दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा असो किंवा इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचा मुद्दा असो. राजकारणाच्या सोयीसाठी अचानक उफाळून येणाऱ्या आणि तितक्याच अचानकपणे मागे पडणाऱ्या काही वादांच्या अल्पजीवी काळातही, आपण काहीतरी बोललेच पाहिजे असा ज्यांचा समज असतो, त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे नेते रामदास आठवले हे अग्रक्रमाचे दावेदार ठरावेत. आठवले यांच्या पक्षाचे स्वरूप निवडणुकीच्या राजकारणात इतके आकुंचन पावले आहे, की त्याला स्वत:चे अधिकृत निवडणूक चिन्हदेखील उरलेले नाही. सत्ताकारणाच्या लांगूलचालनी वृत्तीमुळे आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची वळचणदेखील स्वप्नपूर्ती करू शकत नसल्याच्या जाणिवेतून आलेल्या वैफल्यामुळे आठवले यांनी नंतर ‘भगव्या युती’ची वाट धरली, हे सर्वश्रुत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजात घडविलेली परिवर्तनाची क्रांती भगवान बुद्धांच्या परिवर्तन क्रांतीनंतरची दुसरी मोठी क्रांती होती. आपल्या पश्चात या क्रांतीची धुरा समर्थपणे पेलवू शकेल आणि समाजातील प्रत्येकाला या क्रांतीची फळे मिळवून देईल असा नेता या चळवळीतूनच उभा राहावा ही त्यांची अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही, हे नेतृत्वाच्या वादात गुरफटून शकले पडलेल्या दलित चळवळीकडे पाहता स्पष्ट होते. सत्तासहभागाचे स्वप्न स्वत:पुरते साकारण्याचे राजकारण करणारे आठवले हे या नेत्यांपैकी एक! त्यांना आता नव्या सत्तासहभागाची स्वप्ने पडू लागली आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सावलीत मिळालेला सत्तेचा जेमतेम वाटा संपल्यानंतर ते शिवसेना-भाजप युतीच्या झेंडय़ाखाली आले, पण मुंबई-ठाणे महापालिका आणि राज्यातील अन्य निवडणुकांमध्ये सेना-भाजपला आठवलेंच्या ‘भीमशक्ती’चा फारसा फायदा न दिसल्याने, आठवलेंची आता पंचाईत झाली आहे. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तापलेल्या तव्यावर भाजून निघणाऱ्या पोळीच्या आपल्या वाटणीस येणाऱ्या वाटय़ावर कसेही करून सत्तेचे तूप पडावे यासाठी आता त्यांचा आटापिटा सुरू झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील मतांचे एकत्रीकरण झाले नाही, तर सत्तेची सावली आपल्या डोक्यावर येईलच याची शाश्वती नसल्याने या मतांच्या एकत्रीकरणाची गरज अखेर आठवले यांनाही पटली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना-भाजपसोबत येऊन काँग्रेसविरोधी मतविभाजन टाळावे यासाठी जेव्हा युतीचे अन्य नेते सतत प्रयत्न करत होते, तेव्हा या नव्या भागीदाराच्या सहभागाचा आपल्याला फटका बसणार या चिंतेने हैराण झालेले आठवले मनसेच्या सहभागास सातत्याने विरोध करत होते. महायुतीचे स्वरूप जितके विशाल होईल, तितका आपल्या सत्तासहभागाचा वाटा संकुचित होईल ही भीती त्यांना असणार, हे त्यांच्या आजवरच्या राजनीतीकडे पाहता साहजिकही आहे. महायुतीमध्ये मनसे सहभागी झाल्यास रिपाइंच्या सहभागाचा फेरविचार करू असा इशारा कालपरवापर्यंत देणाऱ्या आठवले यांना आता अचानक नवा साक्षात्कार झाला आहे. राज ठाकरे यांच्या सहभागाने काँग्रेस आघाडीविरोधातील मतांचे एकत्रीकरण मजबूत होईल व तसे झाले तरच सत्तासंपादनाचे स्वप्न सोपे होईल, हे आठवले यांना आत्ताच का आठवले असावे, यासाठी वेगळ्या विश्लेषणाची गरजच नाही. आपल्या इशाऱ्याला फारसे महत्त्वच दिले गेले नाही, तर सत्तासहभागाचे स्वप्नदेखील दुरापास्त होण्यापेक्षा, सत्तेचा मार्ग जास्तीत जास्त विस्तृत करण्यातच शहाणपण आहे, हे त्यांनी वेळीच ओळखले असावे. दुसरे म्हणजे, महायुतीमध्ये मनसेचा समावेश ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक ‘झाकली मूठ’ आहे. उद्या तसे झालेच, तर ही ‘सव्वा लाखाची’ झाकली मूठ उघडण्याचे श्रेय आपल्याला मिळून जाईल, असा तर त्यांचा होरा नसावा ना?
अखेर आत्ता आठवले..
दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा असो किंवा इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचा मुद्दा असो. राजकारणाच्या सोयीसाठी अचानक उफाळून येणाऱ्या आणि तितक्याच अचानकपणे मागे पडणाऱ्या काही वादांच्या अल्पजीवी काळातही, आपण काहीतरी बोललेच पाहिजे असा ज्यांचा समज असतो, त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे नेते रामदास आठवले हे अग्रक्रमाचे दावेदार ठरावेत.
First published on: 28-05-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale welcome raj thackerays mns in maha alliance