काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बोलावे आणि त्यावर वाद व्हावेत, काही लोकांनी (अर्थात त्यांच्या विरोधकांनी) हसावे, काही लोकांनी (अर्थात त्यांच्या समर्थकांनी) ते बोलले ते कसे योग्य होते, हे सांगत बसावे हे आता नेहमीचेच झाले आहे. दारिद्रय़ ही एक मनोवस्था आहे, हे राहुल यांचे ताजे विधानही त्यास अपवाद नाही. यूपीए सरकारने दारिद्रय़ रेषेबाबत केलेल्या विनोदाच्या पाश्र्वभूमीवर राहुल यांचे हे विधान आल्यामुळे तर त्यास अधिकच रंगत चढली. या विधानावरून ट्विटर आणि फेसबुक या समाजमाध्यमांतील स्वयंघोषित राष्ट्रहितेच्छू शब्दवीर तर राहुल यांच्यावर तुटून पडले. ट्विटरवर पप्पू विरुद्ध फेकू, यो राहुल सो डंब विरुद्ध नमोटार्ड अशी हॅशटॅगची लढाई सतत सुरूच असते. आता निवडणूक जवळ आलेली असल्याने ती अधिक चेवाने लढली जाईल. बोलणे ते बरळणे ते गरळ ओकणे येथपर्यंत अनेक हत्यारे तेथे वापरली जातील. परंतु रस्त्यावरील कळवंडीइतकीच त्यांची किंमत असते. शिवाय ट्विटरचे १५ टक्के वापरकत्रेच तेथील ८५ टक्के टिवटिव करीत असतात हेही लक्षात घेतले पाहिजे. तूर्तास ही बाब बाजूला ठेवली, तरी राहुल यांच्या त्या विधानाचा मुद्दा उरतोच. खरेतर प्रश्न राहुल यांच्या सगळ्याच विधानांबाबतच आहे! ते बोलतात खूप चांगले. तत्त्वज्ञानात्मक. आदर्शवत्. म्हणजे त्यांचे शब्द तसे असतात. परंतु शब्द म्हणजे निव्वळ स्वरयंत्रातून फुंकली गेलेली हवा. शब्दांना वजन येते कामातून, अनुभवातून. राहुल यांचे वय, त्यांची प्रतिमा, त्यांचा अनुभव यामुळे त्यांचे कोणतेही भाषण हे अजूनही शाळकरी भाषणस्पध्रेतीलच वाटते, त्यात कार्यजन्य जडत्वाचा अभाव दिसतो, परिणामी ते विनोदी ठरते. याला बहुधा त्यांच्याकडेही इलाज नसावा. अन्यथा दारिद्रय़ ही एक मनोवस्था आहे, हे विधान कोणा प्रतिष्ठित विचारवंताच्या पुस्तकातून आले असते तर ते ‘कोटेबल कोट’ अथवा सुभाषित ठरले असते. राहुल यांचे प्रस्तुत विधान संदर्भ सोडून घेतलेले असल्याचे काँग्रेस समर्थकांचे म्हणणे आहे. ते काँग्रेसविरोधकांना अर्थातच मान्य नसणार. हा राजकारणातील नेहमीचाच भंपकपणा झाला. तो नरेंद्र मोदी यांच्या विधानातील ‘गाडीखालील कुत्र्या’च्या संदर्भात आपण पाहिला, तसाच तो दिग्विजयसिंह यांच्या विधानातील ‘टंच माल’ या शब्दाच्या संदर्भातही पाहिला. कोणतेही विधान असे चिमटीत पकडून बाहेर काढून त्याचा विपर्यास करणे सोपे असते. सनसनाटीपणास भुकेलेले आपले बूमबहाद्दर ते करीतही असतात. राजकारण्यांनाही ते हवेच असते. आपल्या विरोधकाच्या तोंडास असे परस्पर शेण फासले जात असेल, तर त्यास कोणत्या राजकारण्याचा आक्षेप असेल? तीच गोष्ट आपल्यावर उलटल्यानंतर मात्र त्यांना संदर्भासह स्पष्टीकरणाची आठवण येते. या गोष्टींमधून लोकांचे दोन घडी मनोरंजन होते. परंतु समाजजीवनातील वादचच्रेचा स्तर मात्र रसातळाला जातो. कोणत्याही विषयावर ट्विटरमध्ये १४० शब्दखुणांची पिचकारी टाकून आपण कसे सजग आणि सुजाण आहोत, आपल्याकडे कशी विनोदबुद्धी आहे, हे दाखविण्याची हौस अनेकांना असते. राजकारण्यांचाही त्यात अपवाद नाही. माध्यमांतून भरणाऱ्या अशा वाचाळांच्या बाजारामुळेच आपले विचारविश्व अधिकाधिक संकुचित व द्वेषपूर्ण होत आहे. या संकुचितपणाची शिकार आज राहुल ठरले, उद्या मोदी ठरतील वा परवा आणखी कोणीतरी. हे असेच चालू राहिले, तर हसू मात्र येथील (अ)विचारस्वातंत्र्याचेच होईल.