‘२००२ साली काय झाले ते विसरून जाऊ या व हिंदू- मुस्लीम एकत्र येऊन सर्वाची व देशाची प्रगती करू या’ हे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ‘मुस्लीम बांधवां’ना केलेले आवाहन म्हणजे निवडणुकांचे स्वागत गीत आहे. मोठय़ा संख्येने असलेल्या मुस्लिमां शिवाय दिल्लीचे तख्त काबीज करणे अवघड आहे याची फक्त निवडणुकीपुरती असलेली जाणीव असे वदवून घेते.. पण हे पुतना मावशीचे प्रेम आहे हे न कळण्याइतपत मुस्लीम दुधखुळे आहेत असे मानण्याचा हा प्रकार आहे.
कट्टर मुस्लीम आपले घरदार व जन्मभूमी सोडून पाकिस्तानमध्ये निघून गेले. मागे राहिलेले मुस्लीम हे आपल्या मातृभूमीच्या प्रेमाने काही संपत्ती नसतानासुद्धा येथेच राहिले. बरे, यांच्या वंशवळींचा अभ्यास केला तर स्वातंत्र्यपूर्व काळात फार तर दोन किंवा तीन पिढय़ांपूर्वी यांपैकी अनेक जण हिंदू होते. अगदी बॅ. मोहमद अली जीना यांचे आजोबा पुंजाभाई हेसुद्धा हिंदू होते. ही गोष्ट भाजप म्हणजेच त्या वेळच्या जनसंघाने कधीच विचारात घेतली नाही. धर्माच्या आधारे देश खंडित झाल्याच्या रागाने हिंदुनिष्ठांची बुद्धी बधिर झाली व सर्वच मुस्लीम हे देशाचे दुश्मन आहेत हा मूलभूत विचार म्हणून स्वीकारला. तीन-चार पिढय़ांपूर्वी हिंदू असणाऱ्यांच्या पुढील पिढय़ांना कधीही आपले म्हणण्याची मानसिकता स्वीकारली नाही. तसेच त्यांना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्नच काय पण विचारही केला नाही. त्यामुळे समाज एकसंध करणे देशहिताचे आहे हे या जाज्वल्य देशप्रेमींच्या कधी लक्षातच आले नाही. ही दूरदृष्टी त्या वेळच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी दाखवली त्यामुळे स्वातंत्र्यानंतर कितीतरी निवडणुकांत काँग्रेसच्या पाठीशी मुस्लीम मतदार उभा राहिला.
जर आरएसएस या मातृसंस्थेच्या धोरणात जर काही बदल होत असेल व आपले धोरण परत नव्याने बदलायला तयार असेल तरच भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या मुस्लिमांना केलेल्या आवाहनाला काही अर्थ प्राप्त होईल.
प्रसाद भावे, सातारा.
गाडगीळ काहीही म्हणोत.. ‘विकास’ होणारच?
‘उत्तराखंडचा कित्ता’ हा विजय दिवाण यांचा लेख (२५ जून) लक्षवेधी आहे. हिमालयात काय घडले हे आता सर्वानाच समजले आहे. सह्याद्रीच्या परिसरात काय घडणार हेच पाहायचे आहे. डॉ. माधव गाडगीळ यांच्या सारख्या लोकांनी लिहिलेले, सांगितलेले आपले राज्यकत्रे ऐकत नसतात. कारण त्यात त्यांचे भले नसते.
बॅ. धनंजयराव गाडगीळ यांनी १९६९ साली वसई-विरार याठिकाणी किती व कशी लोकसंख्या असावी याचे आडाखे त्यावेळच्या राज्यकर्त्यांना सांगितले होते, मात्र त्याची अमलबजावणी केली गेली नाही. सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी आमच्या पूर्वजांनी तलाव, विहिरी, बावखाल खोदून पिढय़ानपिढय़ा त्यांचे जतन केले. १९८८ साली सरकारने हा भूभाग शहरीकरणासाठी जाहीर केला. त्याला हरित वसई संरक्षण समितीने विरोध केला. खाजण भागात बहुमजली इमारती बंधू नका, विहिरी व तलाव बुजवू नयेत, अशी भूमिका घेतली. त्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनीही पाठिंबा दिला. त्यावेळच्या केंद्रीय पर्यावरण मंत्री मेनका गांधी यांनी राज्य सरकारला पत्र लिहून, या भागाचे शहरीकरण करताना निसर्ग उध्वस्त होणार नाही याची काळजी घेण्याचे सुचविले, त्याची नोंदही घेतली गेली नाही.
महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली बकालीकरणाचा उद्योग सुरू आहेच, त्यामुळे माधव गाडगीळ यांचा शब्द मानला जाईल असे वाटत नाही. वसई परिसरात विहिरींतील पाणी मानवी वापरास धोकादायक होऊ लागले आहे. किमान गाडगीळ समितीच्या शिफारशी या भागाला त्वरित लागू कराव्यात, अशी परिस्थिती आहे.
मार्कुस डाबरे, पापडी, वसई
देवळे नव्हती, माणूस होताच!
‘गल्लत, गफलत, गहजब!’ या सदरात प्रसिद्ध झालेला राजीव साने यांचा ‘महत्त्वाचे काय? : ईश्वराचे अस्तित्व की त्याचे स्वरूप?’ हा लेख (२१ जून) वाचला. लेखामध्ये सर्वेश्वरवाद अर्थात पँथिईसम या विचारसरणीचा पुरस्कार केला आहे. सरधोपट ईश्वरवादापेक्षा सर्वेश्वरवाद आकर्षक वाटणे साहजिक आहे. परंतु यात एक मेख अशी आहे की एकदा तुम्ही देवाचे अस्तित्व श्रद्धेच्या आधारावर मान्य केले, मग तो देव कुठल्याही प्रकारचा असो, त्याची उपासना ही येणारच. इतिहासाने हे वारंवार सिद्ध केले आहे की देव ही संकल्पना नतिकदृष्टय़ा कमकुवत लोकांच्या डोक्यात भिनल्यानंतर देवाविषयी चालणारे तत्त्वज्ञान थांबते आणि धर्म सुरू होतो. एकदा सुरू झालेला धर्म पुरोहित आणि राज्यकत्रे यांच्या सोयीचा असल्याने लेखात उल्लेखलेल्या अन्य मार्गानी वाटचाल करू लगतो.
देव, परमात्मा, किंवा ब्रह्म या तार्किकदृष्टय़ा अत्यंत तकलादू संकल्पना आहेत. या सर्व संकल्पना माणसाच्या आपण कोण आहो? काय करतो आहो? आणि कुठे चाललो आहो? या प्राचीन प्रश्नांचे उत्तर द्यायचा एक अत्यंत जुना मार्ग आहे.
या सर्व संकल्पना ठिसूळ आणि कमकुवत असण्यामागचे कारण त्या संकल्पनांमध्येच दडले आहे. चांगले आणि वाईट दोन्ही जर ईश्वराचाच भाग आहे, तर ते ज्ञान (बऱ्या वाईटाचे) आपल्याला, कुठून मिळते? देव कुठून आला आणि जग निर्माण करण्यापूर्वी तो काय करत होता? देवाला कुणी निर्माण केले? हे प्रश्न प्रत्येक आस्तिक विचारसरणीत, मग ती सर्वेश्वरवादी का असेना, निर्माण होतात आणि अनुत्तरित राहतात. या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे न मिळाल्याने देव नाही हे उत्तर मान्य करणे भाग पडते.
प्राचीन मानवाचा इतिहास हेच सांगतो की, भूकंप, ज्वालामुखी-उद्रेक, वादळे, पूर, या आणि यांसारख्या आपत्तींविषयी वाटणारी भीती हाच देव या संकल्पनेचा उगम आहे. त्यामुळेच बहुधा देवाविषयी वर उल्लेखलेल्या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे मिळणे अवघडच नाही तर अशक्य आहे.
लेखात भक्कम श्रद्धेची गरज अधोरेखित केली आहे. परंतु ही श्रद्धा मुदलात असावीच कशाला? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. कुठल्याही ईश्वरी गृहीतकाशिवाय जग चालणे थांबत नाही हे सत्य आहे, कारण मनुष्य पृथ्वीवर लाखो वर्षे देवळे न बांधता राहतच होता आणि प्रगती साधतच होता. आस्तिक विचारसरणी ही आपल्या निसर्गाविषयीच्या प्रागतिहासिक भीतीमधून आली आहे. म्हणूनच ती दगडी हत्यारांसोबत इतिहासात मागे सोडणे गरजेचे आहे.
श्रीनिधी घाटपांडे
संधिसाधू आणि गमावलेली संधी
‘देवभूमीत माणुसकी हरवली.. ’ ही बातमी (लोकसत्ता, २५ जून) वाचली. एकीकडे उत्तराखंडमध्ये मदतकार्यात मदतीचा ओघ सुरू झाला असताना अशी लुटालूट स्थानिकांनी करावी हे दुर्दैवी आहे. अर्थात बाहेरून आलेली सर्वच मदत ही आपत्तीग्रस्तांना पोहोचेल की नाही ही शंका असतेच, कारण अशा वेळी स्थानिक संधिसाधू जागृत होतात. १९९३ला किल्लारी येथे भूकंप झाला त्या वेळीही उच्च प्रतीचे घडीचे तंबू परदेशातून आले, ते अनेक नेत्यांच्या फार्महाऊसवर पोहोचले होते.
असाच आणखी एक विरोधाभास – उत्तराखंडसाठी एका बाजूला आíथक मदतीचे आवाहन होत असताना श्रीमंत बीसीसीआयने मात्र अजून कोणतीही मदत न करता केला. त्यांनी आवर्जून भारतीय संघाला मात्र आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडकाचे प्रत्येकी कोटी रुपये जाहीर केले. विजेत्या खेळाडूंना हे बक्षीस देणे गर नाही; मात्र अशीच मदत त्यांनी या आपदग्रस्तांना दिली तर त्याची क्रिकेटच्या इतिहासात त्याची नोंद अवश्य होईल.
प्रवीण आंबेसकर, ठाणे
‘भावी महासत्ते’मधील ‘भाविकां’चे लाड..
माधव गोगटे यांच्या अभ्यासावर आधारित, केदारनाथ येथील अनर्थाची भौगोलिक आणि वैज्ञानिकदृष्टय़ा कारणमीमांसा करणारा लेख (रविवार विशेष, २३ जून) वाचला आणि प्रत्येक ओळीनिशी मनाची अस्वस्थता वाढत गेली.
आपल्यासारख्या, महासत्तेची स्वप्नं बघणाऱ्या देशात मूर्तीमध्ये देव आहे आणि त्याच्या दर्शनासाठी प्राणघातक प्रवासाची तयारी असणारे लाखो लोक आहेत हे जाणून अतिशय वाईट वाटले. आजकाल प्रत्येक तीर्थक्षेत्रातील गर्दी लाखोंच्या घरात आहे, आणि या गर्दीच्या गरजा पुरवताना तीर्थक्षेत्राचे बाजारीकरण होत आहे. हे बाजारीकरण करताना आणि ‘भक्तां’चे लाड पुरविताना निसर्गाची पायमल्ली होते आहे. तात्पर्य हेच की, या सगळ्या प्रलयासाठी भाबडी आणि हौशी जनताच सर्वतोपरी जबाबदार आहे.
– ओंकार चेऊलवार, परभणी</strong>