विविध पंचांगांत पावसाचे दिवस- तारखांनिशी दिलेले असतात; पण पावसाचे अंदाज वर्तविणे हे काही पंचांगकर्त्यांचे मूळ उद्दिष्ट नाही. पंचांगातील या तारखा शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकतील का या दृष्टीने ‘कृषीज्ञानकोशा’चे कर्ते अशोक जोशी यांनी ‘लोकसत्ता’त दोन लेख लिहिले आणि त्या निरीक्षणांची सत्यता तिऱ्हाईत तज्ज्ञांनी तपासावी, यादृष्टीने प्रयत्नही केले. या पडताळणीतून तसेच पंचांगे आणि पावसाचे आधुनिक अंदाजशास्त्र यांच्या कार्यपद्धतींतील फरक लक्षात घेऊन निर्माण झालेले हे काही प्रश्न, इथे उत्तरांसह; तरीही खुले..
कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने पावसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पावसाची सुररुवात, शेवट, उघडीप व एकूण वार्षिक पर्जन्यमान यांचा अंदाज आधी मिळाला तर त्याप्रमाणे पीकनियोजन करून उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते हे सर्वमान्य आहे.
मागच्या वर्षी (२०१२ साली) पाऊस फारच अनियमित होता. तेव्हा पावसाची सर्वत्र चर्चा चालू होती. कृषिज्ञानकोशाचे संपादक अशोक महादेव जोशी यांच्याबरोबरील चर्चेच्या ओघात पारंपरिक ज्ञान म्हणून पंचांगांचा उल्लेख झाला. त्यांनी २ सप्टेंबर २०१२ रोजी ‘लोकसत्ता’त येरे घना, येरे घना हा लेख लिहून २०१२ सालच्या पावसाचे पंचांगातील आडाखे आणि त्यामागील पंचांगकारांचे शास्त्र यांचे विवेचन केले होते. त्यानंतर ९ जून २०१३ रोजी वराहमिहिर आणि पर्जन्यविचार हा त्यांचा ‘लोकसत्ता’त आलेला लेख तसेच तसेच त्या सालची दाते, राजंदेकर तसेच रुईकर यांची पंचांगे त्यांनी मला दिली आणि मर्यादित माहितीसाठी पुढील प्रश्न उपस्थित केले-
१) पंचांगातील पावसाचे अंदाज किती प्रमाणात बरोबर असतात ?
२) हे अंदाज किती प्रमाणात उपयुक्त आहेत?
या प्रश्नांचा अभ्यास करण्यापूर्वी प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की पावसाचे अंदाज वर्तविणे हे पंचांगकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट नाही. आणि त्यांनी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजांपेक्षा पंचांगातील अंदाज जास्त बरोबर असतात असा कुठेच दावा केलेला नाही. तसेच कोणत्याही पंचांगकर्त्यांने आमच्या अंदाजाचा वापर करून शेती केल्यास शेतकऱ्याचा फायदा होईल अशी कोणतीही जाहिरात करून पंचांगाची विक्री केलेली नाही. ही पाश्र्वभूमी मनात ठेवून पुढील विवेचन केले आहे.
प्रश्नांची होय किंवा नाही इतपत उत्तरे देण्याइतके प्रस्तुत संकलकाचे ज्ञान किंवा संशोधन नाही. परंतु पारंपरिक ज्ञान व आधुनिक विज्ञान या दोन्ही गोष्टींची गरज असून त्यांच्या साहाय्याने अधिक परिपूर्ण अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. पारंपरिक पद्धतीत स्थानिक परिस्थितीचा विचार केलेला असतो तर वैज्ञानिक पद्धतीत वैश्विक नियमांचा अधिक वापर केलेला असतो. दोघेही आपापल्या परीने सर्वसामान्यांना सेवा देण्यात गुंतलेले असतात आणि जास्त अचूकतेकडे त्यांचा अविरत प्रयत्न असतो.
प्रस्तुत विवेचनात अतितांत्रिक बाबी व दीर्घ निबंध या दोन्ही गोष्टी टाळलेल्या आहेत, कारण तो एक स्वतंत्र अभ्यासविषय आहे.
अंदाज हे भविष्यातील अनिश्चिततेशी सामना करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. भूत व वर्तमान यांतील माहितीच्या आधारे अंदाज केले जातात. कोणती माहिती किती आवश्यक वा पुरेशी आहे व विश्लेषणाच्या कोणत्या पद्धती शक्य आहेत याचा प्रत्येक संशोधक विचार करत असतो. अंदाज हा संपूर्ण बरोबर किंवा चूक या प्रकारात बसविता येत नाही. तो संभाव्यता म्हणून मांडावा लागतो व भविष्यात त्याची पडताळणी करून त्याचा वापर आपल्या अनुभवाप्रमाणे करावा लागतो.
पावसाचा अधिकृत अंदाज देण्याचे काम भारत सरकारच्या वतीने भारतीय हवामानशास्त्र विभाग करत असतो. त्यांच्याकडे शंभराहून अधिक वर्षांची माहिती, निरीक्षणाची आधुनिक साधने, संगणक, ज्ञानी माणसे, अनुभवी शास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय देवघेव इत्यादींची मदत असते. हा विभाग निरनिराळ्या प्रकारच्या अंदाजांचे अहवाल देत असतो. उदा. एक-दोन दिवसांसाठी, एखाद्या ठिकाणासाठी वा वार्षिक दीर्घ काळासाठी एकूण पाऊसमान, सुरुवातीची तारीख, शेवटची तारीख, इ. मात्र सहा महिने आधी तारीखवार, प्रदेशवार पावसाची संभाव्यता दिलेली वाचनात नाही. पंचांगकर्ते अशी माहिती संक्षिप्त स्वरूपात उपलब्ध करतात (दाते पंचांग-पृष्ठ क्र. ८०, राजंदेकर पंचांग- पृष्ठ क्र. ९२-९३ व रुईकर पंचांग- पृष्ठ क्र. ९२-९३). दोघांची एकास एक अशी तुलना करता येत नाही व आहेत त्या स्वरूपात दोन्ही अंदाजांची पडताळणी करावी लागते.
कोणताही अंदाज योग्य किंवा अयोग्य ठरविण्यासाठी अंदाजांच्या गुणधर्माची निश्चिती करावी लागते आणि अंदाज आणि प्रत्यक्षात झालेली गोष्ट यांतील तफावत मोजण्याची पद्धती निश्चित करावी लागते. या संदर्भातील निकष पुढीलप्रमाणे असू शकतात-
१) अचूकता (२) संभाव्यता (३) विश्वासार्हता (४) स्थळ, काळ व प्रसंग (५) ढोबळमानाचे प्रमाण (६) दोन अंदाजातील फरकाचा परिणाम.
वरीलप्रमाणे गुणधर्म आपापल्या उद्देशांप्रमाणे आधी निश्चित करावेत. निर्णय घेताना प्रचलित गणिती पद्धतीप्रमाणे संख्याशास्त्रीय नियम ‘ब्रायर स्कोअर’ वापरता येतो. परंतु पंचांगामागील ग्रहगणित किंवा होराशास्त्र ही पद्धत वेगळी असल्याने त्यासंबंधातील निकष व सिद्धांत वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसासंबंधी अंदाज अचूक येण्याच्या मर्यादा समजण्यासाठी पुढील २-३ सोपी उदाहरणे पाहू.
प्रश्न १) – हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील एखाद्या थेंबाची वाफ झाली तर त्या वाफेचा कणसमूह पावसाचा थेंब बनून पुण्याच्या पर्वतीवर पडेल का? पडल्यास किती दिवसांनी पडेल?
उत्तर – सांगता येत नाही, कारण थेंब > वाफ > टॅग > यांचा ट्रेस शक्य व्हायला हवा. मात्र अॅग्रेगेशनमुळे अभ्यास शक्य आहे.
प्रश्न २) – या वर्षी पुण्यात एकदा तरी पाऊस पडेल का?
उत्तर – हो. कारण निसर्गक्रमाप्रमाणे उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो व पाऊस पडतो.
प्रश्न ३) – ब + ह (ब अधिक/उणे ह, म्हणजे कमाल व किमान अंदाज ) = किती?
उत्तर- ब आणि ह बद्दल पुरेशी माहिती नाही. आता समजा ब= १०+ ४ आणि ह= ५+ २ तर ब + ह = कमीत कमी ९, जास्तीत जास्त २१ व अन्य अधेमधे.
वरील उदाहरणात दोनच घटक घेतले तरी किती प्रकारचे अंदाज होतात! पावसाच्या बाबतीत सहा ते आठ घटक होतात. या परिस्थितीत अंदाज करणे किती कठीण याची कल्पना यावी.
