एके काळी रायगड ही महाराष्ट्राची राजधानी होती. एके काळी ते भाताचे कोठारही होते. राजधानी सतराव्या शतकातच लयाला गेली आणि भाताचे कोठार ही ओळख केवळ भूगोलाच्या शालेय पुस्तकांपुरती राहिली. आज रायगडची खरी ओळख विकासाचे कोठार अशीच करून द्यावी लागेल. भातखाचरांचा, आगरांचा हा जिल्हा. जमिनीच्या एका तुकडय़ातून खंडी-अर्धा खंडी भात पिकला म्हणजे जणू सोनेच उगवले अशी तेथील परिस्थिती होती. आज तेथे शेतजमीन अशी राहिलीच नाही. त्यांची पैशांची झाडे बनली आणि जमीनमालकांचे गुंठामंत्री झाले! साधारणत: साठोत्तरी काळात झालेले औद्योगिकीकरण आणि ९१ नंतर त्याला मिळालेली जागतिकीकरणाची जोड यामुळे रायगडने ही विकासझेप घेतली. आज या जिल्ह्य़ावर एक दृष्टिक्षेप टाकला, तरी जिंदाल, थळ यांसारखे मोठे प्रकल्प एकीकडे दिसतात तर दुसरीकडे जेएनपीटीचे बंदर आणि द्रुतगती मार्ग. येथे दुसरी मुंबई आहेच. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात नयना क्षेत्राच्या पायाभरणीतून तिसरीही बनू घातली आहे. आणखीही महत्त्वाचे रस्ते, सागरी मार्ग, वीजनिर्मिती प्रकल्प येथे येत्या काही वर्षांत येत आहेत. आणि या सर्व विकासामुळे रायगड हा आज महाराष्ट्रातील एक सधन जिल्हा बनला आहे. हे कशामुळे झाले? एकीकडे विदर्भ-मराठवाडय़ाच्या विकासाच्या अनुशेषाची आपण चर्चा करीत असतो. रायगडशेजारच्याच ठाणे जिल्ह्य़ातील मोठा आदिवासी भाग मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहे. आणि दुसरीकडे रायगड नावाचे एक मोठे विकासबेट उभे राहत आहे. याचे कारण काय आहे? मुंबईचा शेजार आणि समुद्रकिनारा ही रायगडची बलस्थाने आहेत. तशी ती ठाण्याचीही आहेत. परंतु तरीही रायगडने ठाणे जिल्ह्य़ावर विकासाच्या बाबतीत चांगलीच मात केल्याचे दिसते, ती कशामुळे? त्याचे महत्त्वाचे कारण रायगड जलमार्गाने जोडले गेले हे आहे. शूर्पारक आणि कल्याणक (हल्लीचे सोपारा) हे बंदर होते, म्हणून श्रीस्थानक-कल्याणकपर्यंत नगरे वाढली. ते बंद पडले, तेव्हा त्या नगऱ्यांची वाढ खुंटली. एवढी ही साधी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्य़ांचा विकास कोठे रखडतो, हे यातून स्पष्ट होते. विकास येतो तो रस्त्यांतून, मग तो जमिनीवरचा असो, पाण्यातला असो वा हवाई. रस्ते हवेच. ते विविध शहरांना, बाजारपेठांना जोडणारे हवे. वाहतूक वेगवान हवी आणि ती स्वस्त हवी. रायगडमध्ये येत्या काळात आंतरराष्ट्रीय विमानतळ, वडाळा ते न्हावा शेवा हा सागरी मार्ग, बेलापूर-पेंदार मेट्रो रेल्वे येत आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होत आहे. या मार्गावरून विकासाची गाडी वेगाने धावणार यात शंका नाही. हा विकास सर्वस्तरीय नाही, असे यावर कोणी म्हणू शकेल. ते खरेही आहे. परंतु अखेर आर्थिक विकास हा धरणाच्या पाटांप्रमाणे असतो. कुठे ते पाणी मुबलक मिळते, कुणाला झिरप्यांवर समाधान मानावे लागते. या विकासाने काही प्रश्नही निर्माण केले आहेत. ‘लोकसत्ता’ने गेल्या महिन्यात आयोजित केलेल्या बदलता महाराष्ट्र परिसंवादात अर्धनागरीकरणाच्या समस्यांवरही चर्चा झाली. रायगडच्या अनेक गावांमध्ये या समस्या मोठय़ा प्रमाणावर भेडसावताना दिसत आहेत. सधनता आणि संस्कृती नेहमीच हातात हात घालून येतात असे नाही, हेच तेथे दिसत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हा एक आव्हानात्मक विषय असणार आहे. रायगडचा विकासगड होणे हा म्हणूनच एक अभ्यासविषय होण्याची गरज आहे.

Story img Loader