खान्देशातील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ बिकट आर्थिक स्थितीमुळे विविध समस्यांना सामोरे जात आहे. इतिहासविश्वाला एक वेगळी दिशा देणाऱ्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या निधनानंतर धुळे येथे त्यांच्या अनुयायांनी इ. वि. का. राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली. संशोधनाच्या कामी आर्थिक मदत व्हावी म्हणून स्थापन केलेली बँक बंद पडल्याने दशकभरापासून मंडळाला मिळणारी मदत थांबली.
शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसल्याने मंडळाने आजवर देणगीदारांच्या पाठबळावर इतिहास संशोधन व संशोधकांसाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. मंडळाच्या संग्रही शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्रांचा अमूल्य दस्तावेज, बखर, मध्ययुगीन काव्य, ज्योतिष व वैद्यविषयक ग्रंथ, पुराण व चरित्र आदींचा समावेश असलेली सहा हजार दुर्मिळ व मौल्यवान हस्तलिखिते आणि तीस हजार कागदपत्रे आहेत.
मंडळाच्या वस्तुसंग्रहालयाची अवस्थाही फारशी वेगळी नाही. संग्रहालयातील दुर्मिळ मूर्तीची योग्य पद्धतीने मांडणी करण्यासाठी मंडळास मदतीची गरज आहे. मंडळाने आजवर छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, शिवछत्रपतींची १०९ कलमी बखर, मराठय़ांच्या इतिहासाची साधने (खंड १ ते ११), शिवाजीची राजनीती, राजवाडे चरित्र, गीताई धर्मसार आदी ६० हून अधिक दुर्मिळ ग्रंथांचे प्रकाशन केले आहे. त्यातील काही संशोधनपर ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रती संपल्या असून त्यांचे पुनर्मुद्रण आणि भारतीय विवाह संस्थेचा इतिहास यांच्या इंग्रजी भाषांतरित ग्रंथांच्या पुनर्मुद्रणास तसेच पुरंदरे दप्तर खंड-४, खान्देश माळव्यांच्या इतिहासाची साधने, नागपूर राज्याच्या इतिहासाची साधने, बुंदेलखंडातील मराठय़ांचा कारभार मोगल दरबाराची बातमीपत्रे, दुसऱ्या रघुजीची खबर, खान्देश इतिहासाचा शोध आदी हे नवसंशोधित ग्रंथ निधीअभावी रखडले आहेत. प्रकाशनातील २० ग्रंथ ई-बुक्सद्वारे मंडळाने उपलब्ध केले असले तरी उर्वरित ग्रंथ त्या पद्धतीने करण्यासाठी आर्थिक निधीची उणीव भासत आहे.
आदिवासी संस्कृतीच्या दालनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि ऐतिहासिक छायाचित्रांसाठी ‘रॉयल गॅलरी’ उभारणीचे कामही निधीअभावी रखडले आहे. इच्छुकांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे या नावाने धनादेश काढावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा