रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन आल्यामुळे काही प्रमाणात अर्थघसरण थांबली. मात्र, अर्थव्यवस्थेच्या वाऱ्याची दिशा ही प्रत्यक्ष काही घटनांपेक्षा आभासावरच बऱ्याच अंशी अवलंबून असते. म्हणूनच रिझव्‍‌र्ह बँकेचे पहिले पतधोरण जाहीर करताना तिकडे अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमधील सत्तांतरामुळे होणारे परिणामही राजन यांची कसोटी पाहणारे ठरणार आहेत.
रिझव्‍‌र्ह बँकेचे कोरेकरकरीत गव्हर्नर रघुराम राजन २० सप्टेंबरला आपले पहिले तिमाही पतधोरण जाहीर करतील त्या वेळी दोन गोष्टी घडलेल्या असतील. एक म्हणजे चलनवाढीचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे राजन यांच्या लक्षात आलेले असेल. परंतु त्याच वेळी अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या प्रमुख पदाच्या स्पर्धेतून लॅरी समर्स यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले असेल. या दोनही गोष्टी राजन यांच्यासाठी, आणि अर्थातच त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेसाठीही, महत्त्वाच्या आहेत. या दोनही घटनांना सोमवारी सुरुवात झाली. अशाच वेळी ऑगस्टचा घाऊक किंमत निर्देशांक जाहीर झाला असून त्यातील वाढ ही राजन यांची डोकेदुखी ठरणार आहे. जुलै महिन्यात हा निर्देशांक ५.७९ टक्के इतका होता. तो आता ६.१ टक्क्यांवर गेला आहे. जून महिन्यात हा चलनवाढीचा वेग ५.१६ टक्के इतका होता. याचा अर्थ चलनवाढ होतच असून ती रोखण्याचे मार्ग आपल्या पहिल्याच पतधोरणात राजन यांना विचारात घ्यावे लागणार आहेत. चलनवाढ रोखली जात नाही तोपर्यंत व्याजदरात सवलत देणे रिझव्‍‌र्ह बँकेला शक्य होत नाही. व्याजदर घसरले की पैसा मोठय़ा प्रमाणावर खेळू लागतो आणि पुन्हा मग चलनवाढ होते. ती रोखण्यासाठी व्याजदर चढे ठेवावेत तर कर्ज आणि पतपुरवठा महाग होतो आणि विकास खुंटतो. या चक्राची गती सांभाळण्यातच माजी गव्हर्नर ध्रुवी सुब्बाराव यांचा वेळ आणि ऊर्जा गेली. त्यातूनच ते आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला आणि अर्थव्यवस्था चालवणाऱ्या या दोन व्यक्ती देशाचा अर्थगाडा दोन वेगवेगळ्या दिशांनी नेऊ पाहात असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यात रुपयाच्या घसरगुंडीने या गोंधळात भरच पडली. या पाश्र्वभूमीवर सुब्बाराव यांचे उत्तराधिकारी म्हणून राजन यांची नियुक्ती झाल्याने वातावरणात अचानक आश्वासक बदल झाला.
त्यामुळे भांडवली बाजार सावरला आणि त्याच्या जोडीला रुपयाची घसरणही थांबली. अर्थव्यवस्थेच्या वाऱ्याची दिशा ही प्रत्यक्ष काही घटनांपेक्षा आभासावरच बऱ्याच अंशी अवलंबून असते. त्याचमुळे अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना मार्केट सेंटिमेंट- बाजारभावना- महत्त्वाची असते. या बाजारभावनेच्या हिंदोळ्यास काल्पनिक कारणेही पुरतात. त्याचमुळे तिसऱ्या आघाडीचे सरकार सत्तेवर येणार या भीतीनेच भांडवली बाजार कोसळतो तसाच रघुराम राजन यांच्या आश्वासक उद्गारांनी तो सावरतोदेखील. सध्या तसेच झाले होते. राजन आल्यामुळे आता सर्व काही ठीक होईल अशी हवा तयार होऊ लागली आणि काही प्रमाणात अर्थघसरण थांबली. त्याच वेळी नवीन पदाची जबाबदारी स्वीकारताना राजन यांनी विचारांची दिशा दाखवली त्याचाही परिणाम झाला. आपल्या पहिल्याच वार्ताहर परिषदेत राजन यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करून आपल्या वयास साजेशा तडफेचे दर्शन घडवले. बाजार सावरायला सुरुवात झाली ती तेव्हापासून. इतके दिवस बँकांना आपल्या शाखाविस्तारासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी लागायची. ही कारकुनी पद्धत राजन यांनी मोडीत काढली आणि बँकांना शाखाविस्तारासाठी मुक्तद्वार दिले. त्याच वेळी बँकांची बुडीत खाती गेलेली कर्जे वसूल करण्यासाठी त्यांनी नव्याने उपाययोजना जाहीर केल्या आणि सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी चलनवाढ निर्देशांकांशी निगडित कर्जरोखे उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची घोषणाही केली. या त्यांच्या धडाडीने बाजारात विश्वास निर्माण झाला आणि अर्थव्यवस्थेची घसरण रोखली जात असल्याची हवा तयार झाली. त्या वेळी सत्तरी पार करून चाललेला रुपया हा त्यानंतर आजतागायत डॉलरच्या तुलनेत ६२ रुपयांच्या आसपास स्थिर होताना दिसत असून त्यामुळेही जनतेत आश्वासक वातावरण तयार होऊ लागले.
