‘२००२ साली काय झाले ते विसरून जाऊ या व हिंदू- मुस्लीम एकत्र येऊन सर्वाची व देशाची प्रगती करू या’ हे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ‘मुस्लीम बांधवां’ना केलेले आवाहन म्हणजे निवडणुकांचे स्वागत गीत आहे. मोठय़ा संख्येने असलेल्या मुस्लिमां शिवाय दिल्लीचे तख्त काबीज करणे अवघड आहे याची फक्त निवडणुकीपुरती असलेली जाणीव असे वदवून घेते.. पण हे पुतना मावशीचे प्रेम आहे हे न कळण्याइतपत मुस्लीम दुधखुळे आहेत असे मानण्याचा हा प्रकार आहे.
कट्टर मुस्लीम आपले घरदार व जन्मभूमी सोडून पाकिस्तानमध्ये निघून गेले. मागे राहिलेले मुस्लीम हे आपल्या मातृभूमीच्या प्रेमाने काही संपत्ती नसतानासुद्धा येथेच राहिले. बरे, यांच्या वंशवळींचा अभ्यास केला तर स्वातंत्र्यपूर्व काळात फार तर दोन किंवा तीन पिढय़ांपूर्वी यांपैकी अनेक जण हिंदू होते. अगदी बॅ. मोहमद अली जीना यांचे आजोबा पुंजाभाई हेसुद्धा हिंदू होते. ही गोष्ट भाजप म्हणजेच त्या वेळच्या जनसंघाने कधीच विचारात घेतली नाही. धर्माच्या आधारे देश खंडित झाल्याच्या रागाने हिंदुनिष्ठांची बुद्धी बधिर झाली व सर्वच मुस्लीम हे देशाचे दुश्मन आहेत हा मूलभूत विचार म्हणून स्वीकारला. तीन-चार पिढय़ांपूर्वी हिंदू असणाऱ्यांच्या पुढील पिढय़ांना कधीही आपले म्हणण्याची मानसिकता स्वीकारली नाही. तसेच त्यांना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्नच काय पण विचारही केला नाही. त्यामुळे समाज एकसंध करणे देशहिताचे आहे हे या जाज्वल्य देशप्रेमींच्या कधी लक्षातच आले नाही. ही दूरदृष्टी त्या वेळच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी दाखवली त्यामुळे स्वातंत्र्यानंतर कितीतरी निवडणुकांत काँग्रेसच्या पाठीशी मुस्लीम मतदार उभा राहिला.
जर आरएसएस या मातृसंस्थेच्या धोरणात जर काही बदल होत असेल व आपले धोरण परत नव्याने बदलायला तयार असेल तरच भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या मुस्लिमांना केलेल्या आवाहनाला काही अर्थ प्राप्त होईल.
प्रसाद भावे, सातारा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा