सोशल साइट्सवरील आभासी लढाईपासून सामान्य जनता काहीशी लांब असल्याने त्यामार्फत क्रांती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तेथील खेळाडूंना मैदान मोकळे आहे. पण लढाई रंगणार.
राजकारण हा क्रिकेटसारखाच खेळ आहे. क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा असतो, तर खेळाडूंसाठी कमाईचा असतो. तसा. पण तरीही या दोन खेळांमध्ये मोठा फरकही आहे. क्रिकेटच्या मैदानाला सीमा असतात. राजकारणाच्या खेळात मात्र, मैदानाला सीमा नसतात आणि साधनांनाही मर्यादा नसतात. हाती असेल ते साधन घेऊन या मैदानात उतरता येते. म्हणूनच राजकारणाच्या खेळात जुन्याबरोबर अनेक साधने सहजपणे रुळली आणि स्थिरावली. पण आता नवी साधने हाती आल्याने या खेळाचे बारमाही सामने सुरू झाले आहेत. ती खरे तर आभासी आहेत, पण वास्तव साधनांपेक्षाही त्यांचा प्रभाव मोठा आहे. असंख्य समस्यांनी ग्रासलेला, रोजच्या कटकटींचा सामना करताना थकून गेलेला आणि विरंगुळ्याच्या शोधात भटकणारा सामान्य माणूस या आभासी जगात सहजपणे रमतो! सामान्यांवर या आभासी दुनियेचे मोठे उपकार आहेत. कटकटींनी पिचलेल्या माणसाला या आभासी दुनियेतील आभासी साधनांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तो कधी चित्रपटांच्या दुनियेत रमतो, पडद्यावरील नायक-नायिकांचे आगळे जग न्याहाळताना आपल्या हातून निसटलेल्या प्रत्यक्ष जगण्यातील क्षणांची आभासी साठवण करतो..
या आभासी दुनियेत आणखी एक मोठी भर पडली. इंटरनेटच्या दुनियेने ज्ञानाची कवाडे खुली करतानाच, असंख्य एकटय़ादुकटय़ा, सोबत शोधणाऱ्या किंवा अवतीभवतीच्या वास्तव दुनियेत वावरताना बुजणाऱ्यांसाठी ‘सोशल साइट’ नावाचे एक नवे आभासी जगच निर्माण केले. विरंगुळ्याचे क्षण शोधणाऱ्यांची संख्या कदाचित जगभरातील अन्य देशांपेक्षा भारतामध्ये अधिक असावी. त्यामुळेच, ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘यूटय़ूब’सारख्या ‘सोशल साइट्स’ना भारतात प्रचंड लोकप्रियताही मिळाली आणि हे साधन आपल्या मैदानावरच्या खेळाला उपयुक्त आहे, याची जाणीव राजकारणाच्या मैदानावरील धूर्त खेळाडूंना झाली. सोशल साइटस हेच लोकप्रियता मोजण्याचे उद्याचे परिमाण ठरणार, हे सर्वात अगोदर या खेळाडूंना उमगले आणि प्रत्येक खेळाडू ट्विटरवर आला. फेसबुकवर दाखल झाला. पोस्ट, लाइक्स, फॅन्स, फ्रेन्डस आणि फॉलोअर्स हे शब्द राजकारणात रुळू लागले. अलीकडे तर ते परवलीचे शब्द बनून गेले आणि हा खेळही आभासी झाला, त्यामुळे ही आभासी साधने या बारमाही लढाईतील हुकमी हत्यारे होऊन गेली. आपला प्रचार आणि शक्य होईल तेथे प्रतिस्पध्र्याचा अपप्रचार करण्यासाठी सोशल साइटसचा वापर सुरू झाला.
मनमोहन सिंग ते मोदी, दिग्विजय सिंह ते सुषमा स्वराज, अरविंद केजरीवाल ते अण्णा हजारे, जे जे राजकारणाच्या मैदानावर उतरलेले आहेत, त्या सर्वानी ही हत्यारे प्राप्त करून घेतली. संधी शोधून किंवा संधी मिळेल तशी, ही हत्यारे परजली जात असल्याने, राजकारणाच्या या आभासी मैदानावरली आभासी लढाई आता शिगेला पोहोचली आहे. या लढाईत कोण बाजी मारणार याकडे त्या त्या नेत्याच्या फ्रेन्डस, फॅन्स आणि फॉलोअर्सचे डोळे लागून राहिलेले असतात. अलीकडेच नरेंद्र मोदींनी ट्विटर युद्धात शशी थरूर यांच्यावर विजय मिळविला. परवापरवापर्यंत ट्विटरवरील सर्वाधिक लोकप्रिय राजकीय खेळाडू म्हणून काँग्रेसच्या शशी थरूर यांचे नाव गाजत होते. या स्पर्धेत आता नरेंद्र मोदींचे नाव ‘ट्विटरवीर’ म्हणून सिद्ध झाले आहे.