त्यात भर पडेल ती अमेरिकेतून आलेल्या वृत्ताची. अमेरिकी रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान प्रमुख बेन बर्नाके हे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पायउतार होणार असून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून लॅरी समर्स यांचे नाव चर्चेत होते. २००८ साली लेहमन ब्रदर्स विसर्जित झाल्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बर्नाके यांच्या निर्णयामुळे दरमहा ८५०० कोटी डॉलर्स बाजारात ओतले जातात. अर्थव्यवस्थेस पैशाची कमतरता पडू नये हा त्यामागील हेतू. परंतु परिस्थिती आता सुधारल्यामुळे ही रक्कम टप्प्याटप्प्याने कमी करण्याची घोषणा बर्नाके यांनी नुकतीच केली. त्यांची जागा घेऊ पाहणारे समर्स यांचा विचार वेगळा होता. त्यांना एकाच फटक्यात हा रसदपुरवठा बंद करायचा होता. तसे झाले असते तर डॉलरचा भारत वा अन्य देशांतील ओघ अधिकच आटून अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याचा धोका होता. गेल्या महिन्यात बर्नाके यांनी ही डॉलर रसद कमी करण्याचे नुसते सूतोवाच केले तर रुपया गडगडला. त्यामुळे ती घोषणा प्रत्यक्षात अमलात आली असती तर काय झाले असते याची कल्पना केलेली बरी. तेव्हा ती घोषणा एकाच फटक्यात अमलात आणू पाहणारे समर्स हे फेड प्रमुखपदाच्या शर्यतीतून बाद होत असल्याचे जाहीर झाल्याने रघुराम राजन यांच्यासाठी सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणता येईल. परंतु तो पूर्णपणे बरा झाला असे म्हणता येणार नाही. याचे कारण असे की मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस बर्नाके यांनी फेडची व्यापक बैठक बोलावली असून तीत डॉलर रसदीचे काय करावयाचे हा प्रश्न चर्चिला जाणार आहे. तेव्हा या बैठकीत जर काही महत्त्वपूर्ण घोषणा झाली वा धोरणात्मक भाष्य झाले तर त्याचाही परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, हे निश्चित. म्हणजेच अर्थव्यवस्थेविषयी आणि त्यातही राजन यांच्याविषयी जो काही आशावाद पहिल्याच काही दिवसांत निर्माण झाला आहे, तो येथे संपुष्टात येतो.
याची जाणीव अर्थातच राजन यांना आहे. त्याचमुळे रिझव्‍‌र्ह बँकेचा प्रमुख या नात्याने आपल्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही, हे त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर लगेचच जाहीर केले. तसे ते करणे गरजेचे होते. याचे कारण गेल्या काही वर्षांत अर्थव्यवस्थेची जी काही दुरवस्था झाली आहे ती एका व्यक्तीच्या नियुक्तीने सुधारणार नसून त्यासाठी धोरणात्मक बदलांची गरज लागणार आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा हा की हे धोरणात्मक बदल हे सरकारकडून येतात, रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमुखास त्याबाबत काहीही अधिकार नसतो. देशाच्या बँकेचा प्रमुख म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर करू शकतो ते इतकेच की तो बँकांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि व्याजदरात चढउतार करण्याच्या अधिकारामुळे पैशाचा ओघ नियंत्रित करू शकतो. ही बाब एकदा लक्षात घेतल्यास रघुराम राजन यांच्याकडून अवास्तव अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही.
भारतीय मानसिकतेत रामनामास भलतेच महत्त्व आहे. नुसत्या रामनामाच्या उच्चाराने समस्या मिटतात असे आस्तिकांना वाटते. ते धर्म वा राजकारणापुरतेच ठीक. वास्तवात त्या रामावरचा अतिविश्वास हा जसा धोकादायक आहे तसाच आर्थिक प्रगतीबाबत रिझव्‍‌र्ह बँकेत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या रघुरामावरील अंधश्रद्धाही घातक आहे. ‘आम्ही काय कोणाचे खातो रे, हा राम आम्हाला देतो रे..’ हे ‘त्या’ रामाचे वर्णन या रामास लागू करणे अंतिमत: धोक्याचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा