अखिल भारतीय महाराष्ट्रात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ब्रह्मांडनायक रजनीकांत यांना खास आवतण देण्याची जी खास टूम निघाली आहे, तिचे स्वागत करताना समस्तांस आनंदच होईल याविषयी कोणासही शंका असण्याचे कारण नाही. रजनीकांत हे राष्ट्र अभिनेते असून, ते जन्माने मराठी आहेत. ही त्यांची साहित्य संमेलनासाठीची खास अर्हता येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. जाणते संमेलन रसिक ती ध्यानी घेतीलच. दुसरी याहून महत्त्वाची बाब म्हणजे रजनीकांत हे भूमिपुत्रही आहेत. म्हणजे ते संमेलनभूमीतले. जेजुरीनजीकच्या मावडे कडेपठार या गावाचे. यावर कोणी अजाणते अशी शंका घेईल, की बोवा, साहित्याच्या भूमीमध्ये ही भूमिपुत्राची भूमिका कोठून बरे आली? साहित्य म्हणजे साहित्य. त्यास सीमा आणि कुंपण असेलच, तर ते केवळ विश्वाचे. परंतु त्यांस हे ज्ञात नाही, की आता साहित्यातला सीमावाद संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीतही निर्ढावला आहे. अशा वेळी रजनीकांत यांस या मुद्दय़ावर आवतण गेले तर त्यात वावगे ते काय? हे आवतण मावडे कडेपठारच्या उपसरपंचांनी रजनीकांत यांना पाठविले आहे. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव या नात्याने त्यांनी ते संमेलनाच्या लेटरहेडवरून ई-मेलद्वारे धाडले आहे. वृत्तपत्रांच्या साहित्यप्रतिनिधींनी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी. हल्लीची साहित्य संमेलने आणि महाराष्ट्राचा ग्रामीण भाग किती उच्चतंत्रनिपुण झाला आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाचे फेसबुक अकाऊंट तयार झाले रे झाले, की लगेच ‘साहित्य संमेलन झाले हायटेक’ अशा खास बातम्या त्यांना यापुढे देता येणार नाहीत. या ई-मेलद्वारे मा. उपसरपंच यांनी रजनीकांत यांना साहित्यिक व भावनिक आवाहन केले असेलच. मराठी माणूस भावनांनी वाहत जातो. तेव्हा या आवाहनाचा इष्ट तो परिणाम होईलच. त्याचबरोबर यापूर्वी मराठी साहित्याचे स्वयंघोषित माहेरघर जे पुणे, तेथे झालेल्या एका अ. भा. साहित्य संमेलनास साक्षात अमिताभ बच्चन हेही मान्यवर अतिथी म्हणून आले होते व त्यांनी तेथे अग्निपथच्या पंक्ती पाठ म्हणून दाखविल्या होत्या, हा इतिहासही या ई-पत्रामध्ये सांगितला असता तर अधिक बरे झाले असते. कारण की भावनांप्रमाणेच मराठी माणूस इतिहासानेही वाहून जात असतो, हा इतिहास आहे. आणि हा इतिहास असे सांगतो आहे, की अ. भा. साहित्य संमेलनाचे स्वरूप दिवसेंदिवस साहित्यिकांचे हळदीकुंकू या संज्ञेस अधिकाधिक पात्र होत चालले आहे. आता वस्तुस्थिती अशी आहे, की मराठी साहित्यिकांमध्ये साहित्यिक खूपच कमी राहिले असून, जे आहेत त्यांच्या नावावर पुस्तके खपणे दूर. गर्दीची तर बातच नको, हे खुद्द काही लेखकांचेच निरीक्षण आहे. आणि संमेलनांचे यशापयश तर बाजारी मूल्यांवर म्हणजे एक तर गर्दीच्या संख्येवर ठरते किंवा पुस्तकांच्या खपाच्या आकडय़ांवर तरी ठरते. तेव्हा साहित्यिकांच्या नावावर संमेलनाची जत्रा किती यशस्वी होईल याची स्वागत समितीलाही शंकाच असते. अशा वेळी रजनीकांत यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व गर्दी जमविण्यास बरे, असा त्यांचा आपला विचार असावा. तो रास्तच आहे. मात्र आता कार्यबाहुल्यामुळे रजनीकांत येऊ शकले नाहीत, तर साहित्य रसिकांचा चांगलाच हिरमोड होईल. त्यांना जोजविण्यासाठी या संमेलनात रजनीकांत यांच्या अभिजात विनोदांवर एखादा परिसंवाद, त्यांच्या विनोदांच्या पुस्तिकांचे वाटप, विनोदांचे अभिवाचन असे उपक्रम योजावेत आणि येथून पुढे रसिकांच्या अपेक्षा इतक्या उंचावू नयेत. रजनीकांत यांच्यासारख्या बडय़ांऐवजी राखीताई सावंत यांच्यासारख्या मराठी मातब्बरांस आवतण द्यावे. ते कसे संमेलनाच्या हेतूस धरून होईल!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा