‘करून दाखविले’ काय आणि प्रत्यक्षात घडले काय, या चिंतेने उद्विग्न असलेले उद्धवजी मातोश्रीच्या दिवाणखान्यात अस्वस्थ येरझारा घालत असल्याची कुणकुण लागल्यामुळे महापालिकेतील बिनीचे सैनिक कमालीचे बेचैन आहेत. तसे तर, मुंबईत नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यासोबत रस्त्यांवर खड्डे होणार हे ओघानेच येत असते. खड्डे बुजविण्यासाठी कोटय़वधींची तरतूद करूनही हे पैसे नेमक्या कोणत्या पाण्यात मुरतात या शंकांनी बेजार झालेले मुंबईकर खड्डय़ांतून मार्ग काढता काढता पालिकेतील सत्ताधीशांची ‘आठवण’ काढतात आणि त्यांच्या नावाने भर आषाढात ‘फाल्गुन मास’ साजरा करतात अशी ‘गुप्तवार्ता’ पोहोचल्यामुळे अखेर तमाम पुणेकरांसमक्ष उद्धवजींनी तमाम मुंबईकरांची माफी मागितली, आणि सर्वात आधी स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे खडबडून जागे झाले. ‘नैतिक जबाबदारी’ नावाचा नवा प्रकार प्रभावीपणे राजकारणात वावरू लागला आहे. ‘भौतिक जबाबदारी’चा विसर पडला, तरी ‘नैतिक जबाबदारी’चे प्रदर्शन करून वेळ मारून नेता येते. खड्डय़ाखड्डय़ांतून डोकावणाऱ्या अपयशाच्या उद्विग्नतेतून उद्धवजींनी पुण्यातून मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केल्याचे वृत्त कळताच, राहुल शेवाळे यांना याच नैतिक जबाबदारीची जाणीव झाली आणि त्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा उद्धवजींकडे पाठवून दिला. नागरिकांना सुसह्य़ रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची भौतिक जबाबदारी पार पाडून दाखविण्याचे ‘राहून गेल्यामुळे’ राहुल शेवाळे यांच्या मनात पश्चात्तापाचा महापूर आला असावा. लगेच उद्धवजींनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला, आणि सर्वपक्षीय राजकारणात सोयीनुसार हमखास मदतीला धावून येणारा ‘कामाला लागा’ असा आदेश पुन्हा एकदा देऊन टाकला. गेल्या निवडणुकीत ‘करून दाखविल्या’मुळेच सत्ता मिळाली होती, हे उद्धवजींना चांगले आठवत असल्यामुळे ‘कामाला लागा’च्या आदेशानंतर तरी पुन्हा पालिकेतील सैनिक काही तरी ‘करून दाखवतील’ अशा भाबडय़ा समजुतीत मुंबईकरांची मने कळवळतील, असा कदाचित यामागचा होरा असावा. शेवाळे यांचा राजीनामा आणि तो फेटाळून कामाला लागण्याचा उद्धवजींचा आदेश यामागे ‘क्षणाचे नाटक’ नीती असावी असा संशयही कदाचित मुंबईकरांच्या मनात बळावेल. खड्डय़ांच्या समस्येने चहुबाजूंनी वेढलेल्या सामान्य मुंबईकरांच्या समस्यांना आणि खड्डय़ांच्या भ्रष्ट अर्थकारणास वाचा फोडणाऱ्या ‘टक्केवारीच्या भ्रष्टखुणा’ ही मालिका ‘लोकसत्ता’ने सुरू केली आणि दुसऱ्याच दिवशी उच्च न्यायालयानेच याची  दखल घेत पालिकेलाही फैलावर घेतले. लगेचच मुंबईकरांची माफी मागून उद्धवजींनी अपयशाची थेट कबुलीच देऊन टाकली. आता शेवाळे कोणत्या कामाला लागतात, याकडे जनतेचेही लक्ष लागणार आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडले आहेत, तसे खिळखिळे झालेले पेव्हरब्लॉकही निसरडे झाले आहेत. यामुळे कुणाचा जीव जातो आहे, तर कुणी घसरून पडून जायबंदी होत आहे. खड्डे आणि निसरडय़ा रस्त्यांवर आता शेवाळे यांना काही तरी करून दाखवावे लागणार आहे. पालिकेच्या वेबसाइटवरचे खड्डय़ांच्या छायाचित्रांचे पान बुजविले गेले तरी खड्डय़ांचे वास्तव मात्र बुजलेले नाही. त्या बुजविलेल्या पानावर एका तरी गुळगुळीत रस्त्याचे छायाचित्र झळकावण्याची धमक शेवाळे यांनी दाखवली, तर नैतिक जबाबदारीच्या जाणिवा जाग्या असल्याची जनतेची खात्री पटेल.

Story img Loader