जालना जिल्ह्य़ाच्या भोकरदन गावातील एक घर सतत गजबजलेले असते. रावसाहेबांनी हातात हात मिळवावा, पाठीवर हात फिरवून विचारपूस करावी एवढीच त्या गर्दीतील प्रत्येकाची अपेक्षा असते. गेल्या जवळपास चार दशकांपासून जनसंपर्काचा हा आगळा सोहळा रावसाहेब दानवे पाटील यांच्या आसपास असाच पाहावयास मिळतो. त्याच भांडवलाच्या जोरावर रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत लढविलेल्या २३ पैकी २२ निवडणुकांमध्ये सलगपणे विजय मिळविला. हाडाचा शेतकरी असलेल्या रावसाहेबांचे एकत्र कुटुंब जवखेडा या मूळ गावी असते. मराठवाडय़ात भाजप रुजवायचा असेल, तर तेथे वजनदार मराठा चेहरा उभा राहिला पाहिजे या विचारातून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी रावसाहेबांचे नेतृत्व जाणीवपूर्वक उभे केले. राजकारणात भक्कम उभे राहायचे तर सहकार क्षेत्रात वर्चस्व सिद्ध केले पाहिजे, हे ओळखून रावसाहेबांनी सहकारी संस्थांचे जाळे उभारण्याचा ध्यास घेतला. जिल्हा बँकेचे चेअरमन, रामेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन, मार्केट कमिटी, खरेदी-विक्री संघ, सूतगिरणी, दूध संस्था आदी स्थानिक सहकारी संस्थांच्या कारभारावर रावसाहेब दानवे यांचा कायमचा ठसा आहे. जवखेडा गावातील भाजप शाखाप्रमुख, पक्षाचे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष अशा क्रमाने पक्षसंघटनेतील पदे भूषविणारे रावसाहेब दानवे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने, पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता सुखावला आहे. ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री हा त्यांचा सत्ताकारणातील प्रवास म्हणजे त्यांच्या कर्तबगारीचा आलेख आहे. राज्याच्या प्रश्नांची नेमकी जाण, सामाजिक मानसिकतेचे नेमके भान आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे सखोल ज्ञान हे तिहेरी भांडवल गाठीशी घेऊन रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मराठावाडय़ात मोदींचे काँग्रेसमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवेल, आपल्या ज्येष्ठतेच्या आणि अनुभवाच्या जोरावर पक्षसंघटना आणि राज्य सरकारातील मानापमानाच्या भावनेतून निर्माण होणारे पेचप्रसंग सहजपणे सोडवेल आणि प्रसंगी एखाद्याचा कानही पकडेल, अशा अपेक्षेने त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे. मोदी आणि अमित शहा यांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे रावसाहेब दानवे म्हणतात. राज्यात एक कोटी सदस्यनोंदणीला त्यांचा अग्रक्रम आहे. दानवे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या भाजपला नवा चेहरा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा