वासुनाक्यावरील मुले येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही मुलीबद्दल आक्षेपार्ह वाटतील, असे ताशेरे मारतात, तेव्हा सहसा मुलींचा दृष्टिकोन त्याकडे दुर्लक्ष करण्याचा असतो. इतकी वर्षे अशी टिंगलटवाळी करणारी मुले आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटातील असत. आता हे लोण मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचले आहे. डोंबिवलीमध्ये अशी टवाळी करणाऱ्या टारगटांनी त्यांना विरोध करणाऱ्या त्यांच्याच वयाच्या मुलाचा खून केला, तेव्हा कायदा आणि सुरक्षेपेक्षाही सामाजिक परिस्थिती किती बिघडली आहे, याचीच चिंता अधिक वाटते. कामावरून परत येताना आपल्याच वसाहतीत राहणाऱ्या मुलीला सोबत करणाऱ्या संतोष विचिवारा या तरुणाने सोसायटीच्या दरवाज्यात उभे राहून त्या मुलीचा मोबाइल क्रमांक विचारणाऱ्या मुलांना हटकले. त्याचा राग येऊन या टारगटांनी संतोषचा सुरीने भोसकून खून केला. सोसायटीतल्या लोकांना मारहाण होत आहे, असे वाटले म्हणून त्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावरही वार करण्यास या मुलांनी मागेपुढे पाहिले नाही. १६ ते १८ वयोगटातील या मुलांपैकी एक बीकॉमला, तर एक बारावीत आहे. चित्रपट, दूरचित्रवाणीवरील हिंसकता सामान्यांच्या जीवनात उतरते आणि त्यामुळे तरुणाई बिघडते, असे संशोधन सतत सांगितले जाते. ते खरे की खोटे याबद्दल अजूनही जगात अभ्यास सुरू आहे. मुलांना आवडणाऱ्या कार्टून मालिकांमुळे हिंसक प्रवृत्ती बळावते, असेही सांगितले गेले. प्रत्यक्षात मुलांना कशामुळे विकृत गोष्टी कराव्याशा वाटतात, याची प्रत्येक संस्कृतीमधील कारणे वेगवेगळी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अमेरिकेतील निष्कर्ष भारताला लागू पडतीलच असे नाही. डोंबिवलीतील घटनेत हत्या झालेला मुलगा आणि ती करणारी मुले यांची सांस्कृतिक पाश्र्वभूमी साधारण सारखीच आहे. तरीही संतोष विचिवारा याने त्याच्याबरोबरच्या मुलीला वाचवण्यासाठी तिची छेड काढणाऱ्यांना विरोध करण्याचे धैर्य दाखवले. त्याचा परिणाम जीव गमावण्यात झाला. हातात सुरे घेऊन मुलींची छेड काढणाऱ्या मुलांना धडा शिकवणे हे कायद्याचे काम असले, तरी समाजात अशा गोष्टींना सार्वत्रिक पातळीवर विरोध होत नाही. शस्त्र बाळगणे हा गुन्हा केवळ कागदावर राहिल्याने आणि अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षेला विलंब होणे, यामुळे कुणाचाच कुणावर वचक राहत नाही. सभ्यता आणि मर्यादा यांचे भान केवळ शिक्षणाने येते असे नाही. त्यासाठी भोवतालच्या परिसरातही त्याची बीजे असावी लागतात. २००८ ते २०१२ या चार वर्षांच्या काळात मुंबईतील हत्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी बलात्कार आणि छेडछाडीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष एका पाहणीत आढळून आला. विलेपार्ले, बांद्रा, कुर्ला या परिसरांत बलात्काराच्या घटना अधिक घडल्याचे या पाहणीत लक्षात आले. समाजात सुसंस्कृतता पाळली जावी, यासाठी पोलीस खाते निर्माण झाले असले, तरी प्रत्यक्षात पोलिसांना गुन्हा घडल्यानंतरचेच काम करावे लागते. गुन्हा घडूच नये, यासाठी काही करण्याएवढी पोलीस खात्याची क्षमता नाही. मुलींचा होणारा विविध पातळ्यांवरील छळ ही सामाजिक विकृती आहे, हे जोवर तरुणाईच्या लक्षात येत नाही, तोवर हे प्रश्न अनुत्तरितच राहणार. आर्थिक गटाचा सुसंस्कृततेशी जोडला जाणारा संबंध कसा फोल आहे, हेही डोंबिवलीतील घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. उत्तर शोधण्यापूर्वी प्रश्न समजून घेण्याचीच खरी गरज आहे, हेही त्यामुळेच लक्षात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
सामाजिक बिघाडाचा सवाल
वासुनाक्यावरील मुले येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही मुलीबद्दल आक्षेपार्ह वाटतील, असे ताशेरे मारतात, तेव्हा सहसा मुलींचा दृष्टिकोन त्याकडे दुर्लक्ष करण्याचा असतो. इतकी वर्षे अशी टिंगलटवाळी करणारी मुले आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटातील असत. आता हे लोण मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचले आहे. डोंबिवलीमध्ये अशी टवाळी करणाऱ्या टारगटांनी त्यांना विरोध करणाऱ्या त्यांच्याच वयाच्या मुलाचा खून केला,

First published on: 06-12-2012 at 04:39 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question on social aggravation