ऑक्टोबरातल्या पावसानं महाराष्ट्रभर हजेरी लावली, विदर्भाला तर दिलासाच दिला.. पुण्यात ऑक्टोबर हा पावसाचाच महिना मानावा लागतो आहे.. हा बदल कधी झाला? ‘२०० वर्षांत दोन आठवडय़ानं पुढे’ सरकणाऱ्या पावसाळ्यानं चाल बदललीय का?
या वेळचा पावसाळा अनेक दृष्टीनी वेगळा ठरला. इतका की मोसमी पावसाने त्याचे सर्वच वेळापत्रक झुगारून दिलं. आता तर निम्मा ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस पूर्णपणे थांबल्याची खात्री देता येत नाही. उकाडय़ाने दुपापर्यंत हैराण केल्यानंतर कधी आणि कसा पाऊस पडेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे गणित बिनसल्यासारखे दिसले. त्याचे आगमन वेळेवर झाले, पण त्यानंतर जून महिन्यात त्याने इतकी निराशा केली की शेतकऱ्यांपासून ते शहरात राहणाऱ्यांपर्यंत सर्वाच्याच तोंडचे पाणी पळाले. मधल्या काळातील प्रवासात चढउतार झालेच. पण सर्वात चिंता होती ती या वर्षीच्या पावसावर असलेल्या ‘एल-निनो’ च्या सावटाची. त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटाला पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी असेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र हे सावट आले नाही आणि शेवटच्या काळात पावसाने बरीच तूट भरून काढली. महाराष्ट्राच्या दृष्टीने तर त्याचा शेवट फारच चांगला झाला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात इतका पाऊस पडला की तो पावसाळ्यातील एखादा महिना वाटावा, तसा वाटला.. त्यामुळे पाऊस बदललाय का, या चर्चेला पुन्हा बळ मिळाले.
जूनमध्ये अतिशय तोकडा पाऊस पडतो. त्याच वेळी जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे अधिकृत चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात धो-धो पाऊस कोसळतो. अनेक भागात तर संपूर्ण पावसाळ्यात पडला नाही असा पाऊस ऑक्टोबरमध्ये अनुभवायला मिळाला. गणपती संपल्यानंतर त्याला सुरुवात झाली, मग त्याने आठवडाभर बहुतांश राज्याला झोडपून काढले. त्यामुळे बराचसा खरीप (पावसाळी) हंगाम वाया गेला तरी रब्बी (हिवाळी) हंगामासाठी बरी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्टोबर महिन्यातील पाऊस नवा नाही. या काळात वादळी पाऊस पडतोच, विशेषत: दुष्काळी पट्टय़ात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या पावसाची हजेरी लागतेच. पण या वेळचे त्याचे प्रमाण फारच वेगळे होते. पुणे-सातारा या पट्टय़ात तर पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत पडला नाही इतका पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या पाच-सहा दिवसांत पडला. अध्र्याहून अधिक महाराष्ट्रातही पावसाच्या दृष्टीने संपूर्ण जून महिन्यापेक्षा ऑक्टोबरचा एकच आठवडा भारी ठरला. राज्याच्या सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात हे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे एरवी अगदीच अभावाने असे दिसणाऱ्या मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे दिसून आले.. याचा स्पष्ट अर्थ असा की काहीतरी बदल घडत आहेत. मुद्दा एवढाच आहे की, ते एक-दोन वर्षांपुरते अपवाद म्हणून आहेत की दीर्घकालीन आहेत.
मान्सूनचे आगमन आणि त्याचा परतीचा प्रवास याबाबत मागच्या काही वर्षांमध्ये निश्चितपणे वेगळेपण पाहायला मिळाले आहे. तो वेळेआधीच संपूर्ण देश व्यापू लागला आहे आणि त्याचा परतीचा प्रवासही उशिराने सुरू होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास राजस्थानच्या वाळवंटातून सुरू होतो. आताच्या वेळापत्रकानुसार त्याला सुरुवात होते ती सामान्यत: १ सप्टेंबरच्या आसपास. मात्र, गेली सलग ५-६ वर्षे हा प्रवास सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत आहे. हा बदल देशपातळीवरचा आहे. याचबरोबर छोटय़ा पातळीवरील एक बदलही मुद्दाम नोंदवत आहे. हे निरीक्षण पुण्याच्या पावसाचे आहे. पुण्यात सलग गेली चार-पाच वर्षे पावसाळा संपता संपता किंवा संपल्यावर खूप मोठा वादळी पाऊस हजेरी लावत असल्याचे
हवामान विभागातर्फे याबाबत अलीकडेच झालेला अभ्यासही महत्त्वपूर्ण भाष्य करतो. त्यानुसार गेल्या २०० वर्षांच्या आकडेवारीनुसार मान्सूनचा काळ साधारणत: दोन आठवडय़ांनी पुढे सरकल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या वर्षीचे आणि गेल्या काही वर्षांमधील पावसाचे वर्तन त्यात बसणारे आहे. त्यामुळे मोसमी पाऊस बदलतोय का, अशीही शंका येईल. हवामानाचा कल ठरवताना केवळ पाच-दहा वर्षांचा विचार करून चालत नाही. कारण प्रत्येक वर्षीच्या पावसात काही चढउतार असतातच. त्यामुळे हे बदल दीर्घकाळ आहेत का हे ठरविण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. तोपर्यंत पावसाळ्याचा मुख्य कालावधी हा जून ते सप्टेंबर असाच मानावा लागेल. पावसाने पुढच्या काळातही ऑक्टोबरमध्ये अशीच हजेरी लावणे सुरू ठेवल्यास याबाबत काहीतरी ठरवावे लागेल.. पण पावसात निश्चितपणे काही ना काही बदल होत आहेत हे मात्र तोवर स्वीकारावेच लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा