काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नेहमी साधे राहणे पसंत करतात. म्हणजे धुतलेला झब्बा-पायजमा आणि चपला अशा पेहरावात निवडणुकीसाठी प्रचार केला किंवा एखाद्या झोपडीत जाऊन विचारपूस केली की सामान्य आणि गरीब जनतेच्या मनात कणव निर्माण होते असा त्यांचा समज असावा. त्यामुळे सध्या देशातील पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात राहुल गांधी विरोधकांना हिणवताना ‘एअरकंडिशनर’मध्ये बसणारे आणि म्हणून जगाशी संबंध नसणारे असे शब्दप्रयोग सतत करत असतात. ते ज्या मोटारीतून येतात, ती वातानुकूलित असते आणि काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील अकबर पथावरील कार्यालयात किमान पन्नास वातानुकूलन यंत्रे बसवण्यात आली आहेत, हे तरी त्या सभेसाठी आलेल्या गर्दीला कुठे माहीत असते? विरोधक अशा थंडाव्यात बसून गरीब भारतीयांबद्दल विचार करतात, अशी टीका करताना राहुल यांना हे लक्षात येत नाही, की समोर बसलेली जनता अशा थंडाव्याच्याच प्रतीक्षेत असते. जगणे नकोसे होण्यासारखी परिस्थिती असताना, किमान गारवा निर्माण करणारी वातानुकूलन यंत्रे ही आता चैन नसून गरजही बनते आहे, हे त्या जनतेला ठाऊक असते. गेल्या काही वर्षांत भारतातील वातानुकूलन यंत्रांच्या उद्योगात भरीव वाढ झाली आहे. २००९ मध्ये ११ हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या या उद्योगाने अवघ्या तीन वर्षांत प्रचंड प्रगती केली आणि २०१२ मध्ये तो १७ हजार ६०० कोटींपर्यंत पोहोचला. ज्या औद्योगिक प्रगतीमुळे भारत ही जगातील एक मोठी बाजारपेठ बनली, त्याचा सर्वात मोठा घटक हा ‘आम आदमी’ आहे, याचा राहुल यांना विसर पडला असावा. जगातल्या सगळ्या उद्योगप्रधान देशांना भारताच्या या बाजारपेठेने खुणावले आणि त्याचा परिणाम येथील अर्थकारणावर झाला, हे जर त्यांच्या लक्षात आले असते, तर वातानुकूलित खोलीत बसणाऱ्यांची टिंगल करण्यापूर्वी त्यांनी विचार केला असता. १९९०पर्यंत देशातील रेल्वेमार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांपैकी फक्त चार गाडय़ा वातानुकूलित होत्या. आज अशा ९७ रेल्वेगाडय़ा प्रवाशांना थंडावा देत प्रवास करत आहेत. एकूण प्रवाशांपैकी अशा थंड रेल्वेतून जाणाऱ्यांची संख्या केवळ दीड टक्का असली, तरीही त्यात गेल्या पाचच वर्षांत ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ राहुल यांनी समजून घेतला पाहिजे. शहरातच काय, पण ग्रामीण भागातही वातानुकूलन यंत्रे खरेदी करण्याची ऐपत असणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होते आहे. या वाढत्या मागणीमुळे या यंत्रांच्या निर्मितीत अनेक कंपन्यांनी शिरकाव केला असून स्पर्धेमुळे किंमतही कमी होते आहे. प्रश्न आहे, तो देशात उपलब्ध नसलेल्या विजेचा. ती वीज देण्यासाठी आपल्या सरकारने काय केले, याचे उत्तरही राहुल गांधींनी या निवडणूक सभांमध्ये देऊन टाकायला हवे. देशाच्या अर्थकारणात भर घालू शकणाऱ्या या उद्योगाकडे अधिक लक्ष दिले, तर त्याचा उन्नतीसाठीच फायदा होईल, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांचे वडील राजीव गांधी यांनी भारतात सुरू केलेल्या दूरसंचार चळवळीने आज किती महाकाय स्वरूप धारण केले आहे, हे त्यांना माहीत नसावे. जगातील दूरध्वनी यंत्राची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. एअरकंडिशनर हे प्रगतीचेही चिन्ह असू शकते, याचे भान आले, तर विरोधकांवर अशा प्रकारे टीका करण्याऐवजी ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या उक्तीचा अर्थही त्यांना उमगू शकेल.
थंडाव्याचे दु:ख
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नेहमी साधे राहणे पसंत करतात. म्हणजे धुतलेला झब्बा-पायजमा आणि चपला अशा पेहरावात निवडणुकीसाठी प्रचार केला

First published on: 30-10-2013 at 12:52 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi politics on poverty