बॉलीवूडची ‘हॉट आयटम गर्ल’ राखी सावंतला राजकारणात तात्पुरते बस्तान बसविण्यासाठी अखेर हक्काची जागा मिळाली. बिनधास्त आणि वादग्रस्त विधानांमुळे चंदेरी दुनियेत चर्चेत राहण्याची सवय झालेली राखी गेल्या काही वर्षांपासूनच स्वत:ला राजकारणात रुजविण्याचा प्रयत्न करीत होती. अण्णा हजारे यांना ‘सुपरमॅन’ ठरवून त्यांना भाऊ मानणाऱ्या आणि बाबा रामदेव यांच्याशी ‘स्वयंवर’ करण्याचा जाहीर मनोदय व्यक्त करणाऱ्या राखीची राजकारणाच्या तालावर नाचणारी पावले तेव्हाच दिसू लागली होती. लोकसभा निवडणुकीवर मोदी नावाची मोहिनी सुरू झाल्यावर लगोलग दिल्लीत भाजपच्या नेत्यांचे आशीर्वाद घेणारी आणि स्वत:ला ‘भाजपची बेटी’ म्हणविणारी ही ‘ड्रामा क्वीन’ उमेदवारीची स्वप्ने पाहातच मुंबईत परतली होती. मोदींच्या प्रचारासाठी मोफत ‘नमो चहा’ची ‘टपरी’ टाकण्याचे जाहीर करूनही तिला भाजपची उमेदवारी मिळालीच नाही. ‘केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंत बरी’ असे प्रशस्तिपत्र शिवसेनेच्या मुखपत्रातून मिळताच, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तिने थोरले भाऊ मानले आणि तेच आपले प्रेरणास्थान आहेत असे तिने जाहीरही करून टाकले. पण शिवसेनेकडूनही तिच्या राजकीय आकांक्षांना प्रतिसाद मिळालाच नाही. मग स्वत:चाच राष्ट्रीय आम पार्टी नावाचा पक्ष काढून ‘हिरव्या मिरची’ची निशाणी मिरवत निवडणूक लढविणारी आणि अनामतही गमावणारी ही कोटय़धीश अशिक्षित अभिनेत्री आता रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये दाखल झाली आहे. लोकसभेतील पराभवानंतर स्वत:च स्थापन केलेल्या या नवजात पक्षाचा राजीनामा देऊन विधानसभेच्या निवडणुकीआधी स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नातील राखीची राजकीय तळमळ अखेर रामदास आठवलेंनी जाणली. पक्षाच्या महिला शाखेचे राष्ट्रीय नेतृत्वही आता राखी सावंत करणार आहे. भाजप, शिवसेनामार्गे स्वत:च्या पक्षाच्या राजकीय प्रवासाचा अनुभव घेऊन निवडणुकीत जेमतेम दोन हजारांच्या आत मते मिळविणारी राखी आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने जाहीरपणे रंगवू लागली आहे. रामदास आठवले हे राजकीय नेते आणि कवी, अभिनेतेही आहेत. ‘इडियट बॉक्स’वर गाजलेल्या ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी राजकारणातील व्यग्रतेतून वेळ काढून आंदोलनही केले होते. कदाचित, रुपेरी दुनियेशी असलेल्या याच नात्यामुळे राखीला पक्षात प्रवेश दिला गेला असावा. असे करून आठवले यांनी महायुतीला गेल्या काही दिवसांपासून भेडसावणाऱ्या एका समस्येवर पर्यायी तोडगाही उपलब्ध करून दिला आहे. राखी सावंत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असू शकतात, असे आता आठवलेंनाही वाटू लागले आहे. लोकसभेच्या निवडणुका लढविताना भाजपप्रणीत रालोआने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यावर महायुतीत धुसफूसच सुरू आहे. महायुतीच्या अशा अडचणीच्या काळात रिपाइंमध्ये प्रवेश करणाऱ्या राखी सावंतने स्वत:ला मुख्यमंत्रिपदाची उमेदवार म्हणून जाहीर करून टाकले आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरील वाद मिटेपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा एक ‘राखी’व उमेदवार रिपाइंकडे तयार आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण अपयशानंतर विधानसभेच्या रिंगणात नव्या जोशात उतरलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात कुणी तरी ‘राखी’व गडी महायुतीला हवाच होता. निळा रंग धारण केलेल्या या हिरव्या मिरचीने राज ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करून ती चिंताही दूर केली आहे.
मुख्यमंत्रिपदाचा ‘राखी’व उमेदवार..
बॉलीवूडची ‘हॉट आयटम गर्ल’ राखी सावंतला राजकारणात तात्पुरते बस्तान बसविण्यासाठी अखेर हक्काची जागा मिळाली.
First published on: 30-06-2014 at 02:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant joins rpi say can be cm