राखी, गंडा, बंधन यांचे राजकारणाशी जवळचे नाते जुळणार असे भाकीत काही वर्षांपूर्वी कोणी केले असते, तर प्रतिगाम्यांच्या रांगेत बसवून त्या भविष्यवेत्त्याची यथेच्छ खिल्ली उडविली गेली असती. पण देशाचे राजकीय दिवस पालटले, तसतशी खिल्लीची जागाही कौतुकाने घेतली. गंडा, बंधन आणि राखी यांना राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, हे आता चक्षुर्वैसत्यम आहे. हा मुद्दा आला, की कुणाला राखी सावंतची आठवण येऊ शकते. राजकारणात सक्रिय झालेली पहिली राखी म्हणून महाराष्ट्रात तिचेच नाव सर्वतोमुखी आहे. तिकडे दिल्लीत केजरीवाल यांच्या सरकारातही अशाच एका राखीने आपलेही नाव राजकीय इतिहासात कोरून ठेवले होते. केजरीवाल यांच्या सत्तारोहणाचा जेवढा गाजावाजा झाला, तेवढाच त्यांच्या सरकारचाही होत राहावा यासाठी या राखीने- म्हणजे राखी बिर्लाने- पुरेपूर काळजी घेतल्याने तिचेही नाव देशात सर्वतोमुखी झाले. त्यामुळे, राजकारणात राखीची चलती असते, हे अधोरेखित झाले आणि लगेचच महाराष्ट्रात राखी सावंतने लोकसभा निवडणुकीच्या राजकारणातच उडी घेऊन दाखविली. याच काळात, धागाबंधनाचेही पीक फोफावले. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी शिवसेनेच्या शिवबंधनाची कितीही खिल्ली उडविली असली, तरी या धाग्याने राजकारणात आपला प्रभाव अजूनही टिकवून ठेवला आहे. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक दीपक केसरकर हे कालपरवा शिवसेनेत दाखल झाले, तेव्हा हीच शिवबंधनाची राखी त्यांच्या हातावर बांधली गेली होती. म्हणूनच, राखी आणि बंधन यांचे नाते राजकारणाने जेवढे घट्ट केले आहे, तेवढा घट्टपणा कदाचित, रक्षाबंधनाच्या घरगुती नात्यातही नसावा.. राजकारणातील रक्षाबंधनाला एक आगळेपण असते. येथे ज्याच्या मनगटावर राखी बांधली जाते, त्याचे हात किती लांब आहेत, हे अगोदर पाहिले जाते. अन्यथा हजारो जणांना रक्षणाची हमी देण्याची हिंमत कुणालाही शक्यच नाही. त्यासाठी, ज्याचे हात ‘वपर्यंत’ म्हणजे, जेथे सामान्यांची साधी नजरदेखील पोहोचणार नाही, तेथे पोहोचतात, त्याचे महत्त्व मोठे असते. अर्थात, एवढय़ा ‘वपर्यंत’ पोहोचण्यासाठी ते हातही लांब असावे लागतात. फक्त कायद्याचेच हात एवढे लांब असतात, अशी आजपर्यंतची साधी समजूत होती. पण आता लांब हातांचे अनेक जण आसपास दिसतात. अर्थात, हजारो राख्या हातावर बांधून घ्यायच्या असतील, तर हात लांब असलेच पाहिजेत. तोकडय़ा हातांवर हजारो राख्या बांधून घेताच येणार नाहीत, आणि तोकडय़ा हातांनिशी असा रक्षाबंधनाचा विक्रमदेखील प्रस्थापित करता येणार नाही. घाटकोपरचे मनसेचे आमदार राम कदम यांनी रक्षाबंधनाचा विक्रम प्रस्थापित करायचे ठरविले, जाहीर केले आणि त्या दृष्टीने कार्यवाहीदेखील सुरू केली, तेव्हा कुणालाच त्यांच्या या अभिनव उपक्रमाचा अचंबा वाटला नसेल. त्याचे कारण हेच असले पाहिजे. त्यांचे हात वपर्यंत कोठवर पोहोचत असतील, याची सामान्यांना कल्पना असणे शक्य नाही. पण रक्षाबंधनाचा विक्रम जाहीर करून त्यांनी एका गोष्टीचे संकेत दिले आहेत. हात लांब आहेत, हाच तो संकेत. शिवसेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनगटावर शिवबंधनाची राखी बांधून त्यांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली होती. आपल्या घरगुती रक्षाबंधनाचा एक वेगळा अर्थ असतो. मनगटावर राखी बांधणाऱ्या बहिणीच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही भावाकडून दिली जाते. राजकारणात मात्र, राखी बांधणाऱ्यांनी पाठीशी उभे राहावयाचे असते. राम कदम असोत नाही तर नवी मुंबईतील संजूभाऊ वाडे असोत.. त्यांच्या हातावर राखी बांधणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवावी लागणार आहे. ते त्यांचे नैतिक बंधन असेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा