्यांचे चाहते किंवा तसे चाहते आहे असे गृहीत धरणारी प्रसारमाध्यमे धन्य होत. तारे म्हणून मिरवण्याची सवय झालेल्यांना धुळीला मिळणे कठीण जाते. आपण धुळीस मिळताना इतरांनी पाहू नये, यासाठी धूळफेक करण्याचा जोरदार प्रयत्न यातून होतो. त्या धूळफेकीत हौसेने धुळवड खेळल्यासारखे न्हाऊन निघणारेही धन्य होत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा