‘सत्ता हे विष असते’, ही आईची शिकवण काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते, सत्तास्पर्धेतील संभाव्य युवराज आणि नेहरू-गांधी घराण्याच्या चौथ्या पिढीचे वारस राहुल गांधी यांनी मनावर घेतलेली दिसते. देशाची सत्ता आणि नेहरू-गांधी घराण्याचा वारसा ही परंपरा काँग्रेसमध्ये जाणीवपूर्वक जपली गेली आहे. त्यामुळे सत्तेच्या सोपानावरील प्रत्येक पायरीवर या घराण्याच्या पाऊलखुणा उमटल्याच पाहिजेत याची खबरदारी घेत या घराण्याच्या वारसदारांना पक्षाच्या राजकारणात केंद्रस्थानी ठेवण्याच्या आजवरच्या काँग्रेसी संस्कृतीला राहुल गांधी यांच्या नव्या ‘भीष्मप्रतिज्ञे’ने चांगलाच हादरा बसला आहे. आपण लग्न करणार नाही आणि कुटुंब, मुलेबाळे यांच्या फंदात पडणार नाही, असे राहुल गांधींनी जाहीर केले आहे. गांधी-नेहरू घराणे हा काँग्रेसचा चेहरा आहे. त्याच्या जोरावरच हा पक्ष देशाच्या भावनांवर स्वार होतो, हा इतिहास आहे. त्यामुळेच राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये चिंता आणि बेचैनीच्या लाटा उसळू लागल्या असतील. राहुल गांधी यांनी राजकारणात आणि पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर पाय ठेवला त्याला फार काळ लोटलेला नाही. अलीकडेच, ज्या जयपूर अधिवेशनात त्यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा मुकुट चढला त्याच्या आदल्या दिवशी, काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा असलेली त्यांची आई, सोनिया गांधी या राहुलवरील नव्या जबाबदारीच्या जाणिवेने कासावीस झाल्या. त्या रात्री त्या राहुलच्या खोलीत आल्या आणि ढसढसा रडल्या. कारण, ज्या नव्या राजकीय जबाबदारीचे ओझे आपल्या मुलाच्या शिरावर येणार आहे, ती जबाबदारी म्हणजे काटेरी मुकुट आहे, याची त्यांना जाणीव होती – असे राहुल गांधींनीच त्या अधिवेशनातील आपल्या भाषणात सांगितले होते. राजीव गांधींच्या निधनानंतर काही काळ सोनिया गांधी पक्षापासून आणि राजकारणापासून दूर राहिल्या. नंतर सोनिया गांधींनी पक्षाचे नेतृत्व करावे यासाठी त्यांची मनधरणी करण्यातच पक्षाच्या चाणक्यांचा बराचसा वेळ खर्ची पडला आणि त्याला यश आल्यावर पक्षाचा चेहरा पुन्हा उजळला. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला सत्तास्थापनेचा कौल मिळताच पंतप्रधानपदाची सहजपणे चालून आलेली संधी सोनिया गांधींनी नाकारली आणि त्यांच्या या त्यागवृत्तीने काँग्रेसचे राजकारणही उजळून निघाले. गांधी घराण्याने पुन्हा पक्षाला उभारी दिली आणि हे घराणे म्हणजे काँग्रेसचा चेहरा आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. पुढे राहुलचे नेतृत्व फुलविण्याच्या प्रयत्नांनाही यश आले आणि अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला गांधी घराण्याचा नव्या पिढीचा चेहरा मिळाला. मात्र, काँग्रेसचे जसे गांधी-नेहरू घराण्याशी नाते आहे, तसेच नाते देशाच्या सत्तेशीदेखील आहे. त्यामुळे भविष्यातील सत्ताकारणासाठी गांधी घराण्याचा चेहरा हीदेखील गरज आहेच. राहुल गांधी यांनी विवाहबंधनात न अडकण्याचे जाहीर केल्यावर लगेचच काँग्रेसकडून त्यावर सारवासारव सुरू झाली. घराणेशाहीच्या राजकारणाचा वीट आल्यामुळेच ती खंडित करण्याचा राहुल गांधींचा इरादा त्यांच्या मनोदयातून स्पष्ट डोकावतो, पण पक्षाच्या दृष्टीने तीच चिंतेची बाब आहे. त्यामुळेच, राहुलचे हे वक्तव्य म्हणजे अंतिम शब्द नाही, असा खुलासा पक्षाला करावा लागला. राहुलचे हे शब्द म्हणजे ‘हूल’ आहे की पक्षाच्या नव्या चिंतेची ‘चाहूल’ आहे, हे आता काळाच्या ओघातच स्पष्ट होणार आहे.
चिंतेची चाहूल की नुसतीच हूल?
‘सत्ता हे विष असते’, ही आईची शिकवण काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते, सत्तास्पर्धेतील संभाव्य युवराज आणि नेहरू-गांधी घराण्याच्या चौथ्या पिढीचे वारस राहुल गांधी यांनी मनावर घेतलेली दिसते. देशाची सत्ता आणि नेहरू-गांधी घराण्याचा वारसा ही परंपरा काँग्रेसमध्ये जाणीवपूर्वक जपली गेली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-03-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi announcement for not getting married is for actual or feint