काँग्रेसचे दिग्विजय सिंह असोत, भाजपच्या सुषमा स्वराज असोत, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल असोत, नाहीतर गांधीवादी अण्णा हजारे असोत, ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट नाही असा नेता आज देशाच्या राजकारणाच्या मैदानावर शोधूनही सापडणार नाही. या माध्यमाची मोहिनी राजकीय नेत्यांना पडणे तसे साहजिकही होते. इंटरनेट हे तरुणाईचे एक अविभाज्य अंग झाले आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे एकमेव प्रभावी साधन आहे, हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा या नेत्यांनी आपापली ‘इंटरनेट फळी’ उभी करण्यास सुरुवात केली. मोदींच्या दिमतीला तर बंगलोरमधील तज्ज्ञांचे पथक उभे करण्यात आले. ट्विटरच्या मैदानावरील ‘फॉलोअर्स’च्या फळ्या जणू देशाचे सत्ताधीश ठरविणार असे वातावरण तयार झाले आणि या रणनीतीला भक्कम टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही ‘प्रतिनीती’ आखली. जेमतेम १४० ‘कॅरेक्टर्स’च्या, तरीही असामान्य ताकदीच्या ट्विटरच्या मैदानावर सदैव तलवारबाजी करणाऱ्या शशी थरूर यांच्यावर मोदी-अस्त्राचा मुकाबला करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि ट्विटरयुद्धाच्या रणभूमीवर हे दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले. उत्तराखंडमधील शेकडो बळी घेणाऱ्या आणि हजारोंना विस्थापित करणाऱ्या भीषण उत्पातानंतर ट्विटरच्या रणांगणावरून पहिले अस्त्र भाजपच्या सुषमा स्वराज यांनी काँग्रेसवर टाकले. उत्तराखंड सरकारचा राजीनामा घेण्याची मागणी स्वराज यांनी ट्विटरवरूनच केली आणि अन्न सुरक्षा कायद्यासाठी अधिसूचना काढल्यानंतर मुदतीआधी निवडणुका घेण्याचा सरकारचा इरादा असल्याची शंकाही त्यांनी ट्विटरवरूनच व्यक्त केली. आता याच रणावर निर्णायक लढा होणार, हे जणू ठरून गेल्यासारखेच.
आगामी काळात राजकीय लढायांमध्ये याच आभासी हत्यारांचे हल्ले परस्परांवर होतील, याची चुणूक दाखवणाऱ्या या अलीकडच्या घटना.. हा खेळ दिवसागणिक चुरशीचा होत जाईल, पण प्रेक्षकांना मात्र यामध्ये फारशी भूमिका नाही. मुंबईशेजारीच असलेल्या पालघरसारख्या निमशहरामधील एका तरुणीने फेसबुकवरून एक जेमतेम राजकीय ठरेल अशी स्वभावसुलभ प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर देशाचे राजकारण ढवळून निघाले. फेसबुकसारखे आभासी हत्यार वास्तव क्रांती घडवू शकते, याची भरपूर उदाहरणे त्याआधी आसपासच्या जगात उभी राहिली होती. इंटरनेटच्या माध्यमानेच टय़ुनिशियासारख्या देशाचा अध्यक्ष बेन अलीच्या काळ्या कारभाराचे बिंग फोडले आणि तेथे क्रांती घडली. समस्याग्रस्त जनतेचा हा उठाव अनेक देशांना धडा शिकवणारा ठरला. महागाई, गरिबी आणि मुस्कटदाबीमुळे हैराण झालेली जनता आणि अर्निबध स्वैराचारात आकंठ बुडालेले मुजोर सत्ताधीश अशा अवस्थेला इंटरनेटनेच तोंड फोडले. या माध्यमाची ही ताकद आसपासच्या जगात असली, तरी हे वारे तितक्या सुसाटपणे भारतात पोहोचलेले नाहीत. एखाद्या ‘पोस्ट’ला ‘लाइक’ आणि ‘डिस्लाइक’ करण्यापुरती, कथा-कविता किंवा एखाददुसरा उधारउसनवार विचार ‘शेअर’ करण्यापुरती किंवा अगदीच झाले, तर एखाद्या घटनेवर माफक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यापुरतीच मानसिकता इथे पोसली जातेय. त्यातच, पालघरच्या त्या प्रकरणानंतर सामान्य नेटधारकाने सोशल साइटवरील आपल्यापुरत्या वावराच्या सीमारेषाच जणू आखून घेतल्या आहेत. एखाद्या मैदानावर कुणी षटकार, चौकारांची आतषबाजी केल्यानंतर टाळ्या वाजवून, शिट्टय़ा फुंकून आणि प्रोत्साहन देणाऱ्या घोषणांचा गजर करून आनंद व्यक्त करण्यापुरत्या.. त्यामुळे, क्रांती वगैरे होणार नाही, हे जणू पक्के झाल्याने या आभासी लढाईचे आभासी मैदान खेळाडूपुरतेच मोकळे आहे आणि हत्यारेही त्यांच्याच हातात आहेत. पण लढाई रंगणारच आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा