मान टाकून पडून राहण्याऐवजी चि. राहुलबाबा लोकसभेत एकदोन वाक्यांपुरते का होईना आक्रमक झाले, हे पाहूनच काँग्रेसजनांचा उत्साह दुणावला.. असा भारलेला नेता असल्यास कितीही पराभव आपण पचवू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात तयार झाला आहे. अर्थात काही छिद्रान्वेषी मंडळी चि. राहुलबाबास गवसलेल्या या आक्रमकतेचा संबंध प्रियांकाताईंच्या राजकारण प्रवेश वृत्ताशी जोडत आहेत, ही बाब नोंद घेण्यासारखी..
काँग्रेस पक्षासाठी बुधवार, ६ ऑगस्ट हा दिवस श्रावण लागलेला असूनही गटारीची ऊर्मी यावी इतका उत्साहाचा असेल. याचे कारण म्हणजे पक्षाचे उपाध्यक्ष आणि भावी अध्यक्ष चि. राहुलबाबा गांधी यांना पुन्हा गवसलेला जोश. खरे तर त्यांच्या संदर्भात पुन्हा गवसलेला असे म्हणणे योग्य नाही. नुसताच गवसलेला असे म्हणावयास हवे. ज्या तडफेने चि. राहुलबाबा यांनी काल लोकसभेत सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला त्यास तोड नाही. बुधवारच्या हल्ल्यात त्यांनी जी काही ऊर्जा वापरली त्याच्या एकदशांश जरी लोकसभा वा अन्य निवडणुकांच्या दरम्यान त्यांच्याकडून पणाला लागली असती तर पक्षाची इतकी आणि अशी दशा होती ना. असो. जे झाले ते झाले. कितीही प्रयत्न केला तरी भूतकाळ तर काही कोणास बदलता येत नाही. तेव्हा राहुल गांधी यांनी काय केले नाही वा काय करावयास हवे होते याची चर्चा आता करणे तसे निरुपयोगीच. उगाच बैल गेल्यावर झोपा केल्यासारखेच ते. तेव्हा भविष्य महत्त्वाचे. परंतु काँग्रेसजनांसाठी तेच तर अंधकारमय वाटत होते. याची प्रमुख कारणे दोन. एक तर भारताच्या राजकीय क्षितिजावर उगवलेला नरेंद्र मोदी नावाचा पैलवान आणि दुसरे म्हणजे त्याच वेळी शड्डू ठोकण्याची कला विसरत चाललेले काँग्रेसजन. तेव्हा आता आपले काही खरे नाही, असे या पक्षीयांस वाटू लागून त्यांचा मोठा हिरमोड होऊ लागला होता. परिस्थिती इतकी बिकट होती की कोणीही यावे आणि पक्षश्रेष्ठींस टप्पू मारून जावे. नेतृत्वाचा धाक कोणास उरलेला नव्हता. वर्षांनुवर्षे, पिढय़ान्पिढय़ा उबदार वातावरणात सत्तावृक्षाची फुले वेचण्याची सवय असलेल्यांवर अचानक गोवऱ्या वेचावयाची वेळ आल्यास जुळवून घेणे तसे आव्हानात्मकच. आता आपल्याकडे सत्ता नाही आणि उद्या येण्याची शक्यताही नाही यामुळे देशभरातील काँग्रेसजनांच्या तुंदिलतनूंवरील मूठ मूठभर मांस कमी होण्यास सुरुवात झाली होती. वास्तविक सत्ता जाणे या एकाच घटनेने काँग्रेसजनांची मने शतश: विदीर्ण केली होती, असे नाही. कधी सत्तेत कधी बाहेर हे त्यांना माहीत होतेच. राजकारण म्हटले की असे होणार यास त्यांची तयारी होतीच. परंतु ते हिरमुसले होऊन त्यांच्या खादीची चमक गेली ती त्या पक्षाच्या नेतृत्वाने मान टाकल्यामुळे. चि. राहुलबाबास आता यश मिळाले नाही, हरकत नाही. काँग्रेसजनांच्या धमन्यांतून जन्माला येतानाच श्रद्धा आणि सबुरी वाहात असते. ही श्रद्धा असते पक्षo्रेष्ठी नावाच्या कुलदैवतावर आणि सबुरी असते ती त्या कुलदैवताकडून आपल्याला आज ना उद्या न्याय मिळणारच या आशेवर. हिंदी सिनेमातील भगवान के घर देर है, अंधेर नहीं.. हे वाक्य काँग्रेसजनांच्या हृदयावर कोरलेले असते. १० जनपथ या पत्त्यावर वास करून राहणारा आपला देव कधी चुकू शकत नाही, अपयशी ठरू शकत नाही आणि मुख्य म्हणजे आपल्याला सोडून मैदान ए जंगमधून पळून जाऊ शकत नाही यावर काँग्रेसजनांची अभेद्य श्रद्धा असते. परंतु गेल्या काही महिन्यांतील घटना याच श्रद्धेला तडा देणाऱ्या होत्या. लोकसभेतील दारुण पराभवानंतर ज्या पद्धतीने पक्षश्रेष्ठी मान आणि खांदे पाडून वागू लागले होते त्याने काँग्रेसजनांच्या हृदयास घरे पडत होती. एकतर या पराभवानंतर त्यांचा नेता गायबच झाला. एरवी पक्षश्रेष्ठी दुखल्याखुपल्या काँग्रेसजनांच्या जखमांवर फुंकर घालायला हजर असतात, या परंपरेस ताज्या निवडणुकांनी छेद दिला. निकाल लागले, पक्षाचा निक्काल लागल्याचे स्पष्ट झाले आणि या पक्षाची जबाबदारी ज्याने आपल्या खांद्यांवर घ्यावयाची ते चि. राहुलबाबाच गायब झाले. ते कोठे आणि कशाला गेले होते ते सोनियामाता किंवा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच जाणोत. आणि इतके करून आपला अज्ञातवास संपवून ते परतले तर अज्ञातवासातील काळात केलेल्या श्रमांमुळे थकून थेट लोकसभेतच माना टाकू लागले. ते पाहिले मात्र काँग्रेसजनांचा बांध फुटू लागला. आता आपल्या पक्षाचे काय होणार, ज्याच्याकडे आशेने पाहावे तोच असा लुडकल्याचे पाहून काँग्रेसजनांनी जणू हायच खाल्ली होती. त्या सर्वाना चि. राहुलबाबाच्या या लोकसभीय कामगिरीमुळे पुन्हा एकदा हायसे वाटू लागेल. सर्वच काही संपलेले नाही याची खात्री वाटेल आणि आपला निद्रिस्त नेता अखेर जागा झाल्याचे पाहून त्यांची हृदये अपार आनंदाने भरून येतील.
ज्याच्याकडून आता कोणताही आवाज येणार नाही असे समजून फटाके फोडणाऱ्याने एखाद्या न वाजलेल्या फटाक्याबाबत निर्धास्त व्हावे आणि नंतर त्या फटाक्याने दणदणाटी गर्जना करत आसपासच्यांचे डोळे दिपवून टाकावेत तसे बुधवारी चि. राहुलबाबांनी केले. आपणास बोलू दिले जात नाही हे पाहताच चि. राहुलबाबा अध्यक्षांसमोरील हौद्यात धावून तर गेलेच, परंतु त्याच्या जोडीला त्यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर थेट पक्षपातीपणाचाच आरोप केला. त्यांचे म्हणणे असे की सत्ताधारी पक्षालाच चर्चेत रस नाही. काही ना काही गडबड-गोंधळ घडवून चर्चा टाळली जाते, असे त्यांचे निरीक्षण. त्याच वेळी सत्ताधारी पक्षास फक्त एकाच व्यक्तीचा आवाज ऐकावयास आवडते, अशी छद्मी प्रतिक्रियादेखील त्यांनी नोंदवली. या संदर्भात त्यांनी अर्थातच कोणाचेही नाव घेतले नाही. पण तरी नेमक्या कोणत्या नरेंद्राविषयी ते बोलत आहेत, हे काही लपून राहिले नाही. अशा तऱ्हेने चि. राहुलबाबा यांनी दुहेरी मार्गानी आपली जागृतावस्था सिद्ध केली. काँग्रेसजनांत उत्साहाची सळसळ निर्माण झाली ती नेमकी याचमुळे. वास्तविक चि. राहुलबाबा यांनी भाजपवर केलेल्या आरोपाचे काहीही अप्रूप त्यांच्या काँग्रेस पक्षाला वाटले नाही. एकाच कोणाचा आवाज भाजपीयांना ऐकावासा वाटतो, त्याच एका आवाजाला मान मिळतो आदी मुद्दय़ांत टीका करण्यासारखे काय, या सवालाने काँग्रेसजनांना परेशान केले आहे. आम्ही जन्मोजन्मी एकाचाच आवाज ऐकत तर मोठे झालो, त्याव्यतिरिक्त आम्ही दुसऱ्या कोणाचे थोडेच काही ऐकतो असे त्यांचे म्हणणे. तेव्हा या मुद्दय़ावर चि. राहुलबाबांनी भाजपवर टीका करण्यासारखे काय, या प्रश्नाने काँग्रेसजन काहीसे गांगरले. पण त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी काही का असेना.. चि. राहुलबाबा काही बोलले तर खरे.. या मुद्दय़ावर ते खूश झाले. इतके दिवस आपले नेतृत्व करणार तरी कोण, या प्रश्नाने त्यांना चांगलेच पछाडलेले होते.   चि. राहुलबाबाने त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या एकाच कृतीने दिले. त्यामुळे काँग्रेसजनांचा उत्साह चांगलाच दुणावला असून असा भारलेला नेता असल्यास कितीही पराभव आपण पचवू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात तयार झाला आहे. अर्थात काही छिद्रान्वेषी मंडळी चि. राहुलबाबास गवसलेल्या या आक्रमकतेचा संबंध प्रियांकाताईंच्या राजकारण प्रवेश वृत्ताशी जोडत आहेत, ही बाब नोंद घेण्यासारखी. या सौभाग्यवती प्रियांका भ्रतार रॉबर्ट यांनी लवकरात लवकर राजकारणात यावे यासाठी काँग्रेसजनांचा एक समूह आपापले देव पाण्यात घालून बसलेला आहे. त्यांच्या प्रार्थनेस यश येण्याची चिन्हे असून या वर्षांखेरीस सौ. प्रियांकाताई पूर्णवेळ राजकारणात येतील असे वृत्त आहे. तेव्हा           चि. राहुलबाबास सूर सापडण्याचे कारण हे प्रियांकाताईच्या आगमनात आहे, असे म्हणतात.
काही का असेना, बंधुप्रेम असावे तर असे. प्रियांकाताई येणार या शक्यतेनेच चि. राहुलबाबांत इतका बदल होणार असेल तर ती खरोखरच आली तर काय होईल, याच्या कल्पनाचित्रानेच काँग्रेसजन हरखून गेले आहेत. आणि हे सर्व चार दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरच घडल्याने समस्त काँग्रेसजन सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..  वेडय़ा बहिणीची रे वेडी माया.. हे गाणे गात फेर धरून नाचू लागले आहेत.

Story img Loader