प्रश्न ४) – एक मोटार सरासरी ६० कि.मी. वेगाने जात असेल तर ३०० कि.मी. वरील ब या ठिकाणी जाण्यास तिला किती वेळ लागेल?
उत्तर- ५ तास. कारण वेग व अंतर, प्रवास रस्ता, सुरुवात व शेवट, अडथळे स्वनिर्मित वा परनिर्मित नाहीत यांची माहिती आहे.पावसाच्या बाबतीत प्रारंभिक परिस्थिती, घटकांचे संक्रमण व कार्य हे अनिश्चित असल्यामुळे शेवटची स्थिती अनिश्चित. पावसाच्या बाबतीत जागतिक व स्थानिक असे सर्व प्रकारचे परिणाम घडत असतात. (वरील उदाहरणे मुद्दाम सोपी करून मांडली आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती जास्त गुंतागुंतीची असते व सध्या आकलनाला मर्यादा आहेत.
पंचांगाच्या शास्त्रीयतेबद्दल मागील काही वर्षांत कुंडली व अंदाज याबाबत कोर्टकचेऱ्या झाल्या आहेत. त्या वादात न शिरताही अजून सुधारणेला वाव आहे असे म्हणण्यास हरकत नसावी तसेच गेल्या पाच-सहा वर्षांत विविध सरकारी व खासगी संस्था पावसाच्या आधुनिक व पारंपरिक स्वरूपावर विशेष संशोधन करीत आहेत; पण निर्णायक निष्कर्ष अजून उपलब्ध झालेले नाहीत.
पंचांगाधारे हवामानाचा अंदाज देताना विशेषत: या वर्षी (२०१२-२०१३) साली उत्तराखंडात पावसामुळे झालेला अनर्थ तसेच पूर्व किनाऱ्यावर फायलिन वादळामुळे झालेले प्रचंड नुकसान या विषयी कोणत्याही पंचांगकर्त्यांने अंदाज व्यक्त केलेले नाहीत. हवामान खात्याने मात्र फायलिन वादळाची तपशीलवार माहिती दिल्यामुळे ओडिशात मोठा नरसंहार टळला. ग्रहस्थितीवरून वातचक्राचा अंदाज घेता येतो हा पंचांगकर्त्यांचा दावा यामुळे मान्य करता येत नाही. आपल्या पंचांगकर्त्यांना आपल्या सूर्यमालेतील फक्त नऊ ग्रहच माहिती आहेत; पण आणखीही ग्रह आपल्याच सूर्यमालेत आहेत आणि विश्वात अशा अनेक सूर्यमाला आहेत असे आता सिद्ध झालेले आहे. वातचक्राच्या संदर्भात या सूर्यमालांचाही परिणाम होत असण्याचा संभव आहे.
वराहमिहिर किंवा त्याच्या आधी काही जणांनी (पराशर) पावसाचे आडाखे किंवा एकूणच ग्रहस्थिती व त्यानुसार विविध गोष्टींविषयी अंदाजाच्या पद्धती दिल्या आहेत. त्यानुसार विशेषत: पावसाच्या संदर्भात गणिताने काही तारखा येतही असतील; पण त्या कितपत विश्वासार्ह आहेत या विषयी शंका वाटते.
एकाच पद्धतीने विचार करूनही दाते, राजंदेकर व रुईकर यांच्या तारखांत फरक येतो, तो का?
मी या तीनही पंचांगकर्त्यांनी दिलेल्या तारखांप्रमाणे २०१२-२०१३ सालच्या पावसाच्या नोंदी ठेवल्या आहेत. काही वेळा तारखा बरोबर येतात पण काही वेळा त्या चुकीच्या असतात.
तरी वरील विवेचनावरून असा निष्कर्ष काढता येईल की एकूणच हवामानाचा अंदाज व्यक्त करणे ही गोष्ट अतिशय अवघड आहे म्हणून दोन्ही पद्धतींचा वापर करणे सयुक्तिक ठरेल. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या वेबसाइट्सवर उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. ती बघून आपले मत बनवावे.
– लेखक शासकीय सेवेतील
मुख्य अभियंता आहेत.
पंचांग न बघणारा पाऊस!
विविध पंचांगांत पावसाचे दिवस- तारखांनिशी दिलेले असतात; पण पावसाचे अंदाज वर्तविणे हे काही पंचांगकर्त्यांचे मूळ उद्दिष्ट नाही. पंचांगातील या तारखा शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकतील का या दृष्टीने
First published on: 09-11-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain that came without aware of almanac